आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
नोव्हेम्बर २०१६ मध्ये रेल्वेतील सुधारणांचा एक अनुभव आला. त्यावर मी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. पोस्ट अशी :
===========
मोदी द्वेष्टयाना, ते कुणा विरुद्ध बोंबाबोंब करत आहेत, हे कळत नाहीये.
आज तपोवन एक्सप्रेसने बाबा औरंगाबादला गेलेत. दीड वाजता त्यांनी आमच्या फॅमिली व्हाट्सअप ग्रूपवर मेसेज टाकलाय:
—
तपोवनमध्ये नेहमीसारखी तोबा गर्दी. अशा परिस्थितीत बोगीचे संडास चोकअप. काहीवेळेने ते घाण पाणी बोगीत येऊ लागले.
रेल्वे कंप्लेंट नंबरला मेसेज केला. त्यांनी दखल घेऊन नवीन नंबर दिला. त्यांना मेसेज पाठवला.
अर्ध्या तासात स्वीपर मला शोधत आला व सफाई केली.
त्रासातही दखल घेतल्याने दिलासा वाटला!
जय हो मोदीजी
जय हो सुरेश प्रभुजी!!
—
हे असं आहे.
विशेष म्हणजे माझे बाबा कुणाला सहज “जय” करणारे नाहीत. कट्टर भगव्यांच्या धिंगाण्याला नेहमी शिव्या घालत असतात. सध्याच्या करन्सी चेंजमुळे खुश आहेत पण फक्त मिसमॅनेजमेंटमुळे होत असलेल्या त्रासाचा रागही आहे. माझ्या activism बद्दल नेहेमी काळजी व्यक्त करणारे, चावडी-व्हाट्सअप वरील गप्पा आणि मतदान एवढाच राजकारणाशी संबंध असणारे माझे वडील आज “जय हो मोदीजी” म्हणत आहेत.
असे मेसेजेस नेहेमी येतात. पण आज पहिल्यांदा हा अनुभव माझ्या विश्वासातील माणसाकडून कळालाय आणि त्याचा इन्स्टंट (आणि बहुतेक लॉंग लास्टिंगसुद्धा!) इफेक्ट सुद्धा दिसलाय.
ह्या पार्शवभूमीवर मोदी विरोधक/टीकाकार पोरकट भासतात. उथळ मुद्दे, लोकांच्या भावनेशी-प्रश्नांशी तुटलेली नाळ आणि दांभिक पुरोगामीत्व वा बुद्धीप्रामाण्याची आत्म प्रौढी ह्या सर्वांचं चमत्कारिक मिश्रण ह्या द्वेष्टयांमधे आढळतं. मोदींचं कॅबिनेट लोकांचे रोजचे प्रश्न सोडवत आहे आणि हुच्च लोक अभिव्यक्ती, आणिबाणी, सेक्युलरिझम अश्या दिखाऊ टिमक्या वाजवत आहेत.
थोडक्यात, अजून तरी वर्तमान सत्ताधाऱ्यांवर सकारात्मक दबाव निर्माण करणाऱ्यांची पोकळी आहे.
भक्तांसाठी आनंदाची गोष्ट आहे. देशासाठी काळजीची.
===========
वर म्हटल्याप्रमाणे, ही पोस्ट नोव्हेम्बर २०१६ ची आहे. (इच्छुकांनी फेसबुकवर ही मूळ पोस्ट इथे क्लिक करून वाचावी.) दुःखद गोष्ट ही आहे की सप्टेंबर २०१७ मध्ये, अजूनही, ही परिस्थिती बदलेली आहे असं म्हणवत नाही.
राहुल गांधी अधिकाधिक मॅच्युरिटी आणि गांभीर्य ही अत्यंत समाधानाची बाब – हा एकमेव अपवाद. संपुर्ण विरोधकांच्या प्रतलाचा विचार करता फारशी समाधानकारक परिस्थिती नाही, आणि हे देशहिताच्या दृष्टीने गंभीर आहे.
“महापुरुषांचा पराभव त्यांचे अनुयायी करतात” ह्या प्रमेयाचं उलट रूप – “महापुरुषांचा विजय त्यांचे विरोधक करतात” – हे देखील तंतोतंत खरं आहे. अर्थात, महापुरूष कोण – ह्यावर फेसबुकी महायुद्ध घडू शकतं, त्यामुळे त्या ऐवजी “प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्ती” म्हणूया. आज जे जे ऐतिहासिक लोक प्रचंड चर्चेत आहेत, ते सर्वच्या सर्व त्यांच्या विरोधकांमुळेच!
मोदीजी महापुरूष किंवा ऐतिहासिक व्यक्ती नाहीत. पण हा “Modi Phenomenon” उभ्या भारतात २४ तास घडवून आणण्यात भक्त ब्रिगेडपेक्षा जास्त सहभाग मोदी विरोधकांचा आहे. “मोदी विरोध” त्यांची मोठी चूक ही नव्हे – चुकीच्या मुद्द्यांवर विरोध – ही आहे.
