आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखक – राजेंद्र मानेरीकर
===
श्री गणरायाचे विसर्जन झाले की पितृपक्षाची सुरुवात होते. आपल्या पितरांची म्हणजे पूर्वजांची आठवण करण्याचा हा पंधरवडा. अशी पद्धत आहे की, या आठवड्यातील एका दिवशी आपल्या ज्ञात पूर्वजांच्या नावे श्राद्ध घालायचे.
त्या दिवशी काही धार्मिक विधी करून आपल्या पितरांना आवाहन करावयाचे. या पंधरवड्यात आपल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ते येतात व जेवतात अशी भावना आहे. त्यासाठी अनेकांना जेवू घालायची पद्धत आहे.
ही पद्धत भारतभर आहे. अजूनही हा पंधरवडा फार मनापासून पाळला जातो व घरोघरी हे श्राद्ध होते. त्याला महालय असेही नाव आहे.
मराठीत बराच वर्ग महाळ या नावाने हे श्राद्ध करतो. ब्राह्मणांत याचा धार्मिक विधी मोठा असतो व त्याला पक्ष असेही सुटसुटीतपणे म्हणतात. श्राद्धपक्ष असा एक जोडशब्दही प्रचारात आहे. असल्या साऱ्या रीतीभातींचे जनकत्व ब्राह्मणांकडे जाते म्हणतात. ती जुनी गोष्ट.
नवी गोष्ट ही की निदान महाराष्ट्रात तरी या रीती सोडून देण्याचे कर्तृत्वही ब्राह्मणांना जरूर देता येण्यासारखे आहे! श्राद्ध म्हणजे काय हे काहीजण जरूर सांगतील पण पक्ष म्हणजे काय असे मागोमाग विचारलेत तर निवडणुका लढवितात ते असेही उत्तर येऊ शकेल! असो…!
या आणि तत्सम रूढींना विरोध केलेले पहिले ऋषी चार्वाक होत.
त्यांनी सांगितले की –
आपण आवाहन केल्याने आत्मे येतात असे समजणे हा मूर्खपणा आहे. आत्मा नावाची चीजच जगात नसते. देह मृत झाला आणि जाळला की त्याची राख झाली. देहातून आत्मा निघून जातो, तो कुठेतरी आस्तित्वात असतो असे म्हणणे ही अंधश्रद्धा होय.
तसे सांगून लोकांना फसविणे ही शुद्ध फसवणूक आहे. आपण येथे कुणाला तरी जेवू घातले की, आपल्या पितरांना पोचते असे म्हणणे यात काही अर्थ नाही.
हा सारा वैदिकांच्या फसवणूक करून स्वतःची तुंबडी भरण्याच्या कार्यक्रमाचा भाग आहे. त्यात फसू नका असे आवाहनही त्यांनी केले. चार्वाक होऊन गेले त्यालाही हजारांत वर्षे झाली पण पितरांना जेवू घालण्याच्या समाजाच्या सवयीत फार काही फरक पडलेला नाही.
आदि शंकराचार्य हे चार्वाकांनंतरचे होत. त्यांनी अद्वैत सिद्धांत प्रतिपादन केला व अन्य मतांची निवृत्ती केली. त्यांनी प्रतिपादिले की सर्वांभूती एकच तत्त्व नांदत असून तोच आत्मा. तो निर्गुण निराकार निर्मल शुद्ध निरवयवी चैतन्यस्वरूप अकर्ता अभोक्ता असा आहे. त्याला आदि नाही व अंतही नाही. त्याला जन्म नाही व मरणही नाही.
ह्या आत्म्यालाच परमात्मा, ब्रह्म इत्यादी नावांनी पुकारले जात असले तरी त्याला अमुक नाम नाही व अमुक रूपही नाही. तो होता, आहे व राहील.
वस्तुत: हा विचार शंकराचार्यांचा असा नव्हे. परंतु मतांमतांचा गलबला झाला त्यात सत्य काय ते शोधून काढणे व ते प्रस्थापित करणे हे कार्य आचार्यांच्या नावे जमा आहे. आता त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक पाहिले तर काय दिसेल?
