' मुलगा ‘वेगळ्याच’ गोष्टीसाठी चर्चेत आहे, पण नागार्जुनची जादू मात्र अजून ओसरलेली नाही – InMarathi

मुलगा ‘वेगळ्याच’ गोष्टीसाठी चर्चेत आहे, पण नागार्जुनची जादू मात्र अजून ओसरलेली नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक – अक्षय शेलार 

===

साउथ इंडस्ट्रीत एकोणिसशे ऐंशीच्या दशकात बरेच नवीन चेहरे समोर येत होते. शिवाय, या चेहऱ्यांमध्ये नवीन काहीतरी करून दाखवण्याची धमक आणि अभिनय कौशल्य दिसून येत होते. याच काळात समोर आलेला आणखी एक चेहरा, तो चेहरा म्हणजे नागार्जुन.

 

nagarjuna-marathipizza01

 

२९ ऑगस्ट १९५९ रोजी चेन्नईत स्थायिक असलेल्या अक्किनेणी कुटुंबात जन्मलेला हा मुलगा, अक्किनेणी नागार्जुन. नंतर हे कुटुंब हैदराबादला आले. इथे म्हणे नागार्जुनने आपलं पुढील शिक्षण आणि इंजिनिअरिंगची डिग्री घेतली.

नागार्जुनचा आपल्याला माहित असलेला पहिला चित्रपट १९८६ मधील ‘विक्रम’ जरी असला, तरी मुळात त्याने १९६७ मधील तेलुगू चित्रपट ‘सुदीगुंडालु’मधून बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे आणि नंतर पुढे जाऊन तो बाॅलिवुडमधील ‘हिरो’ या चित्रपटाचा रिमेक असलेल्या व्ही. मधुसूदन रावांच्या विक्रममध्ये प्रमुख भूमिकेत दिसला. नंतर त्याने मजनू, संकीतर्णा या हिट चित्रपटांत प्रमुख भूमिका केल्या.

 

nagarjuna vikram movie InMarathi

 

शिवाय करिअरच्या अगदी सुरूवातीलाच, म्हणजे १९८८ मधील ‘आखरी पोरातम’मध्ये त्याला थेट श्रीदेवी आणि सुहासिनी या प्रस्थापित अभिनेत्रींसोबत काम करता आले. हा चित्रपट सुपरहिट ठरला.

 

nagarjuna aakhari poratam movie InMarathi

 

यानंतरच्या त्याच्या काही चित्रपटांनी सुमार कामगिरी केली, पण १९८९ मध्ये आला तो मणिरत्नमचा गीतांजली. हा चित्रपट त्या वर्षीचा उत्तम चित्रपट म्हणून तर गाजलाच. शिवाय, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं नॅशनल अवॉर्डदेखील यालाच मिळाले.

खऱ्या अर्थाने तो भारतभर माहित झाला, तो त्याच्या यानंतरच्या चित्रपटाने आणि तो चित्रपट होता राम गोपाल वर्मा ऊर्फ रामूचा पहिला चित्रपट ‘सिवा’. या चित्रपटाने रामूला नवी ओळख तर प्राप्त करून दिलीच. शिवाय, अभिनयाबाबत नागार्जुनचे भरपूर कौतुक झाले. पुढे याच्याच हिंदी रिमेक ‘शिवा’ मधून नागार्जुनने हिंदीत पदार्पण केले आणि हिंदीलाही आणखी एक नवा चेहरा गवसला.

यानंतर तेलुगू, तमिळ आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये नागार्जुनची जोरदार इनिंग सुरू झाली. पण यानंतरचे त्याचे काही चित्रपट बऱ्यापैकी बरे असेच होते. कारण त्यांनी ना बाॅक्स ऑफिसवर फारशी कमाई केली, ना त्यांनी अभिनयात त्याला फारसा वाव मिळवून दिला. थोडक्यात, त्याला एका मोठ्या हिटची गरज होती.

 

nagarjun inmarathi

 

अखेर यानंतरच्या किलर, नेती सिद्धार्थ, चैतन्यम् या काही चित्रपटांमधून वेगवेगळ्या जाॅनरमध्ये काम केल्याने त्याचे एक प्रायोगिक अभिनेता म्हणून नाव तर झालेच. शिवाय, हे चित्रपट सुपरहिटदेखील ठरले. यानंतर त्याला म्हणे अभिनयात प्रयोग करूनही चित्रपट हिट करणारा – ‘सेल्युलाॅइड सायन्टिस्ट’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

मग १९९४ मध्ये आला तो महेश भट दिग्दर्शित हिंदी – तेलुगू चित्रपट ‘क्रिमिनल’. हा चित्रपट सुपरहिट ठरला. शिवाय, नंतर आलेला ‘हॅलो ब्रदर’ देखील हिट ठरला. आणि याच चित्रपटाचा पुढे हिंदीत ‘जुडवा’ नावाने रिमेक बनविण्यात आला. हा सिनेमादेखील हिट ठरला आणि तो तमिळमध्ये डब देखील केला गेला.

यानंतरही त्याने बरेच सुपरहिट चित्रपट केले. पण १९९७ मधील ‘अन्नामय्या’ या चित्रपटाने त्याला खरी ओळख मिळाली. यातील पंधराव्या शतकातील ‘अन्नामाचार्य’ या गायकाची भूमिका नागार्जुनने साकारली होती.

या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर तर मिळालेच. पण त्या वर्षीचे तमिळनाडू राज्याचा ‘नंदी पुरस्कार’ देखील मिळाला. शिवाय, त्याला या वर्षीचं अभिनयासाठीचं स्पेशल मेन्शन म्हणून नॅशनल अवॉर्डदेखील मिळालं.

