ज्ञानाचा मोठा शत्रू अज्ञान नसून ज्ञानाचा भ्रम आहे!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
लेखक : सागर बाबानगर
===
विद्या विनयेन शोभते! याचा अर्थ आपल्याला माहित आहे का ? एक उदाहरण घेऊयात. ते म्हणजे दुपारचा प्रखर सूर्य. त्याच्याकडे आपण बघू शकत नाही. माणूस त्याच्या प्रखरतेपासून स्वःताला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच समजा एखादा ज्ञानी पंडित जर ज्ञानामुळे दुसऱ्यांवर रोष झाडत असेल तर लोक त्याच्यापासून नेहमी दूर पळतात. जे ज्ञानी लोक असतात ते आपल्या ज्ञानाचा वापर विनयतेनं करतात. दुसऱ्यांच्या भल्यासाठी करतात.
महाभारतात युधिष्ठीर एकदा प्रवासाला चालला होता तेव्हा यक्षाने युधिष्ठिराला विचारले की प्रवासामध्ये तुझा साथी कोण असणार आहे? तेव्हा युधिष्ठिराने उत्तरं दिले
ज्ञान…. माझं ज्ञान हेच मला शेवटपर्यंत साथ देणार आहे.
बघा ज्ञानामध्ये किती ताकत असते. ज्याच्याकडे ज्ञान असतं ना त्याच्याकडे भीती कधीच नसते. तो नेहमी निडर असतो. आज ही आपल्या भारत देशात ७४% लोक साक्षर आहेत आणि २६% लोक निरक्षर आहेत. प्रसिद्ध फिलॉसॉफर प्लुटो म्हणतो की, अशिक्षित राहण्यापेक्षा न जन्मलेलं बर. कारण अज्ञान हेच आयुष्यात आलेल्या संकटांच मूळ असत. पण त्या पुढे ही जाऊन विचार केला तर एखाद्या गोष्टीचं चुकीचं ज्ञान हे खूप वाईट असतं. प्रसिद्ध संशोधक स्टीफन हॉकीन म्हणतात.
ज्ञानाचा मोठा शत्रू अज्ञान नसून ज्ञानाचा भ्रम आहे.
जसं अज्ञान हे वाईट तसं चुकीचं ज्ञान हे त्याहून घातक असत.
ज्ञान अभ्यासक्रमाच्या सिद्धांतात ”ज्ञान” या शब्दाचा उल्लेख “सत्याचा न्याय्य समज” असं केला आहे. याचा अर्थ असा की जोपर्यंत कोणीतरी त्यांच्या ज्ञानासाठी सबळ पुरावा देण्यास सक्षम आहे तोपर्यंत हे सत्य म्हणता येईल. “सत्य” या शब्दासाठी ठोस परिभाषा नसली तरीही माझ्या मते “काही गोष्टींची गुणवत्ता किंवा स्थिती ही सत्य असते”. शिवाय, मला वाटते की एखाद्या गोष्टीबद्दल तर्क करीत आहोत केवळ एकतर सत्य किंवा असत्य असू शकतो आणि दोन्ही नाही.
खोटं ज्ञान किवा ज्ञानाचा भ्रम खरंच असतं की नाही हे विवादास्पद आहे. काही लोक म्हणतील की, खोटं ज्ञान किंवा ज्ञानाचा भ्रम असं काही नसतं आणि सर्व ज्ञान हे सत्य असतं. जे लोक खोट्या ज्ञानाच्या अस्तित्वाचे समर्थन करतात त्यांचा असा विश्वास आहे की जर आपण एखादी गोष्ट सिद्ध करू शकलो नाही किंवा त्याबद्दल पुरावा देऊ शकलो नाही तर ते सत्य मानले जाऊ शकत नाही आणि म्हणून ते आपोआप खोटे ज्ञान होईल.