हा जो आत्मा म्हणून जो काही आहे तो अभोक्ता आहे. याचा अर्थ असा की, तो जेवू काही शकत नाही. त्याला नामच जर नाही तर त्याला हाक कशी मारणार? त्याला येता जाता येत नाही त्यामुळे त्याला आवाहन करण्यात अर्थ तो काय? खुद्द शंकराचार्यांनी त्याला गंध कळत नसता फुले कशी वाहता व ऐकू येत नसता आरती कशाची करता असे प्रश्न विचारले आहेत.
अशा स्थितीत एकूणच हे श्राद्ध प्रकरण म्हणजे उभ्या भारताने जपलेली एक अंधश्रद्धा व ब्राह्मणांनी चालविलेला फसवणुकीचा कार्यक्रम आहे याबद्दल खरे तर शंका असण्याचे काहीच कारण नाही.
परंतु, असे केले की, काही चिमूटभर विद्वान सोडले तर सामान्य मनुष्य मूर्ख असतो आणि त्याला साध्या साध्या गोष्टीही कळत नाहीत असे म्हणावे लागते. हे श्राद्धपक्षाचे प्रकरण इतके जुने आहे की हा अवघा भारत देश म्हणजे केवळ वेड्यांचा देश होता व आहे असे म्हणावे लागते. तसे म्हटले की, आम्ही त्या वेड्यांचे शहाणे वंशज होतो व आमचे बाह्य रंगरूप त्यांना शोभेसे असले तरी मेंदूच काय तो वेगळा आहे असा निष्कर्ष निघतो.
हे ही वाचा –
===
आपण इतर सर्वांपेक्षा वेगळे व शहाणे आहोत हा समज आधुनिक मानसशास्त्रात फार चांगला समजत नाहीत.
आनुवंशिकतेचे शास्त्र फक्त मेंदू बदलतो असे सांगत नाही आणि उत्कांतीचे विज्ञान समाजातील थोड्याच लोकांची उत्कांती होते असे सांगत नाही.
समाजशास्त्रानुसार समाजाची इतकी फसवणूक समाजातील एक अत्यंत अल्पसंख्य वर्ग करू शकतो व ती बाकीचा बहुसंख्य समाज ती हजारो वर्षे मुकाटपणे सहन करतो हे मान्य करता येत नाही. अन्यायाला केव्हा ना केव्हा वाचा फुटतेच व तो नाहीसा करण्याच्या प्रयत्नांना इतके अपयश येत नाही.
अंधश्रद्धा चिवट असतात व त्यांचे निर्मूलन फार कठीण असते हे खरे आहे. परंतु, अंधश्रद्धा ह्या प्रामुख्याने सामान्य ज्ञानाचीही जेथे उपासना होत नाही व सोबत दारिद्रय आणि सामाजिक खचलेपण जास्त असते तेथे अधिक प्रमाणात असतात असे दिसून येईल.
या विधानावर असा आक्षेप घेता येईल की, ज्यांची भौतिक प्रगती पुरेशी झालेली आहे तेही अंधश्रद्धांच्या विळख्यात अडकतात आणि अशांची संख्या कमी नाही.
बुवाबाजीला सद्यकाळात जगभर मिळणारा प्रतिसाद पाहता हे खरे वाटेल पण लक्ष देऊन पाहिले तर त्या त्या कुटुंबात या तऱ्हेच्या अंधश्रद्धा ह्या वंशपरंपरागत चाललेल्या दिसून येणार नाहीत. श्राद्धपक्ष ही बाब मात्र संपूर्ण भारतवर्षात हजारो वर्षे समाजाच्या सर्व स्तरांत चालू आहे व ती नजिकच्या काळात बंद पडेल अशी कोणतीही चिन्हे नाहीत.
आता हा पेच कसा सोडवायचा?
