आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
मागील भागाची लिंक : रामभटा जर जगात पांडुरंग असेल तर तुला तो मोठा दंड करील : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३८
====
गाथेचे इंद्रायणीत विसर्जन केल्यानंतर कान्होबादी मंडळींनी तुकोबांना घरी आणले, अंथरूणावर निजविले. लोकांना वाटले थोड्या वेळाने उठतील, पण तसे झाले नाही. ती रात्र तशीच गेली. दुसऱ्या दिवशी सकाळीही तुकोबा उठले नाहीत तेव्हा मात्र हळूहळू भयाचे वातावरण पसरू लागले. अशुभ शंका मनात येऊन लोकांचे जीव बेचैन झाले. वैद्यांना आमंत्रण गेले. वैद्यांना निदान होई ना. श्वास नाडी मंद चालत असले तरी आजाराचे असे काही चिह्न त्यांना दिसे ना. वहिनीबाई उसने अवसान आणून वेळ ढकलीत होत्या.
कान्होबांना दोन आघाड्या सांभाळाव्या लागत होत्या. घरी तुकोबांचा हा दीर्घ निद्रेचा प्रकार आणि नदीकाठावरची गर्दी, भेटायला येणारी असंख्य माणसे, चर्चा. त्यात चाललेली कीर्तने आणि अभंगांच्या नव्या बनत असलेल्या वह्या. त्यातून गावोगावचे तरूण येऊन इंद्रायणीत बुड्या मारीत होते आणि गाथा शोधीत होते. ती कुणाच्याच हाताला लागत नव्हती.
एक दिवस गेला, दुसरा तिसरा तसाच गेला. कान्होबा स्वतःला समजावीत होते, धीर धर. तुकोबांची ही निद्रा आपल्यासारख्यांची नव्हे. कदाचित ही समाधी असेल वा योगनिद्रा असेल. तसे नसते तर आजारी माणसाची चिह्ने मुखावर सहज उमटली नसती का? श्वासाची गती, नाडी मंदावत चालले असते. ज्या अर्थी सारे काही स्थिर आहे त्या अर्थी चिंता करण्यासारखे काही नाही. तू अस्वस्थ होऊन काय होईल? गाथा पुन्हा उभी करायचा घाट तू घातला आहेस ना? तिकडे लक्ष दे. तो संकल्प मोठा आहे आणि त्याचे जू तूच आपणहून खांद्यावर घेतले आहेस. तुकोबांची चिंता तू का करतोस? त्यांचा पांडुरंग आहे ना समर्थ? तो सांभाळेल त्यांना!
असे पांडुरंगाचे नाव मनात आले की कान्होबांना आता त्याचा राग येऊ लागला. ते म्हणू लागले –
बरा रे निर्गुणा नष्ट नारायणा । घरबुडवणा भेटलासी ॥
एके घरी कोणी कोणासी न धरी । ऐसी अपरांपरी केली आह्मा ॥
कान्हा ह्मणे कां रे निष्काम देखिलें । ह्मणोनि मना आले करितोसी ॥
काय रे नष्ट नारायणा, माझ्या भावासारखा निष्काम, काही न मागणारा मनुष्य भेटला म्हणून तू काहीही करतोस? काही घरांत एकाचे दुसऱ्याशी जमत नाही आणि एक दुसऱ्याचे तोंड बघत नसतात. आम्हा दोघा भावांत तू तसा अंतराय आणलास! लोक तुला निर्गुण म्हणतात पण प्रत्यक्षात तू तर घरबुडव्या निघालास!
कान्होबांची एकट्याचीच काही अशी भावना नव्हती. भेटायला येणारा प्रत्येकजण झाल्या प्रकाराने त्रस्त होत होता आणि चिडचिड करीत होता. आपापसांत बोलून झाले की शेवटी ही मंडळी कान्होबांपाशी येऊन आपल्या भावना व्यक्त करीत. त्यात संताप, असहायता, भीती अशा अनेक छटा असत. मग कान्होबा स्वतःच्या मनातील विचार बाजूला ठेवून त्यांची समजूत काढायचा प्रयत्न करीत.
