' ते शिक्षा देतील, म्हणतील तुझे कवित्व इंद्रायणीत बुडीव : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३४ – InMarathi

ते शिक्षा देतील, म्हणतील तुझे कवित्व इंद्रायणीत बुडीव : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३४

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक :  जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३३

===

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

त्या यज्ञस्थळावरून परत येताना माझेही मन प्रक्षुब्ध झाले होते.

रामभटांनी पुढील दिवशी आपली कथा पुढे सुरू केली.

हा तुकाराम कोण? हा असे का लिहितो? इतके लिहिण्याचे धार्ष्ट्य ह्याच्याकडे आले कुठून? ह्या आणि अशा प्रश्नांनी माझे डोके भंडावून सोडले. त्याला कोणाचा पाठिंबा असेल? कोणाची चिथावणी असेल? हा स्वतःच स्वतःच्या मनाने हा उद्योग करीत असेल की ह्याला कोणी वापरून घेत आहे? असा मी विचारांत गढलेला असताना आणि यज्ञस्थळाहून परत येताना वाटेत देहूचा फाटा लागला. क्षणांत काहीतरी विचार केला आणि सोबतच्या विद्यार्थ्यास लगोलग देहूस धाडला. सांगितले, हा तुकाराम कोण ते शोध आणि बोलावलंय म्हणून सांग. पोहोचेपर्यंत तुला उशीर होईल. तेव्हा तू तिथेच कुण्या ब्राह्मणाचे घर पाहून राहा. मिळेल तशी माहिती काढ आणि परत ये. अशा तऱ्हेने तो मुलगा देहूच्या दिशेने गेला आणि माझ्या मनात विचार आला, ब्राह्मणसमाजाला इतक्या वाईट भाषेत बोल लावणाऱ्या माणसाला आपण काय समजवणार? कसे समजवणार? त्याला आपण नेमके कोणत्या भाषेत सांगायचे की तुझे वर्तन चूक आहे? मी मनात भाषेची जुळवाजुळव करू लागलो. तुकाराम आपल्याकडे आल्यास आपल्याला त्याची चौकशी करायची आहे. ती नेमकी कशी करावी? आधी काय विचारावे? तो काय उत्तर देईल हा प्रश्न माझ्या मनात आला आणि मला जरासे भयच झाले. जर तो म्हणाला, चला माझ्या बरोबर, मी तुम्हाला असे ब्राह्मण दाखवितो की जे लोकांना नाडतात तर मी काय उत्तर देऊ? देवपूजेच्या नावाखाली लुबाडणाऱ्या ब्राह्मणांचे दाखले तो देऊ लागला तर मी पुढे काय बोलू? यज्ञस्थळी झालेली चर्चा तिथे ठीक होती, आता येईल तो प्रसंग कसा असेल? थकून घरी आलो, भोजन वगैरे होऊन रात्री अंथरूणावर पडल्यावर एक चमत्कारिक विचार मनात आला. आज तुकारामाच्या दोन प्रकारच्या रचना आपण ऐकल्या. एका प्रकारच्या रचनांनी ब्राह्मणांना क्षुब्ध केले आणि दुसऱ्यांनी मान खाली घालायला लावली. आपण जर दुसऱ्याच रचना ऐकल्या असत्या तर येईल त्या तुकारामाशी आपण कसे बोललो असतो?
असा विचार करता करता केव्हांतरी उशीरा मला झोप लागली.

————

दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे उठलो, आवरले, वेदपठणाचा वर्ग घेतला. तुकारामाचा विषय मनात बाजूला पडला होता. नेहमीप्रमाणे आनंदात न्याहरीला बसलो तोच लांबून टाळांचा गजर ऐकू येऊ लागला. तो आवाज आमच्याच घराच्या दिशेने सरकत होता. जय जय रामकृष्णहरि, जय हरि विठ्ठल असे शब्दही मग स्पष्ट ऐकू येऊ लागले. आणि एका क्षणी तो आवाज आमच्या अंगणात येऊन उभा राहिला! मी बाहेर जाऊन पाहतो तर तीन चार लोक हातात झांज, चिपळ्या, वीणा घेऊन उभे. एक क्षण माझ्या लक्षात काही आले नाही. वाटले, त्यांना ‘या’ म्हणावे, पाणी विचारावे. आणि तितक्यात लक्षात आले, तुकाराम आलाय! निरोप पोहोचल्या पोहोचल्या आलाय. मला पाहून गजर थांबला. मी सरळच विचारले, तुकाराम कोण तुमच्यांत? माझ्या आवाजात किंचित करडेपणा असावा. पण उत्तर गोड आले,
मी, देवा!