ज्यांना “विरूद्ध पक्षाचे” समजण्यात येते ते चार्वाक आणि शंकराचार्य येथे एका बाजूला आहेत. त्यांच्या विरूद्ध पक्षात बहुसंख्य जनता आहे. त्याच बाजूला जे शंकराचार्य मानतात ते पुरोहित आहेत. चार्वाक मानणाऱ्यांना शंकराचार्यांचे व आपले कुठेतरी जमेल अशी शक्यताही वाटत नाही आणि पुरोहित वर्गाला चार्वाकाचे नावही नकोसे वाटते. बहुसंख्य जनता मात्र आनंदाने पितरांना जेवू घालीत आहे व ह्या तात्त्विक विचारकलहाची तिला अजिबात आवड नाही.
या जनतेला मूर्ख म्हणण्याची माझी तयारी नाही, आदि शंकराचार्यांचे स्मरण मला सतत असते आणि चार्वाकांबद्दलचा माझा आदर कधीही उणावत नाही. अशा स्थितीत विषयाची मांडणी आपल्याकडून नीट होत नाही एवढाच निष्कर्ष निघतो. ती सरळ केली हा पेच कसा तो उरतच नाही.
मुळात श्राद्धपक्षाचा हा विषय आत्मा ह्या कल्पनेशी निगडीत ठेवणे ही एक गफलतच या विषयात झालेली आहे.
श्राद्ध करणे ही गैर गोष्ट आहे असे कुणी म्हणत नाही. श्राद्ध हे आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याची श्रद्धेने आचरिलेली गोष्ट आहे. हे स्मरण कसे करावे हाच काय तो मुख्य प्रश्न. तो जेवणाचा कार्यक्रम करून जेवढा समाधानकारक पद्धतीने सुटतो तेवढा दुसऱ्या कुठल्याच वाटेने सुटत नाही असा अनुभव घेऊन समाजात हा निर्णय फार पूर्वी झालेला आहे.
आनंदाच्या, मंगल प्रसंगी आप्तांना, शेजाऱ्यांना, गावालाही जेवू घालतातच. हे काही आपल्याकडेच होत नाही तर जगभर होते. निमंत्रितांसाठी विवाह समारंभ हा भेटीगाठी व भोजन समारंभ होतो. तीच गोष्ट श्राद्धपक्षाची आहे. त्यातही हा प्रसंग मुख्यतः भोजनाचाच आहे.
या कारणास्तव भोजन घालण्याची पद्धत व्यक्ती मृत झाली की चौदाव्या दिवसापासून होते. या दिवशीच्या जेवणाला दोन महत्त्वाचे अर्थ आहेत.
एक म्हणजे त्या कुटुंबात आजपासून गोडाचीही पाकसिद्धी होऊ दे व ते कुटुंब रोजच्या व्यवहाराला लागू दे. तसेच व्यक्ती मृत झाली तेव्हा अंत्यसंस्कारासाठी अनेकजण जमले होते. प्रेताचा दहनविधी ही तशी कष्टाची गोष्ट आहे. त्या करिता ज्यांनी आपला अमूल्य वेळ दिला, मेहनत घेतली व धीर दिला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हाही हेतू आहे.
आजकाल ही बाब अनेकजण विसरतात ते चांगले नव्हे. अनेकजण या दिवशी जेवायला बोलावले तर जात नाहीत तेही चांगले नव्हे. त्या काळात आधार फक्त माणसांचाच वाटत असतो. ते ओळखून ही मदत समजून अवश्य भोजनास जावे.
शास्त्राने पहिल्या वर्षी दर महिन्याला असे श्राद्ध सांगितले आहे व नंतर दरवर्षी त्या तिथीला. ही आईवडिलांची आठवण करण्याची गोष्ट झाली. पितृपक्षात आपण आपल्या आठवणीतील कितीही पितरांची आठवण करू शकतो.
