Site icon InMarathi

बहिष्काराचा अंधार कायम आहे…

brahman buddha marathipizza

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखिका : अलका गांधी-आसरेकर

===

अगदी छोट्याशा म्हणजे फारतर शे-सव्वाशे उंबऱ्यांच्या गावात जन्मले आणि बारा पंधरा वर्षांची होईपर्यंत तिथेच वाढले. त्यात सत्तर टक्के मुसलमान..बाकीची चार-चार सहा-सहा घरे बारा बलुतेदारांची.. गावाच्या बाहेर महारवाडा..आणि साताठ घरं आमची गुजरात्यांची..

थोडक्यात गावाची विभागणी पारंपरिक पद्धतीची.. चार चार घरं असली तरी ती गवळआळी, तो कुंभारवाडा, बाजूला जंगमांची चार घरं.
नाही म्हणायला ब्राम्हण एकही नव्हता. मुसलमानांच्या गावात ब्राम्हणाचा धंदा तो काय चालणार.. तरीही पंचक्रोशीत हिंदू वस्ती होती छोट्या छोट्या खेड्यांवर. त्यांना एक तरी ब्राम्हण हवा बरीवाईट कार्ये करण्यासाठी, काही नाही तर निदान लग्न लावायला, लग्नानंतर सत्यनारायण घालायला आणि कुणी मेलं तर अंतिम कार्याला तर हवाच ना. म्हणून पंचक्रोशीतल्या लोकांनी तालुक्याच्या गावच्या एका भटजीबुवांना आग्रहाने आणून गावच्या कोंडावर (तिथे फक्त थोडी मराठा वस्ती) एक घर फुकट राहायला देऊन ठेवलं होतं. आणि ते भटजीबुवा या नावानेच प्रसिद्ध होते. त्यांचं नाव कुणालाच ठाऊक नव्हतं. तर ते एकच ब्राम्हणाचं घर.

2.bp.blogspot.com

परंतु जातीभेद बऱ्यापैकी होता. म्हणजे सर्वांचे आपसात संबंध खूप चांगले, परंतु रोटीव्यवहार नाही. बेटीव्यवहार तर अजून पन्नास वर्षे लांब होता. मुसलमानांकडचं पाणीही प्यायचं नाही. हा अलिखित नियम सगळे पाळत होते. अगदी कातकरी (आदीवासी) देखील मुसलमानांकडचं पाणी प्यायचे नाहीत गावात आले की. मुसलमान, महारवाड्यातले लोक यांच्यासाठी पाण्याचे, चहाचे कप वेगळे असायचे. आणि ते त्यांनाही ठाऊक असायचं. कुणालाच त्याचं काही वाटायचं नाही. न चहा देणाऱ्याला, न तो पिणाऱ्याला.

यावरून मला इथं अमृता प्रितमची रसिदी टिकटची आठवण झाली. मला वाटतं हे भारतभरच असावं. कारण अमृता या तिच्या आत्मवृत्तात म्हणते,

तेव्हा मला ह्याची पुसटशीही कल्पना नव्हती, की पुढे मी आयुष्यभर ज्या माणसावर प्रेम करेन तो माणूस अशा धर्माचा असेल, की ज्याच्यासाठी माझ्या घरात कपबशा, पेले वेगळे ठेवलेले असायचे.

तर हे सगळीकडेच होतं. सांगत होते ते दुसरंच…

आपल्या जातीचा, समाजाचा दबाव इतका असतो की तुमच्या मनात नसलं तरी तुम्हाला तसं वागावं लागतं. मुसलमानांच्या घरी पाणी पिणाऱ्याची गावभर छीथु व्हायची. मग कोण पिणार ना… मग तिथून जरा मोठ्या गावात म्हणजे तालुक्याच्या गावी आलो. तिथं बरोबर आमच्या घरासमोरच एक मुस्लिम कुटुंब राहत होते. अर्थात तालुक्याचं गाव हे हिंदुबहुल होतं. आणि हे मुस्लिम कुटुंब चांगलं सुशिक्षित,स्वच्छ राहणीमान असलेलं होतं. त्या बाईशी माझी गट्टी जमली. वयाने दोन पाच वर्षेच मोठी फारतर. तिच्या घरी गप्पा मारत बसले की ती चहाचा आग्रह करायची. आणि मी काही ना काही कारणाने टाळायचे. कारण घरी आवडणार नाही याची खात्री होती.

fthmb.tqn.com

परंतु एक दिवस प्यावाच लागला. मला स्वतःला काही फारसे वाटले नव्हते. परंतु नेमकं माझ्या धाकट्या बहिणीने पाहिलं आणि घरी जाऊन आईला सांगितले. घरी आल्यावर आईने झापलेच. चहावाचून अडलं होतं का तुझं काही…मी जरा ओशाळले.

अगं, म्हटलं तिचा आग्रह मोडवला नाही म्हणून…!

ती तर करणारच आग्रह तुला बाटवण्याकरता. तुला अक्कल नको?

आईने फार ताणलं नाही. परंतु पुढे अनेक वर्ष दोघींनी अधुनमधून ऐकवलं –

मुसलमानाच्या घरचा चहा पिणारी तू…!

आज मी शहरात रहाते.  माझ्या घरी सर्व जाती धर्माचे लोक येतात. मी त्यांच्याकडे जाते. आज मला कोणी अडवणारं नाही आणि अडवलं तर मी ऐकणारही नाही. परंतु सामाजिक दबाव काय चीज असते हे मी अनुभवलेय. तुम्हाला बदलायचं असलं तरी समाज बदलू देत नाही.

भाऊ कदम प्रकरणावरून आठवलं सारं हे.. सामाजिक दबाव. तुम्हाला कर्मठ बनवतो. ईलाजा-नाईलाजाने. आणि तो दबाव झुगारणे फार कठीण असते. फार कठीण. भाऊ कदमलाही माफी मागावी लागली. समाजापुढे हार पत्करावी लागली. माझा किस्सा १९८७ चा …भाऊ कदम २०१७ ..तीस वर्षे झाली..फार नाही… आपण अजून तिथेच आहोत. समाजाचे कप्पे वेगळेवेगळेच राहिले पाहिजेत…एकमेकांत मिसळता कामा नये…कारण समाज एक झाला तर अनेकांचे पोटापाण्याचे धंदे कायमचे बसतील.

 


सो…अंधेरा कायम रहे…

अंधार कायम आहे…

या सर्व साठमारीत सर्वात हाल होणार आणि होतात ते स्त्रियांचे. आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या स्त्रियांचे. ज्या घरात जातील त्या खुंट्याची दोरी गळ्यात अडकवून राहायचे. मुसलमानांच्या घरात गेलात तर सलमा व्हा…बौद्धांच्या घरात गेलात तर प्रतिज्ञा पाळा (त्या घरातल्या पुरुषानी नाही पाळल्या तरी चालेल…धर्म स्त्रियांनी सांभाळायचा असतो…मग तो कुठलाही असो.)…मराठ्यांच्या घरात गेलात तर भट म्हणून डिवचून घ्या…ब्राम्हणांच्या घरात गेलात तर खालच्या जातीतली म्हणून हिणवून घ्या…

कारण स्त्रियांना स्वतःचा धर्म, स्वतःची जात असतेच कुठं…?!

पुरुषांच्या जाती धर्माच्या युद्धात ढाल बनणे आणि चिवट राहून दोन्हीकडचे वार झेलत राहाणे एवढंच बाईचं प्राक्तन. सगळे कर्मठ समाज जेमतेम सुरू झालेल्या बेटीव्यवहाराला पुन्हा खिळ घालणार.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version