आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
म्हणतात की भविष्यात मनुष्य प्राण्याला पाणी, अन्न आणि अश्या कैक गरजेच्या वस्तूंचा तुटवडा भासणार आहे आणि त्याला कारणीभूत खुद्द माणूसच असेल. ज्या गोष्टींचा भविष्यात तुटवडा भासू शकेल असे भाकीत वर्तवले जात आहे त्यात इंधन देखील आले बरं का. कारण ज्या प्रमाणे जेवढ्या झपाट्याने गाड्यांचा बाजार वाढत आहे, असे पाहता येणाऱ्या काळात रस्त्यावर चालणारा माणूस क्वचीतच दिसून येईल. पण जस जसा मनुष्य वाहनाच्या आहारी जाणार आहे तस तशी त्याला इंधनाची कमतरता भासू लागणार आहे कारण वाहनांचा वापर तर वाढतोय, पण पेट्रोल, डीझेल सारख्या इंधनांचे साठे मात्र जैसे थेच आहेत. त्यात कच्च्या तेलासाठी देश देशांमध्येही अगदी भिडंत सुरु आहे. म्हणजेच एक प्रकारे या इंधनाचा प्रश्न येणाऱ्या काळात जागतिक पटलावर मोठी उलथापालथ घडवून आणू शकतो. हे सगळं टाळावं म्हणूनच त्यावर सध्या अनेक बुद्धीजीवी संशोधन करून उपाय शोधत आहेत. नवनवीन युक्त्या लढवत आहेत, जेणेकरून भविष्यातील किमान एक तरी समस्या कमी होईल. त्यांच्या गेल्या कित्येक वर्षांच्या मेहनतीला फळ आले असे म्हणावे लागले, कारण त्यांनी एक असा निष्कर्ष शोधून काढला आहे ज्याने संभाव्य इंधन कमतरता भरून निघेल. कसं म्हणून विचारताय? चला जाणून घेऊ.
शास्त्रज्ञांनी कार्बन डायऑक्साइड आणि सौरउर्जेचा वापर करून मिथेनॉल बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या इंधनाचा प्रयोग कारसह विमानातही केला जाऊ शकेल. कार्बन डायऑक्साइड गॅसने आता मिथेनॉल बनवले जाईल. हे मिथेनॉल कारसह विमानासाठी इंधनाचे काम करेल. इंधनाचा हा पर्यायी स्रोत बनवण्यासाठी सौरउर्जेची मदत घेण्यात येईल. या तंत्रज्ञानाचा यापूर्वी वापर करण्यात आला आहे, परंतु आता हे तंत्रज्ञान कमी पैशात मोठय़ा प्रमाणावर मिथेनॉल बनवण्यालायक विकसित केले जाईल. सौरउर्जेच्या मदतीने मिथेनॉल उत्पादनाचे अनेक फायदे असतील. मिथेनॉलची साठवणूक हा त्याचा मोठा फायदा आहे.
तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो हे मिथेनॉल इंधन बर्याचश्या रेसिंग कार्स मध्ये वापरले जाते. परंतु ते जागतिक पातळीवर इंधन म्हणून कितपत प्रभावी आहे याबद्दल अनेकांच्या शंका आहेत.
असो तर, मिथेनॉल बनवण्याचे तंत्रज्ञान हायड्रोजनद्वारे इंधनाच्या उत्पादनाशी निगडित आहे. हायड्रोजनची रासायनिक क्रिया केल्यावरच आधी मिथेनॉल मिळते. या तंत्रज्ञानात आधी पाण्याचे अणू तोडून हायड्रोजन आणि ऑक्सिजनला वेगवेगळे करण्यात येईल. त्यानंतर हायड्रोजन कार्बन डायऑक्साइडने क्रिया करून मिथेनॉलचे उत्पादन प्राप्त होईल. ही प्रक्रिया सौरउर्जेद्वारे तडीस नेण्यात येईल. याला ‘फोटोकेटेलिसिस’ असे म्हणतात. यामध्ये उर्जेचे थेट रासायनिक उर्जेत रूपांतर होते.
दीर्घकाळापासून सौरउर्जेच्या मदतीने हायड्रोजनचा इंधनाच्या स्वरूपात वापर करण्याबाबत संशोधन सुरू आहे. यामध्ये यशही मिळाले आहे. त्यामुळे हायड्रोजनला भविष्यातील इंधन असे म्हटले आहे. मात्र, हायड्रोजनची साठवणूक आणि वितरण करण्यामध्ये मोठा अडथळा आहे. त्यामुळे आता शास्त्रज्ञांनी आपले लक्ष मिथेनॉलच्या उत्पादनावर केंद्रित केले आहे.
आता तुमच्या मनात विचार येत असेल की ज्या प्रमाणे पेट्रोल आणि डीझेलच्या अतिवापरामुळे निसर्गावर, हवामानावर जो काही प्रतिकूल परिणाम होतो आहे त्यापेक्षा जास्त परिणाम मिथेनॉलच्या वापराने होणार नाही का? तर मंडळी नाही, हे तयार करण्यात येणारे मिथेनॉल पर्यावरणासाठी घातक नसेल असे म्हटले जात आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे सध्या ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार धरण्यात आलेला कार्बन डायऑक्साइड गॅस इंधनाच्या एका स्रोताच्या रूपामध्ये वापरात येईल. हे तंत्रज्ञान स्वस्त झाल्यावर पर्यायी उर्जेच्या एका प्रमुख स्रोताच्या रूपाने समोर येईल. त्याचा वापरही सोपा होईल.
हे सर्व लक्षात घेता असं म्हणण्यास हरकत नाही की मिथेनॉल जर खरंच पारंपारिक इंधनांना रामबाण पर्याय म्हणून पुढे आला तर भविष्य काहीसे कमी त्रासदायक असेल.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page