“वर्षातून दोनदा केवळ आईवडिलांचे स्मरण केले की पुरेसे झाले”, असे पूर्वीच्या समाजकारण्यांनी मानले नाही. आपले जीवन अनेक रक्ताच्या व बिनरक्ताच्या नातेवाईकांमुळे घडते, गुरुजनांमुळे, सुहृदांमुळे घडते. त्या सर्वांची आठवण करावी हा हेतू पितृपक्षातील श्राद्धामागे आहे. हा विचार उदात्त असून त्यात नाकारण्यासारखे काही नाही. सारे स्वीकारण्यासारखेच आहे.
आपली ऐपत किती व प्रसंग आपण “किती मोठा” करायचा ह्याचीही मुभा मुळातच आहे. मृत व्यक्तीच्या नावे एक माणूस ठरवून त्या पानावर बसविण्याची पद्धत आहे. तेवढेही झेपत नसेल तर तो आहे अशी कल्पना करून छोटेसे पान मांडता येते. त्याला चटावरचे श्राद्ध म्हणतात. हेही जमत नसेल तर कुण्या व्यक्तीला दूध द्यावे असे म्हटले आहे.
हेही जमत नसेल तर मृत व्यक्तीची आठवण काढून बोंब मारावी असा औपहासिक पर्यायही ठेवलेला आहे!
हे जे भोजन घालायचे त्या मागची भावना अन्य भोजन प्रसंगांपेक्षा वेगळी आहे. येथे कृतज्ञतेला दुःखाची किनार आहे. त्यामुळे वातावरण मंगल प्रसंगासारखे असू नये अशी अपेक्षा आहे. भटजींचा संबंध येतो तो इथे. ते मंगल कार्येही करतात आणि दुःखद प्रसंगही निभावतात. लक्षात घ्या, हा प्रसंग मंगल, तो दुःखद वगैरे आहे हे आपल्यासाठी, त्यांच्यासाठी ते रोजचे जीवन आहे.
थोडक्यात, ते आपल्या प्रसंगाला शोभेल असे नाट्य निर्माण करणारे कलावंत आहेत! म्हणाल तो प्रयोग लावतात!
ह्या प्रयोगांची – हा शब्दही त्यांचाच आहे – संहिता फार पूर्वी रचली गेलेली आहे. कालानुरूप काही बदल झाले असतील व काही क्रियांचे अर्थही बदलले असतील पण मूळ भावना न बदलल्यामुळे संहितेचे स्वरूप बरेचसे तसेच राहिले आहे.
श्राद्धपक्षाच्या वेळी मंगलप्रसंगी असते तसे नेपथ्य नसते. तरी यांचे नाटक रंगते. त्यांनी या साऱ्या गोष्टींचा विचार करून ठेवला आहे. श्राद्धाचे साहित्यही वेगळे असते – काळे तीळ, माका, पांढरी फुले वगैरे. पाकसिद्धीही वेगळी असते. भाताचे पिंड करतात. खरेतर पिंड म्हणजे देह. पिंडी ते ब्रह्मांडी हे वचन सुप्रसिद्ध नाही का? येथे शिजवलेल्या भाताचे पिंड करतात म्हणजे त्या व्यक्तीच्या नावचा देह बनवितात किंवा म्हणा प्रतिमा करतात. त्या प्रतिमेला डोळे काढतात, काजळ लावतात, काळे तीळ माका वाहतात म्हणजे पूजा झाली. आता सर्वांनी नमस्कार केला की श्राद्ध झाले.
पिंडाला काही जेवता येत नाही त्यामुळे मृताच्या नावे कुणी बोलावतात. त्याला मानसन्मानाने जेवू घालणे हाही याचाच एक भाग. नंतर इतर आमंत्रित व घरच्यांनी जेवायचे. त्यांनी जेवायच्या आधीचा हा कार्यक्रम ही भटजी मंडळी इतक्या कसबाने करतात की साऱ्या वातावरणात एक उदास, शोकाची भावना निर्माण व्हावी. यजमानाला आणि आमंत्रितांनाही जाणीव हवी की आजही पोटभर जेवायचे आहे, आग्रहही करायचा आहे पण हा प्रसंग लग्नाचा नव्हे! गांभीर्याने घ्या!
