आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
सोशल मिडीयामुळे आजकाल कोणतीही गोष्ट वाऱ्याप्रमाणे पसरते. गेल्या काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअप आणि फेसबुकवर देखील एक व्हिडिओ खूप वायरल होताना आपल्याला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एका तीन वर्षाच्या लहान मुलीला तिची आई शिकवत आहे आणि ती मुलगी वैतागलेली आहे, रडते आहे, तसेच प्रेमाने शिकवावे अशी विनवणी करताना दिसते आहे. खूप लोकांना हा व्हिडिओ म्हणजे गमतीचा प्रकार वाटला आणि या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिकिया सुद्धा देण्यात आल्या. पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर मनात एक विचार येतो की, खरच कोणी आपल्या मुलांना शिकवताना अश्या प्रकारची व्हिडिओ काढेल का? आपल्याच मुलांचे हसे झालेले आवडण्याइतपत तर आई-वडील क्रूर नसतात, भलेही आपली मुले अभ्यास करण्यासाठी कितीही कंटाळा करत असली तरीही इतरांनी त्यांना हसावे असे कुठल्याच पालकांना वाटणार नाही.
हा व्हिडीओ बघताच क्षणी हे लक्षात येते की, ती लहान मुलगी बरोबर बोलत असून देखील तिला जबरदस्तीने सारखे-सारखे तेच बोलायला लावले जात आहे, ज्यामुळे ती कंटाळते. मग तिचा तो कंटाळवाण्या आणि रडणाऱ्या चेहऱ्याची व्हिडीओ काढली गेली आहे. पण तुम्हाला माहित आहे का? की हा व्हिडीओ कोणी आणि कशासाठी तयार केला आहे… आज आपण तेच जाणून घेऊया….
भारतीय क्रिकेटपटूंनी देखील या व्हिडीओची निंदा केली. विराट कोहलीने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेयर केला आणि त्यावर आपली विरोधी प्रतिक्रिया दर्शविली. शिखर धवन आणि युवराज सिंग यांनी सुद्धा इंस्टाग्रामवर या व्हिडीओचा विरोधच केला. पण या व्हिडीओ मागील सत्य काही तरी वेगळेच असल्याचे दिसून येत आहे.
या वायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जी ३ वर्षांची लहान मुलगी दाखवण्यात आली आहे, तिचे नाव हयाआहे. प्रसिद्ध गायक तोशी आणि शरीब साबरी यांची ती भाची आहे. आता शेवटी त्यांनी आपली मौन सोडलं आहे आणि त्यांनी सांगितले की, या एका मिनिटाच्या व्हिडीओ क्लिपच्या आधारावर तिच्या आईविषयी कोणतेही मत मांडण्याचा कुणालाही अधिकार नाही.
अहवालानुसार, तोशी यांनी सांगितले की, हा व्हिडीओ आमच्या कुटुंबियांच्या व्हॉट्सअप ग्रूपसाठी तयार करण्यात आला होता. क्रिकेटपटूंनी आपली मते मांडण्याच्या आधी विचार करायला हवा होता.
तोशी ने सांगितले की, “विराट कोहली आणि शिखर धवन यांना आमच्याबद्दल काहीच माहित नाही. आमची भाची कशी आहे हे फक्त आम्हालाच माहित आहे, तिचा स्वभावच आहे तो. ही व्हिडीओ काढल्यानंतर लगेचच ती खेळायला निघून गेली. जर तुम्ही तिला सोडून दिलात तर ती म्हणेल की, मी फक्त मस्करी करत होती. तिच्या स्वभावामुळे तिला सोडून दिले तर ती अभ्यासच करणार नाही. ते जे रडणे आहे ते फक्त तेवढ्यापुरते आहे, जेणेकरून तिची आई तिला खेळू देईल. ती फक्त अडीच-तीन वर्षांची लहान मुलगी आहे, तिला काय समजतय.”
त्याचबरोबर ही व्हिडीओ एवढी वायरल होईल असे त्यांना वाटले नव्हते, ते स्वतः सुद्धा त्याबद्दल आश्चर्यचकीत आहेत. तोशी म्हणाले की, “ही व्हिडीओ हयाच्या आईने तयार केली आहे, जेणेकरून ती आपल्या पतीला आणि भावाला ती किती हट्टीपणा करते हे या व्हिडीओमार्फत दाखवू शकेल.”
तोशीने पुढे बोलताना आपले म्हणणे मांडले की, “एका आईच्या ममतेची आपण कोणत्याही गोष्टीशी तुलना करू शकत नाही, कारण एका आईने ९ महिने त्या बाळाला आपल्या पोटामध्ये वाढवलेले असते. माझेही लग्न झाले आहे आणि मलाही एक मुलगा आहे, त्यामुळे मुलांना वाढवणे किती कठीण असते ते मला माहित आहे. कधी-कधी त्यांच्या हट्टी स्वभावामुळे आपल्याला त्यांच्याशी कठोर वागावे लागते. असे न केल्यास त्यांना शिकवण देणे खूप भारी पडेल.”
पण तोशी साहेब जर हा व्हिडिओ तिने केवळ हयाचा अट्टाहास दाखविण्यासाठी काढला होता, तर मग तो सोशल मीडियावर वायरल का झाला, जर तो वायरल झाला नसता तर हयाच्या आईला एवढ्या विरोधाला सामोरे जावे लागले नसते ना…
आणि मंडळी अशा वायरल होणाऱ्या फोटोज किंवा व्हिडीओजवर लगेच विश्वास ठेऊन त्यावर प्रतिक्रिया देण्याआधी त्यामागील सत्य जाणून घ्या आणि त्याहीपेक्षा अश्याप्रकारचे व्हिडिओ ज्यांच्यावर टिका केली जाईल ते वायरल होणारचं नाहीत याचीही काळजी घ्या…
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page