आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
वाळवंटात शेती होते का? असा प्रश्न जर तुम्ही कोणालाही विचारला तर मिळणारे बहुतांश उत्तर ‘नाही’ असे असेल. कारण वाळवंटाच्या मातीत ना पोषक घटक असतात, ना ती शेतीसाठी योग्य जमीन असते, त्यामुळे त्यात शेती करणे कठीण असेच सगळ्यांचे म्हणणे असेल, जे काही अंशी खरे देखील आहे. पण सध्याच्या प्रगत तंत्रज्ञान युक्त जगात काहीही अशक्य नाही हे देखील तितकेच खरे! आणि तुयाला शेती क्षेत्र सुद्धा अपवाद नाही. एकीकडे आपल्या भारतात सुपीक जमीन असून देखील निसर्गाच्या कोपामुळे आणि सरकारच्या उदासीनतेमुळे शेतीचे क्षेत्र उजाड झाले असताना दुसरीकडे ऑस्ट्रेलिया सारख्या देशात थेट विराण वाळवंटामध्ये चक्क ग्रीन हाउस उभारून शेती केली जात आहे. विश्वास बसत नाहीये? अहो मग हा चमत्कार तुम्ही जाणून घेतलाच पाहिजे.
ऑस्ट्रेलियातील पोर्ट ऑगस्टा सिटीतील वाळवंटात उभारले गेलेले हे पहिले असे ग्रीन हाउस आहे जेथे समुद्राच्या पाण्याने आणि सौर ऊर्जेच्या मदतीने भाज्या उगवल्या जातात. आता तुम्ही म्हणालं समुद्राच्या खाऱ्या पाण्याने शेती कशी केली जाते? तर त्यांनी समुद्रातील खारे पाणी सौर उर्जेच्या सहाय्याने शेतीपूरक बनवले आहे. ह्या ग्रीनहाउस प्रकल्पाचे नाव सनड्रॉप फार्म्स असून Seawater Greenhouse Australia Pvt Ltd या कंपनीमार्फत तो प्रकल्प चालवला जातो.
हे ग्रीन हाउस ५० एकरात पसरले असून त्याच्या निर्मितीसाठी १३३८ कोटी रूपये इतका खर्च आला आहे. येथे दरवर्षी १७ हजार टन भाज्या उत्पादित केल्या जाऊ शकतात. या ग्रीन हाऊसचे सीईओ फिलिप सॉमवेबर म्हणतात की,
ही जगातील पहिलीच अशी अॅग्रीकल्चरलची सिस्टम आहे ज्यात जीवाश्म ईंधन, भूजल, किटनाशकांचा उपयोग केला गेलेला नाही. हे पूर्णपणे ऑर्गेनिक फार्महाऊस आहे.
सध्या येथे टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षीच्या हंगामात तब्बल १७ हजार टनाचे उत्पादन घेतले गेले होते हे विशेष! ह्या फार्महाऊसला २३ हजार सोलर प्लेट लावल्या गेल्या आहेत. यात दिवसाला ३९ मेगावॅट वीज उत्पादित होते. एवढी वीज खाऱ्या पाण्याला गोडे करण्यासाठी आणि ग्रीनहाऊसला गरम ठेवण्यासाठी पुरेशी आहे.
ह्या ग्रीनहाऊससाठी जवळच्याच स्पेन्सर खाडातून २ किमी लांबीवरून पाईपलाईन टाकून समुद्रातील पाणी आणले आहे. वाळवंटात तापमान जास्त असल्या कारणाने येथील लहान रोपे वाचविण्यासाठी त्याच्या आसपास पाण्यात बुडवलेले कार्डबोर्ड ठेवले जातात. जमिन तापल्याने रोपे जळून जातात त्यामुळे येथील जमिनीऐवजी नारळाच्या भुश्यात ही रोपे लावली जातात. या प्रोजेक्टची सुरुवात २०१० मध्ये झाली. ओमान, कतार आणि यूएईमध्येही असे अनेक प्रोजेक्ट्सवर काम सुरु आहे. तर पोर्तूगाल आणि अमेरिका येथेही अशा प्रकारचे ग्रीनहाऊस उभारण्याची तयारी सुरु आहे.
भारतात देखील सौरउर्जेची काही कमी नाही तसेच भारताला समुद्रदेखील मुबलक प्रमाणात लाभलेला आहे. त्यामुळे आपल्या देशातही असा एखादा प्रकल्प उभारला जाऊ शकतो, जो नक्कीच आपपल्या शेती क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.