आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
लेखक : अनुपम कांबळी
===
शेवटी आज सुरेश प्रभूंनी देशाच्या रेल्वेमंत्रीपदाचा कार्यभार अधिकृतरीत्या सोडला. रेल्वेच्या वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे व्यथित होऊन त्यांनी आपल्या रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दोन आठवड्यापूर्वीच पंतप्रधानांकडे सुपूर्त केला होता. आपल्या देशात एखाद्या मंत्र्याने किंवा पदाधिकाऱ्याने राजीनामा द्यायचा आणि वरिष्ठांनी तो फेटाळून लावायचा, अशी नाटके रोजच सुरु असतात. ‘तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो’ हीच नौटंकी त्यामागे दिसून येते.
दुसरीकडे हजारो कोटींचे घोटाळे करून प्रकाश मेहता किंवा सुभाष देसाई यांसारखे मंत्री सर्वत्र राजीनाम्याची मागणी होत असताना कुठेच पद सोडण्याची भाषा करत नाहीत. अशा नैतिकतेची चाड शिल्लक नसलेल्या राजकारणात सुरेश प्रभूंनी आपला राजीनामा पंतप्रधानांकडे सुपूर्त करत लालबहादूर शास्त्रींनी या देशाला घालून दिलेली नैतिक जबाबदारी स्वीकारण्याची परंपरा आजच्या काळातही कायम ठेवली.
मात्र आपल्या देशात अशी राजीनामानाट्य नेहमीच सुरु असल्याने अनेकांनी सुरेश प्रभू हे देखील त्याच पंक्तीतले आहेत असे मानून चौफेर टीका केली होती. ‘आता पंतप्रधान राजीनामा नाकारतील आणि प्रभू पुन्हा रेल्वेमंत्री होतील’ अशी भाकिते देखील सोशल मीडियावरील काही पोपट फेम ज्योतिषांनी वर्तवली.
त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो सुरेश प्रभूंनी ज्या दिवशी पंतप्रधानांकडे राजीनामा सोपवला त्याच दिवशी ते गणपती उत्सवासाठी सिंधुदुर्गात यायला निघाले. एवढेच नव्हे तर २३ ऑगस्ट नंतर त्यांनी ‘रेल भवन’ मध्ये पुन्हा पाऊल देखील ठेवले नाही.
कालच सुरेश प्रभू राजीनामा सुपूर्त केल्यानंतर रेलभवनमध्ये येत नाहीत, याबाबतच्या बातम्या इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावरून सातत्याने होणाऱ्या रेल्वे अपघातांमुळे सुरेश प्रभू खूप व्यथित झाले होते, हे स्पष्टपणे दिसून येते. भारतीय रेल्वेचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी मी माझ्या रक्ताचे पाणी केले आहे, हे त्यांनी केलेले ट्विट खुप काही सांगून जाते.
सुरेश प्रभूंनी भारतीय रेल्वेसाठी सर्व काही केले पण हे सर्व करीत असताना ते एक गोष्ट विसरले की इतकी वर्षे भारतीय रेल्वे ही ठेकेदार आणि दलाल लोकांकडून चालवली जात होती. रेल्वे मंत्रालयातील बहुतांशी सरकारी बाबूंशी या बोगस ठेकेदारांनी आर्थिक साटेलोटे करून संगनमत केल्याने भारतीय रेल्वे ही या सर्वांसाठीच भ्रष्टाचाराचे कुरण बनली होती. प्रभू सर ही सर्व सिस्टीम पारदर्शक बनवायला गेले. आपल्या स्वच्छ व प्रामाणिक कारभाराने भ्रष्ट अधिकारी आणि बोगस ठेकेदार या दोघांनाही त्यांनी वेसण घातली. मग हे लोक तरी कसे गप्प बसतील…? त्यामुळेच रेल्वेचा ट्रॅक मध्येच कापून कोणी पळून जात होता तर कोणी भर रेल्वेमार्गात रात्री-अपरात्री ट्रक उभा करून ठेवत होता. त्यांच्या या नीचकर्मामुळे रेल्वेचे सातत्याने अपघात होत राहिले. त्या अपघातांमध्ये कित्येक लोक मृत्युमुखी पडले आणि किती तरी जण जायबंदी झाले.
