आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त जयंत पाटील ह्यांनी आपल्या लेखणीतून शुभेच्छा देणारं अनावृत्त पत्र पाठवलं. ते मराठी पिझ्झाच्या वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत.
===
लेखक : जयंत पाटील (गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र विधानसभा)
===
प्रिय नरेंद्रभाई ,
सर्वप्रथम आपल्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा ..!! आज आपण ६७ वर्षांचे झालात. वयाच्या ६७ व्या वर्षी देशाच्या पंतप्रधानपदी असणं ही निश्चितच अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे.
एका अत्यंत सामान्य कुटुंबातून येवून भारतासारख्या खंडप्राय देशाचं पंतप्रधान होण ही काही साधी बाब नव्हे ! अर्थात यामागे तुमचे मोठे कष्ट आणि साधना आहेच. भारतासाख्या एवढ्या मोठ्या देशात प्रचंड मेहनत घेणारे आणि गुणवत्ता असलेले अनेक लोग असतात पण सर्वच लोक पंतप्रधान होऊ शकत नाहीत, पण तुम्ही तुमच्या कष्टानेच पंतप्रधान झालात. तुमचं अभिनंदन करायचं ते यासाठीच. रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करणारे डॉक्टर मनमोहन सिंह या देशाचे पंतप्रधान होतात, रेल्वे स्टेशनवर चहा विकणारे तुम्ही देखील या देशाचे पंतप्रधान झालात हे या देशाच्या लोकशाहीचे मोठे यश आहे.लोकसभेत पहिल्यांदा जाताना तुम्ही लोकशाहीच्या या मंदिराच्या पायरीवर माथा टेकवलात आणि लोकशाही पद्धतीने होणाऱ्या चर्चेवर आपला विश्वास आहे हे दाखवून दिलत.
२६ मे २०१४ रोजी जेव्हा तुम्ही या देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतलीत तेव्हा या देशातील अगदी सामान्य कुटुंबापासून ते सर्वाधिक श्रीमंत कुटुंबांपर्यंत सर्वांनी तो सोहळा डोळे भरून पाहिला. तुम्हाला शपथ घेताना पाहून या देशातील लाखो लोकांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. किती प्रचंड अपेक्षा होत्या लोकांच्या त्या क्षणाला तुमच्याकडून …!! अगदी एव्हरेस्टएवढ्या!
प्रत्येक जण म्हणत होता,
आता या देशातील गरिबी पूर्णपणे दूर होणार, बेरोजगारी नष्ट होणार, २ कोटी युवकांना दरवर्षी रोजगार मिळणार, प्रत्येकाच्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये जमा होणार, आपण चीन आणि पाकिस्तानला धडा शिकवणार, देशात आता लोकांना त्यांची कामे करायला चिरीमिरी द्यावी लागणार नाही, ‘भ्रष्टाचार’ हा शब्दच इतिहासजमा होईल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्णपणे थांबतील वगैरे वगैरे.
