आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
सध्याच्या काळात शिक्षणाची किती गरज आहे हे तुम्हाला वेगळ्याने पटवून देण्याची गरज नाही. पण सध्या झालंय असं की मुलांना तर शिक्षणाची ओढ आहे, पण त्यांना दर्जेदार शिक्षण निरंतर मिळावे ह्यासाठी प्रशासन मात्र काहीही करत नाहीये.
आपल्या भारतातील शिक्षणव्यवस्थेबद्दल न बोललेलच बरं. बाराही महिने शिक्षण क्षेत्राशी निगडीत काही ना काही गोंधळ सुरु असतो, जो आपल्या देशाच्या उडालेल्या शिक्षणाच्या बोजवाऱ्याची साक्ष देत असतो.
फक्त भारतच नाही तर जगात असे अनेक देश आहेत जेथे शिक्षण व्यवस्थेमध्ये बऱ्याच त्रुटी आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शिक्षणासाठी त्यांना खूप कसरत करावी लागते.
अशीच कसरत होते मेक्सीकोमधील विद्यार्थ्यांची. अमेरिकन आणि मेक्सिको हे दोन वेगवेगळे देश, दोहो देश दोन सीमांनी विभागले गेले आहेत.
पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मेक्सिको आणि अमेरिकेच्या सीमेवर स्थिती काही शहरांमधील विद्यार्थी हे शाळेच्या अभावामुळे रोज अमेरिकेत शिकायला जातात. म्हणजेच रोज पहाटे लवकर उठा, बोर्डर क्रॉस करा आणि शाळेत जा अशी त्यांची स्थिती आहे!
शाळेत जाताना मुले अनेकदा गृहपाठ किंवा जेवणाचा डबा विसरतात. पालकांना त्यामुळे धावपळ करावी लागते.
एखादे मूल शाळेत जाताना पासपोर्ट विसरून गेले तर मात्र पालकांची अधिकच दमछाक होते. ते मागून धावपळ करत पासपोर्ट आपल्या मुलाजवळ पोहोचता करतात. मेक्सिकोमध्ये राहणारी ८०० पेक्षा अधिक मुले दररोज पासपोर्ट घेऊन अमेरिकेत शिक्षणासाठी जातात.
सीमेवर यांची दररोज तपासणी होते. मुले पासपोर्ट विसरली तर त्या दिवशी शाळा बुडते. ही अमेरिकन मुले मेक्सिकोच्या पालोमस येथे राहतात.
पालोमस, अमेरिकी शहर कोलंबसपासून ७ किलोमीटर अंतरावर आहे. न्यू मेक्सिकोने चार दशकांपूर्वी आपल्या नागरिकांच्या शिक्षणासाठी कायदा तयार केला होता.
या कायद्यामुळे त्यांच्या राज्यात मोफत शिक्षण मिळते. विद्यार्थी या अधिकारामुळे शिक्षणासाठी अमेरिकेत येतात.
ही मुले अमेरिकेत शिक्षण घेत असली तरीही पालकांना येथे येण्याचा अधिकार नाही. काही वर्षांपूर्वी हद्दपारी धोरणानुसार अमेरिकेतून मेक्सिकोमध्ये पाठवले होते. ११ वर्षीय जोहानादेखील रोज शिक्षणासाठी अमेरिकेला येते.
तिचे वडील जीसस रॉड्रिग्ज सांगतात की,
मी मेक्सिकन आहे. पत्नी एरियाना अमेरिकी आहे. पूर्वी आम्ही अमेरिकेत राहायचो. २००७ मध्ये सीमा पार करताना आम्हाला अटक झाली. आम्हाला निर्वासित ठरवण्यात आले.
मेक्सिकोमध्ये परतण्याशिवाय पर्याय नव्हता. सुरुवातीची ५ वर्षे मी मेक्सिकोत, पत्नी एरियाना व मुलगी जोहाना अमेरिकेत राहिले. न्यू मेक्सिकोच्या शिक्षण कायद्याची माहिती मिळाली. म्हणून मी पालोमसमध्ये स्थायिक झालो. पत्नी आणि मुलीलादेखील इकडे बोलावून घेतले.
टेक्सासमध्ये देखील मुले सीमापार करतात, मात्र तेथे शुल्क अनिवार्य आहे. अमेरिकन कस्टम अधिकाऱ्याच्या मते, शिक्षणासाठी दररोज मेक्सिकोतून येणे, ही काही नवी बाब नाही.
टेक्सासच्या अल-पासो व इतर परिसरातदेखील असे घडते. मात्र, येथे मोफत शिक्षण दिले जात नाही. ते शालेय शुल्क भरून खासगी शाळांत शिक्षण घेतात. पालोमसहून कोलंबसला येणाऱ्या अमेरिकी मुलांना शुल्क आकारले जात नाही.
इतके असूनही ही चिमुरडी मुले न चुकता रोज शाळेत जातात हे विशेष!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.