आधार कार्ड, स्वच्छ भारत अभियान, पढेगा इंडिया तो बढेंगा इंडिया आणि मोदींनी डॉक्टरांना केलेलं “आठवड्यातून एक दिवस मोफत सेवा पुरवा” हे आवाहन – ह्या चार मुद्द्यांवर देशभरात घमासान व्हायला हवं होतं. पण द्वेष्टयांची इच्छा केवळ “हंगामा” करण्याची आहे खरे प्रश्न सोडवण्याची नाही. तिथे ते माती खातात.
ज्या आधार सिस्टीमबद्दल भाजप अन अक्ख्या राईट विंग ने टीकेची झोड उठवली होती, त्यांनी “कुठलेही बदल न करता” तीच सिस्टीम देशभरात मजबूत केली.
शहरांच्या स्वच्छतेची जबाबदारी ज्या सिस्टीमची आहे, त्या सिस्टीमला हात नं लावता, आमच्या देशाच्या पंतप्रधानाने लोकांनाच हातात झाडू घेण्यास प्रोत्साहित करणं हे गंभीर आजाराला जुजबी पेन किलर देण्यासारखं आहे – असं एकही मोदी विरोधक बोलत नाही. (इथे प्रबोधन महत्वाचं नाही – असं म्हणणं नसून, ते “पुरेसं” नाहीये – हा मुद्दा आहे.)
शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्राबद्दल तर मोदी सरकारवर ओढावेत तेवढे कोरडे कमीच.
आपल्या सरकारी शाळा आणि दवाखाने भग्न अवस्थेत पोहोचल्या आहेत. डी एड, बी एड मधे धड ट्रेनिंग होत नाही, शिक्षकांची रिक्रुटमेंट हफ्ता दिल्याशिवाय होत नाही हे रस्त्यावरील चित्र आहे. सरकारी दवाखान्यांच्या दुरावस्थेबद्दल, तिथल्या डॉक्टरांच्या अडचणींबद्दल बोलावं तेवढं थोडंच.
आणि मोदी सरकार काय करतंय? ज्या देशात ६०% लोक मोफत शिक्षण आणि वैद्यकीय सुविधांवर कसेबसे तग धरून आहेत, त्या देशात – खाजगी शाळा आणि इस्पितळांसाठी शेतजमिनी विकण्याचा मार्ग मोकळा करत आहेत. (संदर्भ – भू अधिग्रहण कायदा!)
भारतासारख्या देशात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात “सरकार” हाच सर्वात मोठा आणि सशक्त प्लेयर हवा – हे कळण्यासाठी किती अक्कल लागते?!
(टीप: सरकार ने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात कायमस्वरूपी राहू नयेच. फक्त आज हे लक्षात घ्यायला हवं की भारतीय लोकसंख्येच्या खूप मोठा भाग अजून आर्थिक दृष्ट्या एवढा सक्षम नाहीये की कुटुंबाच्या शिक्षण व आरोग्याच्या गरजा भागवू शकेल. ह्या सेवा फुकट देत रहाणं कधी ना कधी बंद करायलाच हवं. पण ती वेळ अजून आली नाहीये.)
मोदी भक्त ह्या सर्वांवर गप्प बसतील. बसू देत – विरोधकांनी ह्यावर मूग गिळून गप्प का बसावं?
जे लोक “मीं कुठल्यांही कम्पूचा नांही हां!” असा गर्व बाळगतात, ते ह्यावर कुठे बोलताहेत?! पण सर्वजण, एकजात – सैनिकांच्या शौर्यावर / नोटबंदी वर / गांधीजींच्या कॅलेंडर वर स्वतःची पोळी भाजत आहेत!
मोदींनी आज पर्यंत जे जे योग्य केलंय – परदेश वाऱ्या ते सर्जिकल स्ट्राईक – त्या सर्वांवर हे लोक आरडाओरडा करतात. जिथे मोदी सरकार खरंच चुकतंय, त्यावर सर्व गप्प! प्रस्थापित विरोधक जर ह्यात कमी पडत असतील तर माध्यमांनी, सजग नागरिकांनी हे मुद्दे सतत उचलून धरले पाहिजेत. विरोधकांना (आणि शक्य झाल्यास सरकारलंसुद्धा) महत्वाच्या मुद्द्यांकडे वळवलं पाहिजे. २०१९ च्या तयारीला विविध पक्ष लागतीलच…पण आता —
नागरिकांनीसुद्धा तयारीला लागलं पाहिजे!
कारण, “मोदींना पर्याय कोण?” इतकाच “विरोधकांना पर्याय कोण?” हा प्रश्न महत्वाचा आहे.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.