आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
इतिहासात अश्या अनेक दुर्घटना घडल्या आहेत ज्यात त्यातून वाचलेल्या लोकांनी जिवंत राहण्यासाठी प्रतिकूल परिस्थितींचा सामना केला. असाच एक दुर्दैवी अपघात १९७२ मध्ये एंडीज (Andes) च्या बर्फाच्छादित पहाडांमध्ये झाला होता.
या दुर्घटनेत वाचलेल्या लोकांना त्या बर्फाच्छादित पहाडांमध्ये ७२ दिवस विना अन्नाचे राहावे लागले होते. आपल्या सोबतच्या घायाळ लोकांना आपल्या डोळ्यांसमोर मारताना पाहावे लागले होते.
एवढंच नाही तर जिवंत राहण्यासाठी त्यांना त्यांच्याच साथीदारांचे मृतदेह खावे लागले होते.
जिंवंत राहण्याच्या या संघर्षाला कारणीभूत ठरलेली ती दुर्घटना इतिहासात ‘१९७२ एंडीज फ्लाईट डिजास्टर’ (1972 Andes flight disaster) किंवा ‘मिरॅकल ऑफ एंडीज’ (Miracle of the Andes) या नावाने प्रसिद्ध आहे.
ही दुर्घटना त्या फ्लाईटमध्ये प्रवास करणाऱ्या उरुग्वे येथील ओल्ड क्रिश्चियन क्लबच्या रग्बी टीममधील त्या रग्बी खेळांडूसाठीही प्रसिद्ध आहे, ज्यांनी प्रतिकूल परिस्थतीत चिवट वृत्ती दाखवत स्वतः तर मृत्यूवर मात केलीच त्यासोबतच इतर १४ लोकांचेही प्राण वाचवले.
ही दुर्दैवी घटना १३ ऑक्टोबर १९७२ साली घडली.
उरुग्वे येथील ओल्ड क्रिश्चियन क्लबची रग्बी टीम या दुर्घटनेची बळी ठरली. ही टीम चिली येथील सैंटीयागोला मॅच खेळायला जात होती. उरुग्वे एअरफोर्सचे विमान या टीमचे खेळाडू, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंब तसेच मीटर परिवाराला घेऊन जात होता. या विमानात एकूण ४५ लोक प्रवास करत होते.
विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच वातावरण बदलायला लागलं. एंडीजच्या बर्फाच्छादित डोंगरांमध्ये पायलटला समोरचं दिसेनासं झालं. वातावरण खराब होत चाललं, पायलटलाही येणारा धोका दिसू लागला होता.
तेवढ्यात –
१४०० फुटावर असताना पायलटने आपली पोजिशन चुकवली आणि एका क्षणात विमान एंडीजच्या एका पर्वत शिखरावर जाऊन आदळलं. आकाशात उडणारे विमान क्षणार्धात पेटले आणि एंडीज पर्वतात दिसेनासा झाला.
या विमानातील त्या रग्बी टीम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की त्यांचा अंत असा त्यांच्या समोर येईल. क्षणार्धात सर्व होत्याचं नव्हतं झालं.
या भयंकर दुर्घटनेत १८ लोकांचा मृत्यू झाला होता पण २७ जण कसे-बसे वाचले होते. मात्र काळ अजून सरला नव्हता.
एंडीजच्या हाडं गोठवणाऱ्या बर्फात जिवंत रहाणं त्यांच्यासाठी मृत्यूपेक्षाही भयानक होते. हा एंडीज जणूकाही त्यांच्या जीवनात यमराज बनून आला होता. २७ जण वाचले तर खरे पण त्यांना तिथे खायला-प्यायला काही नव्हते आणि चारी बाजूंनी नजर जाईल त्यापलीकडे पर्यंत बर्फाची चादर पसरलेली होती.
इकडे या दुर्घटनेची माहिती मिळताच उरुग्वे सरकारने लगेचच रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले. पण विमानाचा रंग पांढरा असल्याने या बर्फाने झाकलेल्या एंडीजमध्ये त्याला शोधण हे काही सोपे नव्हते.
तरी उरुग्वे सरकारच्या रेस्क्यू टीमने १० दिवस सतत शोधकार्य सुरु ठेवले. एवढ्या खराब परिस्थितीत विना अन्न-पाण्याचे कोणीही जिवंत राहाण शक्य नाही असे मानून, अखेर ११व्या दिवशी हे रेस्क्यू ऑपरेशन थांबविण्यात आलं.