अशा वेळी भारतीय रेल्वेला आधुनिकतेकडे घेऊन जाण्यासाठी रक्ताचे पाणी करणारा रेल्वेमंत्री व्यथित होणे स्वाभाविकच होते. त्यामुळेच प्रभूंनी आपला राजीनामा पंतप्रधानांना सुपूर्त केला.
सुरेश प्रभूंनी केंद्रीय रेल्वेमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा ‘देशाची लाईफलाईन’ म्हणून प्रसिद्ध असलेली भारतीय रेल्वे गुंतवणुकीअभावी ‘व्हेंटिलेटर’वर होती. त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम रेल्वेची श्वेतपत्रिका काढून त्यात २०१५ ते २०१९ या कालावधीत १३० बिलियन डॉलरपेक्षा जास्त निधी रेल्वेमार्गांचे विस्तारीकरण आणि अतिशय दाट असलेले रेल्वेमार्ग तुलनेने सुलभ करून भारतीय रेल्वेचा कायापालट करण्यासाठी खर्च केला जाईल, असे स्पष्टपणे नमूद केले.
रेल्वेच्या डब्यांचा दर्जा सुधारण्यासाठी, सिग्नलिंग यंत्रणा आधिक प्रभावी करण्यासाठी आणि जास्तीचे उत्पन्न मिळवुन देणाऱ्या रेल्वेमार्गांची क्षमता वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेमध्ये पुढील पाच वर्षात ८.५६ लाख कोटी गुंतवणूक मिळवण्याचे उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवले होते. तसेच निधी उभारण्यासाठी नवनवीन उपाय शोधून काढले होते. भारतीय रेल्वेने ३० वर्षांसाठी एलआयसी कडुन २५ बिलीयन डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. जागतिक बँकेने ३० बिलीयन डॉलर्स कर्ज देण्याचे मान्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला ‘मेक इन इंडिया’चा नारा भारतीय रेल्वेमध्ये अत्यंत प्रभावीपणे राबविताना रेल्वेमंत्र्यांनी डिझेल आणि विद्युत रेल्वे इंजिन बनविण्याच्या ४२ हजार करोड़ रुपयांच्या प्रकल्पासाठी GE, EMD, Alstom, Bombordier आणि Siemens सारख्या जगातील नामांकित कंपन्याना आमंत्रित केले.
भारतीय रेल्वे थेट परकीय गुंतवणुकीतून रेल्वेइंजिन निर्मितीचे दोन मोठे प्रकल्प बिहारमध्ये साकारत आहेत. पहिल्या प्रकल्पात ४५०० आणि ६००० हॉर्स पॉवर क्षमतेची १००० डिझेल इंजिन पुढील १० वर्षे पुरविण्यात येतील. त्यासाठी अमेरिकेतील GE कंपनीने २००० कोटींचा प्लांट बिहारमधील मर्होर्वा येथे स्थापिला आहे. दुसरा प्रकल्प १२००० हॉर्स पॉवर क्षमतेची ८०० विद्युत इंजिन पुरविण्यासाठी १३०० कोटी रुपये खर्चून फ्रांसमधील Alsthom कंपनीने बिहार मध्येच माधेपुरा येथे निर्माण केला आहे.