 

तू देहूचा काय?

 

होय देवा.

 

तू कवित्व करतोस काय?

 

काहीच उत्तर आले नाही.

मी विचारले,

 

तुका ह्मणे तुह्मी करा घटपटा । नका जाऊं वाटा आमुचिया,
तुका ह्मणे फळ चिंतिती आदरें । लाघव हे चार शिंदळीचे,
माया ब्रह्म ऐसे ह्मणती धर्मठक । आपणासरिसे लोक नागविले,

 

हे शब्द कोणाचे?

 

उत्तर आले,

जय हरि विठ्ठल!

 

मी पुढे विचारले, ही ब्रह्मनिंदा झाली. ती कुणी केली?

 

पुन्हा उत्तर आले,

जय हरि विठ्ठल!

 

अशी काही प्रश्नोत्तरे झाली. मी काही प्रश्न विचारली आणि त्याला तेच उत्तर येई, जय हरि विठ्ठल! आणि वर झांजेचा एक ठोका! शेवटी माझा संताप अनावर झाला आणि मी विचारले, नक्की आणि शेवटचे सांग – ही कवने तुझी नव्हेत काय?

 

तुकोबांनी मधाळ आवाजात उत्तर दिले,

देवा, रागावू नका. ऐका,

 

बोलिलों जैसें बोलविलें देवें । माझें तुम्हां ठावें जाती कुळ ॥
करा क्षमा कांही नका धरू कोप । संत मायबाप दीनावरि ।।
वाचेचा चालक जाला दावी वर्म । उचित ते धर्म मजपुढें ॥
तुका ह्मणे घडे अपराध नेणता । द्यावा मज आतां ठाव पायीं ।।

हे ऐकून मी म्हटले,

तुझ्याकडून नकळत अपराध झाला म्हणतोस आणि मी कवित्व केले असे काही मान्य करीत नाहीस!

माझे हे बोलणे मध्येच तोडत तुकोबा म्हणाले,

करितों कवित्व म्हणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरीची ॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥
काय मी पामर जाणें अर्थभेद । वदवी गोविंद तेंचि वदे ॥
निमित्त मापासी बैसविलों आहे । मी तो कांहीं नव्हें स्वामिसत्ता ॥

 

तुकोबांचा आवाज ऐकत राहावा असा होता, विनम्रतेने ओथंबलेला होता पण त्याक्षणी मला संतापाची कावीळ झालेली असल्याने ते धवल सूर मला पिवळे वाटू लागले. तुला अर्थभेद कळत नाही? तू तुझ्या जातीकुळाचा दाखला देतोस आणि वेदांतही बोलतोस! काय रे,

 

नभोमय जालें जळ । एकीं सकळ हरपलें,
अग्निमाजी गेले । अग्नी होऊन तें च ठेलें,

 

हे शब्द कोणाचे?

 

पुन्हा उत्तर आले,

जय हरि विठ्ठल!

 

मी म्हटले,

अरे विठ्ठल विठ्ठल काय करतोस? तो का तुझ्या नावाने रचना करतो? सरळ मोकळेपणे सांग तुला वेद वेदांत कुणी शिकविला? तुझा गुरु कोण?

माझा हा प्रश्न ऐकून मात्र येथवर असलेला तुकोबांचा सौम्य चेहेरा वेगळेच तेज धारण करिता झाला आणि माझ्या कानावर शब्द आले,

आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा भगवंत वाचा त्याची ॥
साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥
काय म्यां पामरें बोलावी उत्तरें । परि त्यां विश्वंभरें बोलविले ।।
तुका ह्मणे त्याची कोण जाणे कळा । चालवी पांगळा पायांविण ।।

हे ऐकून माझा संताप अनावर झाला आणि मी कडाडलो,

माझा एकच प्रश्न आहे, तुला वेदांत कुणी शिकविला? कुणीतरी ब्राह्मण फुटीर असल्याखेरीज तुझी वाणी अशी झाली नाही. तू सामान्य कवित्व जरूर करशील पण नासदीय सूक्त तुला कोणीतरी निश्चितच शिकविले असले पाहिजे. मी ते नांव विचारीत आहे. त्याचे उत्तर तू देणार आहेस की नाही?

