' फेसबुक पोस्टखाली आपलं नाव लिहून “©” चिन्ह टाकल्याने कॉपीराईट मिळतो का? वाचा! – InMarathi

फेसबुक पोस्टखाली आपलं नाव लिहून “©” चिन्ह टाकल्याने कॉपीराईट मिळतो का? वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : श्रीकांत केकरे

===

सर, माझ्याकडे एक फारच छान कहाणी आहे, तुम्ही त्यावर शॉर्टफिल्म कराल?

मी सगळ्यांना सांगत असतो तेच सांगितलं –

स्क्रिप्ट बघितल्याशिवाय सांगता येणार नाही.

त्याला ईमेल दिला आणि सांगितलं माझ्याकडे आत्ता वेळ आहे, लहान कहाणी आहे तर लगेच पाठवली तरी बघता येईल.

नाही, अजून शेवट लिहायचं राहिलं आहे, उद्या सकाळपर्यंत नक्की पाठवतो.

त्याने सांगितलं आणि मी फोन ठेवला. त्या उत्साही मुलाने सांगितल्यासारखंच रात्री तीन वाजता पर्यंत उरलेला भाग लिहून मेल टाकलेली होती. स्क्रिप्ट उघडताच पहिल्या पानावर कहाणीचं नाव आणी © च्या चिन्हापुढे त्याचं नाव दिसलं. पण नंतरची कहाणी ओ. हेनरीची “आफ्टर ट्वेंटी ईयर्स” ह्याचीच मराठी आवृत्ती होती.

पात्र आणि जागा बदलून मुंबईमधल्या ड्रग्ज़ माफियावर आधारित केल्याखेरीज विशेष काहीही बदल नव्हते.

पण त्याच्यावर कॉपीराईटचं चिन्ह लावून पुढे स्वतःचं नाव लिहिल्याने त्याला खरंच कॉपीराईट मिळू शकेल? का एकच गोष्ट दोन लोकांना सुचू शकत नाही? आणि तसं झाल्यास खरा हक्क कोणाचा?

 

copyright01-marathipizza

 

तर त्या मुलाने ह्या कहाणीचा कॉपीराईट मिळवला होता का? अगदी त्याची स्वतःची लिहिलेली कहाणी असल्यासही वर्ड फाईलमध्ये किंवा आपण काढलेल्या कुठल्याशा छान फोटोवर, फेसबुकवर आपली छानशी कविता, लेख लिहून शेवटी © असा कॉपीराईटचं चिन्ह लावून स्वतःचं नाव लिहिल्याने कॉपीराईट ,मिळतं? तर ह्या सगळ्यांचं उत्तर आहे – नाही.

बाकी सगळं ठीक, पण त्याने कॉपीराईट मिळवला नाही हे मी ठामपणे कसं सांगू शकतो? कॉपीराईट कसं मिळवता येतं, त्याआधी हे माहिती असणं गरजेचं आहे कि कॉपीराईट नेमकं असतं काय.

कुठलीही बौद्धिक रचना- लेख, कविता, कहाणी, संगीत, सिनेमा, नाटक, चित्र, फोटोग्राफ, विडियो इत्यादी ह्याप्रकारच्या रचना किंवा कलाकृती जर व्यावसायिकरित्या वापरता येत असतील आणि त्यांनी पैसे कमावता येत असतील तर त्यांना कायद्यात बौद्धिक संपत्ती मानलं जातं.

त्यांचा कुठलाही व्यावसायिक गैरवापर होऊ नये म्हणून जसं आपण इतर प्रकारच्या स्थिरस्थावर संपत्तींवर अधिकृतरीत्या नोंदणी करून संपत्ती आपल्या नावावर करतो, तसंच ह्या संपत्तींचीही नोंदणी होते.

ही नोंद अधिकृत रित्या केली असल्यास त्याला कॉपीराईट किंवा IPR (Intellectual Property Right/बौद्धिक संपत्ती अधिकार) म्हणतात. भारतात कॉपीराईट कायदा १९५७ साली आखला गेला आणि १९५८ पासून अंमलात आला.

तेव्हापासून त्यात अनेकदा गरजेनुसार बदल झालेले आहेत. २०१२ मध्ये फिल्म आणि संगीतही ह्याच्या चौकटीत व्यवस्थित बसवले गेले. २०१२ मध्येच आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारतीयांच्या बौद्धिक संपत्तीचे संरक्षण व्हावे म्हणून भारताने बर्न्स सम्मेलनात आखलेले नियम पत्करले आहेत.

 

copyright02-marathipizza

 

जसं कोणीही व्यक्ती तुमच्या नावावर असलेल्या घरा/दुकानी/जमिनीचं वापर तुम्हाला त्याचं भाडं किंवा खरेदीची किंम्मत दिल्या खेरीज किंवा किमान तुमच्या परवानगी खेरीज वापर करू शकत नाही, अगदी तसंच ह्या बौद्धिक संपत्तीचं ही वापर बिना परवानगी केल्यास कायद्याचा तावडीत सापडण्यासाठी पुरेसं ठरतं.

अचल संपत्तीला जसं भाडेतत्त्वावर, खरेदीकरून, कुठल्या समारंभासाठी मर्यादित वेळेसाठी असे वापरण्यात येतं तसेच वेगवेगळे प्रकार बौद्धिक संपत्तीच्या वापरण्यासाठीही असतात. पण ते सगळं अजून कधी.

तर हा कॉपीराईट मिळवायचा कसा?

