Site icon InMarathi

नैसर्गिक आपत्तीला घाबरणारा भारतीय सिनेमा!

movie-marathipizza00

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक : पवन गंगावणे

===

29 ऑगस्ट 2017. पुन्हा एकदा मुसळधार सुरू झालाय. पुन्हा एकदा मुंबईची गती मंदावलीये. कुठे गुडघाभर तर कुठे कंम्बरेवर पाणी साचलंय. रेल्वे ट्रॅक्स पाण्याने भरल्यात. हजारो चिंतीत चेहरे सध्या मुंबईच्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन्सवर आशाळभूतपणे पुनःपुन्हा एखादी ट्रेन येतेय का हे माना वळवून बघत आहेत. कोणी घरी फोन लावतोय तर कोणी बाबांच्या, बायकोच्या, भाऊ, बहिणीची घरी येण्याची वाट पाहतोय. बरेच लोक ऑफिसमध्ये अडकून पडलेत. जे घरी आहेत ते चिंतेत आहेत आणि जे घरी नाहीत ते ही. अनेक लोकं रस्त्यावर अडकलेल्या लोकांना निवारा, खाद्य देऊन मदत करत आहेत तर काही मलिशकाचं bmc चं गाणं गुणगुणताहेत. पावसाळा म्हटलं की मुंबईकरांच्या अंगावर काटाच येतो – कारण बारा वर्षांपूर्वी, हो विश्वास बसत नाही, पण तब्बल 12 वर्षांपूर्वी मुंबई अशीच थांबली होती.

livemint.com

26 जुलै 2005 रोजी अवघ्या 24 तासात विक्रमी 944 मिमी पाऊस पडला होता. त्यादिवशी पहिल्यांदाच मुंबईकरांनी हतबलता अनूभवली होती. त्या दिवशीही असेच लोकं पावसात अडकून पडले होते. कोणी कारमध्ये, कोणी ऑफिसात तर कोणी रस्त्यातच. निसर्गाचं असं रौद्ररूप मुंबईने याआधी पाहिलं नव्हतं. या निर्दयी पावसाने 1094 च्यावर जीव गिळंकृत केले होते. या घटनेतून सावरायला मुंबईला जवळपास महिना लागला होता. या घटनेनंतर bmc ने मुंबईच्या sewer आणि ड्रेनेज सिस्टममध्ये आमूलाग्र बदल करण्याचे कबूल केले होते. यानंतर इतर भारतीयांना वाटले की असा प्रसंग पुन्हा नाही उदभवणार, परंतु तो तर निसर्ग आहे. त्यापुढे सर्वांना झुकावे लागते. अगदी कधीही न थांबणाऱ्या मुंबईला सुद्धा.

संध्याकाळ पर्यंत 6 लोक मृत झाल्याची बातमी आलीये. हा आकडा पूढे न वाढावा हीच अपेक्षा. आज 12 वर्षानंतर जर परत हीच स्थिती ओढावलीये म्हणजे bmc ची उपायव्यवस्था नक्कीच कुठेतरी कमी पडतीये.

2009 मध्ये 26 जुलैच्या घटनेने चित्रपटांना प्रेरणा दिली होती. त्या घटनेवर आधारित इमरान हाश्मी आणि सोहा अली खानची प्रमुख भूमिका असलेला तुम मिले हा सिनेमा आला होता. तुम मिलेमध्ये एका प्रेमकथेसोबत 26 जुलैच्या पुराची सांगड घालण्यात आली होती. हा सिनेमा विशेष फिल्म्सने बनवलेला आजवरचा सर्वात महागडा सिनेमा होता. सुपरहिट गाणे आणि तेव्हा फुल फॉर्मात असलेला इमरान हाश्मी असूनही पटकथा कमजोर असल्याने तुम मिले तिकिट खिडकीवर अपयशी ठरला आणि या सिनेम्यासहच महेश भट्टने ठरवून घेतलं की यानंतर एका सिनेम्यात इतके पैसे कधीच नाही गुंतवायचे. तुम मिलेच्या एक वर्ष आधी 2008 मध्येही 26 जुलैच्याच कथानकावर बेतलेला 26थ जुलै ऍट बरिस्ता नावाचा एक अत्यन्त अल्पबजेट सिनेमा येऊन गेला होता, ज्यात 26 जुलैच्या पावसात बरिस्ता कॅफेमध्ये अडकलेल्या काही लोकांची कथा दाखवली होती. पण हा सिनेमा कधी आला आणि कधी गेला याचा प्रेक्षकांना कधी पत्ताच लागला नाही.

glamsham.com

हॉलिवूडमध्ये डिसास्टर फिल्म्स हा जॉनर खूप प्रसिद्ध आहे. यात 2012, दि डे आफ्टर टूमॉरो, वोलकॅनॉ, ट्विस्टर, डांटेज पीक, पोसायडन, दी परफेक्ट स्टॉर्म आणि यासारखे असंख्य सिनेमे होऊन गेलेत ज्यात निसर्गाचं रौद्र रूप आणि त्यात झुंजणाऱ्या पात्रांच्या कथा दाखवण्यात आल्यात. डिसास्टर फिल्म्सचाच उपप्रकार म्हणजे एखादी दुर्घटना दाखवणारे सिनेमे किंवा alien invasion movies ज्यात अंतराळातील जीव पृथ्वीवर हल्ला करतात. या उपप्रकारात इंडिपेंडेन्स डे, टायटॅनिक, वॉर ऑफ दि वर्ल्डस, क्लोवरफील्ड, knowing, एअरपोर्ट इत्यादी सिनेमे येतात. यानंतरचा उपप्रकार म्हणजे मोन्स्टर फिल्म्स – ज्यात एखादा दैत्याकार प्राणी एखाद्या शहरावर हल्ला करतो. यात गॉडझिल्ला, किंगकाँग वगैरे हे सिनेमे मोडतात.