सुरेश प्रभू एक गोष्ट स्वतःहुन मान्य करायचे की, भारतीय रेल्वेसारख्या महाकाय संघटनेचा रहाटगाडा हाकताना निर्णयप्रक्रिया अधिक गतिमान होणे आवश्यक आहे. त्यासाठीच रेल्वेमंत्र्यांनी निधीच्या निर्गुंतवणूक अंमलबजावणी संदर्भातील निर्णय घेण्याचे आधिकार रेल्वेभवनापुरते मर्यादित न ठेवता, त्या अधिकारांची अंमलबजावणी काही प्रमाणात विभागीय पातळ्यांवर केली होती. अशा प्रकारे अधिकारांचे विकेंद्रीकरण केल्याने निर्णयप्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शक बनली होती. त्यांनी देशभरातील गुणवंत तरुण-तरुणींना समान संधी उपलब्ध होण्याकरिता रेल्वेभरती प्रक्रिया ऑनलाईन करुन त्यात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला.
रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेभवनात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून आणि भारतीय रेल्वेशी निगडीत सर्व प्रकारची खरेदी ऑनलाईन टेंडर्सच्या माध्यमातून करण्यासाठी e-procurement ही नवीन कार्यप्रणाली सुरू करून रेल्वे खात्यातील भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणावर लगाम लावला.
भारतीय रेल्वेचा विचार करता दररोज २.३ कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात म्हणजेच दररोज ऑस्ट्रेलिया देशाच्या लोकसंख्येएवढे लोक भारतीय रेल्वेने प्रवास करतात. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी ट्विटरचा वापर जादुच्या कांडीसारखा करून महाकाय रेल्वे प्रशासनाचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी उपाययोजना सुनिश्चित केली होती. त्यांनी रेल्वेमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रेल्वेची तक्रार निवारण यंत्रणा सोशल मीडिया फ्रेंडली झाली, सर्व तक्रारी अधिक तत्परतेने, अधिक वेगाने हाताळल्या जाऊ लागल्या.
भारतीय रेल्वेला सोशल मीडियावरून प्रत्येक दिवशी सरासरी १५०० तक्रारी येत होत्या. त्यातील बहुतांश तक्रारी या सामान्य स्वरुपाच्या असल्या तरी दिवशी ८ ते १० गंभीर स्वरूपाचे संदेश भारतीय रेल्वेला प्राप्त व्हायचे. त्यातही महिलांच्या छेड़छाडीसंदर्भातील तक्रारी अधिक असायच्या आणि त्या सर्वच्या सर्व तक्रारी संबंधित विभागांकडुन तातडीने दुर केल्या जायच्या. यापैकी बहुतेक तक्रारींमध्ये स्वतः रेल्वेमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष पुरविले होते.
या तक्रारी निवारण करण्यासाठी भारतीय रेल्वेने खास कार्यपद्धती निर्माण केली होती.
तक्रारीचा संदेश स्क्रीनवर प्राप्त होताच त्या तक्रारीसंबंधी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना माहिती दिली जायची. त्यानंतर संबंधित अधिकारी योग्य ती कार्यवाही करून तक्रारीचे तात्काळ निवारण करायचे.
सुरेश प्रभूंनी देशातील महत्वाच्या ४०० रेल्वेस्थानकांच्या आधुनिकीकरणासंदर्भात आश्वासक पावले उचलली होती. भविष्यात प्रवाशांना भारतीय रेल्वेसोबत कायम टिकवायचे असेल तर त्यांनी रेल्वे प्रवासावर खर्च केलेल्या पैशांचे योग्य मूल्य त्यांना मिळवून द्यावे लागेल. महत्वाच्या शहरांमध्ये प्रवासी आरक्षण केंद्रांमुळे प्रवाशांना सुलभपणे आणि तातडीने रेल्वेच्या तिकिटी मिळत आहेत. गेल्या काही वर्षात ऑनलाइन तिकीट बुकींग लोकप्रिय होत असतानाच सुरेश प्रभूंनी मोबाईल फोनवरून रेल्वेतिकीट बुक करण्याची सेवा प्राधान्याने सुरू केल्याने आजकाल मोबाईलवरून दररोज ५० हजार तिकिटे बुक केली जातात.