ह्या साऱ्या प्रकारात भोजन हीच मुख्य गोष्ट आहे. पण महत्त्व त्यामागील भावनेला आहे.
ती भावना निर्माण करणे आवश्यक असते. कारण तेराव्याचे श्राद्ध वगळता नंतर काळाच्या ओघात ती भावना स्वाभाविकपणे कमी झालेली असते. पिंड बनले की मात्र वातावरण पालटते. घरातली बडबड कमी होते, आपले पितर जेवायला येत आहेत ह्या भावनेने मन कातर होते. तसे ते व्हायला हवे.
आज या विषयाचे सामाजिक शिक्षण इतके कमी झालेले आहे की एखाद्यास पोहोचवून स्मशानातून लगेच पुन्हा त्या घरी जावे तर बाहेरून टिव्हीचा आवाज आणि हास्यविनोद ऐकू येतात. मागे फिरावेसे वाटते, पण आत एक व्यक्ती सारे जीवन संपल्याच्या आणि देह असल्याच्या भयानक अवस्थेत कोपऱ्यात बसून असते. तिच्यासाठी आत जावे लागते. ते जाणे वाया जात नाही आणि तो प्रसंगही पुन्हा येत नाही.
श्राद्धाच्या वा पक्षाच्या दिवशी हे सारे घडून बराच काळ गेलेला असला तरी काळ मागे नेण्याऱ्या ह्या पुरातन नाटककारांचे मला विचार करता आता फार कौतुक वाटते.
चार्वाकांचे म्हणणे असे की ही सारी बनवाबनवी कर्मकांडी वैदिकांनी उत्पन्न केलेली आहे. यावर असे म्हणता येईल की –
आत्मा येत जात जेवत नाही, येथे कुणाला जेवायला घातल्याने पितरांना पोहोचत नाही यात संशय नाही. तसे जो कोणी म्हणत असेल तो स्वतःला किंवा दुसऱ्याला फसवीत आहे. वैदिक आपल्या घरी येऊन काही कार्य करतात त्याचा अर्थ त्यांना कळलेला असतो असे मानणे चूक आहे.
नाटकाच्या लेखकाला काय म्हणायचे आहे, हे नाटकात काम करणाऱ्याला कळलेलेच हवे असे नाही. बऱ्याचदा ते कळलेले नसते व बऱ्याचदा ते पटलेलेही नसते तरी पोटाकरता कामे चालू असतात. असे नसते तर खलनायकाचे पात्रही नसते व मग नाटकही नसते!
वैदिक मंत्र म्हणणाऱ्या अनेकांना संस्कृतच येत नसते. लताबाईंनी अनेक भाषांमध्ये उत्तम गाणी गायली आहेत तसे हे समजावे. तरीही गीतातील भावना काय हे लताबाईंनी व या भटांनी आधी समजावून घेतलेले असते. आपण काय करतो आहोत हे त्यांना माहीत असते. आपल्याला उत्सुकता असल्यास त्यांना विचारावे, न पुरल्यास त्याच्या गुरुकडे जावे.
फसवाफसवीचा एक भाग आर्थिक आहे. या व्यवसायात दक्षिणा अमुक असे सांगण्याचा भटाला अधिकार नाही. आपण यजमान, आपल्याला शोभेल अशी संभावना आपण करावी. पाचशे पान जेवायला घातले आणि भटाला पाचशे देताना खळखळ केली, तर त्यात आपणच आपली शोभा केली! आपली फसवणूक होऊ नये या करिता आपणच दक्ष असावे.
पुरणपोळीवर तूप मागणाऱ्या हावरट ब्राह्मणावर महात्मा फुले यांनी कोरडे ओढले आहेत. आम्ही पुरणपोळी करणार नाही व केली तर त्यावर तूप वाढणार नाही असे निक्षून सांगावे.
