प्रभूरामासह ‘रावणवधाचे’ कारण ठरलेले `हे’ ६ शाप तुम्हाला नक्कीच ठाऊक नसतील
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
रावण हे आपल्या पुराणकथांमधील एक असे पात्र आहे, ज्याच्याबद्दल जाणून घेण्यास आजही लोक उत्सुक आहेत. काहींच्या मते तो दानव असला तरी मुळात क्रूर नव्हता, तो अतिशय ज्ञानी होता, पण त्याची मती भ्रष्ट झाली आणि त्याचा व्हिलन झाला.
रावण हे पात्र आपल्याला जीवनातील एक मूल्य देखील शिकवते, ते म्हणजे माणूस कितीही ज्ञानी असला, शक्तिमान, पराक्रमी असला तरी त्याने गर्व न करता नेहमी सत्याच्याच मार्गाने मार्गक्रमण केले पाहिजे. अन्यथा त्याचा रावण होऊ शकतो. रावणाने देखील नेमकी हीच चूक केली होती.
तिन्ही लोकांतील ज्ञानी पंडित म्हणून ओळख असतानाही केवळ स्वत: कमीपणा घेण्याछी त्याची सवय नसल्याने त्याचा सर्वनाश झाला. प्रभू रामांनी त्याचा वध करून जेव्हा जेव्हा अश्या प्रवृत्तींचा पापाचा घडा भरतो तेव्हा तेव्हा त्यांचा नाश हा अटळ असतो हेच दाखवुन दिले.
पण तुम्हाला माहित आहे का, केवळ प्रभू रामचं रावणाच्या वधाला कारणीभूत असे नव्हते, रावणाच्या जीवनात त्याला वेगवेगळे शाप देखील मिळाले होते, ज्यामुळे त्याचा मृत्यू हा अटळ होताच. चला तर पाहूया काय आहेत ते पुराणकथांमधील रावणाला मिळालेले शाप…..!
१) शूर्पणखाचा आपल्याच भावाला शाप
रावणाची बहिण शूर्पणखा तर तुम्हाला माहित आहेच, तिच्या पतीचे नाव विद्युतजिन्न होते. तो कालकेय नावाच्या राजाचा सेनापती होता. जेव्हा रावण अखिल जगावर विजय मिळवण्यासाठी मोहिमेवर निघाला तेव्हा कालकेय राजासोबत त्याचे घनघोर युद्ध झाले.
या युद्धामध्ये रावणाने आपल्याच बहिणीच्या पतीचा म्हणजेच विद्युतजिन्नचा वध केला. तेव्हा शोकाकुल शूर्पणखाने रावणाच्या भीतीने उघडपणे नाही तर मनातल्या मनात रावणाला शाप दिला की,
ह्या केलेल्या कृत्यामुळे तुझा सर्वनाश होईल.
२) वेदवतीचा शाप
रामायणातील काही नोंदीनुसार, रावणाकडे पुष्पक विमान होते, ज्यातून एकेदिवशी भ्रमण करताना त्याला एक रूपवान स्त्री दिसली. रावणाने तिची माहिती काढली, तिचे नाव वेदवती आहे असं त्याला कळले.
ती विष्णू देवांची निस्सीम भक्त होती आणि त्यांना आपल्या पतीच्या रुपात प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करत होती. रावणाने तिचे केस पकडले आणि तिला जबरदस्तीने आपल्या सोबत चलण्यास सांगितले. रावणाच्या ह्या हीन कृत्यामुळे संतापून तिने जागीच आपला देहत्याग केला आणि रावणाला शाप दिला की,
एका स्त्रीच्या चारीत्र्यावर घाला घालण्याचे हे हीन कृत्य केल्याबद्दल एका स्त्रीमुळे तुझा सर्वनाश होईल आणि त्याच वेदवतीने माता सीतेच्या रुपात दुसरा जन्म घेतला.