पण आज तुमच्या सत्तारोहणाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर काय परिस्थिती आहे? देशाचा विकासदर जवळपास दोन टक्क्यांनी खाली आला आहे, देशाचा विकासदर दोन टक्यांनी कमी होणे म्हणजेच देशाचे दोन लाख चाळीस हजार कोटींचे नुकसान होणे होय, तुम्ही सत्तेत आल्यानंतरही दर वर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत, निश्चलनीकरणामुळे लघु आणि मध्यम उद्योजक उध्वस्त झाला आहे, अगदी उच्चशिक्षित मुलांना इथे नोकऱ्या नाहीत तर इतरांची काय अवस्था असेल ? सीमेवर रोज जवान शहीद होत आहेत, कोणी आपला मुलगा गमावतोय तर कोणी आपला बाप तर कोणी पती, अक्षरशः रोज एखादी तरी जवान शहीद झाल्याची बातमी आम्हाला वर्तमानपत्रात वाचावीच लागते, काश्मीरमध्ये मुली आणि महिलांनी दगड हातात घेतल्याची दृश्य आम्ही पाहतो आहोत, आपल्या देशात गरीब अजून गरीब होत चालला आहे काही मोजके श्रीमंत तुमच्या आशिर्वादाने अजून श्रीमंत होत आहेत, तुमच्या राज्यात महिलांपेक्षा गायी अधिक सुरक्षित आहेत. कोणीतरी मध्यंतरी म्हणालं होतं,
“ना बेटी, ना बेहने, ना माये सुरक्षित है, मोदी तेरे राज में बस गाये सुरक्षित है”
पंतप्रधान महोदय, आज कधी नव्हे इतका या देशातील दलित आणि मुस्लीम असुरक्षित आहे, त्याला स्वतःच्या आणि कुटुंबाच्या जीवाची काळजी वाटते आहे. कधी कुठून कोणती झुंड येईल आणि आपल्यावर गोमांस ठेवल्याच्या संशयावरून हल्ला करेल याची त्यांना भीती वाटते आहे. आमीर खान सारख्या शहाण्या अभिनेत्याला देश सोडून जावेसे वाटते, शाहरुख खानसारख्या अभिनेत्याला भारतात असहिष्णुता वाढली आहे असे उगीचच कसे वाटू शकेल ? अर्थात ही केवळ काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.
तुम्ही सत्तेत आल्या आल्या मोठ्या जोशात जनधन योजनेची सुरुवात केलीत, मात्र आज त्या योजनेची काय अवस्था आहे ? आज त्या योजनेची खाती चालू ठेवण्याचा खर्च हा त्या योजनेच्या कोणत्याही फायद्यांपेक्षा जास्त आहे. स्वच्छ भारत सारखी योजना आपण गांधींच्या चष्म्यातून कधी अमलात आणूच शकला नाहीत. स्वच्छ भारत सारखी योजना आज प्रभावीपणे राबवलेली दिसत नाही, अनेक मोठ्या व्यक्तींचे स्वच्छता करतानाचे फोटो मात्र बाकी छान आले. मेक इन इंडियाबाबत आज कोणी बोलताना दिसत नाही, देशात उद्योग गुंतवणुकीचे वातावरण फलद्रूप होताना फारसे दिसत नाही.
पंतप्रधान महोदय, निश्चलनीकरणाचा अत्यंत धाडसी असा निर्णय आपण घेतलात, अगदी कोणालाही विश्वासात न घेता, तुमच्या अर्थमंत्र्यानाही तुम्ही सांगितल नाही असं बोललं जात. पंतप्रधान महोदय, अरुण जेटलींच्या जागी कोणी स्वाभिमानी व्यक्ती असती तर राजीनामा देऊन घरी गेले असती. मात्र आपला धाक असा आहे की काही बोलायलाच नको. सारा देश ढवळून निघाला होता या निर्णयाने ! अनेक लोकांचे बँकेच्या रांगेत उभे राहून जीव गेले. मात्र, आज आपल्या हाती शून्य उरलाय असंच सरकारी आकडे सांगतायेत. सगळ्या जगभरातील अर्थतज्ञांनी नोटबंदीच्या निर्णयाला चुकीच म्हंटल पण तुम्ही कोणाचही ऐकल नाहीत. तुम्ही तुमच्या एका वेगळ्याच झोकात होतात. अमर्त्य सेन या नोबेल विजेत्या अर्थतज्ञाने तर या कृतीला ‘आततायी कृती’ असं संबोधल. आज देशातील चलनाच्या नोटांपैकी ९९ टक्के नोटा या पुन्हा बँकांत जमा झाल्या आहेत , माझ्यासारख्या नागरिकांना प्रश्न पडलाय कुठे गेला काळा पैसा ? काय साध्य झालं नोटबंदीने ?
