' डेव्हिड धवन…चोरी प्रांजळपणे कबूल करणारा “दिल का सच्चा” डायरेक्टर – InMarathi

डेव्हिड धवन…चोरी प्रांजळपणे कबूल करणारा “दिल का सच्चा” डायरेक्टर

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक : पवन गंगावणे

===

१६ ऑगस्ट १९५५ला आगरताळ्यात राजींदर धवनचा जन्म झाला, पण त्यांच बालपण कानपुरमध्येच गेलं. राजींदरचे वडील तिथे बँकेत मॅनेजर होते. राजींदरच्या शेजारीच एक ख्रिश्चन कुटुंब राहायचे. ते राजींदरला डेव्हिड म्हणून हाक मारायचे, हळूहळू सगळ्या वस्तीसहीत राजींदरचे घरचेसुद्धा त्याला डेव्हिड म्हणूनच बोलवायला लागले आणि इथून पुढे त्याच नावचं डेव्हिड होऊन गेलं… ‘डेव्हिड धवन’…

david-dhawan-marathipizza01
timesofindia.indiatimes.com

बारावी पर्यंतच शिक्षण झाल्यानंतर डेव्हिडने त्याचे मोठे बंधू अनिल धवन प्रमाणेच फिल्म अँड टेलेव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)ची वाट धरली. अनिलने ऍकटींगच्या कोर्समध्ये डिप्लोमा केला होता आणि डेव्हिडही ऍकटिंगच्याच कोर्समध्ये ऍडमिशन घ्यायला गेले होते, परंतु तिथे सुरेश ओबेरॉय आणि सतीश शहा सारख्या दमदार कलाकारांना बघून डेव्हिडने ही वाट आपली नव्हे असे म्हणून एडिटिंगच्या कोर्समध्ये ऍडमिशन घेतलं. या डिप्लोमा दरम्यान डेव्हिडने एडिटिंगने सिनेमा कसा बनवला किंवा बिघडवला जाऊ शकतो याचा जवळून अभ्यास केला आणि एडिटिंगच्या सगळ्या क्लृप्त्या आत्मसात केल्या.

डिप्लोमा सम्पवून डेव्हिडने मुंबई गाठली जिथे अनिल धवन सिनेमांमध्ये काम करत होते. एडिटिंगमध्ये मास्टर असलेल्या डेव्हिडकडे एक-एक सिनेमे यायला लागले आणि असं करता करता त्यांनी ६०च्यावर सिनेमे एडिट केले. एडिटिंगचा प्रचंड अनुभव असलेले डेव्हिड आता स्वतःचा सिनेमा बनवायला तयार होते. डेव्हिड धवन मनमोहन देसाईंना दैवत मानायचे. त्यांच्या मोठ्या स्टारकास्ट असलेल्या भव्यदिव्य सिनेम्यावर डेव्हिडचं मनापासून प्रेम होतं. डेव्हिडचं मानणं होतं की, देसाईंच्या सिनेम्यात कॉमेडी, फॅमिली ड्रामा, action, गाणी आणि रोमान्स हा सगळा मसाला अगदी ठासून असायचा आणि त्यांच्यासारखा wholesome सिनेमा बाकी कुठलाही डायरेक्टर देऊ शकत नाही. म्हणून मनमोहन देसाईंची प्रेरणा घेऊन डेव्हिडने १९८९ मध्ये संजय दत्त आणि गोविंदाला घेऊन ताकतवर हा सिनेमा बनवला. डेव्हिड धवन हे इंडस्ट्रीतल इतकं नावाजलेलं नाव असून डेव्हिड कधीच सर्वज्ञानी, ओरिजिनल किंवा एखादा तज्ञ असल्याचा आव आणत नाहीत. चित्रपटसृष्टीत १०-१५ वर्ष काम करून झालं की, बहुतेक फिल्ममेकर्स स्वतःच्या भोवती एक गूढ वलय निर्माण करून घेतात आणि स्वतःला मास्टर ऑफ दि क्राफ्ट, स्कील्ड टेक्निशियन, जिनियस वगैरे घोषित करून टाकतात आणि त्यांची काम करण्याची पद्धत किती अभ्यासपूर्ण आहे हे सांगत फिरतात, पण अतिशय प्रांजळ स्वभावाचे डेव्हिड प्रामाणिकपणे ही कबूली देतात की ताकतवर हा मनमोहन देसाईंच्या अमर अकबर अँथॉनीच्या कथानकावर बेतलेला आहे आणि त्यांनी तीन पात्रांची कथा कमी करून दोन पात्रांत बनवली आहे. ताकतवर यशस्वी राहिला आणि या सिनेम्यासोबतच डेव्हिडला मिळाला त्यांचा जिगरी यार म्हणजेच गोविंदा.

