विमानाच्या खिडकीवरील “त्या” छोट्या छिद्रावर कधी तुमचं लक्ष गेलं आहे का…?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपल्यातील बहुतेक जणांनी विमानामधून प्रवास केला असेल, विमानामध्ये प्रवास करण्याची मज्जा काही वेगळीच असते, पण पहिल्यांदाच या विमानामधून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी विमान प्रवास हा तेवढाच भीतीदायक असतो.
विमानामधील खिडक्या ह्या गोल असतात आणि पूर्णपणे झाकलेल्या असतात. पण जर तुम्ही कधी विमानाच्या खिडक्यांच्या बाजूला बसला असाल, तर तुम्ही पाहिले असेल की, त्या खिडक्यांच्या खाली एक छोटेसे छिद्र असते.
कदाचित जास्त लोकांनी याकडे लक्ष दिले नसेल, पण तिथे छिद्र असते आणि ज्यांनी ते पाहिले असेल, त्यांचा डोक्यामध्ये नक्कीच असा प्रश्न निर्माण झाला असेल की, हे छिद्र इथे कशाला आहे ? याचा उपयोग तरी काय ?
त्यावेळी तुम्ही वेगवेगळे तर्क लावले असतील. पण खरे कारण कदाचित तुम्हाला माहित नसेल. चला तर मग जाणून घेऊया या छिद्राबद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती….
खरतरं ३५००० फुट उंचीवर हवेचा दाब अतिशय कमी असतो. त्या दाबाचा विमानाच्या खिडकीवर देखील प्रभाव पडू शकतो आणि विमानाची खिडकी चुकून उघडली गेली तर त्या हवेचा वेग कोणालाही बाहेर खेचू शकतो बाहेरील हवेचा वेग हा खिडकीच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांना थेट बाहेर खेचू शकतो.
हे घडू नये म्हणून विमानातील हवेचा दाब हा बाहेरील हवेच्या दाबापेक्षा जास्त असावा लागतो.
पण इथे अजून एक समस्या निर्माण होते ती म्हणजे विमानात राखण्यात येणारा जास्त हवेचा दाब हा प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जरी गरजेचा असला तरी मात्र तो उंचावर उडणाऱ्या विमानासाठी म्हणावा तितका सुरक्षित नसतो.
म्हणूनच बाहेरील आणि विमानातील एका विशिष्ट प्रमाणात हवेचा संतुलित दाब राखावा म्हणून विमानाच्या खिडकीवर ती लहान लहान छिद्रे असतात.
या लहान लहान छिद्रांना ब्लीड होल्स म्हणतात, हे छिद्र विमानाला सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
विमानाची खिडकी तीन टिकाऊ पट्ट्यांपासून बनलेली असते. पट्ट्यांचा सर्वात वरचा भाग हा दुसऱ्या आणि तिसऱ्या पट्ट्यांच्या भागाचे रक्षण करतो.
त्यामुळे बाहेरचा दबाव आणि विमानामधील दबाव यांच्यातील फरक संतुलित राखण्याच्या उद्देशाने ह्या पट्ट्या डिझाईन करण्यात आलेल्या असतात.
हे ब्लीड होल्स बाहेरचा आणि विमानामधील दबाव तर संतुलित राखतातच, त्याचबरोबर या खिडक्यांच्या पट्ट्यांमधील हवेचा दबाव देखील समतोल ठेवण्यास मदत करतात.
तसेच हे छिद्र विमानातील आद्रता कमी करण्यात देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात आणि दवामुळे तुम्हाला अस्पष्ट दिसणारे दृश्य अधिक स्पष्टपणे दिसते.
अश्या या लहान छिद्राची मूर्ती लहान असली तरी त्याचे काम आणि कीर्ती महान आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.