चरफडें चरफड शोकें शोक होये । कार्यमूळ आहे धीरापाशी ॥
कल्पतसे मज ऐसें हें पाहातां । करावी ते चिंता मिथ्या खोटी ॥
न चुके होणार सांडिल्या शूरत्वा । फुकट चि सखा होईल हानी ॥
तुकयाबंधु ह्मणे दिल्या बंद मना । वांचूनि निधाना न पवीजे ॥
लोकहो, चरफड करून होईल काय? चरफड केल्याने चरफडच वाढत असते. शोक केल्याने शोकच वाढत असतो. आपण काही कार्य करतो आहोत ना? ते सिद्धीस कसे जाईल हे पाहा. त्याचे मूळ आपल्या धीर धरण्यात आहे. मी ही विचारकल्पना केल्या. तर माझ्या असे लक्षात आले की चिंता करणे मिथ्या आहे! चिंता करणे खरे नव्हे!
जे होणार आहे ते होणारच आहे, चुकणार नाही. असे असता संकटाला सामोरे जाण्यात जो शूरपणा आहे तोच आपण त्यागला तर हानीशी फुकट सख्य मात्र होईल! म्हणून हा तुकयाबंधू काय सांगतो आहे ते नीट ऐका. आपल्याला कार्यसिद्धीचे निधान गाठायचे असेल तर मनाचे बंद आवळून धरले पाहिजेत! दुसरा उपाय नाही!
लोकांना असे समजाविण्याचे काम केले म्हणून कान्होबांचे मन शांत राहात होते, धीर टिकत होता असे नाही. परंतु, अशा वेळी काय करावे तुकोबांनी आपल्या वर्तनातून अनेकदा शिकविले होते. तुकोबांकडील उपाय म्हटला तर सोपा होता. विठोबाशी भांडायचे. त्याच्याशी रुसवेफुगवे करायचे. काही मागायचे तरी त्याच्याकडेच. करूणा भाकायची तरी त्याचीच. कान्होबा तसेच करू लागले. विठ्ठलाशी भांडू लागले. त्याला एकदा नष्ट नारायण म्हणून झाले. आता त्यांनी नवीच भाषा काढली –
धदिंधदिं तुझ्या करीन धदिंड्या । ऐसें काय वेड्या जाणितले ॥
केली तरी बरें मज भेटीं भावास । नाहीं तरि नास आरंभिला ॥
मरावे मारावे या आले प्रसंगा । बरें पांडुरंगा कळलेंसावें ॥
तुकयाबंधु ह्मणे तुझी माझी उरी । उडाली न धरीं भीड कांहीं ॥
हे पाहा पांडुरंगा, तू माझी आणि माझ्या भावाची भेट घालून द्यावीस हे बरे. नसता मी तुझा नास आरंभला हे पक्के समज. मला हे कळले आहे की प्रसंगच असा आला आहे की एकतर तुला मारून टाकावे किंवा स्वतः मरावे. हा तुकयाबंधु त्या संघर्षास तयार आहे. त्या संघर्षाची त्याला भीड म्हणून नाही. एक तर तू उरी फुटशील नाही तर मी!
तर पांडुरंगा, धदिंड्या, तू ह्या वेड्याला अद्याप ओळखलेले नाहीस. तुझे धदिंधदिं करीन, तुझ्या चिंधड्या उडवीन हे विसरू नको!
भुक्ती मुक्ती तुझें जळो ब्रह्मज्ञान । दे माझ्या आणोनी भावा वेगीं ॥
रिद्धि सिद्धि मोक्ष ठेवीं गुंडाळून । दे माझ्या आणून भावा वेगीं ॥
नको आपुलियां नेऊं वैकुंठासी । दे माझ्या भावासी आणुन वेगीं ॥
नको होऊ काही होसील प्रसन्न । दे माझ्या आणून भावा वेगीं ॥
तुकयाबंधु ह्मणे पाहा हो नाहीतरी । हत्या होईल शिरीं पांडुरंगा ॥
हे पाहा पांडुरंगा, तुझे भुक्तीमुक्तीचे ब्रह्मज्ञान मला नको, माझा भाऊ तेवढा मला लवकर आणून दे. रिद्धिसिद्धिमोक्ष गुंडाळून ठेव पण माझा भाऊ तेवढा मला लवकर आणून दे. तुझ्या वैकुंठालाही मला नेऊ नकोस पण माझा भाऊ तेवढा मला लवकर आणून दे. इतकेच काय, तू माझ्यावर प्रसन्न होशील असेही काही करू नकोस! पण माझा भाऊ तेवढा मला लवकर आणून दे. पांडुरंगा, मी काय म्हणतो आहे ते पाहा बरं, नाहीतर तुझ्याच माथी हत्येचे पाप लागेल हे लक्षात ठेव.