श्राद्धाचा प्रसंग असा आहे की त्यात फसवणुकीला फार वाव नाही. तरी तेराव्या चौदाव्याला शंका आली तर भाजीच्या दुकानात करतो तशी घासाघीसही करावी. त्यात काहीही गैर नाही. त्यांचा हा व्यवसाय आहे व त्यातून जास्त उत्पन्न मिळविण्याचा ते प्रयत्न करणार. आपण ग्राहक आहो तेव्हा जागरूक असावे. केव्हा कुठे किती ताणायचे हे आपल्यालाही कळले पाहिजे.
नुकताच गौरी गणपतींचा उत्सव झाला. त्यासाठी विकायला अनारसे ठेवलेले होते. आपण विचारावे, कुठल्या तुपात तळले आहेत? साजूक की वनस्पती? दुकानदाराने दोनही प्रकारचे आहेत म्हटले आणि आपल्याकडे पैसे असले तर साजूक तुपातील अवश्य घ्यावे पण नंतर साजूक तुपात वनस्पती कशावरून मिसळलेली नसेल अशी शंका घेऊन आपला व खाणाऱ्यांचा आनंद कमी करू नये. खाताना शंका आलीच तर पुढच्या वेळी दुकान बदलावे. आपल्या घरी करणे होत नाही व केले तर चांगले होत नाहीत म्हणून बाहेरून आणण्याची वेळ आली हे ध्यानात धरावे.
भटाब्राह्मणांशिवाय महाळ करणारे अनेक आहेत. त्यात आपले आपण पिंड करून नैवेद्य दाखविणारेही आहेत. भटाब्राह्मणांना बोलावल्याने वा न बोलावल्याने श्राद्ध कमी वा जास्त प्रतीचे होते असे नाही. भट ही गंडविणारी जमात असेल तर त्यांच्यापासून सुटका सहज आहे, पण पितरांपासून नाही. त्यांची आठवण न करणे हे कृतघ्नपणाचे आहे.
“ती कशी करावी हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे” हे त्यावरील उत्तर नव्हे. पितृपक्ष ही घातक संकल्पना नव्हे. तिचा योग्य अर्थ जाणून आपल्या कुटुंबाचे आपण प्रबोधन करावे. भाताचे पिंड करणे, त्याला नमस्कार करणे व नंतर गायीला गुरांना खाऊ घालणे यात नुकसान काही नाही व त्यात वेडेपणाही काही नाही.
फोटो नव्हते तेव्हा सर्व समाजाला झेपेल असा शोधलेला हा प्रतिमापूजनाचा आणि तोही अल्पकाळ चालणारा हा कार्यक्रम आहे. तो तसाच आहे म्हणून एकनाथांनी त्या वेळच्या ब्राह्मणांची फिकीर केली नाही. तयार अन्न तत्कालीन क्षुधार्थींना वाढून ते मोकळे झाले व ब्राह्मणांपुढे झुकले नाहीत. तेव्हा हा अर्थ माहीत असल्यानेच आपल्या कृत्याची लाज वाटून ते ब्राह्मण शेवटी एकनाथांना शरण गेले.
फोटोचा जमाना आला तरी पिंडाचे काम फोटो करू शकत नाहीत. प्रत्येक सामान्य माणसाला चूकबरोबर कळत असते. जो स्वत: आपल्या मृत आप्ताला जाळून आला त्याला त्या व्यक्तीची राख झाली हे सर्वार्थाने कळत असते. त्याला तेच शहाणपण शिकविणे हे फार शहाणपणाचे नव्हे.
या निमित्ताने आम्ही संस्थेला देणगी देतो असे आजकाल अनेक जण म्हणतात. ही गोष्ट वाईट नव्हे. पण ज्याने समाजाची धारणा होते त्याला धर्म म्हणतात. त्या धर्माचे पालन ही समाजाच्या एकीसाठी व स्वास्थ्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. आपल्या कुटुंबात प्रत्येकाचे स्वातंत्र्य ज्या प्रमाणात आपण मर्यादित करतो तसेच आपल्या कुटुंब म्हणून समाजात असलेल्या सामाजिक वर्तनाचे आहे. दिसेल ती परंपरा मोडायची हे धोरण योग्य नव्हे. हा विवेक सामान्य जनांत आहे म्हणून ही प्रथा भारतभर टिकून आहे. तिच्याशी भटाभिक्षुकांचा संबंध नाही आणि अवकाशात न तरंगणाऱ्या आत्म्यांचाही नाही.