===
हे ही वाचा – भारताच्या ७ अज्ञात रणरागिणींची कहाणी तुम्हालाही जगण्याची नवी प्रेरणा देईल
===
तर दुसरीकडे या दुर्घटनेत वाचलेल्या २७ लोकांपैकी काही घायाळ लोक तिथल्या विषम परिस्थितीला झुंज देण्यात अयशस्वी ठरले आणि अखेर त्यांनी मृत्यूला कवटाळले. पण तरी इतरांनी त्यांनी हार मानली नाही.
आपले साथीदार आपल्याच समोर मरतात हे पाहून कुणाचही मन अस्थिर होईल. पण त्या लोकांनी हिम्मत हरली नाही. इतर वाचलेल्या लोकांनी त्यांच्या जवळ असणाऱ्या अन्नाचे लहान लहान भाग केले जेणेकरून ते जास्त दिवस चालेल आणि ते जिवंत राहू शकतील.
तसेच त्यांनी विमानातून एक अश्या मेटलचा तुकडा काढला जो सूर्यप्रकाशात लवकर गरम होईल. त्यावर बर्फ वितळवून त्यांनी पाण्याची समस्या सोडवली.
पण काहीच दिवसांत त्यांचे अन्न संपले आणि आता त्यांना जिवंत राहण्यासाठी कुठलाच मार्ग उरला नव्हता. तेव्हा त्यांनी आपल्या सोबतच्या साथीदारांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते खाण्यास सुरवात केली.
एका क्षणार्धात आलेल्या अंतातून हे लोक वाचले तर खरे पण आता त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आणि असहाय झाली. आता केवळ १६ लोक उरली होती. या दुर्घटनेला ६० दिवस उलटून गेले होते आणि मदतीची कुठलीच आशा नव्हती.
तेव्हा यांच्यातील दोन खेळाडूंनी खरी जिगर आणि हिम्मत दाखवली.
नॅन्डो पर्राडो (Nando Parrado) आणि रॉबर्ट केनेसा (Robert Canessa) या दोन हिमती खेळाडूंनी विचार केला की, इथे मरण्यापेक्षा मदतीच्या शोध घेण्यासाठी निघावं, जेव्हा की हे खूप कठीण काम होत तरीदेखील या शुरांनी हे काम पत्करलं.
६० दिवसांत या दोघांचेही शरीर दुर्बल झाले होते आणि बर्फात ट्रेकिंग करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे साधनही नव्हते. पण त्यांनी हार मानली नाही. एवढ्या विषम परिस्थिती देखील त्यांनी मदतीच्या शोधार्थ ट्रेकिंग सुरु केली.
पॅरॅडो आणि केनेसा यांनी कमालीच धैर्य दाखवत तब्बल १२ दिवस ट्रेकिंग केली आणि अखेर त्यांच्या हिम्मतीला यश आलं.
या दोघांनीही एंडीज पर्वताला हरवत मृत्यूवर विजय मिळवत चिली गाठलं. इथे त्यांनी तिथल्या रेस्क्यू टीमला आपल्या साथीदारांच लोकेशन सांगितलं आणि त्या लोकांनाही वाचविण्यात ते यशस्वी झाले. या पद्धतीने या दोन खेळाडूंनी हार न मानता स्वत:चेही प्राण वाचवले आणि आपल्या साथीदारांचेही.
या पूर्ण घटनेत १६ लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ही दोघे एका सुपरहिरो प्रमाणे समोर आले.
रॉबर्ट केनेसा हे तेव्हा रग्बी खेळाडू सोबतच मेडिकलचे विद्यार्थी देखील होते. आता हे एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत. तर या दुर्घटनेत आपल्या आई आणि बहिणीला गमावणारे नॅन्डो पर्राडो आता उरुग्वेचे पसिद्ध टीव्ही सेलिब्रिटी आहेत.
या दुर्घटनेत ७२ दिवसानंतर १६ लोकांचं वाचणं हे कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नाहीये. पर्राडो यांनी या दुर्घटनेला आणि आपल्या संघर्षाच्या कहाणीला एका पुस्तकाचे स्वरूप दिले आहे.
तर या दुर्घटनेवर पियर्स पॉल रीड यांनी १९७४ साली अलाईव्ह ‘Alive’ नावाचे पुस्तक लिहिले होते, ज्यावर १९९३ मध्ये निर्देशक फ्रेंक मार्शल यांनी चित्रपट देखील बनवला.
===
हे ही वाचा – एव्हरेस्ट चढणाऱ्या तब्बल ८ गिर्यारोहकांचा या दिवशी असा भयानक मृत्यू झाला होता!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.