त्याशिवाय नवीनोत्तम संशोधन म्हणुन स्मार्ट कार्डद्वारे तिकीट बुक करणाऱ्या मशीन किंवा स्वयंचलित तिकीट मशीनची सुविधा काही स्टेशनवर उपलब्ध करून देण्यात आली. प्रभूंनी प्रवाशांच्या मदतीसाठी ऑल इंडिया २४*७ हेल्पलाईन नंबर ‘१३८’ आणि ऑल इंडिया सिक्युरिटी हेल्पलाईन ‘१८२’ सुरू केली. प्रवाशांना त्यांचे उतरण्याचे ठिकाण आल्यावर रात्री-अपरात्री किंवा पहाटे झोपेतून जागे करण्यासाठी अलार्म सुविधा ‘१३९’ नंबरवर सुरू केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेले ‘स्वच्छ भारत अभियान’ भारतीय रेल्वेमध्ये अत्यंत प्रभावीपणे राबवताना त्यांनी स्वच्छ रेल, क्लीन माय कोच यांसारख्या नवनवीन सुविधा सुरू केल्या. सर्व डब्यांमध्ये कचरापेटी बसवली. तसेच त्रयस्थ यंत्रणेकडून रेल्वेस्थानकांवर स्वच्छतेचे ऑडिट करण्यात आले. १५५ रेल्वेस्थानकांवर शौचालयाचे बांधकाम पुर्ण केले. १५०० रेल्वेमध्ये e-catering सुविधा सुरू करून जेवणाच्या निवडीबाबत प्रवाशांना मोठा विकल्प निर्माण करून दिला. त्यामुळे भविष्यात प्रवाशांना रेल्वेत ब्रांडेड जेवण मिळेल. त्याचप्रमाणे पिझ्झा, बर्गरसारख्या पदार्थांचाही आस्वाद घेता येईल.
त्यांनी १०५२ रेल्वेस्थानकांची ‘आदर्श रेल्वेस्थानक’ म्हणुन निवड केली असुन त्यापैकी ९५६ रेल्वेस्थानके जुलै २०१६ पर्यंत विकसित करण्यात आली आणि उरलेली ९६ रेल्वेस्थानके आता विकसित करण्यात येतील. वाय-फायची सुविधा सर्व A1, A आणि B प्रकारच्या रेल्वेस्थानकावर पुरवण्यासाठी रेलटेलने गुगलशी करार देखील केला. सध्या बेंगलोर, दिल्ली, चेन्नई, सीएसटी मुंबई, अहमदाबाद, आग्रा, वाराणसी, सिकंदराबाद, हावड़ा, गाजिपुर आणि मडगांव या ११ रेल्वेस्थानकावर वाय-फायची सुविधा पुरविण्यात आली आहे.
काही रेल्वेस्थानकावर स्वयंचलित लॉकरची सुविधा पुरविण्यात आली असून प्रवाशांना स्वस्त दरात स्वच्छ पाणी पुरवणाऱ्या स्वयंचलित मशीन देखील बसविण्यात आल्या आहेत. प्रवाशांना स्वच्छ चादरी आणि कापड मिळण्याकरीता ७ नवीन लॉंड्री उभारल्या आहेत. नेहमी सर्वसामान्यांचा विचार करणाऱ्या सुरेश प्रभूंनी जनरल डब्यात मोबाईल चार्जिंग करण्याची सुविधा देखील पुरवली.
आधीच्या सरकारमधील रेल्वेमंत्र्यांना जी गोष्ट गेली ६०-६५ वर्षे जमली नाही, ती गोष्ट अंमलात आणायला सुरेश प्रभूंनी ६० महिने देखील घेतले नाहीत.