३) अनरण्य राजाचा शाप
रघुवंशामध्ये अतिशय पराक्रमी असा अनरण्य नावाचा राजा होऊन गेला. जेव्हा रावण अखिल जगावर विजय मिळवण्यासाठी मोहिमेवर निघाला तेव्हा अनरण्य राजासोबत त्याचे घनघोर युद्ध झाले. या युद्धामध्ये अनरण्य राजा धारातीर्थी पडला. परंतु प्राण त्यागण्यापूर्वी अनरण्य राजाने रावणाला शाप दिला की,
माझ्याच वंशातील एक तरुण तुझ्या सर्वनाशाचे कारण बनेल. पुढे त्याच्याच वंशामध्ये भगवान श्रीरामांचा जन्म झाला आणि त्यांनी रावणाचा वध केला.
४) नंदीचा शाप
एकदा रावण भगवान महादेवांच्या भेटीसाठी कैलास पर्वतावर गेला होता. त्याठिकाणी भगवान शंकरांचे वाहन नंदीला पाहून रावणाने नंदीच्या रुपाची, चेहऱ्याची खिल्ली उडवली आणि तो वानरासारख दिसतो अशी टिप्पणी केली. तेव्हा क्रोधीत झालेल्या नंदीने रावणाला शाप दिला की,
ज्या वानरांशी तू माझी तुलना करतोयस तीच वानर जात तुझ्या नाशाला कारणीभूत ठरेल.
५) मायाचा शाप
रावणाने ज्या प्रमाणे बाहेरच्यांची कधी कदर केली नाही, त्याचप्रमाणे आपल्या सख्ख्या नात्यातल्या लोकांची देखील त्याने कधी कदर केली नाही. आपल्या पत्नीची मोठी बहिण मायासोबतही त्याने कारस्थान रचले होते.
मायाचा पती ‘शंभर’ वैजयंतपुरचा राजा होता. एकदा रावण ‘शंभर’ राजाच्या भेटीला गेला. त्याठिकाणी रावणाने मायाला आपल्या बोलण्यात अडकवले आणि तो तिला आपल्या वशमध्ये करू लागला. ही गोष्ट जेव्हा ‘शंभर’ राजाला कळली तेव्हा त्याने रावणाला बंदी केले.
योगायोगाने त्याचवेळी शंभर राजाच्या राज्यावर दशरथ राजाने आक्रमण केले. दुर्दैवाने शंभराचा त्यामध्ये मृत्यू झाला. पतीच्या निधनाने व्याकूळ झालेली माया सती जाऊ लागली, तेव्हा रावणाने तिला स्वत: सोबत येण्यास सांगितले. तेव्हा क्रोधीत होऊन मायाने त्याला शाप दिला की,
तू वासनांध आहेस, तू माझे सतीत्व भंग करण्याचा प्रयत्न केला आहेस, कुठे न कुठे तू ही माझ्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत आहेस. तुझाही असाच रणांगणात मृत्यू होईल.
६) नलकुबेराचा शाप
अखिल जगावर विजय मिळवण्यासाठी जेव्हा रावण स्वर्गात पोहचला, तेव्हा तिथे रंभा नावाची अप्सरा त्याच्या नजरेस पडली. रावण हा वासनांध होताच, आहारी गेलेल्या रावणाने आपली लैंगिक भूक शांत करण्यासाठी तिला पकडले.
तेव्हा त्या अप्सरेने रावणाला विनवणी केली की, “तुम्ही मला स्पर्श करू नये, मी तुमचा मोठा भाऊ अर्थात कुबेर ह्याचा पुत्र नलकुबेराला माझे मन अर्पण केले आहे. त्यामुळे मी तुम्हाला तुमच्या पुत्रवधु समान आहे.
तरीही रावणाने तिचे काहीही न ऐकता तिच्यासोबत दुराचार केला. जेव्हा ही गोष्ट नलकुबेराला समजली तेव्हा त्याने रावणाला शाप दिला की,
रावणाने कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेशिवाय स्पर्श केला तर त्याच्या मस्तकाचे १०० तुकडे होतील.
तर असे होते हे शाप! जे रावणाने स्वत:च स्वत:च्या चुकीने स्वत:वर ओढवून घेतले आणि ज्याचे परिणाम त्याला पुढे भोगावे लागले.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.