आधी टॅक्स भरा आणि मग अत्यंस्कार करा, असा अजब नियम असलेल्या गावाची कथा ऐकून चक्रावून जाल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
माणसाचा मृत्यू हा कधी आणि कसा येईल, हे कोणालाही ठाऊक नसते.
पण मृत्युनंतर अंतिम संस्कार पूर्ण विधीपूर्वक व्हावेत ही परंपरा शतकानुशतके सुरु आहे. मनुष्याचे योग्यप्रकारे अंतिम संस्कार न झाल्यास त्याला मुक्ती मिळत नाही, असा लोकांचा समज आहे.
कितीतरी लोक तर आयुष्यभर मरणानंतर आपल्याला मोक्ष मिळावा, आपल्याला स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून अधिकाधिक पुण्य करण्याचा प्रयत्न करतात.
कुणी देवधर्म करते, कुणी सेवा करते, तर कुणी दानधर्म. कारण सर्वांनाच ह्यात असताना जशी सुखाची अपेक्षा असते तितकीच मृत्यूनंतरच्या सुखाचीही.

त्यासाठीच मृत्यूनंतरच्या संस्कारांना अधिक महत्त्व दिले जाते.
अनेकदा तर पूर्वजांचे अंतिम संस्कार व्यवस्थित पार पडले नाहीत म्हणून आपल्या जीवनात अडचणी येतात असाही विश्वास असतो. मग कितीतरी पिढ्यांपूर्वीच्या नातेवाईकांचे अंतिम संस्कार पुन्हा पार पाडले जातात.
तसेच, जुन्या धार्मिक आणि पौराणिक विचारांनुसार काशी हे हिंदू धर्मातील पवित्र क्षेत्र मानले जाते. काशीच्या मणिकर्णिका इथे मनुष्याचे अंतिम संस्कार झाल्यास त्याला मोक्ष प्राप्त होतो, असा समज आहे.
यामागे एक कथा रूढ आहे. असे म्हणतात की भगवान विष्णूने खूप वर्ष तपश्चर्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले. आणि अशी विनंती केली की सृष्टीचा नाश झाला तरी वाराणसी म्हणजेच काशीला नष्ट करू नये.
त्यामुळे भगवान शिव आणि पार्वती स्वतः काशीला आले आणि त्यांनी विष्णूची मनोकामना पूर्ण केली.
याच कारणास्तव हिंदूंमध्ये हे स्थान अतिशय पवित्र मानले जाते. या ठिकाणीच आपले अंत्यसंस्कार व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. विशेष म्हणजे त्यासाठी पूर्वनोंदणी सुद्धा केली जाते.
हे जगातील एकमेव स्मशान आहे, जिथे कधीही चितेची आग थंड होत नाही. कारण येथे दरदिवशी जवळपास ३०० प्रेतांचे अंतिम संस्कार केले जाते.
पण येथे मृत शरीराच्या अंतिम संस्कारासाठी देखील कर आकारला जातो.
विश्वास बसत नाही, पण हे सत्य आहे.
चला तर जाणून घेऊया की, अंतिम संस्कारासाठी कर आकारण्यामागे काय इतिहास दडलेला आहे.