असे विविध प्रकारे कान्होबा विठ्ठलाशी भांडत राहिले, त्याच वेळी अवसान आणून आणून लोकांना धीर देत राहिले पण जेव्हा पाच रात्री जाऊनही तुकोबा निद्रेतून बाहेर येईनात तेव्हा ज्याला चार दिवस धिक्कारीत राहिले त्याचाच कान्होबांनी काहीसा अनुनय सुरू केला –
बहु बोलणें न ये कामा । वाऊगें तें पुरूषोत्तमा ॥
एकाचि वचनें आह्मां । काय सांगणे ते सांग ॥
देणे आहे की भांडाई । करणे आहे सांग भाई ॥
आता भीड कांहीं । कोणी न धरी सर्वथा ॥
मागें गेलें जें होऊनी । असो तें धरित नाही मनीं ॥
आतां पुढे येथूनि । काय कैसा विचार ॥
सारखी नाही अवघी वेळ । हें तों कळतें सकळ ॥
तुकयाबंधु ह्मणे खळखळ । करावी ते उरेल ॥
हे पुरुषोत्तमा, मी बराच वावगा बोललो, त्याचा काही उपयोग झाला नाही. मला तरी तुला बोलायची भीड कशापायी असावी? माझ्यापाशी ती सर्वथा नाही! मुद्दा इतकाच आहे की तुझे देणे तू देणार आहेस की नाही? की भांडण करायचे?
प्रत्येक वेळ सारखी नसते हे तर मलाही सर्व कळते. पण मी म्हणतो, मागे झाले ते होऊन गेले, तुझा पुढील विचार काय कसा ते तरी कळू दे.
हा तुकयाबंधु म्हणतो, मी इतकी आर्जवे करूनही तू ऐकणार नसशील तर तू माझे देण्यास खळखळ केलीस असाच तुझा लौकिक उरेल.
कान्होबांचे आर्त सूर, करूण विलाप त्या पांडुरंगाला काही ऐकू जाईना. आणि तशा स्थितीत कान्होबांना एक कल्पना सुचली. ते मनात म्हणाले, आपण त्या निर्गुण निराकार पांडुरंगापाशी कशाला काही मागायचे? जो त्याचा साक्षात अवतार, तो अंथरूणावर त्याच्या योगनिद्रेत जर रमला आहे आणि त्यामुळेच जर आम्हाला त्याच्या जीवित्वाचा घोर लागलेला आहे तर त्याच्याच कानी का न लागावे? त्याचीच आळवणी का न करावी?
कान्होबांना एकदम उत्साह आला. ते तुकोबांच्या अंथरूणापाशी गेले आणि त्याच्यी कानापाशी लहान आवाजात म्हणू लागले –
दुःखें दुभागलें हृदयसंपुष्ट । गहिंवरे कंठ दाटताहे ॥
ऐसे काय केले सुमित्रा सखया । दिले टाकोनियां वनामाजी ॥
आक्रंदती बाळे करुणावचनीं । त्या शोके मेदिनी फुटों पाहे ॥
काय हे सामर्थ्य नव्हते तुजपाशी । संगे न्यावयासी अंगभूतां ॥
तुज ठावे आह्मां कोणी नाहीं सखा । उभयलोकी तुका तुजविण ॥
कान्हा ह्मणे तुझ्या वियोगें पोरटीं । जालों दे रे भेटी बंधुराया ॥
हे बंधुराया, बघ माझी अवस्था कशी झाली आहे! अतीव दुःखाने माझे हृदय दुभंगल्यासारखे झाले आहे. गहिवराने कंठ दाटून आला आहे. लक्ष्मणाने सीतेला वनांत टाकून दिले तेव्हा तिची जशी अवस्था झाली असेल तशी आमची येथे झाली आहे. येथे तुझ्या बाळांनी असा आक्रोश मांडला आहे की तो पाहून ही पृथ्वीही फुटून जाईल.
तू ज्या लोकांत सध्या गेला आहेस तिकडे आम्हांसर्वां अंगभूतांनाही नेण्याचे सामर्थ्य तुझ्या अंगात नव्हते काय? तुला कल्पना आहे की एक तुका सोडला तर आम्हाला येथे दुसरा कोणी सखा नाही. तुझ्या वियोगाने आम्ही अगदी पोरके झालो आहोत. म्हणून हा कान्हा तुला विनवितो आहे की भेट आता आम्हाला लवकर!
===
(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page