आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
व्यवसाय करणे कधी सहज शक्य होत नाही, त्यासाठी खूप मेहनत आणि त्याचबरोबर पैशांचे पाठबळ असणे गरजेचे असते. व्यवसाय करण्याच्या नवनवीन कल्पना नेहमीच अनेक लोकांच्या डोक्यामध्ये येतात, काही त्यामध्ये यशस्वी होतात तर काही अयशस्वी होतात.
तर कितीतरी जणांच्या व्यवसायिक कल्पनांना खूप गुंतवणूकदारांनी धूडकावून लावले, पण तरी देखील त्या लोकांनी हार मानली नाही आणि आपले प्रयत्न चालू ठेवले आणि त्या कंपन्या किंवा माणसांनी पुढे जाऊन खूप प्रगती केली.
अशाच काही कल्पना आज आपण जाणून घेणार आहोत – ज्या पुढे नावारूपाला आल्या आणि त्या माणसांनी स्वतःला जगासमोर सिद्ध केले…
१. नेटफ्लिक्सचे ब्लॉकबस्टर कंपनीने हसे उडवले होते!
नेटफ्लिक्स ही कंपनी १९९७ रोजी सुरू करण्यात आली होती. २००० मध्ये कंपनी सुरू केल्यानंतर फक्त तीन वर्षांनीच नेटफ्लिक्सने सबस्क्रायबर सर्विस नावाची ऑनलाईन विडीओ स्ट्रीमिंग सेवा सुरू केली.
त्याचवेळी ब्लॉकबस्टर आणि रीवल नेटवर्क नावाचे पारंपारिक विडीओ रेंटल सेवांचे यामध्ये स्वतःचे साम्राज्य होते.
एकत्र काम करू या आशेने, नेटफ्लिक्सचे सीईओ रीड हॅस्टिंगग्स यांनी ब्लॉकबस्टरचे सीईओ जॉन एंटीकोशी संपर्क साधला. त्यांनी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला की –
आता ज्या रेंटल सर्विस तुम्ही ग्राहकांना देताय, त्याऐवजी त्यांना नेटफ्लिक्सचा वापर करून विडीओ स्ट्रीमिंगची सुविधा द्या. नेटफ्लिक्सचे सीईओ रीड हॅस्टिंगग्स हे आपली नेटफ्लिक्स ही कंपनी ५० मिलियन डॉलरला विकायला देखील तयार होते.
पण ही ऑनलाईन विडीओ स्ट्रीमिंगची कल्पना ब्लॉकबस्टरचे सीईओ जॉन एंटीको यांना काही आवडली नाही, त्यांना यामध्ये काहीच फायदा वाटत नव्हता. त्यामुळे त्यांनी या कल्पनेची खिल्ली उडवली आणि नेटफ्लिक्सची ऑफर नाकारली.
आज त्याच नेटफ्लिक्सचे मूल्य ७० मिलियन डॉलर आहे आणि ब्लॉकबस्टर कंपनी २०१० मध्ये दिवाळखोर झाली.
२. मेकेन्झी आणि कंपनी जेव्हा भविष्यातील सेल फोनच्या बाजाराचा अंदाज लावण्यास चुकली..
एटी अँड टी सध्या जगातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. ८० च्या दशकामध्ये ही कंपनी सेलफोनच्या उद्योगामध्ये येण्याची योजना आखत होती.
त्यावेळी ही कंपनी फक्त दूरध्वनी उद्योगामध्येचं होती आणि आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा त्यांचा विचार चालला होता.
एटी अँड टी या कंपनीने त्या काळातील मेकेन्झी आणि कंपनी या सल्लागार कंपनीकडून या बाबतीत सल्ला मागितला. मेकेन्झी कंपनीनुसार २००० पर्यंत जगातील फक्त ९ लाख लोकच सेलफोन वापरतील.
हा आकडा खूप कमी होता, तरीही एटी अँड टी कंपनीने यामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आणि २००० पर्यंत त्यांनी जवळपास १०९ मिलियन पेक्षा जास्त लोकांना ही सुविधा पुरवली.
आता २०१७ मध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच सेलफोनचा वापर करताना दिसत आहे आणि त्यामुळे आज एटी अँड टी ही जगातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखली जाते.
३. गुगल १ मिलियनला विकत घेण्याची संधी याहूला मिळाली होती.
गुगल ही जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. गुगलची स्थापना १९९८ मध्ये लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांनी केली होती.
त्यावेळी याहू हे सर्च इंजिन खूप चालत होते आणि गुगल चालत नव्हते. तेव्हा पेज आणि ब्रिन यांनी गुगलचे पेज रँक सिस्टम याहूला १ मिलियन डॉलरला विकण्याचे ठरवले, पण याहूने हा प्रस्ताव नाकारला.
हळूहळू गुगलचे सर्च इंजिन वापरणाऱ्यांची संख्या वाढली आणि याहूला आपली चूक समजली.
२००२ मध्ये पुन्हा याहूने गुगलकडे ३ बिलियन डॉलरमध्ये गुगल विकत घेण्यासाठी प्रस्ताव ठेवला. पण यावेळी गुगलने ५ बिलियन डॉलरची मागणी केली. त्यामुळे अजून एकदा याहूची संधी हुकली.
आज गुगलची किंमत ६०० बिलियन डॉलर आहे आणि याहूने फक्त ४.५ बिलियन डॉलरला आपली कंपनी वेरीझोनला विकली.
४. फेड एक्सच्या संस्थापकाच्या प्राध्यापकाने त्याची कल्पना अयोग्य आहे असे म्हटले होते…
अमेरिकन बहुराष्ट्रीय कुरियर कंपनी फेड एक्सच्या संस्थापकाच्या कॉलेज प्राध्यापकाने ही कल्पना खूपच खराब आहे, असे सांगितले होते.
फेड एक्सचे संस्थापक फ्रेड स्मिथ यांनी एका शाळेच्या पेपरमध्ये आपल्या कल्पक सेवेबद्दलची कल्पना मांडली.
त्यांची कल्पना ही होती की, त्यांची कंपनी जगाच्या कोणत्याही भागामधून लहानातील लहान वस्तू जगाच्या कोणत्याही भागामध्ये पोहोचवेल. हे ऐकून त्यांच्या प्राध्यापकांनी त्यांची मस्करी केली आणि त्यांची कल्पना चुकीची आहे असे सांगितले.
पण स्मिथ यांना आपल्या या कल्पनेवर विश्वास होता. त्यांनी रात्री कमी गर्दीच्या वेळी विमानतळावरून लहान वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यास सुरुवात केली.
पहिल्यांदा स्मिथ यांच्या कंपनीने १८६ पॅकेज एका रात्रीत डिलिव्हर केले.
फेड एक्स आज जगातील सर्वात मोठ्या कुरियर कंपनीपैकी एक आहे. २०१७ च्या फोर्च्युन ५००च्या यादीमध्ये ५८ स्थानावर फेड एक्स होती. २०१६ मध्ये फेड एक्सचे वार्षिक उत्पन्न ५० बिलियन डॉलर होते.
अश्या या क्रांतिकारी कल्पना काहींनी धुडकावल्या, पण तरीही स्वतःवर विश्वास ठेवत या लोकांनी त्या सत्यात उतरवल्या आणि आज ह्या कंपन्या आणि ती माणसे यशाच्या उंच शिखरावर आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.