आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
लेखक : मुकेश माचकर
—
बाबा गुरमीत सिंह राम रहीम याच्या अटकेनंतर डेरा सच्चा सौदा प्रकाशात आला आहे… हा डेरा काय आहे, त्याचे सदस्य कोण आहेत, ते एका बलात्कारी बाबाच्या बचावासाठी का हिंस्त्र झाले आहेत, यावर प्रकाश टाकणारी हरनीध कौर यांची मूळ इंग्रजीतली फेसबुक पोस्ट इथे स्वैर अनुवादली आहे. केवळ डेरा सच्चा सौदाच नाही, तर आपल्या आसपास एखाद्या बाबा-बुवापासून राजकीय नेते, पक्ष, संघटना, जाती, जमाती आणि थोरांच्या वारसांभोवती जी बेबंद गर्दी गोळा होते, तिचाही काहीसा अन्वयार्थ लावण्यासाठी या मजकुराची मदत होऊ शकेल.
हरनीध कौर लिहितात :
===
पंजाबमध्ये मुळात डेरा कसे तयार झाले आणि त्यांची भूमिका कसकशी बदलत गेली, हे लक्षात घेतल्याशिवाय डेरा सच्चा सौदाच्या हिंसाचाराने भयाकुल होण्यातही काही मतलब नाही.
उत्तर भारतातल्या एका मोठ्या जनसमुदायाला भोगाव्या लागलेल्या ऐतिहासिक जुलूमांमधून मुक्त करणारी ओळख डेरा सच्चा सौदाने दिली आहे. या डेऱ्याचे बहुतेक सदस्य मागासवर्गीय आहेत. त्यांनी जातीच्या जोखडातून सुटकेसाठी शीख धर्माचा स्वीकार केला. पण, तिथेही त्यांना जातविग्रह, तीच उतरंड आणि त्याच अत्याचारांचा सामना करावा लागला. शीख धर्म सैद्धांतिकदृष्ट्या जातविरहित आहे. मात्र, प्रत्यक्षातली परिस्थिती दुर्दैवाने फारच वेगळी आहे. जाट-खत्री या उच्चवर्णीय जातींचा शिखांच्या धार्मिक राजकारणावर प्रभाव आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी आणि इतर गुरुद्वारा समित्यांमध्ये त्यांचंच प्राबल्य आहे. त्यांच्यानंतर शीख धर्मात आलेल्यांना त्यांनी पद्धतशीरपणे सत्तास्थानांपासून दूर ठेवलं असून मुळातलं जातीय उच्चनीचतेचं समीकरण शीख धर्मातही अबांधित ठेवलं आहे.
या आणि अशा इतर घटकांमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे, हतबलता आहे, भ्रमनिरासाची भावना आहे. उत्कर्षाची आणि उन्नयनाची वाट त्यांना दिसतच नाही. मग ते अंमली पदार्थांकडे वळतात. घातक नशा ही आता पंजाबची ओळख बनून बसली आहे. त्याचबरोबर आर्थिक असुरक्षितता आणि शिक्षणाचा अभाव यांनीही परिस्थिती आणखी बिघडवली आहे. समाजाचा हा वर्ग दिशा हरवलेला वर्ग आहे. म्हणूनच डेरा सच्चा सौदासारखी संघटना भक्कमपणे त्यांच्या पाठिशी उभी राहते, तेव्हा तिचा त्यांना आधार वाटतो. डेरा त्यांना प्रतिष्ठा देतो. तो त्यांना शिक्षण देतो, दोन वेळचं अन्न देतो, अंमली पदार्थांपासून दूर ठेवतो, त्यांना नोकऱ्या देतो आणि मुख्य म्हणजे जगण्याला उद्देश देतो, आपण कोणीतरी आहोत, अशी जाणीव देतो. आता ही दिशा एक बलात्कारी देतो आहे का, अन्न भरवणारा हात एका खुन्याचा आहे का, याची पर्वा या देशातला कोणताही भरकटलेला माणूस किंवा उपाशी माणूस करत नाही; डेराचे अनुयायी अपवाद कसे ठरतील?
राम रहीम बाबाच्या अटकेनंतर उसळलेला उद्रेक हा निव्वळ व्यक्तिपूजेच्या स्तोमातून उद्भवलेला धार्मिक उन्माद नाही. आपला आधार आता जाणार, या असुरक्षिततेच्या भावनेचीही त्याला जोड आहे. बलात्कार प्रकरणात झालेला न्याय हा डेराच्या अनुयायांसाठी पुन्हा एकदा सामाजिक उतरंडीत तळाला लोटले जाण्याची भीती घेऊन आला आहे. त्यातून ते नुकतेच बाहेर पडायला शिकले आहेत. आताचा हिंसाचार हा जवळपास दोन पिढ्यांच्या खदखदीतून जन्मला आहे. आपल्या विकासाच्या कल्पना किती अन्यायकारक आणि वरवरच्या, दिखाऊ असतात, याचं भान आणून देणारी ही घडामोड आहे. यातून आपण धडा शिकणार का, हा मुळातला प्रश्न आहे. दुसऱ्याच्या पाठीवर पाय देऊन विकास घडवून आणला की कधी ना कधी पिचलेली माणसं बंड करून उठतात, हा या उद्रेकाचा एक अन्वयार्थ आहे.
राजकारण्यांना हे कळतं. त्यांना व्होटबँक ओळखता येते. म्हणूनच तर ते राजकारणी असतात. त्यांनी असे डेरे उभे राहू दिले, त्यांचा उत्कर्ष होऊ दिला, त्यांची संख्या वाढू दिली. या डेऱ्यांना त्यांनी मोकळं रान दिलं. त्यांना सर्व प्रकारचं पाठबळ देऊन त्यांच्या रूपाने हक्काची मतपेढी निर्माण केली. हे डेरे एकमेकांमध्ये भांडत राहतील आणि जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जातील, याची काळजी त्यांनी घेतली. यातून त्यांना डेरे आणि त्यांचे जथेदार उपकृत करून अंकित करून घेता आले.
यातून अंमली पदार्थांपासून दूर ठेवणारी पण धर्म आणि सुरक्षा यांचं त्याहून घातक कॉकटेल पाजणारी ही व्यवस्था जन्माला आली आहे. धर्म ही अफूची गोळी असेल, तर श्रद्धा हा चिलमीचा झुरका आहे, जो एका क्षणात वेगळ्या जगात पोहोचवतो. त्यामुळेच डेरा सच्चा सौदाच्या रूपाने श्रद्धेसाठी जीव घेणारी फौज उभी राहिली आहे. ती उभी राहण्याची जबाबदारी संपूर्ण समाजावर आहे.
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page