नुकतंच अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन झालं , आपल्या या कल्पनेवर अनेक लोक टिका करत असले तरी मी व्यक्तिशः या कल्पनेचे मनापासून स्वागत करतो, 2006 साली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मी मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन व्हावी ही कल्पना प्रेझेन्टेशन करून मांडली होती, जेणेकरून एका अत्यंत समृद्ध भागाचा दुसऱ्या मागासलेल्या भागाशी संपर्क होऊन मागासलेल्या भागाच्या विकासाला चालना मिळेल. प्रकल्पात आत्ताचे दळणवळण हे मुंबई अहमदाबाद या दोन्ही प्रगत शहरांमध्ये होत आहे मात्र मुंबईला विदर्भाशी बुलेट ट्रेनने जोडलं असतं तर अधिक योग्य झालं असतं अशी माझी मनापासून भावना आहे कारण त्यामुळे जशी प्रवासी वाहतूक 350किलोमीटर ताशी वेगाने झाली असती तशीच मालवाहतूक ताशी 160 किलोमीटर वेगाने झाली असती. मुंबई ते नागपूर हे 900 किलोमीटरचे अंतर फक्त साडेतीन तासांत पूर्ण झाले असते विदर्भासारख्या तुलनेने मागासलेल्या भागाच्या विकासाला त्यामुळे मोठी चालना मिळाली असती.
बुलेट ट्रेनच्या एकूण लांबीपैकी 75 टक्के गुजरात मधून तर 25 टक्के महाराष्ट्रातून जात आहे तरी देखील खर्चाचा पन्नास टक्के हिस्सा महाराष्ट्र उचलत आहे. अर्थात याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही बोलतील अशी सुतराम शक्यता नाही कारण एकदा आपल्या मनात आलं की या देशात कोणी काही बोलू शकत नाही, बुलेट ट्रेन मुंबई ते नागपूर, चंद्रपूर अशा अविकसित भागांना जोडणारी असती तर उत्तम झाले असते अथवा बुलेट ट्रेन मुंबई ते दिल्ली व्हाया अहमदाबाद जाणारी असती तरी त्याचे स्वागतच झाले असते
पंतप्रधान महोदय, आपली सुरुवातीची काम करण्याची धडाडी आणि कर्तृत्व पाहून वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक लोक आपल्यासोबत काम करण्यास उत्सुक होते. मात्र आमचा भ्रमनिरास झाला आहे हे मला आपल्याला सांगावे लागेल.
पंतप्रधान महोदय, आपलं धारदार वक्तृत्व ही आपल्याला मिळालेली मोठी देण आहे. या वक्तृत्वाच्या जीवावर तर तुम्ही पंतप्रधानपद तुमच्याकडे खेचून आणलत. आमच्या कोल्हापुरात आलात तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की,
आम्ही सत्तेत आलो की, सारा देश कोल्हापुरी चपला घालून फिरेल.
तर आमच्या सोलापुरात तुम्ही,
साऱ्या देशातील पोलिसांनी सोलापुरात शिवलेले कपडे घालायला हवेत.
असं म्हंटल होतं. आता देश कुठे कोल्हापुरी चप्पल घालतोय ? आमच्या सोलापुरातील लोकांना आजही आपलं आश्वासन आठवत आहे.
मी हे पत्र लिहित असताना कर्नाटकात गौरी लंकेश यांची हत्या झाली आहे. यावर तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने प्रतिक्रिया दिलीये.
जर गौरी लंकेश या भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विरोधात बोलल्या नसत्या तर त्यांची हत्या झाली नसती.
माझ्यासारख्या व्यक्तीला ही अक्षरशः सुन्न करणारी गोष्ट आहे. विशिष्ट विचारधारेच्या व्यक्तीने हत्या केल्याची अप्रत्यक्ष कबुलीच भाजपाचे आमदार देत आहे. या देशाने आणीबाणी पहिली आहे मात्र त्या आणिबाणीतही अशा प्रकारची हत्यासत्र कधी झाली नव्हती. एक प्रकारची अप्रत्यक्ष दमनकारी आणीबाणीच तुम्ही या देशावर लादली आहे.