मणिकर्णिका घाटावर अंतिम संस्कार करण्यासाठी कर वसूल करण्याची परंपरा जवळपास तीन हजार वर्ष जुनी आहे.
असे मानले जाते की, तेव्हापासून या स्मशानामध्ये सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी डोम जातीच्या लोकांवर होती. त्यावेळी डोम जातीच्या लोकांकडे रोजगार मिळवण्याचे कोणतेही साधन नव्हते, त्यामुळे अंतिम संस्कार करतेवेळी त्यांना दान देण्याची परंपरा होती.
- मृत्यूच्या समीप असलेल्या माणसाच्या मनामध्ये नक्की काय विचार चालू असतात ?
- तृतीय पंथीयांच्या अंत्यसंस्काराचा विधी दाखवून देतो की, त्यांची मृत्यूनंतर देखील हेटाळणी थांबत नाही!
पण त्या काळामध्ये डोम जातीचे लोक आजच्यासारखे कोणतीही किंमत सांगून वसूल करत नसत आणि पैसे कमावण्याचे चुकीचे मार्ग देखील वापरत नसत.
अंतिम संस्कार करण्यावर कर आकारण्याच्या परंपरेची सुरुवात राजा हरिश्चंद्राच्या कालखंडामध्ये झाली होती.
त्या काळामध्ये हरिश्चंद्राने एका वचनाचा मान राखण्यासाठी आपली राजगादी आणि राज्य सोडून डोम लोकांचे पूर्वज कल्लू डोम याच्याकडे चाकरी केली होती.
दरम्यान राजा हरिश्चंद्राच्या मुलाचा आकस्मिक मृत्यू झाला आणि आपल्या मुलाच्या अंतिम संस्कारासाठी राजाला कल्लू डोमकडे परवानगी मागावी लागली.
कारण दान न देता, त्यावेळी देखील अंतिम संस्कार करण्याची परवानगी नव्हती.
त्यामुळे राजा हरिश्चंद्राला नाइलाजाने आपल्या पत्नीच्या साडीचा तुकडा दक्षिणा म्हणून कल्लू डोमला द्यावा लागला आणि त्या वेळेपासूनच अंतिम संस्कार करण्याच्या बदल्यात कर मागण्याची परंपरा अजूनच रूढ झाली.
त्याच परंपरेचे काहीसे बिघडलेले आधुनिक रूप आज आपल्याला मणिकर्णिका घाटावर दिसून येते.

आज हा येथील लोकांचा व्यवसाय झाला आहे. स्मशानाच्या प्रत्येक कोपऱ्यांवर नियमानुसार डोम कुटुंबीयांनी हेर पसरवले आहेत.
त्यांची नजर स्मशानामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रेत यात्रेकडे असते, त्यावरून ते ठरवतात की, कोणत्या पार्टीकडून किती पैसे वसूल करायचे.
उपरोक्त डोम कुटुंबीयांच्या गोष्टींवर विश्वास ठेवल्यास, जुन्या काळामध्ये त्यांच्यावर धन-संपत्ती उडवणाऱ्या श्रीमंत लोकांची कमी नव्हती.
डोम जातीतील लोकांचा दावा आहे की, त्या काळामध्ये अंतिम संस्काराच्या बदल्यात त्यांना राजवाडे जमीन, संपत्तीच नाही, तर सोने-चांदी देखील देत असत.
पण आताच्या काळामध्ये ठरवलेली रक्कम मिळवण्यासाठी देखील स्मशानामध्ये येणाऱ्या लोकांशी वाद घालावा लागतो. असे म्हणणे डोम लोकांचे आहे.

अशाप्रकारे सध्याच्या व्यावहारीक काळात व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मृतदेहाच्या अंतिम संस्कारांसाठी देखील पैसा लागतो. व्यक्तीच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याच्या संस्कारांची किंमत किती असावी यावरून वादविवाद होतात.
असे समजले जाते की जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हे सर्वात मोठे दुःख असते. पण इथे परिस्थिती काहीशी निराळी दिसते.
इथे व्यवहाराला अधिक महत्त्व प्राप्त होते. मृत्यूनंतर मोक्ष मिळेल या अपेक्षेने इथे अंतिम संस्कार व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. पण त्या व्यक्तीच्या पश्चात थोड्याशा जागेसाठी सौदा करण्याची वेळ येते.
थोडक्यात इथे दुःखापेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा ठरतो.
ही जागा बघणाऱ्यांना सुद्धा या गोष्टीची जाणीव होते. कधी ना कधी मरण येणारच हे इथे येणाऱ्या प्रत्येकाला स्विकारणे तर भाग पडतेच. पण आपल्या पश्चात आपल्याला कशी वागणूक मिळेल हे आपल्या हातात नाही.
त्यामुळे खरंच मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करत राहावेत की आहे ते जीवन व्यवस्थित जगावे हा विचार करण्यास ही जागा प्रवृत्त करते.
अशी आहे भारतातील परिस्थिती, जेथे मेल्यानंतर ही माणसाला अंतिम संस्कारासाठी कर द्यावा लागतो. आता तुम्हीच ठरवा ही प्रथा किती चूक आणि किती बरोबर..!
–
- हा भारतीय सैनिक मृत्यूनंतर देखील चिनी सैनिकांच्या छातीत धडकी भरवतोय!
- मृत्यूनंतरही आपली नखे आणि केस खरंच वाढत असतात का? जाणून घ्या..
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.