Site icon InMarathi

दुर्गा मातेच्या चारित्र्यावर घसरण्यापर्यंत विकृतीची मजल गेलीये, आणि “ते” नेहेमीप्रमाणे गप्प आहेत

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

नवरात्र सुरू आहेत. घट बसलेत. देवीची पूजा अर्चा होत आहे. अनेकांनी उपवास ठेवलेत. चहूकडे अनवाणी फिरणारे भाविक दिसताहेत. हे नऊ दिवस मंगल, पवित्र, प्रसन्न असायला हवेत. आणि ते असतातच!

घरच्या देवघरापासून ऑफिसच्या डेस्कपर्यंत आपण दुर्गा मातेच्या तंद्रीत असतो.

परंतु ह्या सुखावर विरजण टाकू बघणारे विकृत ही कमी नाहीत.

गुढी पाडवा – राम नवमी जवळ आली की श्री रामांवर टीका करा, कृष्ण जन्माष्टमीला कृष्णाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवा हे उपद्व्याप आता सर्वांच्या परिचयाचे झालेत.

आता विकृतांची नजर दुर्गा मातेवर पडली आहे.

दिल्ली विद्यापीठातील एका असिस्टंट प्रोफेसर ने दुर्गा मातेबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि हीन टिपणी करणारी पोस्ट फेसबुकवर टाकली. त्यावरून सोशल मीडियावर टीकेचं आणि विरोधाचं काहूर उभं राहिलंय.

ह्या प्रोफेसर विरुद्ध विविध ठिकाणी तक्रारी देखील नोंदवल्या गेल्या आहेत.

 

 

 

 

परंतु दुःखद गोष्ट ह्या माणसाची विकृती नाही.

माध्यमं आणि प्रस्थापित विचारवंतांचा ह्या विकृतीकडे बघण्याचा असलेला चुकीचा दृष्टिकोन दुःखद आहे.

सदर प्रकरणात “तक्रार करणारे” लोक कोणत्या राजकीय विचारधारेचे आहेत हे महत्वाचं आहे का? अजिबातच नाही. कोणताही सेन्सिबल माणूस सदर प्रकरणाबद्दल चीड व्यक्त करेलच. शक्य त्या पातळीवर तक्रार करेल.

परंतु माध्यमांना ह्या प्रकरणात तक्रार करणारे लोक “उजव्या विचारधारेचे आहेत” हे आवर्जून नमूद करावंसं वाटतं. असं का?

टाईम्स ऑफ इंडियाची बातमी काय म्हणते पहा :

 

 

The alleged remark has earned the ire of BJP’s student wing, Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP), which is demanding immediate suspension of the teacher, even as a complaint was lodged against him by other teachers of the college.

वरील वाक्यात भाजप चा उल्लेख अनावश्यक आहे. अभाविप हा उल्लेख आल्यावर भाजपच्या उल्लेखाची काय गरज?

त्या ही पुढे –

Kedar Mandal, an assistant professor of Hindi at Dyal Singh College, had allegedly updated his Facebook status where he used derogatory language for goddess Durga. Following this, Mandal’s colleagues, who are also members of the right-wing teacher’s body NDTF, filed a complaint against him at the Lodhi Road police station.

ह्या प्रोफेसरच्या सहकाऱ्यांनी पोलीस कम्प्लेंट नोंदवली आहे. त्यांच्या संघटनेचा आणि हळूच “राईट विंग” चा उल्लेख घुसवला गेलाय. हे देखील अनावश्यक आहे.

सदर प्रकरणाला माध्यमांनी विनाकारण आणि मुद्दाम राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करणं निषेधार्ह आहे.

लोकांच्या धर्म भावना राजकीय परिघापासून दूर जायला हव्यात हे आपणच अनेकदा म्हणत असताना, माध्यमांनी चटकदारपणाच्या मोहात असं वारंवार वागणं परस्परविरोधी आहे.

अर्थात हे झालं बिग बॅड मीडिया बद्दल. त्यांचा तर हा धंदाच आहे. प्रस्थापित बुद्धीजीवी, पुरोगामी लोक? त्यांचं काय?

सदर प्रकरणावर विचारी पुरोगाम्यांचं वर्तन अचंभित करणारं आहे. जिथे जिथे ह्या विकृतीचा विरोध झाला तिथे तिथे “दुर्लक्ष करा”, “पब्लिसिटी स्टंट आहे”, “आपण शहाण्यासारखं वागूया” असे उपदेश केले गेले.