पुढे त्याने संतोषम्, शिवमणी, इत्यादी रोमँटिक काॅमेडी टाइप हलक्याफुलक्या चित्रपटातही काम केलं. नंतर २००३ मध्ये त्याने त्याच्या एका भाच्याचा सत्यम नावाचा चित्रपटाची देखील निर्मिती केली.

 

nagarjuna satyam InMarathi

 

मग २००४  मध्ये आला त्याचा सुपर-डुपर हिट ‘मास’. जो आपल्याकडे ‘मेरी जंग – वन मॅन आर्मी’ या नावाने प्रसिद्ध झाला. यातील त्याची स्टाईल, संवाद फेक, इत्यादी गोष्टींमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट विशेष आवडला.

 

nagarjuna mass InMarathi

 

याच काळात बाॅलिवुडचा पारंपरिक प्रेक्षक हळूहळू साउथ इंडियन चित्रपटांकडे वळू लागला होता. त्यातील अ‍ॅक्शन, संवाद, वगैरे गोष्टी प्रेक्षकांना आवडू लागल्या होत्या. त्यामुळे हा चित्रपट आणि यातील नागार्जुनचं काम भरपूर गाजलं. शिवानंतर तब्बल एक दीड दशकाने नागार्जुनने हिंदी प्रेक्षकांनवर पुन्हा एक नवं गारूड निर्माण केलं.

२००६ मध्ये त्याचा आणखी एक पीरियड ड्रामा असलेला ‘श्री रामादासु’ हा चित्रपट आला. यात त्याने अठराव्या शतकातील एका संगीतकाराची भूमिका साकारली होती. याही चित्रपटासाठी त्याला नंदी पुरस्कार मिळाला.

नंतर २००७ मध्ये त्याचा आणखी एक चित्रपट आला, ‘डाॅन’. जो हिंदीत डब होऊन इथेही तितकाच प्रसिद्ध झाला. हा आपल्याकडे साधारणपणे ‘डाॅन नंबर १’ म्हणून सर्वश्रुत आहे. यातही पुन्हा त्याचा परफॉर्मन्स आणि आशयामुळे हा चित्रपट भरपूर गाजला.

 

nagarjuna don InMarathi

 

यानंतरही त्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये केलं. काही हिट झाले तर काही फ्लाॅप झाले. काहींनी त्याला अभिनेता म्हणून जास्त समृद्ध केलं तर काहींनी निव्वळ गल्लाभरू काम करवून घेतलं.

थोडक्यात, त्याचा चित्रपटांतील त्याचा अभिनय, आशय आणि विषय हे कधीच सारखे आणि समांतर राहिलेले नाहीत. विनोदी चित्रपट, राॅमकाॅम चित्रपट, अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपट, वगैरे सगळ्या प्रकारात त्याने काम केलंय.

अजूनही बहुतांशी सर्वच भारतीय प्रेक्षक त्याला शिवा, मास आणि डाॅन या तीनच भूमिकांसाठी ओळखतो. मुळात त्याच्या चित्रपटांच्या दिग्दर्शकांचं यातील श्रेय बऱ्यापैकी जाणवतं.

कारण, शिवा असो किंवा मास आणि डाॅन प्रत्येक चित्रपट हा कथानकात त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीचा आधार घेतो. त्यावेळी समाजात घडत असणाऱ्या भ्रष्टाचार, देशद्रोह वगैरे घटनांचे पडसाद तर कथानकात दिसतातच. पण, हे सगळेच चित्रपट कुठेतरी एक देशप्रेमाची भावना जागृत करतात आणि हेच त्या-त्या वेळी प्रेक्षकांना जास्त भावले.

 

nagarjuna InMarathi

बहुतांशी लोकांना आज त्याचे नॅशनल अवाॅर्ड, नंदी पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, वगैरेंची ना माहिती आहे ना हे पुरस्कार त्यांच्या खिजगणतीत येतात. त्यांना फक्त हा अभिनेता भारी आहे, इतकंच कळतं. आणि ह्याच भारी अभिनेत्याच्या मास आणि डाॅनसारख्या भूमिका आपल्याला आवडल्या, इतकंच त्यांना कळते.

माझ्या माहितीत अजूनही असे मित्र आहे ते ज्यांच्या परिमाणानुसार मासमधील त्याचा अभिनय हा जगातील सर्वांत भारी अभिनय आहे, तर डाॅन नंबर १ हा नागार्जुनचा सगळ्यात भारी चित्रपट आहे.

त्यांनी त्याचे तमिळ आणि तेलुगू चित्रपट ना पाहिले आहेत ना त्यांना त्याची नावं माहित आहेत. पण त्यांना नागार्जुन आवडतो, हे मात्र नक्की आणि हाच खरा प्रतिसाद अभिनेता म्हणून नागार्जुनला स्वतःला आवडेल, याची मला खात्री आहे.

 

nagarjuna mission azad movie InMarathi

 

आज त्याच्या नावावर तब्बल नऊ नंदी पुरस्कार आहेत. ही संख्या चिरंजीवी आणि रजनीकांतपेक्षा जास्त आहे. शिवाय, तीन फिल्मफेअर आणि नॅशनल अवॉर्डदेखील त्याला मिळालंय.

बहुतेक लोकांना याबद्दल माहित असेल नसेल तरीही त्यांना नागार्जुन हे नाव माहित असेल, हे नक्की आहे आणि आज या नागार्जुनची आठवण येण्याचं कारण म्हणजे  प्रत्येकाला कधी ना कधी तरी याचा एखादा तरी चित्रपट आवडलेला असेल, असतोच.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?