आज ट्वीटरवर ज्या १७७९ लोकांना आपण ‘फॉलो’ करत आहात त्यापैकी जवळपास हजारभर लोक विरोधी विचारधारेच्या आणि लोकांच्या बद्दल अत्यंत विषारी आणि अधूनमधून अश्लीलही लिखाण करणारे आहेत. तुम्ही ज्याला फॉलो करत आहात त्यापैकी एकाने गौरी लंकेश यांना त्यांच्या हत्येनंतर ‘कुत्री’ असे म्हटलंय. पंतप्रधान महोदय, अशा लोकांना फॉलो करून तुम्हाला नक्की कोणता संदेश जगाला द्यायचा आहे?? ज्या पंडित नेहरूंची जागा आपण घेऊ पाहत आहात, तुमच्या जागी जर ते असते तर त्यांनी ‘अशा’ समर्थकांना सर्वात कडक शिक्षा केली असती. आपल्या दोन दिवसीय म्यानमार दौऱ्यात आपण तब्बल वीस वेळा ट्वीट केलंत मात्र सारा भारत त्याच वेळी गौरी लंकेश यांना श्रद्धांजली वाहत असताना आपल्याला मात्र श्रद्धांजलीचे दोन शब्दही लिहावेसे वाटले नाहीत हे विशेष.
इतिहासाने आपली नोंद घ्यावी यासाठी अगदी जीएसटी कायद्याचा सोहळादेखील आपल्याला स्वातंत्रदिनाच्या धर्तीवर मध्यरात्री घ्यावा वाटला, मध्यरात्रीच्या ठोक्याला सारा देश झोपलेला असताना आपल्याला साऱ्या देशाला उद्देशून भाषण करावेसे वाटले.
सिनेमाच्या प्रमोशनसाठी येणाऱ्या नटांना भेटायला आपल्याकडे वेळ आहे मात्र दाभोलकर, पानसरे, अखलाख यांच्या कुटुंबियांना भेटायला मात्र आपल्याकडे वेळ नाहीये. अदनान सामीच्या चार महिन्यांच्या बाळाला भेटायला आपल्याकडे चाळीस मिनिटे आहेत मात्र गोरखपूरमध्ये जीव गमावलेल्या शेकडो कोवळ्या बाळांच्या मात्यापित्यांच्या डोक्यावरून हात फिरवायला आपल्याकडे चार मिनिटे नाहीयेत .
पंतप्रधान महोदय, उत्तराखंड आणी अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा बरखास्त करण्याचा आपला प्रयत्न म्हणजे संविधानाशी केलेला खेळच होता, न्यायालयाने त्याला वेळीच वेसण घातली हे बरे झाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठाला आणि तेथील बुद्धिमान विद्यार्थ्यांना त्यांच्या विरोधी विचारधारेच्या लोकांनी भरपूर बदनाम केलं, काही लोकांनी तर बनावट व्हिडियो तयार केले. विशिष्ट विचारधारेच्या लोकांची ही झुंडशाही म्हणजे ‘आयडिया ऑफ इंडिया’ फोडण्याचा प्रयत्न आहे.
हे पत्र लिहित असताना निश्चलनीकरणाचे आकडे माझ्यासमोर आहेत, साऱ्या जगासमोर आपलं हसू झालंय, नोटबंदी अपयशी झालीये,मनमोहन सिहांसारख्या अर्थकारणातील भीष्म पितामहाने देशाच्या सर्वोच्य सदनात काढलेले शब्द खरे ठरले आहेत.
पंतप्रधान महोदय, आम्हाला हे प्रामाणिकपणे सांगितले पाहिजे की, पंतप्रधान म्हणून दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आपण अपयशी ठरला आहात. अजूनही वेळ गेलेली नाही पुढील दोन वर्षांत आपण भारतीय जनतेला दाखवलेली स्वप्ने पूर्ण करू शकता त्यासाठी पुढील दोन वर्ष आपण आटोकाट मेहनत घ्याल अशी मी आशा करतो.
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा …!! जीवेत शरद शतम ..!
आपलाच ,
जयंत पाटील,
आमदार, इस्लामपूर-वाळवा विधानसभा मतदारसंघ, सांगली, महाराष्ट्र,
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.