डिसास्टर फिल्म्स इतक्या प्रसिद्ध आहेत की दरवर्षी या विषयावर कमीतकमी एक सिनेमा तर बनतोच. भारतातही या सिनेम्यांचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. पण मोठी आर्थिक गुंतवणूक आणि जोखीम असल्याने भारतात हा जॉनर सहसा कोणी अटेम्प्टही करत नाही कारण या विषयावर भारतात जे सिनेमे होऊन गेले तेही फारसे यशस्वी ठरलेले नाहीत.

नैसर्गिक आपत्ती हीच मूळ थीम असलेल्या सिनेम्यात वर सांगितल्याप्रमाणे तुम मिले आणि 26थ जुलै ऍट बरिस्ता व्यतिरिक्त 2007 मध्ये आलेला ओरिया भाषेतील कथांतर नावाचा सिनेमा 1999 मध्ये ओडिशामध्ये आलेल्या वादळावर आधारित आहे. भोपाळ गॅस ट्रेजेडीवर आधारित भोपाल एक्सप्रेस आणि भोपाल:ए प्रेयर फॉर रेन हे दोन सिनेमे आहेत. ज्यापैकी राजपाल यादवची प्रमुख भूमिका असलेला भोपाल:ए प्रेयर फॉर रेन हा सिनेमा चांगलाच जमून आलाय. यात गॅस लिकच्या आधीचं जीवन, फॅक्टरीतलं एकंदरीत कामकाज आणि त्यात झालेल्या चुका ज्यामुळे ही दुर्घटना उदभवली हे तिथेच काम करणाऱ्या एका कामगाराच्या नजरेतून दाखवले आहे.

allindiaroundup.com

2011 मध्ये आलेला डॅम999 एक काल्पनिक डीसास्टर फिल्म आहे ज्यात 99 वर्ष पूर्ण झालेल एक ब्रिटिशकालीन धरण फुटून पूर-परिस्थती निर्माण होते. अत्यन्त हलक्या दर्जाचे व्हिएफएक्स असलेला हा सिनेमा अतिशय कंटाळवाणा आहे. याव्यतिरिक्त काही सिनेम्यांमध्ये दुर्घटना/नैसर्गिक आपत्ती हा मेन फोकस न ठेवता एक सबप्लॉट म्हणून वापरण्यात आला आहे जसे की भूकम्प दाखवणारा वक्त आणि काई पो छे, क्लायमॅक्समध्ये पूर दाखवणारा कमल हसनचा दसावथरम. मदर इंडियात पूर आणि त्याने येणारा दुष्काळ असेच पुराचे एक दृश्य शाहरुख खानच्या माय नेम इज खान मध्येही आहे.

कोळसा खाणीतील दुर्घटना दाखवणारा यश चोप्राचा काला पत्थर आणि रेल्वे दुर्घटना दाखवणारा बी आर चोप्राचा दी बर्निंग ट्रेन हे दोन सिनेमे बनलेले आहेत. भव्य स्टारकास्ट असलेले हे दोन्हीही सिनेमे आज कल्ट ब्लॉकबस्टर समजले जातात, परंतु जेव्हा हे सिनेमे रिलीज झाले होते तेव्हा फारसे यशस्वी ठरले नव्हते. कदाचित या कारणानेच भारतीय निर्माते/दिग्दर्शक आजही डिसास्टर सिनेमे बनवायला धजावत नाहीत.

खरं तर भारतात दररोज इतके अपघात आणि इतक्या नैसर्गिक आपत्ती घडतात की अनेक चांगले सिनेमे या विषयावर करता येतील. पण एक सामान्य भारतीय नागरिक जितकी जोखीम रोजच्या जीवनात उचलतो, ती पडद्यावर उतरवण्याची हिम्मत मात्र भारतातले फिल्ममेकर्स दाखवत नाहीत. कारण व्हिएफएक्समध्ये एवढा पैसा गुंतवण्यापेक्षा एखादा सुपरस्टार कास्ट करून मास इंटरटेनरच्या टॅग खाली प्रेक्षकांना हवं ते दाखवता येतं.

4.bp.blogspot.com

70-80 कोटीचे सिनेमे बनवणं आता भारतात कॉमन प्रॅक्टिस झालीये – पण निर्माते तो पैसा एका सुपरस्टारवर लावतात जो त्या पैशांच्या रिटर्न्सची guarantee देतो. ह्याच बजेटमध्ये एखादा चांगला डिसास्टर सिनेमा होऊ शकतो, पण मग तो चालेल याची हमी नसते. कारण त्यात मोठे हिरो नसतात आणि एखादा मोठा हिरो घ्यायचाच झाला तर बजेट आणखी वाढणार. त्यामुळे निर्देशक/दिगदर्शक हा जॉनरच सरसकट टाळतात आणि जे चालतं तेच बनवतात.

जसे हे लोकं जोखीम कमी करताहेत तशी मुंबईकरांच्या आयुष्यातील जोखीम देखील कमी होवो आणि सगळे लोकं आपापल्या घरी सुखरूप पोचावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Exit mobile version