दिल्ली ते आग्रा हा १८८ किलोमीटरचा प्रवास अवघ्या १०० मिनिटात पुर्ण करणारी ‘गतिमान एक्स्प्रेस’ ही भारतातील पहिली सेमी हायस्पीड प्रभूंनी सुरू केली. गतिमान एक्स्प्रेस विक्रमी अशा १६० किमी प्रतितास वेगाने धावते. दिल्ली-आग्रा रेल्वेमार्गाप्रमाणे मुंबई-गोवा, नागपूर-बिलासपुर, नागपूर-सिकंदराबाद, दिल्ली-कानपूर, दिल्ली-चंदीगढ, चेन्नई-हैदराबाद यांसह आणखी आठ मार्गावर भविष्यात ‘गतिमान एक्स्प्रेस’ आपल्या सुसाट वेगाने धावेल. गतिमान एक्स्प्रेसला गती देण्यासाठी १२ डब्यांचा नवा ट्रेन सेट वापरण्यात आला आहे. फक्त वेग हेच गतिमान एक्स्प्रेसचे वैशिष्ट्य नाही.
भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासात ‘गतिमान एक्स्प्रेस’ ही मैलाचा दगड ठरणार आहे. गतिमान एक्स्प्रेसमध्ये दोन एक्जीक्यूटिव वातानुकूलित चेयर कार आणि आठ सामान्य एसी चेयर कार यामधुन ७१५ प्रवासी प्रवास करतील. या गाडीसाठी सर्वात शक्तिशाली ५४०० हॉर्सपॉवर क्षमतेचे पी-५ इंजिन जोडण्यात आले आहे.
‘एअर होस्टेस’च्या धर्तीवर ‘ट्रेन होस्टेस’ ही संकल्पना ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करण्याची सवय असलेल्या सुरेश प्रभूंनी प्रथमच गतिमान एक्स्प्रेसमध्ये प्रत्यक्षात साकारली आहे. या एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांचे सुरुवातीलाच ट्रेन होस्टेस गुलाबाचे फुल देऊन स्वागत करतील. त्याचप्रमाणे या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कार्टुन, चित्रपट, बातम्या पाहणे यांसारख्या मल्टीमिडीया सेवा आणि इंटरनेटचा अमर्याद वापर करण्यासाठी वाय-फाय सेवा मोफत पुरविण्यात येईल.
या एक्स्प्रेसमधील खाण्याची सुविधा इतर गाड्यांपेक्षा उत्कृष्ट दर्जाची असणार आहे. या रेल्वेतील सफाई व्यवस्थेत ‘मराथोन सील’ नावाचा प्रयोग केल्याने सर्व प्रवाशांना गाडीतील पॉलीश केलेली फरशी अधिक चमकदार वाटेल. यात विशेष प्रकारचे ‘कपलिंग बैंलेंस ड्राफ्ट गेयर’ वापरण्यात आल्याने चालकाने ब्रेक लावल्यावर गाडीचा झटका प्रवाशांना लागणार नाही आणि त्यामुळे चहा किंवा पाणी प्रवाशांच्या अंगावर सांडणार नाही.
पर्यावरणप्रेमी प्रभूंनी गतिमान एक्स्प्रेसमध्ये पुर्णपणे ‘बायोटोयलेट’ची संकल्पना पहिल्यांदाच राबवली होती. या रेल्वेच्या बाहेरच्या भागात पिवळ्या रेडियमची पट्टी वापरल्याने रात्रीच्या वेळी फार दुरून ही गाडी येत असल्याचे लक्षात येते आणि त्यामुळे सुरक्षा व्यवस्था सतर्क राहते. अशा प्रकारे नानाविध सुविधांनी सज्ज असलेली ‘गतिमान एक्स्प्रेस’ हे भारतीय रेल्वेने कात टाकली, याचे जिवंत उदाहरण आहे.
युपीए सरकारच्या काळात २००९-१४ साली पाच वर्षात सरासरी १६२६ किमीचे नवीन रेल्वेमार्ग बांधण्यात आले होते. सुरेश प्रभूंनी एका वर्षात तुलनेने तब्बल ८५ टक्के अधिक अशा २८२८ किमी नवीन रेल्वेमार्गाचे बांधकाम करून आपली कार्यक्षमता सर्वांना दाखवून दिली. २००९-१४ साली पाच वर्षात प्रती दिवशी नवीन रेल्वेमार्ग बांधण्याचे प्रमाण ४.३ किमी होते, ते प्रभूंच्या कार्यकाळात ७.७ किमी/दिवस एवढे वाढले.
