अमेरिकेतील असं भव्य हिंदू मंदिर जे पुढील कमीत कमी १०,००० वर्ष भक्कम उभं रहाणार आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
प्रत्येक धर्माला आपआपल्या दैवतांची पुजा करण्याचा अधिकार आहे.
आपण जगाच्या पाठीवर कुठेही रहात असु तरी, आपल्या देवतांची आराधना करण्याचा प्रयत्न आस्तिकांकडून केलाच जातो.
गेल्या काही वर्षांत हिंदू धर्मांच्या अनुयायांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती इतर संस्कृतीतील लोकांना आकर्षित करत आहे.
आणि जर तुम्ही भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्री भेट दिलीत तर तेथील परदेशी नागरिकांची लक्षणीय संख्या पाहून या गोष्टीची तुम्हाला देखील प्रचीती येईल.
पाश्चिमात्य देशातील विशेष करून अमेरिका खंडातील लोकांवर हिंदू संस्कृतीचा वाढता प्रभाव असल्याचे दिसून आले आहे.
हिंदू संस्कृतीच्या परदेशातील वाढत्या प्रसाराचे बहुतांश श्रेय जाते स्वामीनारायण संप्रदायाला!

हिंदू धर्माचा शक्य तितका प्रसार करून त्याचे महत्त्व जगाला पटवून देण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरचं वाखाणण्याजोगा आहे.
त्यांच्या या प्रचारात कुठेही कर्मकांडाला जागा नाही, जे काही आहे ते निव्वळ आध्यात्मिक पद्धतीने ते लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात.
आणि हेच कारण आहे की पुढारलेले परदेशी नागरिक देखील हिंदू धर्माचे महात्म्य स्वत:हून समजून घेण्यासाठी पुढाकार घेत आहे.
तर मंडळी, याच प्रचारकार्यातील आणखी एक मैलाचा दगड स्वामी नारायण संप्रदायाने गाठला आहे. या संप्रदायाने चक्क परदेशी भूमीवर जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक मंदिर उभारले आहे.
अमरिकेतील प्रसिद्ध न्यूजर्सीच्या भूमीवर रॉबिन्सविले या ठिकाणी स्वामीनारायण संप्रदायामार्फत उभारण्यात आलेले हे मंदिर जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर असल्याचे म्हटले जाते.
परंतु हाच मान कंबोडियाच्या अंगकोरवाट मंदिरालादेखील दिला जातो.
(वाचा अंगकोरवाट मंदिराबद्दल : जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर भारतात नसून परदेशात आहे!)
अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये सर्वात जास्त भारतीयांची लोकसंख्या आहे. मंदीराची निर्मिती बोचासनवासी अक्षर पुरूषोत्तम स्वामीनारायण संस्थेने केले आहे.
जवळपास १६२ एकरमध्ये असलेल्या या मंदिराच्या शिल्पाकृतींमध्ये प्राचिन भारताची संस्कृतीचे दर्शन घडते. हे मंदिर १३४ फुट लांब आणि ८७ फुट रुंद आहे. यामध्ये १०८ खांब आणि तीन सभागृह आहेत.

न्यूजर्सीच्या रॉबिंसविले शहरात असलेले हे मंदिर शिल्पशास्त्रानुसार बनवण्यात आले आहे.
१० ऑगस्ट २०१४ रोजी हे मंदिर सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.
या मंदिराच्या निर्मितीसाठी तब्बल १.८ कोटी युएस डॉलर म्हणजेच जवळपास १०८ कोटी रुपये एवढा खर्च आला आहे.

या मंदिराचं नयनरम्य पाहून केवळ भारतीयच नव्हे तर परदेशी लोकही थक्क होतात.
या मंदिरात भक्तांची रिघ सुरुच असते.
या संपूर्ण मंदिरासाठी ६८ हजार क्युबिक फुट एवढ्या इटालियन करारा संगमरवराचा वापर करण्यात आला आहे.
श्री स्वामीनारायण मंदिराच्या कलात्मक डिझाईनसाठी १३,४९९ हजार दगडांचा उपयोग करण्यात आला आहे.
या दगडांवरील संपूर्ण नक्षीकाम भारतातच करण्यात आले आहे. नक्षीकाम पुर्ण झाल्यानंतर याला समुद्रीमार्गाने न्यूजर्सीपर्यंत पोहोचवण्यात आले.

अमेरिकेचे प्रसिद्ध पत्रकार स्टीव ट्रेडरने बीएपीएसच्या श्री स्वामीनारायण मंदिराचे दर्शन घेतल्यावर न्यूजवर्क्स साईटवर या मंदिराबद्दल लिहिताना म्हटले होते
मंदिरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला एकापेक्षा एक अशा अद्भूत कलाकृती पाहावयास मिळतात. त्यांच्यावरून नजर हटणे शक्यच नाही. याशिवाय या मंदिराच्या आतील भागासोबतच मंदिराचा बाहेरील भाग अशा काही पध्दतीने बनवण्यात आला आहे की, हे मंदिर १००० वर्षांपर्यंत अशाच पध्दतीने उभे राहिल.

अमेरिकेतले नागरिक तर या मंदिराच्या अक्षरशः प्रेमात पडले आहेत.
मंदिर खुले झाल्यापासून हिंदू आणि भारतीय संस्कृतीबद्दल कुहुतुल असणारे विदेशी नागरिक येथे आवर्जून भेट देतात.
मंदिरात येणा-या धार्मिक लोकांची संख्या जितकी असते, तेवढ्याच प्रमाणात आर्किटेक्चर, वास्तुप्रेमी यांचीही तिथे गर्दी होते.
हे केवळ मंदिर नाही तर एक सर्वोत्कृष्ट हिंदू अध्यात्मिक केंद्र असल्याचे अनेकांना स्वत:हून कबूल केले आहे.
तर मंडळी – कधी अमेरिकेला गेलात आणि न्यूजर्सीला भटकण्याचा प्लान असेल तर या मंदिराला न चुकता भेट द्या. परदेशात रुजत असलेली आपली संस्कृती पाहून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.