आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
किन्नर… म्हणजे स्त्री वेशातील पुरुष… घटनेने त्यांना सर्व अधिकार दिलेले असूनही आपल्या समाजापासून ते अजूनही वंचितच आहेत. त्यांना आजही समाजात हवं तस स्थान मिळालेलं नाही.
मग आता समाजातच स्थान नाही म्हटल्यावर आपल्या परंपरेशीही ते दुरावलेलेच. त्यातलीच एक परंपरा म्हणजे लग्न… पण आपल्या देशात एक असे स्थान आहे जिथे किन्नर चक्क देवाशी लग्न करतात!
देशातील तमिळनाडू राज्यात अरावन नावाच्या देवाची पूजा केली जाते. अरावन हे किन्नरांचे आराध्य दैवत आहे, म्हणूनच दक्षिण भारतात किन्नरांना अरावनी म्हणून संबोधले जाते.
किन्नर आणि अरावन देव यांच्यातील एक आश्चर्याची बाब म्हणजे, हे किन्नर वर्षातून एक दिवस त्यांचे आराध्य असलेल्या अरावन देवाशी लग्न करतात.
पण हे लग्न केवळ एकाच दिवसाकरिता असते, कारण दुसऱ्या दिवशी अरावन देवाचा मृत्यू होऊन त्याचं वैवाहिक जीवन संपत, त्यामुळे हे लग्न केवळ एका दिवसाचं असत.
हे वाचून जरा आश्चर्य वाटल ना..! आता तुमच्या डोक्यात अनेक प्रश्न उठले असतील की, किन्नर या देवाशी लग्न का करतात, अरावन देव नेमका कोण आहे आणि किन्नारांसोबत लग्न करताचं दुसऱ्याच दिवशी त्याची मृत्यू का होतो?
या सर्व प्रश्नाची उत्तरे घेऊन आम्ही आपल्यासाठी काही अशी माहिती घेऊन येतो आहे जी कदाचित आपल्याला माहित नसेल, तर मग तुम्हाला या आगळ्यावेगळ्या लग्नसोहळ्याची ओळख करवून देतो!
यासाठी आपल्याला महाभारत काळात जाव लागेल, महाभारतातील एका कथे अनुसार एकदा अर्जुनाने द्रौपदीला लग्नावेळी दिलेल्या एका वचनाचं उल्लंघन केलं, त्यामुळे त्याला इंद्रप्रस्थ देशातून निष्कासित करून एका वर्षाच्या तीर्थयात्रेला पाठविण्यात आलं.
इथन निघून अर्जुन उत्तर पूर्व भारताकडे निघाला, जिथे त्याची भेट एका विधवा नाग राजकुमारी उलूपी सोबत झाली. यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि विवाह करतात.
त्यांच्या लग्नानंतर उलूपी एका मुलाला जन्म देते ज्याच नाव अरावन ठेवण्यात येत. मुलाच्या जन्मानंतर अर्जुन त्या दोघांनाही तिथेच सोडून आपल्या पुढील यात्रेकरिता निघून जातो.
त्यानंतर अरावन नागलोक येथे आपल्या आई उलुपीसोबत राहतो. मोठा झाल्यावर अरावन नागलोक सोडून आपल्या पित्याजवळ म्हणजेच अर्जुनकडे येतो. तेव्हा कुरुक्षेत्रमध्ये महाभारताचं युद्ध चाललेलं असत, म्हणून अर्जुन अरावनला थेट युद्ध करण्याकरिता युद्धभूमीत पाठवतो.
युद्ध सुरु असताना एक वेळ अशी येते जेव्हा पांडवाना जिंकण्यासाठी देवी महाकालीपुढे स्वैच्छिक नर बळीकरीता एका राजकुमाराची गरज असते. पण… कुठलाही राजकुमार स्वतःचा बळी देण्यास समोर येत नाही. तेव्हा अरावन स्वतःला स्वैच्छिक नर बळीकरीता पांडवांसमोर प्रस्तुत करतो.
पण… तेव्हा तो त्यासाठी एक अट ठेवतो की, त्याला अविवाहित नाही मरायचं आहे. या अटीमुळे पांडवांपुढे मोठं संकट उभं राहत, कारण आपली मुलगी विधवा होईल हे माहित असताना कुठलाही राजा आपल्या कन्येचा विवाह अरावनशी करण्याकरिता संमती देणार नाही.
जेव्हा कुठलाही मार्ग दिसत नाही, तेव्हा भगवान श्रीकृष्ण मोहिनी रूप धारण करून अरावनशी लग्न करतात. आपली इच्छा पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी अरावन स्वतःच्या हाताने आपलं शीश कापून महाकालीला अर्पण करतो.
आता श्रीकृष्ण हे पुरुष असताना त्यांनी स्त्रीचे रूप घेऊन अरावनशी लग्न केलेलं असत, म्हणूनच किन्नर ज्यांना स्त्री रूपातील पुरुष मानले जाते ते अरावनशी लग्न करतात आणि त्यांना आपलं आराध्य दैवत मानतात.
पण हे लग्न केवळ एका दिवसाचं असत आणि दुसऱ्या दिवशी अरावनाचा मृत्यू होतो. त्यामुळे किन्नर हे विधवा होतात.
ही होती या प्रथे मागील मान्यता…
तामिळनाडूत अनेक ठिकाणी भगवान अरावनचे मंदिर आहेत. पण अरावन देवाचे सर्वात प्राचीन आणि मुख्य मंदिर हे विल्लूपुरम जिल्ह्यातील कुवगाव येथे आहे. या मंदिराला कुथांडावर मंदिर Koothandavar Temple म्हणून ओळखले जात. या मंदिरात केवळ भगवान अरावनच्या शीशाचीच पूजा केली जाते.
कुवगाव येथे प्रत्येक वर्षी तामिळ नववर्षच्या पहिल्या पोर्णिमेपासून १८ दिवस चालणाऱ्या महोत्सवाला सुरवात होते. या उत्सवात केवळ भातातीलच नाही तर जवळपासच्या इतर देशातील किन्नर देखील हजेरी लावतात.
पहिले १६ दिवस येथे किन्नर देवाची आराधना करत नाचतात आणि गातात. वर्तुळ बनवून सर्व किन्नर आनंदाने नाचतात आणि आपल्या लग्नाची तयारी करतात.
यावेळी येथील वातावरण अगदी उत्साहाचं आणि प्रसन्नतेचं असत. १७व्या दिवशी पुजारीच्या हाताने पूजा करून अरावन देवाला नारळ वाहिले जातात. त्यानंतर अरावन देवासमोर पुजारीच्या हाताने किन्नरांच्या गळ्यात मंगळसूत्र घातले जाते, ज्याला तिथे थाली म्हणतात.
त्यानंतर हे किन्नर अरावन देवासोबत लग्न करतात. १८व्या दिवशी अरावन देवाच्या प्रतिमेला कुणगावात फिरविण्यात येत आणि मग ती प्रतिमा तोडून टाकतात.
नवरीच्या वेशात असलेले किन्नर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून टाकतात , तसेच अरावन देवासाठी केलेला सर्व शृंगार देखील पुसून टाकतात आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतात.
विधवेच्या वेशातील हे किन्नर अरावन देवाच्या मृत्यूमुळे दु:खी होऊन आलाप करतात, खूप रडतात. यानंतर पुढील वर्षीच्या पहिल्या पौर्णिमेची आस धरत आपल्या आपल्या घराकडे निघून जातात.
असा हा उत्सव संपूर्ण जगात केवळ तामिळनाडूतच बघायला मिळतो…!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.