' कुठल्याही परिस्थितीत हार न मानणारी ‘मुंबई’ची स्पिरिट…! – InMarathi

कुठल्याही परिस्थितीत हार न मानणारी ‘मुंबई’ची स्पिरिट…!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मुंबई, ठाणे, कल्याणसह इतर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काल मुंबईकरांना जणू 26 जुलै 2005 चाच दिवस पुन्हा उजाडलाय की काय अशी अनुभूती झाली. मंगळवारी, म्हणजेच 29 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी पावसाचा जोर वाढल्यानंतर अनेकांना ’26 जुलै’सारखी स्थिती तर होणार नाही ना अशी भीती वाटली. 29 ऑगस्ट 2017 ला 12 तासांच्या कालावधीत 200 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. ही आकडेवारी 11 दिवसांच्या सरासरी पावसापेक्षाही अधिक आहे. पर्जन्यमानाचे बदलते प्रमाण आणि काँक्रिटायझेशनमुळे हे घडल्याचं विविध संशोधनातून समोर आलं आहे.mumbairain01-marathipizza

गुडघ्यापर्यंत पाणी आणि न थांबणारा पाऊस अशी मंगळवारी शहराची स्थिती होती. रस्ते पाण्यानी तुडुंब भरलेले आणि त्यातच मुंबईची लाईफ लाईन म्हणजेच रेल्वे सेवाही या पावसामुळे ठप्प पडली. दिवस जसजसे वाढत गेला तसतसा पाऊसही वाढत गेला आणि त्यात दुपारच्या सुमारास झालेल्या समुद्राच्या भरतीने मोठ्या प्रमाणात भर घातली. जणू काही संपूर्ण मुंबई जलमय झाली होती. यात रेल्वेची तर साथ सुटलीच पण रस्त्यावर भरलेल्या पाण्यामुळे बेस्ट सेवाही रखडली आणि लोकांची दैना झाली. ऑफिसमधून लवकर निघाल्यावरही चाकरमान्यांना घरी पोहोचता आले नाही, कितीतरी मुंबईकरांना रात्र त्या पावसात काढावी लागली. रस्त्यावर वाहनांच्या रांगांच्या रांगा लागल्या. कधीही न थांबणारी ही मुंबई हळूहळू मंदावली. पाऊस, रस्त्यावर भरलेल पाणी, नातेवाईकांशी तुटलेला संपर्क, घरी कधी पोहोचणार हे देखील माहित नाही, अशा परिस्थितीतही जो डगमगला नाही तो होता मुंबईकर आणि त्याची हिम्मत. या महाप्रलय सदृश्य स्थितीत मुंबईकरांनी हार मानली नाही. मुंबईकरांची हीच स्पिरीट त्यांना इतर लोकांपेक्षा वेगळ बनवते.

mumbairain02-marathipizza
indianexpress.com

काल संपूर्ण मुंबई जणूकाही ठप्प पडलेली, कुणालाही कुठेही जाण्या-येण्यासाठी मार्ग नव्हता, दुपारपासून स्टेशनवर ट्रेन सुरु होण्याची वाट बघणारे प्रवासी रात्र झाली तरी तिथेच अडकून पडले होते, पाण्यामुळे बस, टॅक्सी देखील जिथल्या तिथेच थांबल्या होत्या. अशा वेळी या परिस्थितीत अडकलेल्या आणि त्याची जाणीव असणाऱ्या प्रत्येकानेच एकमेकांना मदत करण्यास सुरवात केली. सोशल मिडीयावर एरवी जाती, राजनीती, धर्म यांवर भांडणारे सर्वच आज एक होऊन मदतीचा हात देत होते. काल कित्येक जणांच्या सोशल मिडिया अकाउंटवर मद्तीची पोस्ट बघायला मिळाली. कित्येक लोकांनी त्यांच्या परिसरात अडकलेल्या लोकांना आमच्या घरी या म्हणत माणुसकी दाखवली, तर कित्येक संस्थांनी लोकांच्या खाण्यापिण्याची सोय केली, त्यांच्यासाठी आश्रयाची सोय केली.

mumbairain03-marathipizza
mid-day.com

काल दुपारपासून ते रात्रभर सोशल मीडियावर अश्या पोस्टचा महापूरच आला होता. प्रत्येक जण होईल तितकी मदत करण्यास पुढे सरसावत होता. त्यातच गणपतीचे दिवस सुरु असल्याने कित्येक गणेश मंडळांनी देखील त्यांच्या मंडळात लोकांची राहण्याची आणि खाण्या-पिण्याची सोय केली. जणू काही त्या विनायकाने या महाप्रल्याच्या माध्यमातून माणसातल्या माणुसकीला जाग आणली होता.

mumbairain06-marathipizza
facebook.com

यात मुंबई पोलिसांनीही त्याचं कर्तव्य चोख पार पाडलं. त्यासाठी त्यांना सलामच करायला हवा. मुंबईत पूर सदृश्य स्थिती असतानाही हे मुंबईचे पोलीस आपले कर्तव्य बजावत होते, स्वतः छातीएवढ्या पाण्यात असूनदेखील ते इतरांना त्यातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी त्यांच्या ड्युटीला न चुकता आपली जबाबदारी पार पाडली आणि नुसतीच पार नाही पाडली तर लोकांच्या सुरक्षितेतची काळजीही घेतली.

यादरम्यान जे स्वतः या परिस्थितीत अडकले होते त्यांनी देखील एकमेकांची होईल तेवढी मदत केली. कित्येकांना तर रेल्वेस्टेशनवरच अख्खी रात्र काढावी लागली. यादरम्यान तिथल्या तिथल्या मंदिर, मशिदी, चर्च आणि गुरुद्वारा यांनी देखील अनेकांना अन्न व निवारा दिला. एवढच काय तर आपले वडापाव वाले आणि चहा वाले यांनी देखील स्वतःचा तोटा न बघता अडकलेल्यांना मोफत वडापाव आणि चहा दिला. यात आपली नौसेनाही मागे नव्हती, नौसेनेतर्फेही अनेक ठिकाणी खाण्या-पिण्याचे स्टॅाल्स लावून गरुजूंना मदत करण्यात आली.

mumbairain04-marathipizza
abplive.in

तर अशी ही मुंबई आणि तिची स्पिरीट जी कुठलीही आपत्ती आली तरी झुकत नाही, तर एकमेकांचा हात धरून त्या सम्येसेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करते. एरवी आजूबाजूला कोण आहे हेही ज्याला माहित नाही तोच मुंबईकर आज तुंबलेल्या पाण्यात इतरांची मदत करताना दिसून आला. मानलं आज तुला मुंबई खरच तू बेस्ट आहेस आणि तुला बेस्ट बनवल ते या मुंबईकरांनी…

याच सर्वात व्हॅट्सऍपवर एक मेसेज खूप शेअर केलं गेला तो असा…

पावसाने एका झटक्यात सगळ्यांना ‘मुंबईकर’ बनवले!

आता कोणी मराठी नाही, कोणी भैया नाही, कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही !

भिजणारी सर्व माणसेच, मदत मागणारी माणसेच आणि प्रत्येक जिवाची काळजी घेणारीही फक्त माणसेच !

उद्या ऊन पडेल, पाऊस थांबेल, सगळं नीट होईल… फक्त एक करा… ह्या पावसाने दिलेला ओलावा असाच जपून ठेवा !!!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?