आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आणि पुन्हा एकदा विरोधकांनी सेल्फ गोल केला आहे. सेल्फ गोल कसला. ट्रेनखाली जीव दिलाय. तो ही साध्यासुध्या नव्हे – #बुलेट_ट्रेन खाली. ज्या नव्या डेव्हलपमेंट्स बद्दल ओरडून ओरडून स्वतःची पाठ थापटून घ्यायला पाहिजे – त्या सर्व उत्तमोत्तम प्रकल्पांना राजकारणाच्या मोहापायी दूर लोटून स्वतःचं हसं करून घेण्यात एक्स्पर्ट झालेत हे.
डिजिटल इंडियाची खिल्ली उडवतात, जीएसटीचा विरोध करतात – हे कमी होतं – म्हणून आता बुलेट ट्रेन खाली चिरडून घेताहेत. खरंतर बुलेट ट्रेनचा विषयसुद्धा वादग्रस्त व्हावा ह्यासारखा विनोद नाही. बॉस…महामहिम सभ्य पुरुषोत्तम मनमोहन सिंगांच्या युपीए वनच्या काळात पुढे आलेला हा प्रस्ताव मोदींनी रेटला आहे. जे लालू प्रसाद यादव मोदींपेक्षा चांगले आहेत असं म्हणता, त्याच लालूंनी आवतन घातलं होतं ह्या बुलेटला. बरं आधी फ्रांस बरोबर सुरू असलेली चर्चा नंतर जपान बरोबर सुरू करण्याचं श्रेय सुद्धा सभ्य पुरुषोत्तमांचं. मोदींनी काय, “नेहेमीप्रमाणे” कॉपी पेस्ट केलंय.
आणि नेहेमीप्रमाणे विरोधकांनी “गुड! आमचं व्हिजन पुढे नेताय!” असं ओरडून ओरडून सांगायच्या ऐवजी ऊर बडवेगिरी सुरू केली आहे. ह्यांचे विरोधाचे मुद्देसुद्धा किती हास्यास्पद राव?! गुजरातच्या विकासापायी लाखो कोटी रूपये घातले अन मुंबईत चारच स्टेशनं केले. ह्यात जपानलाच धंदा मिळणारे आणि मुंबईचा व्यापार अहमदाबादला जाणारे! जरा तर मोठे व्हा राव!
देशाचे “लाखो कोटी” कोणते? काय नुकसान? गुजरात मध्ये गेले म्हणजे वाया जातात हे कोणतं लॉजिक आहे? उद्या फडणवीस पंतप्रधान झाले आणि नागपूरला प्रोजेक्ट आणले तर कोकण-मुंबई-मराठवाडा सकट सर्व देशाचे पैसे वाया जाताहेत असं म्हणणार काय?
ह्या व्यवहारात जपानला फायदा होणार म्हणून भारताचा फायदा नाही हा कोणता विक्रम-वेताळ तर्क आहे? जपानकडून विकत घेतलेल्या उत्कृष्ट प्रतीच्या वस्तू आपल्याला कवडी मोल भावात मिळताहेत हा लाभ नव्हे काय? “त्यांचा” फायदा होतो म्हणजे “आपलं नुकसान” होतंय, असं नसतंय हे. ही विन-विन परिस्थिती आहे.
स्टेशनं वाढवणं गंमत वाटते राव लोकांना. स्टेशनं अधिक पाहिजे म्हणून ट्रेनला पुणे नाशिक फिरवणार होते काय? नकाशा बघितला तर लगेच कळेल हे किती अव्यवहार्य आहे. शिवाय चार स्टेशन महाराष्ट्राचे म्हणजे तिकडच्या लोकांना इथले कमी पर्याय आणि तिकडचे ६ म्हणजे आपल्या लोकांना तिथे ६ पर्याय असा विचार का करू नये? लूजर्स लेकाचे!
बाकी खोटे व्हिलन उभे करण्यात ह्यांचा हात कुणी धरणार नाहीत. गुजरात म्हणजे पाकिस्तानहून डेंजर वाटतो ह्यांना. आणि गुजराती म्हणजे बिन लादेनचे पूर्वजच जणू. गुजरातचा फायदा होणार हे काय दुखणं व्हायचं कारण आहे का हो? गुजरात भारतात नाही काय? तिथे जाऊन इतर भारतीयांना नोकऱ्या मिळवता येणार नाहीत काय?
“मुंबईचा व्यापार बाहेर जाणार” हे तर कृपा करून कुणी म्हणूच नये. मुंबईचा व्यापार बाहेरच जायला पाहिजे आता. मुंबईत काय काय अन किती कोंबायचं आहे? आहे ती गर्दी कमी पडतीये काय? २०० मिमी पाऊस पडला की पूर होतोय एवढ्या बिल्डिंगज आणि कचरा आहे. इतर शहरं डेव्हलप करणं आवश्यकच आहे. नॅशनल सेक्युरिटीच्या दृष्टीनेसुद्धा आर्थिक शक्ती एकवटलेली चांगली नसते. पण कुणी सांगावं शेखचिल्ली लोकांना?
टीकाकारांचा फक्त एक मुद्दा विचार करण्यालायक आहे – प्राथमिकतेचा. आहे ते नेटवर्क मजबूत करायचं की नवं लोढणं गळ्यात अडकवायचं? ते ही एवढं महाग तिकिटांचं?!
पण प्रेफरन्स तेव्हा बघायचा जेव्हा “हे की ते” अशी चॉईस करणं क्रमप्राप्त असतं. रेल्वेच्या किंवा एकूणच कोणत्याच विकास कामांच्या बाबतीत तसं बघून चालत नसतं. जुनी भर घालत बसून नवे इमले रचणे थांबवता येत नसतं. नवं तयार करताना जुन्याची भर ही थांबवायची नसते. रेल्वे पुरतं बोलायचं झालं तर दोन्हीही सुरू आहेच. मग तक्रार करायला जागा नाही. मुंबई मेट्रोच्या वेळी मी असेच महाग प्रवास, त्यापेक्षा आहे त्या लोकल धड चालवा, रस्ते नीट करा अश्या तक्रारी केल्या होत्या. आता दुथडी भरून वहाणारी मेट्रो दिसते आणि निर्णयाची महती पटते.
बाकी एखाद्या माणसावर बहिष्कार घालणं हे त्या त्या धर्म/जातीच्या लोकांचं “संघटनात्मक स्वातंत्र्य” असतं हे म्हणणाऱ्या लोकांना बुलेट ट्रेनची धास्ती वाटते ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. त्यांना उंटावरून प्रवासाचे मध्ययुगीन दिवसच आवडणार.
एकुणात मनोरंजन छान. पण “मोदींना पर्याय कोण” इतकाच “विरोधकांना पर्याय कोण?” हा ही विचार काळजीत पाडणारा आहे.
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.