देशभक्तीची परिसीमा गाठणाऱ्या “त्या” व्हायरल फोटोमागील कटू सत्य…!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
१५ ऑगस्टला आपला भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला म्हणून दरवर्षी आपण हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करतो. राष्ट्रीय सण म्हणून स्वातंत्र्य दिनाचे महत्व अबाधित आहे. यावर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत आणि ध्वजारोहण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने देखील असेच आदेश काढले आणि नेहमीप्रमाणे मुस्लिम मौलवींनी त्याला विरोधही केला. पण यासर्वांना तडा देत यावर्षी सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते एका फोटोने. फेसबुक, व्हॉट्सअपवर हा फोटो प्रत्येक जण शेअर करू लागला.

हा फोटो होता एका सरकारी शाळेत झालेल्या झेंडावंदनाचा. फरक एवढाच, की झेंडा फडकवणारे शिक्षक आणि त्याला सलामी देणारे विद्यार्थी, हे दोघेही छातीएवढ्या पाण्यात उभे होते. कित्येक लोकांनी देशभक्तीचा नमुना म्हणून या फोटोला शेअर आणि लाईक केले. पण या फोटोमध्ये दिसतंय त्यापेक्षा कठीण इथली परिस्थिती आहे. आम्ही आपल्याला याच वायरल होणाऱ्या फोटो मागची कहाणी सांगणार आहोत.
हे छायाचित्र आसामच्या धुबरी जिल्ह्यातील नसकारा प्राथमिक शाळेचं आहे. या फोटोत दिसणाऱ्या त्या शिक्षकाचं नाव आहे मिझानूर रहमान. १५ ऑगस्टला झेंडावंदन झाल्यावर मिझानूर रहमान यांनीच हा फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता. ज्यासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला, पण या दरम्यान मिझानूर रहमान यांना त्यांच्या १८ वर्षीय चुलत भावाला या पुराच्या पाण्यात गमवावे लागले. त्याचे नाव होते रशीदुल इस्लाम. झेंडावंदन झाल्यानंतर काही तासांतच ही दुर्दैवी घटना घडली होती. धुबरी परिसरात आतापर्यंत ३३ लाख लोक पूर ग्रस्त झाले असून यात ३९ लोकांना जीव गमवावा लागला आहे.

यावर्षी सर्व शाळांमध्ये झेंडावंदन करण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यामुळे पूर प्रभावित क्षेत्रात जीवाचा धोका असून देखील या कार्यक्रमाला मुलांना हजर राहावे लागले, त्यामुळे यावेळी इथे शिक्षकांसोबतच विद्यार्थीदेखील उपस्थित होते. या फोटोमध्ये दिसणारे दोन विद्यार्थ्यांना यासाठी निवडण्यात आले होते कारण त्यांना पोहता येत होते. तर त्यांच्यापासून १० मीटरच्या अंतरावर इतर विद्यार्थी राष्ट्रगीत गात होते. पूरपरिस्थिती असताना देखील येथील हे विद्यार्थी आणि शिक्षक त्यांच्या देशभक्तीची परीक्षा देत होते.
रहमान यांनी हा फोटो यासाठी काढला होता कारण त्यांना तो क्लस्टर रिसोर्स सेंटर कोऑर्डिनेटरकडे पाठवायचा होता, जिथून तो ब्लॉक ऑफिसरकडे पाठविण्यात येणार होता. ७ ऑगस्ट ला एक सर्कुलर जारी करण्यात आलं होत, ज्यानुसार सर्व शाळांना स्वातंत्र्य दिनी २०२२ पर्यंत गरिबी, भष्टाचार, आतंकवाद सारख्या सामाजिक दोषांपासून देशाला स्वातंत्र्य करू अशी शपथ घेण्यास सांगण्यात आले होते. म्हणून पूर परिस्थितीतही त्यांना नाईलाजास्तव झेंडावंदनाला हजर राहावे लागले होते…

आता याला देशभक्ती म्हणावी की जबरदस्ती… ? हा लेख वाचल्यानंतर तुमच्याही मनात हाच प्रश्न निर्माण झाला असेल, नाही का…?
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page