आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारताचे स्वातंत्र्य हे अमुल्य आहे.
हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कितीतरी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. या भारत भूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता किती लोक झटले, याची आपण कल्पना देखील करू शकत नाही.
त्यावेळी कितीतरी क्रांतिकारक अन्यायाचे बळी देखील पडले.
इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी संपूर्ण भारत एक झाला. पण त्यामधील सुद्धा काही क्रांतिकारकांना फसवले गेले होते.
यतींद्रनाथ मुखर्जी याच क्रांतीकारकांपैकी एक होते. ते त्या काळातील क्रांतीकारी हिरो होते.
असे म्हटले जाते की, जर यतींद्रनाथ मुखर्जींचे त्या काळातील मिशन यशस्वी झाले असते तर आपल्या भारताला १९१५ मधेच स्वातंत्र्य मिळाले असते.
चला तर मग जाणून घेऊया याच क्रांतिकारकाविषयी काही आवश्यक माहिती.
मजबूत शरीरयष्टी, तीक्ष्ण नजर आणि हृदयामध्ये देशप्रेमाची भावना अशी ओळख यतींद्रनाथ मुखर्जी या बंगालच्या क्रांतिकारकाची होती.
त्यांचा जन्म बंगालच्या नादिया येथे झाला होता, जे आता बांग्लादेशमध्ये आहे.
लहान वयामध्येच वडील गेल्याने त्यांचे पालनपोषण आजीच्या घरी झाले. लहानपणीपासूनच त्यांना मैदानी खेळ आवडत असत. त्यामुळे त्यांचे शरीर धष्टपुष्ट होते.
त्यामुळे ते ११ वर्षांच्या वयातच शहरातील रागीट घोड्यांना आटोक्यात आणणे शिकले होते.
यतींद्रनाथ मुखर्जी हे इंग्रजांचा खूप राग करायचे. जिथे त्यांना इंग्रज दिसतील ते तिथे त्यांना मारायचे.
एकदा तर त्यांनी एकावेळी ८ इंग्रजांना धोबीपछाड दिला होता. त्यामुळे त्या भागातील इंग्रज त्यांना खूप घाबरायचे.
यतींद्रनाथ विवेकानंदांपासून खूप प्रभावित होते…
यतींद्रनाथ मुखर्जी स्वामी विवेकानंदांपासून एवढे प्रभावित झाले होते की, ते रोज त्यांच्याकडे जात असत.
त्यांची मजबूत शरीरयष्टी पाहून विवेकानंदानी त्यांना अंबू गुहाच्या देशी व्यायामशाळेत पाठवले, जेणेकरून ते कुस्तीचे डावपेच शिकू शकतील.
भारताची एक स्वतःची नॅशनल आर्मी असली पाहिजे…
शिक्षण पूर्ण केल्यानंतर १८९९ मध्ये ते लगेचच मुजफ्फरपुरमध्ये बॅरिस्टर पिंगळेचे सेक्रेटरी झाले. पिंगळे हे बॅरिस्टर तर होतेच, त्याचबरोबर ते एक इतिहासकार सुद्धा होते.
त्यांच्यासोबत राहून जतीन यांनी हे अनुभवले की, भारताची एक स्वतःची नॅशनल आर्मी असली पाहिजे.
कदाचित हा विचार भारताची नॅशनल आर्मी बनवण्याचा पहिला विचार होता.
जो त्यानंतर मोहन सिंह, रास बिहारी बोस आणि सुभाषचंद्र बोस यांनी कृतीमध्ये आणला.
यतींद्रनाथ मुखर्जीपासून बाघा जतीनपर्यंतचा प्रवास…
घरातल्या लोकांच्या दबावामध्ये येऊन त्यांना बळजबरीने लग्न करावे लागले.
पण मोठ्या मुलाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे ते खूप विचलित झाले. त्यांनी आंतरिक शांतीसाठी हरिद्वारची यात्रा केली.
