Site icon InMarathi

जगाला अणुयुद्धाच्या सर्वनाशापासून वाचवणाऱ्या “वन मॅन आर्मी” सुपरहिरोची अज्ञात कथा!

stanislav petrov 3 InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

जगातील सर्वात खतरनाक आणि धोकादायक शस्त्र म्हणजे अणुबॉम्ब, हे आपल्या सर्वाना माहीतच असेल. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा-नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ला केल्यानंतर जपानची अवस्था काय झाली हे संपूर्ण जगाने आपल्या डोळ्यांनी पाहिले.

त्यांच्यावर आलेले हे संकट इतर कोणत्याही देशावर येऊ नये असे प्रत्येक देशाला वाटले. कारण अणु हल्यामुळे हिरोशिमा-नागासाकीमध्ये घडलेली भयावह परिस्थिती पाहून संपूर्ण जग थक्क झाले होते.

 

 

या हल्ल्यामध्ये खूप जणांना आपले प्राण गमवावे लागले. या हल्ल्याचा परिणाम हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये जन्मलेल्या पुढच्या पिढीला देखील भोगावा लागला. एवढे होऊन देखील जगामध्ये आता अणुयुद्ध होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

आज आपण अशा एका माणसाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्यामुळे जगात अणुयुद्ध होण्यापासून टळले आणि त्यांच्यामुळे जगात होणारी सर्वात मोठी हानी होण्यापासून थांबली.

 

 

स्टॅनिस्लव पेट्रोव (Stanislav Petrov) हे नाव कदाचित तुम्ही ऐकले नसेल. स्टॅनिस्लव यांच्यामुळेच USSR म्हणजेच सेव्हियत संघाने अमेरिकेवर अणुहल्ला केला नाही. ते USSR चे मिलीट्री ऑफिसर होते.

स्टॅनिस्लवची गोष्ट एका डॉक्युमेंट्रीमधून मांडण्यात आलेली आहे. या डॉक्युमेंट्रीचे नाव ‘द मॅन हू सेव्हड द वर्ल्ड’ हे आहे. या डॉक्युमेंट्रीला २०१४ मध्ये प्रदर्शित केले गेले.

एवढी प्रसिद्धी मिळाली असूनदेखील स्टॅनिसलव हे खूप साधे जीवन जगत होते. एवढे साधे की, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर कितीतरी महिन्यांनी जगाला त्यांचा मृत्यू झाल्याचे कळले.

 

 

१९ मे रोजी स्टॅनिस्लव यांचा मृत्यू झाला होता. पण जगाला त्यांच्या मृत्यूची बातमी आता सप्टेंबरला कळली, जेव्हा ७ सप्टेंबरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जर्मनीच्या पॉलिटीकल अॅक्टीविस्ट कार्ल शुमाकरने (Karl Schumacher) त्यांना फोन केला आणि तेव्हा स्टॅनिस्लव यांच्या मुलाने त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली. स्टॅनिसलव यांच्या मृत्यूचे कारण अजून देखील समजलेले नाही.

 

 

२६ सप्टेंबर १९८३ रोजी स्टॅनिस्लव आपल्या ड्युटीवर होते, मध्य रात्री त्यांनी रडारवर पाहिले कि USSR कडे एक मिसाईल येत आहे. त्यानंतर त्यांनी अजून ४ मिसाईल लाँच झाल्याचे संकेत दिसले.

त्यावेळी त्यांना काय करावे हेच समजत नव्हते, पण त्यांनी आपल्या २०० सहकर्मचाऱ्यांना कोणतीही चिंता न करता शांत बसण्यास सांगितले.

त्यावेळी त्यांच्या समोर असलेल्या स्क्रीनवर ‘स्टार्ट’ लिहिलेले होते. जर त्यांनी ते बटन दाबले असते, तर त्याचा अर्थ असता की, अणु हल्ल्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

त्यांच्याकडे विचार करण्यासाठी खूप कमी वेळ होता. एवढ्या तणावामध्ये असून देखील त्यांनी संयमाने काम केले. त्यांना हे देखील ठरवायचे होते की, हा धोका खरा आहे की नाही.

 

त्यांनी आपल्या ऑफिसरना फोन केला आणि सांगितले की,

अलार्म सिस्टमच्या गडबडीमुळे वाजला आहे आणि घाबरण्याचे काही कारण नाही.

एका वर्तमानपत्राशी वार्ता करताना त्यांनी सांगितले होते की,

मला कोणत्याही प्रकारची चूक करायची नव्हती. मला एक निर्णय घ्यायचा होता आणि तो मी घेतला.

नंतर हे समजले की, कर्नल स्टॅनिस्लव हे बरोबर म्हणत होते. जे सेव्हियत संघाच्या रडारवर दिसले होती, ती सूर्याची किरणे होती. अमेरिकेने टाकलेल्या मिसाईल नव्हत्या.

 

 

त्यावेळी घेतलेल्या त्या ऐतिहासिक निर्णयासाठी स्टॅनिस्लव यांची  प्रशंसा करण्यात आली. त्यांच्या सुपीरियर्सना सिस्टममध्ये झालेल्या गडबडीमुळे चांगलेच खडे बोल सुनावले गेले. १० वर्षापेक्षा जास्त काळ स्टॅनिस्लव यांची ही कामगिरी जगापासून लपवून ठेवण्यात आली होती.

एवढेच काय, तर त्यांच्या  घरच्यांना देखील याबद्दल काहीच कल्पना नव्हती. अश्या महान माणसाच्या जीवनामध्ये एक असा काळ देखील आला, जेव्हा त्यांना बटाटे उगवून आपले घर चालवावे लागले.

 

 

१९९८ मध्ये कर्नल जनरल युरी व्हॉटिन्स्टेस्टने रिपोर्ट्सना स्टॅनिस्लवच्या निर्णयाविषयी सांगितले. त्यानंतर स्टॅनिस्लव यांच्यावर पुरस्कारांचा वर्षाव होऊ लागला. २०१३ मध्ये त्यांना ड्रेसन पीस प्राईजने नावाजले गेले होते.

जर त्यावेळी खरच USSR वर अणु हल्ला झाला असता, तर त्यांच्या जीवनाचे चित्र काही वेगळेच असते. असे हे महान नाव आज ह्या जगात नाही आहे. पण त्यांच्या जाण्याची खंत संपूर्ण जगाला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version