गोविंदासोबत डेव्हिडने तब्बल १७ सिनेमे केले. पुढे डेव्हिडने स्वर्ग, आग का गोला, शोला और शबनम, बोल राधा बोल सारखे यशस्वी सिनेमे दिले. हे सिनेमे मनमोहन देसाईंच्या फॉर्म्युल्यावर आधारलेले wholesome सिनेमे होते. परंतु काळ बदलत होता आणि हिंदी सिनेमांचा प्रेक्षकही. ही गोष्ट चाणाक्ष डेव्हिडच्या नजरेतुन सुटली नव्हती. मनमोहन देसाई टाईप सिनेमे बजेटने मोठे असायचे आणि लंबे सुद्धा. साधारणतः पावणे तीन ते तीन तासांचे. प्रेक्षकांचा अटेन्शन स्पॅन कमी होत चाललाय आणि आता तीन तासांच्या सिनेम्यांना प्रेक्षक कंटाळायला लागले होते हे डेव्हिडने टिपले होते आणि बदलत्या काळानुसार आपल्या सिनेम्यातही बदल करण्याचं त्यांनी ठरवलं. आतापर्यंत केलेल्या ८ सिनेम्यात जे छोटे-मोठे कॉमेडी दृश्य डेव्हिडच्या सिनेम्यात आले होते, त्यांनी पडद्यावर धमाल उडवली होती. पण खरा टर्निंग पॉईंट आला तो १९९३ मध्ये जेव्हा डेव्हिडने आता मनमोहन देसाई स्टाईल सोडून ह्रिषिकेश मुखर्जी स्टाईल स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मुखर्जी हे कॉमेडी सिनेमे बनवायचे, तेही मोठमोठ्या सुपरस्टार्सना घेऊन पण अत्यल्प बजेटमध्ये. हे सूपरस्टार्स कमी फी घ्यायचे मुखर्जींसोबत काम करता यावे यासाठी.

david-dhawan-marathipizza02
bollywoodlife.com

आता डेव्हिडनेही कॉमेडी सिनेमे करायचं ठरवलं, सिनेमाचं बजेट आणि लांबी दोन्ही कमी करायची ठरवलं, आपलं एडिटिंगच कसब वापरून ९०च्या जागी ६० सीन्सचे फास्ट पेसिंग असलेले आणि प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणारे सिनेमे बनवायचं ठरवलं. त्यांनी अनिस बझमीकडून एक स्क्रिप्ट तयार करून घेतली आणि डबल रोल्सचा धमाका असलेला गोविंदा, चंकि पांडे, कादर खानची मुख्य भूमिका असलेला आँखे पडद्यावर आला. आँखे अत्यंत यशस्वी ठरला. प्रेक्षकांनी सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला आणि आपला फॉर्म्युला सफल झाल्याचं डेव्हिडला जाणवलं. यानंतर डेव्हिडने कधीच मागे वळून नाही पाहिलं. अंदाज, लोफर आणि याराना वगळता यापुढे डेव्हिडने नेहमी कॉमेडी सिनेमेच बनवले. आपल्या ४३ सिनेम्यांच्या कारकीर्दीत डेव्हिडने गोविंदा, अनिल कपूर, संजय दत्त, सलमान खान यांसोबतच बहुतेक सिनेमे केले.

१९९६ला अनिल कपूर सोबत केलेला लोफर मला अनिल आणि डेव्हिड या दोघांच्याही कारकिर्दीतला सगळ्यात अंडररेटेड सिनेमा वाटतो. एका उनाड व्यक्तिमत्वापासून ते समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा अनिल कपूरचा लोफर सगळ्याच बाजुंनी एक जबरदस्त सिनेमा आहे, पण अनिल किंवा डेव्हिडच्या सर्वोत्कृष्ट सिनेम्यांमध्ये आज लोफरचे नावही घेतले जात नाही.