ते परत आल्यावर त्यांना समजले की, त्यांच्या गावामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. थोडा सुद्धा वेळ न घालवता ते त्याला शोधण्यासाठी जंगलात गेले.
रस्त्याने चालताना अचानक त्यांच्यासमोर वाघ आला, पण जतीन यांनी त्याला आपल्या खुखरीने मारले. त्यांच्या धाडसाला आणि हिंमतीला पाहून बंगाल सरकारने त्यांना सम्मानित केले.
इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये त्यांची खूप वाहवा करण्यात आली. त्या दिवसापासून लोक त्यांना ‘बाघा जतीन’ या नावाने ओळखू लागले.
–
- प्रसिद्धी पासून वंचित राहिलेली एक शूर क्रांतिकारी : राणी गाइदिनल्यू
- यशवंतराव होळकर : एक असा योद्धा ज्याने इंग्रजांसमोर कधीही हार मानली नाही..!
–
महान क्रांतिकारी होते बाघा जतीन…
सुभाषचंद्र बोस यांच्या आधी रास बिहारी यांनी जतीन यांच्यामधीला खरा नेता जाणला होता. रासबिहारी सांगत असत की,
जतीन यांच्यामध्ये विश्व नेता बनण्याची क्षमता आहे.
अजून एक १८५७ होणार होता…
फेब्रुवारी १९१५ मध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होणार होती. परत एक प्रयत्न केला जात होता. बंडाच्या वेगवेगळ्या तारखा ठरवण्यात आल्या. पण एका गद्दारीमुळे सर्व मेहनत पाण्यात गेली.
त्या दिवसांमध्ये जर्मनीचा राजा भारत भ्रमणसाठी आला होता. लोकांपासून लपून बाघा जतीन यांनी जर्मनीच्या राजाची भेट घेतली.
त्यांनी भारताच्या स्वातंत्रासाठी हत्यारे पुरवण्याची त्यांना विनंती केली. ही विनंती जर्मनीच्या राजाने मान्य केली.
सर्व काही भारताच्या पक्षामध्ये होते, त्याचवेळी याची माहिती गुप्तचर इमेनुअल विक्टर वोस्का याला लागली.
त्याने ही बातमी अमेरिकेला दिली, त्यानंतर अमेरिकेने ही माहिती ब्रिटिशांना सांगितली.
इंग्लंडमधून ही बातमी भारतीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आणि उडीसाचा संपूर्ण समुद्र तट सील करण्यात आला. ह्याप्रकारे भारताने स्वतंत्र होण्याची संधी गमावली.
शहीद झाले राष्ट्रनेता बाघा जतीन…
९ सप्टेंबर १९१५ मध्ये राजमहंती नावाच्या अधिकाऱ्याने गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण बाघा जतीन काही लवकर हाती लागणारे नव्हते.
इतर इंग्रज अधिकारी सुद्धा तिथे आले, दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला आणि त्याचवेळी त्यांचे सोबती चितप्रिय शहीद झाले.
ते स्वतः इतर क्रांतिकारांसोबत कितीतरी वेळ गोळीबाराचा सामना करत होते. पण शेवटी गोळ्यांमुळे चाळणी झालेले त्यांचे शरीर जमिनीवर धारातीर्थी पडले. ज्यावेळी इंग्रज अधिकारी त्यांच्याजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी त्यांना सांगितले की,
गोळ्या मी आणि माझा शहीद झालेला मित्र चितप्रिय चालवत होता, बाकी तीन साथी निर्दोष आहेत.
१० सप्टेंबर १९१५ मध्ये हा थोर क्रांतिकारी जीवनाची लढाई हरला.
–
- जालियानवाला बाग हत्याकांडाचा बदला घेणारे अज्ञात क्रांतिकारी ‘उधम सिंग’!
- मृत्यूला हसत हसत आलिंगन देणारा महाराष्ट्राच्या मातीतील थोर क्रांतिकारक
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.