माझ्या मते, ज्ञानाचा भ्रम हा अस्तित्वात असतो. कारण एखादी व्यक्ती त्याने दिलेल्या माहितीला एखादं पटेल असं उदाहरण किंवा पुरावा देऊ शकत नसेल तर त्या ज्ञानाला काही अर्थ राहत नाही. जगात प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी तथ्य असत. याव्यतिरिक्त, मला असेही वाटते की ज्ञान नवीन माहितीसह बदलले जाऊ शकते, ज्यामुळे एखाद्या विषयासंबंधीचे मागील ज्ञान हे खोटे ठरते. याचेच एक उदाहरण आहे, जेव्हा मानवांचा विश्वास होता की आधी हे जग सपाट होते. पूर्वी, जगाला सपाट समजले जाणे पूर्णपणे वाजवी होते आणि बऱ्याच लोकांनी या ज्ञानाच्या दाव्यास समर्थन देण्यासाठी विविध पुरावे प्रदान केले आहेत ज्यामुळे ते “सत्य” झाले. तथापि, काळ पुढे जाईल तसे या माहितीची जागा नवीन माहितीने घेतली ,ज्यामुळे जग हे एक गोलाकार आकार आहे हे सांगणारे नवीन पुरावे प्रदान केले गेले. त्यामुळे आधी जग हे सपाट होते हे मानणारे पुरावे जुने झाले. म्हणून हे ज्ञान ही खोटे झाले. आत्ताच्या सद्य परिस्थितीत जर कोणी जग हे सपाट आहे असे सांगत असेल तर तो त्याच्या ज्ञानाचा निव्वळ भ्रम होईल.
जर एखाद्याने केमिस्ट्रीचा अभ्यास केला असेल तर ताच्या हे लक्षात आले असेल की, विज्ञान काही प्रमाणात सत्य आहे किंवा खोटे आहे. याचे कारण असे की, विज्ञानामध्ये सत्य म्हणून मानल्या जाणाऱ्या काही गोष्टींवर कित्येक वेळा परीक्षणे केली जातात तेव्हा ती गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या बरोबर ठरते तर दुसरीकडे, जर काहीतरी पुरेसे तपासले गेले नाही आणि सिद्धांत सिद्ध करण्यासाठी जवळजवळ काहीच नसल्यास तर ते सत्य समजले जाऊ शकत नाही आणि ते खोटे ज्ञान मानले जाते. कित्येक वेळा आपण कुठे काहीतरी वाचतो किंवा ऐकतो. त्या त्या गोष्टीबद्दल आपल्या मनात एक समज तयार होतो कि ही गोष्ट अशी आहे. बहुतेक वेळा आपण त्या गोष्टीची शहानिशा करत नाही. दुसर्यांनी सांगितलेलं तेच सत्य आहे असं मानतो. कदाचित त्यांनी आपल्याला सांगितलेलं ज्ञान हे बरोबर सुद्धा असेल. पण समजा ते चूकीच असेल तर आपल्या मनात कायम त्या गोष्टीबद्दल चुकीचं ज्ञान राहील. त्यामुळे आपल्याला तोटा होऊ शकतो. आणि तेच ज्ञान आपण दुसऱ्यांना दिलं तर त्यांना ही चुकीचं ज्ञान मिळेल.
हे जग खूप वर्षांपासून विविध रूढी आणि परंपरेच्या विळख्यात आहे. अंधश्रद्धानी या समाजाला इतक ग्रासलेलं आहे की सत्य समोर असलं तरी आपल्याला धार्मिक भीतीसंकटामुळे अनेकदा माघार घ्यावी लागते. असे खूप लोक आहेत जे आपल्याला खऱ्या ज्ञानाने या भोंदू गोष्टींपासून दूर ठेवायचा प्रयत्न करत आहेत. पण खोट्या ज्ञानाचा पुढाकार घेणारी लोक त्यांना यशस्वी होऊ देत नाहीत. त्यांनी या सगळ्यांचा जणू बाजार मांडलाय. त्यावर त्याचं पोट चालत ?