जसजसा काळ लोटत गेला, गोविंदा आणि डेव्हिड धवनची मैत्री अजून घनिष्ठ होत गेली. डेव्हिड आणि गोविंदा हे यशाचं समीकरण बनून गेलं. परंतु २००४ मध्ये काँग्रेस पार्टी जॉईन करून गोविंदा राजकारणात उतरला आणि उत्तर मुंबई मतदारसंघातुन निवडून येऊन खासदार बनला. नवीन क्षेत्रात रममाण झालेल्या गोविंदाला सिनेमासाठी आता वेळ भेटत नव्हता. या दोन वर्षात त्याने सिनेम्यातून पूर्णपणे ब्रेक घेतला. त्याची डेव्हिडसोबत भेटगाठ कमी होत गेली आणि काही काळासाठी बंदही झाली, पण कोणत्याही ऍक्टरच्या डेट्ससाठी थांबायचं नाही कारण अमिताभ वगळता प्रत्येक ऍक्टर रिप्लेसेबल आहे असं डेव्हिडचं मानणं आहे. १९९७ला डेव्हिडने सलमानला घेऊन सुपरहिट सिनेमा जुडवा बनवला होता. आता गोविंदा उपलब्ध नसल्याने डेव्हिड पुन्हा सलमानकडे वळला आणि २००४ नंतर त्याने सर्वाधिक सिनेमे सलमानसोबतच केले. पुढे गोविंदाने सिनेम्यात कमबॅक केला आणि डेव्हिडसोबत ‘पार्टनर’ आणि ‘डु नॉट डिस्टर्ब ‘हे दोन सिनेमेही केले. ज्यापैकी पार्टनरने बॉक्सऑफिसवर तुफान कमाई केली, पण डु नॉट डिस्टर्ब मात्र आपटला गेला. कोणत्या कारणाने हे नक्की नाही सांगता येणार, पण यानंतर गोविंदा-डेव्हिड धवन यांची मैत्री तुटली.

डेव्हिडने २०१३ मध्ये बनवलेल्या ‘चष्मे बद्दूर’च्या रिमेकमध्ये काम करण्याची गोविंदाची इच्छा होती पण पिक्चरमध्ये सगळी यंग पोरं आहेत, हे सांगून डेव्हिडने गोविंदाला टाळलं. बरं एखादा गेस्ट अपियरन्स तरी करेन असं गोविंदा बोलला पण डेव्हीडने तेही टाळलं. इतके वर्ष जुन्या मैत्रीला देव जाणे कोणाची नजर लागली. तेव्हापासून आजपर्यंत डेव्हिडने गोविंदासोबत काम तर केलेच नाही पण ते इंटरव्युमध्ये गोविंदाचा उल्लेखही टाळतात.

david-dhawan-marathipizza03
rediff.com

२०१२मध्ये डेव्हिडचा लहाना मुलगा वरुणने ‘स्टुडन्ट ऑफ दि इअर’ मधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. एके दिवशी एकता कपूरने डेव्हिडची भेट घेतली आणि तेलुगू सिनेमा कांडिरीगा दाखवला. हा सिनेमा वरुणला घेऊन रिमेक करूया अशी इच्छा व्यक्त केली. हा सिनेमा पुढे ‘मै तेरा हिरो’ बनून पडद्यावर झळकला. हॉलिवूडचे/साऊथचे सिनेमे कॉपी/रिमेक हे डेव्हिड सुरुवातीपासून करत आलेले आहेत.

‘साजन चले सासुराल’ हा ‘अल्लारी मोगुडू’ नावाच्या तेलुगू सिनेमाचा कॉपी होता. ‘बिवी नंबर-1’ हा ‘साथी लीलावती’ नावाच्या तामिळ सिनेम्याचा कॉपी, ‘कुली नंबर 1’ हा ‘चिण्णा मपिल्लायी’ आणि ‘कुली नंबर 1’ नावाच्या तामिळ सिनेम्यांचा कॉपी, ‘राजा बाबू’ ‘रसु कुट्टी’ नावाच्या तामिळ सिनेम्याचा कॉपी, ‘हिरो नंबर 1’ राजेश खन्नाच्या ‘बावरचीचा’ कॉपी तर ‘चष्मे बद्दूर’ फारुख शेखच्या ‘चष्मे बद्दूर’चा रिमेक. यासोबतच डेव्हिडने हॉलिवूडच्या सिनेमांतून प्रेरित होऊनही सिनेमे बनवलेत. ‘दिवाना मस्ताना’ हा ‘what about bob’ नावाच्या सिनेम्याने प्रेरित आहे. ‘चोर मचाये शोर’ची कथा मार्टिन लॉरेंसच्या ‘ब्ल्यू स्ट्रीक’ आणि ‘गोलमाल’वरून प्रेरित आहे. पार्टनर विल स्मिथच्या ‘hitch’ वरून ‘हम किसींसे कम नही’, ‘analyse this’ ‘बडे मिया छोटे मिया’, ‘बॅड बॉईज’ तर ‘मुझसे शदी करोगी’ हा ‘anger management’ वरून घेतलेला आहे. ‘मैने प्यार क्यू किया’ हा ‘कॅक्टस फ्लॉवर’ वरून प्रेरित आहे, तर २०११ मध्ये बनलेला ‘जस्ट गो विद इट’ डेव्हिडच्याच ‘मैने प्यार क्यू किया’ वरून प्रेरित आहे. ‘डु नॉट डिस्टर्ब’ हा ‘दि वॅले’ नावाच्या फ्रेंच सिनेम्याचा कॉपी आहे. ‘क्यूकी मै झूट नही बोलता’ची कथा जिम कॅरीच्या ‘लायर लायर’शी मिळती जुळती आहे.