भारतीय रेल्वेचा २०१५-१६ साली असलेला ९४ हजार करोड हा भांडवली खर्च, २००९-१४ या पाच वर्षातील सरासरी भांडवली खर्चाच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. २००९-१४ या पाच वर्षात सरासरी ११८४ किमी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले होते. सुरेश प्रभूंच्या कार्यकाळात २०१५-१६ या आर्थिक वर्षात १७३० किमी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले. बेला येथे रेल्वे व्हील प्लांट मंजूर करण्यात आला. चेन्नईमध्ये १६०किमी वेगाने धावू शकणाऱ्या रेल्वे डब्यांची फॅक्टरी व झाशी येथे रेल्वे डब्यांचे नूतनीकरण करून त्यांना पुर्वस्थितीत आणण्यासाठी कारखाना उभारण्यात आला.
‘हम ना झुकेंगे और हम ना रुकेंगे… चलो मिलकर कुछ करे…’ या वाजपेयींच्या काव्यपंक्तींचा उल्लेख करणारे सुरेश प्रभू भारतीय रेल्वे प्रवाशांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ‘रेल्वेची गती-राष्ट्राची प्रगती-प्रवाशांचा सन्मान’ हे ध्येय समोर ठेवून, उज्ज्वल भवितव्याच्या पंखावर स्वार होत, प्रत्येक भारतीय रेल्वे प्रवाशाचा ‘उद्या’ सुकर करण्यासाठी ते प्रयत्नशील होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की,”रेल्वे आणि पोस्ट ऑफिसचे जाळे भारतात सर्वत्र विखुरलेले आहे. त्याचा चतुराईने वापर केला असता निश्चितच देशात शाश्वत बदल पहावयास मिळतील. आजपर्यंत देशभरात रेल्वेकडे फक्त दळणवळणाचे एक साधन म्हणुन पाहिले गेले परंतु आम्ही रेल्वेकडे ‘देशाच्या आर्थिक विकासाचा कणा’ म्हणुन पाहतो.” देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत विकासाच्या प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या ईशान्य भारतात आसाम, मिझोराम, आगरतळा आणि मणिपूर या दुर्गम भागात रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी रेल्वेमार्ग उभारण्याचे उददीष्ट डोळ्यासमोर ठेवले कारण केवळ रेल्वेच्या माध्यमातून हा दुर्गम भाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्याठिकाणी सुबत्ता आणणे शक्य होते.
महाराष्ट्रातील भीषण दुष्काळात पाण्यासाठी होरपळणाऱ्या लातूरकरांना रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न ‘जलदुत एक्स्प्रेस’च्या माध्यमातून रेल्वेमंत्र्यांनी साकार केले. उगाच लोकांचे डोळे दिपवण्यापेक्षा किमान सुसह्य व शक्यता असलेला विकास करण्याचा व्यवहारी पवित्रा सुरेश प्रभुंनी घेतला होता. मुळातच राजकारणी नसलेल्या या नेत्यामध्ये व्यवस्थापन व नियोजनाची अफाट क्षमता आणि गुणवत्ता आहे. म्हणूनच आकड्यांच्या आतषबाजीचे विश्लेषण करण्यापेक्षा त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये सुधारणांचे पर्व प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेला दृढसंकल्प मला महत्वाचा वाटायचा.
भविष्यात रेल्वेमंत्रीपदी सुरेश प्रभुंपेक्षा चांगला नेता पहायला मिळेलही पण रेल्वे प्रशासनावर मजबुत पकड असलेला त्यांच्यासारखा उत्तम प्रशासक आपल्या देशाला मिळणे फार दुर्लभ आहे.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.