आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मसाले हा गृहिणींच्या स्वयंपाक जीवनातील एक महत्त्वाचा घटक असतो. जेवण रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्याचे काम हे मसाले करतात. चांगल्या प्रतीचा आणि योग्य मसाला हा जेवणामध्ये जणू जीवच टाकतो.
भाजीला चव आणण्यासाठी हे मसाले आवश्यक असतात. मसाले हे फक्त चवीपुरते मर्यादित नसतात त्यांचा औषधी उपयोग सुद्धा असतो त्यामुळे मसाले विकत घेताना आपण काळजीपूर्वक विकत घेतो. कोणत्या कंपनीचे आहेत, कोणत्या तारखेला बनवले आहेत हे तपासतो.
पूर्वीच्या काळी मसाले हे घरीच तयार केले जात. हळद, तिखट या गोष्टी तर हमखास घरीच केल्या जात, पण जसा काळ बदलला तसं हे चित्र सुद्धा बदललं. आता ना कोणाला घरी मसाले करण्याची आवड आहे ना सवड..!
आपण बाजारात नवनवीन वेगवेगळे मसाले पाहतो. पण त्या मसाल्यांची प्रत किती चांगली असेल याचा आपल्याला अंदाज नसतो, त्यामुळे आपण जास्त करून जे जुने मसाले आपण वापरत आहोत, तेच चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो.
मसालांच्या जाहिराती सुद्धा टीव्हीवर आजकाल खूप पाहायला मिळतात, आणि त्यातील एक जाहिरात म्हणजे एमडीएचची जाहिरात..! एमडीएचच्या जाहिरातीमधील एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की, त्यामध्ये नेहमी एक लाल पगडी घातलेला कानापर्यंत लांब मिश्या असलेला वृद्ध मनुष्य तुम्हाला दिसला असेल.
हा मनुष्य कोण आहे? हा प्रश्न नेहमी तुमच्या मनात पडला असेल, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हा मनुष्य म्हणजे महाशिआन डी हत्ती (एमडीएच) मसाल्यांचे संस्थापक सर धरमपाल गुलाटी हे आहेत.
नुकतीच त्यांच्या निधनाची बातमी आली, आणि त्यामुळे सगळ्यांनाच दुःख झालं आहे.
गुलाटी हे भारतातील सर्वात जुने उद्योजक होते. २०१५-१६ मध्ये सर्वाधिक वेतन दिले जाणारे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) होते आणि भारतातील मसाले व इतर साहित्य उद्योगातील सर्वात प्रमुख नाव होते.
पण भारताचा अग्रगण्य मसाल्यांचा राजा बनणं काही सोपं काम नव्हतं. खरंतर भारतातील लोकांना प्रेरणा देणारी ही त्यांची प्रसिद्ध गोष्ट आहे, जी आज आपण जाणून घेणार आहोत.
धरमपाल गुलाटी यांचा जन्म २७ मार्च १९२३ मध्ये पकिस्तानच्या सियालकोट येथे झाला. तिथे त्यांचे वडील महाशिआन डी हत्ती नावाचे छोटेसे मसाल्याचे दुकान चालवत होते, त्यांनी हे दुकान १९१९ मध्ये सुरू केले होते.
पण भारत-पाकिस्तान विभाजनानंतर गुलाटी कुटुंबियांना खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. विभाजनामुळे त्यांच्या कुटुंबियांची खूप फरफट झाली. त्याचवेळी सांप्रदायिक युद्धाला सुरुवात झाली.
एकाच रात्री त्यांची लहान आतेबहीण आणि आत्या यांच्यावर या सांप्रदायिक युद्धाच्या नावाखाली बलात्कार करण्यात आले आणि त्यांना ठार मारण्यात आलं. त्यांच्या कुटुंबियांचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. त्यानंतर ते दिल्लीला आले, पण या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या व्यवसायाची पूर्णपणे राखरांगोळी झाली होती.
पाकिस्तानातून आल्यामुळे येथील लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. ते लोक पाणीपुरवठा, वीज पुरवठा आणि शौचालयाची कोणतीही सुविधा नसलेल्या कच्च्या भाड्याच्या घरामध्ये राहत होते.
गुलाटी यांच्या वडिलांनी मरण्यापूर्वी गुलाटी यांना १५०० रुपये दिले होते, त्या पैशांनी त्यांनी एक टांगा (घोडागाडी) खरेदी केला आणि या टांग्याने ते प्रवाश्यांना करोल बाग ते कनॉट प्लेसपर्यंत सोडत असत. पण यामधून त्यांचा फायदा होत नसे, त्यानंतर लवकरच त्यांची आई न्युमोनियामुळे मरण पावली.
आता रोज लोक त्यांचा अपमान करू लागले होते, म्हणून त्यांनी आपली घोडागाडी विकली आणि जुन्या खान रस्त्यावर त्याच नावाने एक छोटे नवीन दुकान उघडले. महाशिआन डि हत्ती (एमडीएच) याचा पंजाबीमध्ये अर्थ होतो, एक उदारमतवादी माणसाचे दुकान.
या उपक्रमामुळे त्यांना गरजेचा असलेला वित्तीय फरक कमी होण्यास मदत झाली.
त्यानंतर प्रारंभिक यश मिळाल्यानंतर १९५८ मध्ये त्यांनी चांदणी चौकमध्ये अजून एक दुकान भाड्याने घेतले. १९५९ मध्ये त्यांनी महाशिआन डि हत्ती प्रायव्हेट लिमिटेड आणि एमडीएच स्पाइसेस एम्पायर नावाने स्वतःचा कारखाना सुरु केला.
आज त्यांची घरगुती साहित्य विकणारी फर्म ५० पेक्षा जास्त पदार्थांचे पॅकिंग अमेरिका, कॅनडा, यूके आणि युरोप या ठिकाणांवर निर्यात करते, तसेच ते भारतातातील सर्वात फास्ट-मूविंग कन्झ्युमर गुड्स सुद्धा आहे.
गुलाटी यांनी स्वतःचे महाशयी चूनीलाल चॅरीटेबल ट्रस्ट सुद्धा उघडले, त्यामध्ये २५० खाटांचे रुग्णालय आहे, तसेच झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी मोबाईल हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
गुलाटी हे दिल्लीमध्ये ४ शाळा चालवतात आणि गरजू लोकांना विविध फाउंडेशन व चॅरीटेबल ट्रस्टमार्फत मदत पोहोचवतात.
गुलाटी यांचे आयुष्य खूप चढ -उताराने भरलेलं होतं, पण त्यामधूनच त्यांनी योग्यप्रकारे रस्ता काढून एक नवीन विश्व निर्माण केलं. आजपर्यंत आपण त्यांना फक्त मसाल्याच्या जाहिरातीमधील एक म्हातारे काका समजत होतो, पण हे वाचल्यावर नक्कीच तुम्हाला त्यांच्याविषयी आदर वाटेल.
गुलाटी यांना ९६व्या वर्षी, २०१९मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
आज या महान व्यावसायिकाचा मृत्यू सगळ्यांनाच चटका लावून गेला…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.