एक अत्यंत महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की हा माणूस कुणी फुटकळ ट्रोल नाही. समाजावर काहीही प्रभाव नसलेला सामान्य फेसबुक्या नाही.

हा एक प्रोफेसर आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये कामाला आहे. आणि – हा स्वतःला फुले-आंबेडकर विचारांचा म्हणवतो.

त्याची फेसबुक बायो बरंच काही सांगून जाते.

 

तरुणांवर प्रभाव पाडत असलेला हा माणूस, स्वतःला फुले-आंबेडकर विचारांचा म्हणवणारा माणूस असं विकृत लिहीत असेल तर त्याबद्दल समाजातल्या जाणत्या, विचारी लोकांनी प्रखरपणे व्यक्त व्हायला हवं. ह्या विकृतीचा विरोध करायला हवा.

हा मुद्दा केवळ एका मूर्ख लेखकाच्या फेसबुक पोस्टचा नाही. इतर फेसबुक वीर आणि लिहू पहाणाऱ्या, विचार करू बघणाऱ्या तरुणांच्या वैचारिक दिशेचा आहे.

तरुणांवर प्रभाव पडू शकणारी व्यक्ती अशी विकृत असेल तर तिचा विरोध करायला नको का? ही विकृती पुरोगामी विश्वात खपवून घेतली जाणार नाही हे उच्चारवात सांगायला नको का? ही जबाबदारी प्रस्थापित विचारवंतांची नाही का?

जर अश्या विकृतांकडे “जाऊ द्या, वेडे आहेत” असं म्हणून दुर्लक्ष करायचं असेल तर उद्या चालून अख्खा समाज अश्या हीन पातळीवर उतरलेला बघण्याची तयारी करून ठेवावी लागेल. ते आम्हाला परवडणार आहे का?

गेल्या २-३ दशकात जातीजातींमध्ये फूट पाडण्याचं राजकारण महाराष्ट्रात बळ धरत जात आहे. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून ते संकट जाणते-अजाणतेपणे मोठं करू दिलं हा आपल्या विचारवंतांचा दोष आहे.

त्यांच्या पापाचं फळ अख्ख्या समाजाला भोगावं लागत आहे.

 

globindian.wordpress.com

लोकांना, उत्साही व परिवर्तनशील तरुणांना रस्ता-वीज-पाणी-आरोग्य-शिक्षण ह्या महत्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करता येऊ नये म्हणून भावना भडकवणारी वक्तव्यं, लिखाण सुरू आहे.

त्यांचा विरोध झाला नाही म्हणूनच आज खऱ्या समस्या जशास तश्या आहेत, वाढत जाताहेत, अधिक बिकट होताहेत. पण समाज जाती जातींच्या भांडणात अडकला आहे.

राजकारण्यांनी आणि समाजकंटकांनी त्यांच्या वृत्तीनुसार कार्यभाग साधला. विचारी पुरोगाम्यांनी त्याला हाणून का पाडलं नाही, हे विचारायची सोय नाही.

कोणत्याही धर्मातील अनिष्ट प्रथांवर आसूड ओढणे, समाजात प्रबोधन करणे वेगळं. धार्मिक भावनांचा जाणूनबुजून उपमर्द करणे वेगळं. हा फरक धूसर होऊन चालणार नाही. तो धूसर होणार नाही ह्याची काळजी समाजातील जाणत्यांनी घ्यायला हवी.

जर प्रस्थापितांना हे भान नसेल तर नवख्यांना पुढे यावं लागेल. स्वतःची जात-धर्म-भाषा-प्रांत आणि राजकीय मतभिन्नता देखील बाजूला ठेवून, अश्या विकृतांना एकमुखाने एक दिलाने सामोरं जावं लागेल. “ते” नेहेमीच गप्प बसणार असतील तर “आम्ही” आमचा बुलंद करू. आपापसातील मतभेद अश्या वेळी बाजूला सारून आम्ही सारे एक होऊ – हा विश्वास समाजाला दाखवावा लागेल.

तरुण पिढीचं हे सर्वात मोठं सामाजिक उत्तरदायित्व आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Exit mobile version