जॅकी चॅनने ‘ट्वीन ड्रॅगन्स’ नावाचा एक सिनेमा केला होता ज्याचा रिमेक होता नागार्जुनचा ‘हॅलो ब्रदर’ आणि पुढे डेव्हिड धवनने त्याचा रिमेक करून ‘जुडवा’ बनवला. डेव्हिडने जरी या सिनेमांवरून प्रेरणा घेतली असली आणि बऱ्याच केसेसमध्ये पूर्ण कथा जरी उचलली असली तरी ते कथेचा फक्त गाभा घेतात आणि तिला पूर्णपणे डेव्हिड धवन ट्रीटमेंट देतात. शॉट टू शॉट कॉपी कधीच करत नाही. त्यांच्या पात्रात आणि डायलॉग्समध्ये कमालीचे बदल करतात आणि त्या कथा भारतीय प्रेक्षकांसाठी फिट बनवतात. विल स्मिथचा ‘hitch’ डेव्हिड धवनच्या पार्टनर समोर अगदीच फिका वाटतो. हॉलिवूडच्या कॉमेडी जेव्हा जशाच्या तशा कॉपी केल्या जातात तेव्हा जावेद जाफरीच्या ‘डॅडी कुल’ सारखे सिनेमे बनतात. डॅडी कुल हा ब्रिटिश फिल्म ‘डेथ ऍट अ फ्युनरल’चा कॉपी आहे.पण याचा भारतात रिमेक करताना त्यात हवे ते बदल न केल्याने, त्याची भारतीय संस्कृतीशी, इथल्या लोकांशी घालमेल न घातल्याने हा सिनेमा अत्यंत परका वाटतो आणि प्रेक्षक त्याच्याशी कधीच समरस होऊ शकत नाही. पण हेच अवघड काम सिनेमे बनवताना डेव्हिड धवन लिलया करत आले आहेत. त्यांचा सिनेमा, त्यातल्या व्यक्तिरेखा या नेहमी आपल्यातल्या वाटतात. आपण दुसऱ्या देशातली कथा पाहतोय असं कधीच जाणवत नाही आणि शिवाय धवन कधीच ओरिजिनल असल्याचा आव आणत नाहीत. कित्येक मुलाखतीत ते सिनेमे कॉपी केल्याची प्रांजळ कबुली देताना दिसतात. धवन तर इतपत बोलतात की, काही वर्षांआधीपर्यंत त्यांना कॉपीराईट इनफ्रिन्जमेंट बद्दल माहितीही नव्हती. ते म्हणतात की “मला वाटायचं मी इथें भारतात त्यांची पिक्चर कॉपी करतोय, ते तिथे हॉलिवूडमध्ये बसलेत. तिथून काय केस करतील माझ्यावर? पण नंतर याचा एक कायदा असल्याचं माहीत पडलं.” इतका मोठा स्टार असलेला माणूस जेव्हा उघडपणे अशा गोष्टींची कबुली देतो तेव्हा खरंच वाटत की वा! काय कमाल माणूस आहे हा.

david-dhawan-marathipizza04
exposecity.com

चित्रपटसृष्टीत इतकी वर्षे काढून, इतक यश पाहिलेलं असूनही डेव्हिड धवननी त्यांच्यातला साधेपणा आजपर्यंत जपलाय. साधे फॉर्मल कपडेच घालतात. कधी सूट वगैरे घालून मिरवताना दिसत नाहीत. वागण्यात बोलण्यात आजही एक अदब आहे. उर्मटपणा येऊ दिला नाहीये. त्यांच्या काळातले बहुतेक डायरेक्टर्स एक तर रिटायरमेंट एन्जॉय करत आहेत किंवा फ्लॉप सिनेमे देऊन आता घरीच बसून आहेत, पण डेव्हिडच्या कॉमेडीची घोडदौड अजूनही सुरूच आहे. वरुणला घेऊन ते त्यांच्याच जुडवाचा सिक्वेल घेऊन डेव्हिड या दसऱ्याला येत आहेत. ‘जुडवा 2’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरो आणि डेव्हिड धवनची घोडदौड चालू राहो हीच अपेक्षा…!

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?