अरे पण पोट चालत म्हणून तुम्ही काही करणार आहात का? नरबळी, पशुबळी अशी किती उदाहरण आहेत आपल्याजवळ. यामुळे समोरच्याला होणार्या त्रासाची ही त्यांना तीळमात्र कल्पना नसते. त्यांना फक्त त्यांचा फायदा दिसत असतो. जे लोक सत्याचे आणि खऱ्या ज्ञानाचे उपासक आहेत त्यांना आजपर्यंत खूप त्रास सहन करावा लागला आहे. त्यांना अश्या वाईट प्रणालीविरूद्ध लढाव लागल आहे. ग्यालिलिओनी असे खूप सिद्धांत मांडलेत जे त्या काळच्या लोकांना पटलेले नाहीत. त्याबद्दल त्यांना शिक्षाही झाली. कणाद ऋषींना लोकांचा त्रास झाला. चार्वाक लोकांना समाजाने वाळीत टाकलं. संत तुकारामही त्यातून सुटलेले नव्हते. सनातनी लोक त्यांच्यावर डोळा ठेवून होते. संत तुकारामांनी आपल्या अभंगातून सांगितलेलं आहे,
आंधळ्यासि जन अवघेची आंधळे | आपणासि डोळे दृष्टी नाही.
याचा अर्थ आंधळ्या लोकांना सार जग आंधळ वाटत पण आपल्याला डोळे असून समोर जे सत्य आहे आपण ते पाहू शकत नाही आणि हेच सर्वात धोकादायक आहे. अशी किती उदाहरण आहेत ज्यांनी अश्या खोट्या ज्ञानाविरूढ आवाज उठवला पण त्याच्या नशिबी शिक्षा आणि त्रासच आला. अगदी अलीकडच उदाहरण द्यायचं झालं तर डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे. या दोघांनी अंधश्रद्धेविरुध्द आवाज उठवला. त्यांनी पटवून दिलं की ही सगळी भोंदुगिरी आहे. सत्य सिद्ध करण्यासाठी वेळोवेळी पुरावेही दिले. त्यांना काय मिळालं? छाताडावर गोळ्या ? त्यांनी त्याचं काम केल. पण आपल्याला ही प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी लागेल. आपल्याला मिळालेल्या ज्ञानाची शहानिशा करण गरजेच आहे. अश्या लोकांविरुद्ध लढल पाहिजे. कारण हे भोंदू लोक वर्षानुवर्षे आपल्याला चुकीचं ज्ञान देत आहेत आणि आपण ते ज्ञान दुसऱ्यांना देतो. मग आपण स्वतःला पंडित मानतो. काय फायदा आहे अश्या ज्ञानाचा? ज्यामुळे एखाद्याला खोट ज्ञान मिळत असेल तर… त्यापेक्षा अज्ञानी राहिलेलं बर. अज्ञानामुळे चुकीच्या ज्ञानाचा किमान प्रसार तरी होत नाही.
खरं ज्ञान हे कधी वाया जात नाही. आयुष्यभर ते आपली साथ देत. माणूस हा आयुष्यभर शिकत असतो. अगदी मरेपर्यंत. पण त्याने मिळवलेलं हे ज्ञान योग्य आहे की, नाही याची त्याने शहानिशा केलीच पाहिजे. खऱ्या आणि योग्य ज्ञानातून कायम त्याच्या आयुष्याची समृद्धी होते आणि हेच ज्ञान त्यांनी दुसऱ्यांना दिल तर दुसऱ्यांच आयुष्यही समृध्द होत. पण ज्ञानाचा भ्रम असलेल्या माणसांची कायम अधोगती होते. कारण त्यातून काहीही साध्य होत नाही. उलट पदरी त्रासच येतो. म्हणून कायम ज्ञानी लोकांसोबत राहिलं पाहिजे. म्हणूनच,
ज्याला आहे खरं ज्ञान त्यालाच तर आयुष्य कळल
ज्ञानाचा भ्रम असण्यापरीस आता अज्ञान हे परवडलं
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.