कॉपीराईटसाठी भारत सरकार कडून एक ब्यूरो बनवून त्याला रजिस्ट्रार नियुक्त केलेले आहेत. कॉपीराईट मिळवण्यासाठी कॉपीराईट ऑफिसात आपल्या कलाकृतीची एक प्रत जमा करून त्याच्या नोंदणीची फी भरावी लागते. अद्ययावत तंत्रवापरून आपण ही प्रत ऑनलाईनही पाठवू शकता.

त्यानंतर त्या कलाकृतीला एका नोटिसाद्वारे जाहीर केलं जातं आणि साधारण एक महिन्याची मुदत त्यावर आक्षेपासाठी ठेवलेली असते.

जर कुणी आक्षेप घेतलं तर त्या आक्षेपाच्या कॉपीसह आवेदकाला त्या आक्षेपाचा जाब विचारला जातो. शेवटी दोन्ही पक्षांना एकत्र घेऊन एक किंवा गरज असल्यास अधिक सुनावण्या ठेवल्या जातात. हे सगळं कसं विवाद असलेल्या स्थावर संपत्तीच्या हक्कासाठी होणार्या प्रक्रियेसारखंच आहे ना?

 

copyright03-marathipizza

 

मात्र आवेदनाला आक्षेप नसल्यासही एक परीक्षक त्याचं परीक्षण करतो. त्याचाकडे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांचा एका प्रचंड संग्रहात असलेल्या इतर रचनांशी ह्या रचनेची तुलना करून त्याला मूळरचनेचा दर्जा द्यायचं काम असतं.

असे बरेच तज्ज्ञ परीक्षक असतात आणि ते भाषेप्रमाणे नेमले जातात. तुमची रचना मूळरचना असल्याची खात्री झाल्यावर त्याला एक क्रमांक देऊन त्याची नोंदणी होते आणि आवेदकाला त्याचा कॉपीराईट प्राप्त होतो.

पण जर कुठली संपत्ती बेनामी असली तर त्याच्यावर असलेला वाद जसा सोडवला जातो, तसंच जर तुमची कुठली रचना चोरली गेली असेल, तर तुम्ही कॉपीराईटची नोंद नसूनही कोर्टात त्याची तक्रार नक्कीच करू शकता. फक्त ती रचना तुम्हीच लिहिली/तयार केली आहे, ह्याचा विश्वासार्ह आणि भक्कम पुरावा तुमच्याकडे असायला हवा.

कॉपीराईट असल्यास कोर्टात बऱ्याच गोष्टी सोप्या होतात, ती चोरणाऱ्यास आरोपी म्हणून बघितलं जातं. मात्र तसे नसल्यास ती संपत्ती तुमचीच आहे हे सिद्ध होईस्तोवर दोन्ही बाजूंना त्या रचनेचे समान अधिकारी मानून सुनवाई होत असते.

आता कॉपीराईट मिळवण्याची ही प्रक्रिया किचकट असून वेळखाऊ असते. तर नाट्य/सिनेमा/गीत कथा-पटकथालेखकांसाठी एक अजून चांगला पर्याय आहे. ते फिल्म लेखकांच्या फेडरेशनमधे वार्षिक फी भरून सभासद होऊ शकतात आणि त्यानंतर आपल्या रचना तिकडे वेगळी फी भरून रजिस्टर्डही करून घेऊ शकतात. छायाचित्रकार ही त्यांचा फोटोवर मोक्याचा जागेवर वॉटरमार्क टाकून त्याचा गैरवापर काही अंशी थांबवू शकतात.

तर मला ‘आफ्टर ट्वेंटी ईयर्स’ची मराठी आवृत्ती पाठविणाऱ्याने कहाणीच्या शीर्षकापुढे © आणि त्याचे नाव लिहून दिल्याने तीन गोष्टी समोर येतात.

एक : कहाणी त्याची संकल्पना असेल नसेल, पण रात्री तीन वाजता कहाणी लिहून झाल्यानंतर त्याला पाच मिंटात कॉपीराईट मिळणे अशक्य.

दोन : तो इसम खरा व्यावसायिक लेखक नसून त्याचा नुसता आव आणतो आहे. कारण तसं असल्यास त्याला ही माहिती असायला हवी.

आणि तीन : त्याचा सोबत माझे पुढचे व्यवहार करताना तो व्यावसायिक नसल्याने मी त्याचा अल्पानुभवाचा गैरफायदा घेऊन त्याला सहज लुबाडू शकतो. जसं त्याचा कामाची बाजारभावापेक्षा कमी किंमत मोजणे, त्याचा कहाणीचा कॉपीराईट त्याच्या नकळत माझ्या नावावर करणे इ.

 

facebook-marathipizza

 

तर अजून एक महत्त्वाचा सल्ला असा की, तुमची कृती व्यावसायिक रित्या चोरून आर्थिक फायदा घेण्याची शक्यता असल्यास :

१. सर्वात आधी तिला कॉपीराईटचं संरक्षण द्या, किमान रायटर्स असोसिएशनमध्ये सभासद बनून तिला नोंदणीकृत करून घ्या.

२. उगाच लाईक वगैरेच्या मोहात पडून सार्वजनिक रित्या फेसबुक वगैरेवर जाहीर करू नये. लाईकची वास्तविक जगात शून्य किंमत आहे. आणि शेवटची टिप म्हणजे!

३. तसं केल्यास उगाच © वगैरेचे चिन्ह वापरून व्यावसायिक लेखक असल्याचा देखावा करून स्वतःला इतरांकडून लुबाडून घेऊ नये.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?