' गौरी लंकेश ह्यांच्या हत्येनंतर अशी उघडी पडतीये समाजातील विकृती! – InMarathi

गौरी लंकेश ह्यांच्या हत्येनंतर अशी उघडी पडतीये समाजातील विकृती!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपण इतर देशांच्या गप्पा मारतो, त्यांना ज्ञान शिकवायला जातो, पण आपल्याच देशातील वातावरण किती दुषित होत चाललंय आणि आपला समाज किती वेगाने कडेलोटाच्या दिशीने वाटचाल करतोय त्याचे मात्र कोणालाच सोयरसुतक नाही. त्यावर काहीतरी ठोस कृती करण्यापेक्षा केवळ सोशल मिडीयावर बाता मारणे आणि घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे राजकारण करणे, आपआपल्या सोयीनुसार त्या घटनेचा विरोध करणे किंवा त्याचे समर्थन करणे यातच विचारांचे डोस देणारे आपला वेळ घालवत आहेत. आज याचं सर्व गोष्टींची प्रचीती पुन्हा आली जेष्ठ महिला पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर सोशल मिडीयावर उठलेल्या वायफळ बडबडीतून… सॉरी..चर्चेतून!

Gauri Lankesh--marrathipizza01
thenewsminute.com

देशातील नावाजलेल्या महिला पत्रकारांपैकी एक गौरी लंकेश यांची या मंगळवारी सायंकाळी राहत्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गौरी लंकेश यांनी नेहमीच कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचा आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाचार घेतला होता. त्यामुळे त्यांचे शत्रू काही कमी नव्हते, पण याचा अर्थ थेट कोणत्याही पुराव्याशिवाय हिंदुत्ववाद्यांवर ठपका ठेवणेही नैतिकतेला धरून नाही.

जेव्हा गौरी लंकेश यांच्या खुनाची बातमी मिडियामध्ये झळकू लागली, तसे तथाकथित डावे आणि उजवे दोन्ही गट एकमेकांसमोर आले. अर्थातच सोशल मिडीयावर! कारण तोंडाने आपली मत मांडणं बऱ्याच जणांना जड जातं, म्हणून मोफत लिहायला जेथे भेटतं तेथे मिळून हे सारे जण राडा करतात. अर्थातच त्यातून निष्कर्ष काहीही निघत नाही. फक्त आपल्याला फॉलोअर्स आहेत, लाईक्स मिळतात म्हणून दरोरोज घडणाऱ्या घटनांवर आपली बाजू मांडायची इतकंच ते काम!

गौरी लंकेश यांच्या हत्येचं निमित्त साधूनही यांनी हेच केलं. एक जण म्हणतोय बरं झालं, एकदाची पीडा गेली, उगाच हिंदुंना उठसुठ नाव ठेवण्याशिवाय काम काय होती यांना,

Gauri Lankesh--marrathipizza02

तर दुसरीकडे गौरी लंकेश यांच्या समर्थनार्थ न्यूचे वगैरे स्नॅपशॉट शेअर करून समानता मानणाऱ्या गटामधून पुन्हा एकदा चळवळ वगैरे उभारण्याची आणि उजव्यांना धडा शिकवण्याची भाषा होऊ लागली. तुम्हाला आठवत असेल तर हीच भाषा कलबुर्गी, पानसरे आणि दाभोळकर यांच्या हत्येनंतरही झाली होती, पण त्याचं पुढे काय झालं? काहीच नाही…!

Gauri Lankesh--marrathipizza03
त्यातून कहर म्हणजे गौरी लंकेश यांचा खुण कोणी केला यावर वादंग सुरु झाला. अहो तिकडे पोलीस काय चपात्या लाटायला बसलीये काय? लोकशाहीवर विश्वास आहे म्हणता आणि दुसरीकडे त्याच लोकशाहीचा भाग असणाऱ्या पोलीस यंत्रणेला नावं ठेवता. जर असतील पुरावे तर या समोर आणि सांगा पोलिसांना खुन कोणी केला ते… तेवढच त्यांच काम सोप्प होईल, पण नाही, आपण एका विचारसरणीचे आहोत, त्यामुळे दुसऱ्या विचारसरणीच्या लोकांनीच आपल्या विचारसरणीच्या विचारवंताचा खुन केला असेल अशी यांची गाढ श्रद्धा! असे मानणाऱ्यांना लोक “विचारवंत” म्हणतात यापेक्षा दुर्दैव नाही.

Gauri Lankesh--marrathipizza04

गौरी लंकेश यांच्या हत्येची खिल्ली उडविणाऱ्या, त्यांच्या मरणानंतर आनंदात्मक विचारांची उधळण करणाऱ्या उजव्यांच्या गटाने देखील पुन्हा एकदा आपली लायकी दाखवून दिली असे म्हटले तर वावगे ठरू नये. अरे एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, मृत्यू नैसर्गिक नाही, तर त्यांची हत्या करण्यात आलीये आणि त्याचा तुम्ही आसुरी जल्लोष कसला करता?

Gauri Lankesh--marrathipizza05

माणूस जिवंत असताना ज्या माणसाबद्द्दल कोणाचेही चांगले विचार नसतील, त्या माणसाच्या मृत्यूनंतर मात्र त्याला बोल लावू नये, नावे ठेवू नये असे वडीलधारे सांगून गेले, मात्र इतरवेळी संस्कृती आणि मुल्यांची शिकवण देणारे उजव्या विचारसरणीचे लोक अश्या वेळेस त्याच संस्कृतीमधील मुल्ये कसे काय विसरतात देव जाणे! अश्यांना लवकरात लवकर देव सुबुद्धी देवो असे म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही.

Gauri Lankesh--marrathipizza06

समाजातील अमानुष घटना या वेळोवेळी दाखवत असतातच की, समाज किती असंवेनशील झालाय, पण एका हत्येवर सार्वजनिकरित्या होणाऱ्या वायफळ, तर्कहीन चर्चा देखील त्याच पातळीच्या आहेत आणि त्या देखील आपल्या असंवेदनशील समाजाचचं प्रतिक आहेत, ही वस्तुस्थिती अतिशय भयानक आहे.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?