Site icon InMarathi

ई-सिगारेटच्या नावाखाली कंपन्या ग्राहकांना मूर्ख बनवत आहेत का?

e-cigarates-marathipizza00

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

धुम्रपान हे वाईट आणि त्याबद्दल कोणतेही दुमत नाही. मुख्य म्हणजे सिगारेट पिणाऱ्याला देखील ही गोष्ट नीट माहित असते की, सिगारेट पिणे हे आपल्या जीवावर देखील उठू शके, पण एखादी गोष्ट एकदा का सवय बनली की ती सोडता सोडवत नाही. रोज थोडी थोडी करून या सवयीचे गुलाम असलेले धुम्रपानी आपलं आयुष्य एक एक क्षणाने कमी करत आहे, हे त्यांच त्यांना देखील कळत नाही. मग कॅन्सर सारख्या भयानक आजाराचं निदान झालं की, त्यांची बुद्धी ठिकाणावर येते, पण तोवर वेळ निघून गेलेली असते.

धुम्रपानाबद्दल लोकांचे प्रबोधन करण्यासाठी आज अनेक संस्था कार्यरत आहेत. खुद्द सरकार देखील अनेक उपक्रम राबवीत आहे, पण ही गोष्ट देखील नाकारता येऊ शकत नाही की, जोवर तो मनुष्य खुद्द धुम्रपान सोडण्याचे मनावर घेत नाही, तोवर काही वेताळाप्रमाणे मानगुटीवर बसलेला धुम्रपानाचा राक्षस पिच्छा सोडणार नाही. तर मग आता काय उपाय आहेत ज्याने धुम्रपानाला आळा घालता येईल? तसे तर बरेच मार्ग आहेत. काही सोपे आहे काही कठीण आहेत. पण तुम्हाला आठवत असेलच मध्यंतरी एक आधुनिक उपाय कोणीतरी शोधून काढला होता. बरोबर ओळखलंत-ई-सिगारेट अर्थात इलेक्ट्रॉनिक्स सिगारेटचा उपाय तो. हा उपाय म्हणजे सिगारेट ओढणाऱ्याला सिगारेटचा आनंद तर मिळवून द्यायचा पण त्याच्या शरीरावर कोणतेही हानिकारक परिणाम व्हायचे नाही.

wikimedia.org

जेव्हा ई-सिगारेट सादर करण्यात आली तेव्हा दोन गट पडले होते. एक गट म्हणत होता की, हा आजवरचा सर्वोत्तम उपाय आहे, पण दुसरा एक गट म्हणत होता कि हा उपाय दिसतो तितका प्रभावशाली नाही, ई-सिगारेटचे स्वत:चे काही वाईट दुष्परिणाम आहेत, ज्या कंपन्या तुम्हाला कधीही सांगणार नाहीत आणि मंडळी ह्या दुसऱ्या गटाची गोष्ट खरी होती की काय असे म्हणायची वेळ आली आहे. का? म्हणून विचारताय… चला जाणून घेऊया.

गेल्या काही वर्षांत ई-सिगारेट ओढणार्‍यांची संइत खुप वेगाने वाढत आहे. १९५० च्या दशकात सिगारेट ओढणार्‍यांची संख्या अशीच वाढली होती. २०१० मध्ये दोन टक्के लोक इलेक्ट्रॉनिक सिगारेट पीत होते. २०१२ मध्ये ही संख्या वाढून ३० टक्के झाली. खरं म्हणजे, अशा दाव्यांनी इलेक्ट्रॉनिक सिगारेटची लोकप्रियता वाढवली की, ई-सिगारेट ओढल्याने तंबाखूच्या धुरापासून सुटका होऊ शकते. पण युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधील प्रोफेसर रोबर्ट वेस्ट आणि त्यांच्या टीमने जाहीर केलेल्या एका अहवालात सांगण्यात आले आहे की,

इलेक्ट्रॉनिक सिगारेटमुळे इतर प्रकारे निकोटीन चघळण्यापेक्षा धूम्रपान सोडण्याची शक्यता ६० टक्के अधिक वाढते.

fda.gov

तसे अहवालात हे ही सांगण्यात आले आहे की, फक्त वीस टक्के लोकांचीच धुम्रपानाची सवय सुटली आहे ज्यांनी ई-सिगारेटचा वापर केला होता.

जगभरात ई-सिगारेटमुळे धूम्रपान करणार्‍यांचा नवा वर्ग निर्माण होत आहे. काही देशांत हायस्कूलचे विद्यार्थी ई- सिगारेट सोबतच तंबाखूची सिगारेट देखील ओढतात. ई-सिगारेटची जाहिरात अश्या लोकांना आकर्षित करतेच ज्यांनी सिगारेट ओढणे सोडले आहे. पण उलट ज्यांना धुम्रपानाची सवय नाही त्यांना देखील आकर्षित करते असे आढळून आले आहे. त्यामुळेच महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांनी ई- सिगारेटवर बंदी घातली आहे. अजुनही अनेक राज्ये ई-सिगारेटचा वाढत प्रसार पाहून तशी पाउले उचलण्याची चिन्हे आहेत.

सामान्य सिगारेटपेक्षा वेगळी असली आणि द्रवरूप निकोटीनमधील ई-सिगारेटच्या वाफेत तंबाखूच्या धुरासारखे विषारी घटक नसले, तरी त्यात कार्सिनोजेन्ससह हानिकारक घटक मात्र आढळतात.

theheadshotguy.info

ई-सिगारेटचे इतरही अनेक धोके सांगण्यात आले आहेत जसे की, ही सिगारेट बॅटरीवर चालणारी असल्याने उष्णतेमुळे किंवा तत्सम कारणांमुळे बॅटरी फुटण्याचा धोका बळावतो. ई-सिगारेटचे केमिकल शरीराच्या वायुपेशींमध्ये अँटिबायोटिक्ससाठी प्रतिरोध निर्माण करतात.
ई-सिगारेटच्या वाफेत कार्सिनोजन फॉर्मल्डिहाइड, प्रॉपिलिन ग्लायकॉल आणि निकोटीन असते. अमेरिकेत पोईजन कंट्रोल सेंटर मध्ये ई-सिगारेट संबंधितमुद्दय़ांवर २०१२-२०१३ दरम्यान २१९ टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. यावरून खरंच ई-सिगारेट उत्पादन करणाऱ्या कंपन्या पैसा कमवण्यासाठी ग्राहकांना मूर्ख बनवत आहेत का असा प्रश्न उभा राहतो.

पण अजूनही ई-सिगारेट कितपत धोकादायक आहे याबद्दल संभ्रम आहेच. ई-सिगारेटचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या मते ह्या व्यवसायाचं वाढत क्षेत्र पाहून सिगारेट उत्पाद करणाऱ्या कंपन्यांनी मुद्दामहून उठवलेली अफवा आहे आणि ही गोष्ट नाकारता येऊ शकत नाही. पण त्याचप्रमाणे वरील अहवाल आणि त्यातून सिद्ध झालेल्या दुष्परिणामांकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. येणाऱ्या काळात सत्य काय आहे ते लवकरच बाहेर येईल अशी आशा करुया.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version