परदेशात ‘डे’ असतात, तसे वर्षश्राद्धाचे दिवसही ते विज्ञानवादी देशवासी पाळतात. पितरांसाठी पंधरवडा देण्यात आपल्या पूर्वजांनी फार शहाणपण दाखविले आहे. आपल्या मातापित्यांचे दिवस प्रत्येकजण पाळीलच पण इतर संबंधितांच्या आपल्यावरील उपकाराची जाणीव ठेवणे वा राहणे सोपे नाही. तो दिवस गाठणे जमेलच असे नव्हे व दिवस तरी कोणता असावा हे ठरू शकणार नाही. या पंधरवड्यातील सोयीचा दिवस पाहून हे कार्य – आपल्याला झेपेल त्या प्रमाणात – करणे हे धर्मपालन करणे आहे.
या धर्माला हिंदु धर्म, वैदिक धर्म असे काहीही नाव नाही. कुणाचीही देवता यात पूजीत नाहीत. आपल्याच पूर्वजांचे केलेले स्मरण हे. ते वर्षात कधीतरी करीन असे म्हणणे ही सामाजिक जबाबदारी नव्हे आणि वर्षभर ती भावना जपीन असे म्हणणे हा तर मूर्खपणाच! या संबंधी भगवद्गीतेत म्हटले आहे:
देवांचे भक्त देवांस पितरांचे तयांस चि ।
भूतांचे भक्त भूतांस माझे हि मज पावती ।। (विनोबांची गीताई, ९-२५)
देव म्हणजे सुखोपभोग भोगणारे ते. जो त्यासाठी कष्ट करतो त्याला तसे फळ मिळते. काही पितरांच्या विचारांत अडकून असतात ते तसेच होतात. काहींना आजचे दर्शनी जग आवडते तर त्यांना ते प्राप्त होते आणि जे माझी अपेक्षा करतात त्यांना मी मिळतो.
आजच्या लेखापुरते पाहायचे तर पितरांत अडकणे हे गीताकारांनी फार विशेष चांगले म्हटलेले नाही. त्याचे कारण असे की ते मानवी जीवनाचे ध्येय होऊ शकत नाही. परमात्मास्वरूप होणे हेच खरे असे भगवंतांस म्हणावयाचे आहे.
ती अवस्था आली म्हणजे –
मागील ते स्मरावे । पुढील ते जाणावे । एेसे काही न उरावे । जगी इये ।। –
असे होईल खरे पण अशा प्राप्तार्थानेही धर्मपालनार्थ सर्वसामान्यांप्रमाणे कर्मे करीतच राहिले पाहिजे असेही गीताकारांनीच बजावून ठेविले आहे.
सारांश – पितरांत अडकून राहू नका, तसेच त्यांना विसरूही नका. हा पंधरवडा त्यासाठी आहे.
भटाभिक्षुकांचा राग येत असेल तर आपले धर्मपालन त्यांच्याशिवाय करा. पण धर्म सोडू नका. धर्मपालनाची जबाबदारी आपली आहे, भटांची नव्हे. ते आपले मदतनीस आहेत. ती मदत घेण्याचे बंधन आपल्यावर नाही. जे सगळे करतात ते आपण केले म्हणजे समाज एक राहतो व आपणच शहाणे असल्याचा वाईट शिक्का आपल्यावर बसत नाही.
आपण शहाण्या पूर्वजांचे शहाणे वंशज आहो. चार्वाक म्हणाले तेही सत्य आहे आणि शंकराचार्यांना चूक सिद्ध करणारा अजून जन्माला यायचा आहे. त्या दोघांना मानूनही पितृपक्षातील आपले कर्तव्य आपण बजावू शकतो. तसे केले म्हणजे बुद्धी आणि मन यांत वरचढ कोणी होणार नाही व शांत वाटेल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com |वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. ।आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.