माझ्या ह्या प्रश्नाला तुकोबांनी उत्तर दिले,

सर्वपक्षीं हरि साहेसखा जाला । ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ।।
सहजचाली चालतां पायवाटे । चिंतामणींसमान होती गोटे ।।
तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरीं वेदांत वाहे पाणी ।।

 

हे ऐकून मी म्हटले,

तुकारामा मी तुझ्यापुढे हात टेकले! तुझ्या घरी वेदांत पाणी भरतो म्हणतोस तू! काय बोलतोस? इतके खरे की तू चतुर निघालास! विठ्ठलाच्या मागे लपलास! तुला ब्रह्मनिंदा करायला आणि अशी लपवाछपवी करायला भीती कशी वाटत नाही?

तुकोबा उत्तरले,

आह्मां शरणागतां । एवढी काय करणे चिंता ।।
परि हे कौतुकाचे खेळ । अवघे पाहतो सकळ ।।
अभयदानवृंदें । आह्मां कैंचीं भयद्वंदें ।।
तुका ह्मणे आह्मी । हरिजन साधनाचे स्वामी ।।

हे सारे पाहून माझ्या लक्षात आले, तुकाराम हा सहज मागे हटणारा मनुष्य नव्हे. त्याला थोडा धाक घातला पाहिजे. म्हणून मी किंचित समजावणीच्या आणि किंचित धाकाच्या स्वरात म्हटले,

तुकारामा, तुझे हे बोलणे कुण्या ब्राह्मणाला पटायचे नाही. अवघा ब्रह्मवृंद तुझ्यावर खवळलेला आहे. तरी तू आपली चूक कबूल कर आणि यापुढे ब्रह्मनिंदा होणार नाही असे बघ.

इतके म्हणून मी एक क्षण थांबलो, तुकोबांच्या चेहेऱ्यावरील रेषाही हलली नव्हती, ते पाहून म्हणालो,

आणि हे जर तुला मान्य नसेल तर धर्मपीठ तुला शासन करील. ते भोग.

इतके ऐकल्यावर तुकोबा दोन शब्द बोलले, म्हणाले,

जे मी बोललो ते तुम्ही धर्मसभेला सांगा. त्यांचे जे उत्तर येईल ते मला सांगा. मी विठ्ठलाचा दास आहे आणि त्याच्या इच्छेनेच सारे घडते यावर माझा नितांत विश्वास आहे. जी येईल ती आज्ञा मी त्याची म्हणून स्वीकारेन.

 

सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोंवरी हा प्राण जाय त्याचा ।।
आणिकांचा धाक न धरावा मनीं । निरोपावचनीं टळों नये ।।
समय सांभाळूनि आगळें उत्तर । द्यावें भेदी वज्र तयापरी ।।
तुका ह्मणे तरी ह्मणवावे सेवक । खादले ते अन्न हक होय ।।

 

तुकोबांचे हे बोलणे ऐकून माझा सूर एकदम खाली आला. मी म्हटले,

कशाला हा हट्ट? माघार घ्यावी हे बरे. ती मंडळी प्रक्षुब्ध आहेत आणि तुझ्या हातून खरेच ब्रह्मनिंदा झालेली आहे. वाद वाढवू नये. वाढविला तर काही शिक्षा देतील. म्हणतील, तुझे कवित्व इंद्रायणीत बुडीव! बरे होईल का ते?

माझे हे बोलणे ऐकताच तुकोबा उत्तरले,

देवा, आता अजून बोलू नका, अजून विचारू नका. तुमचे बोलणे हीच मी आज्ञा समजतो. तुमच्या मुखातून माझा स्वामीच बोलला!

 

नये पुसों आज्ञा केली एकसरें । आह्मांसी दुसरें नाही आता ।।
ज्याचे तो बळिवंत सर्व निवारिता । आह्मां काय चिंता करणें लागे ।।
बुद्धीचा जनिता विश्वाचा व्यापक । काय नाही एक अंगी तया ।।
तुका ह्मणे मज होईल वारिता । तरी काय सत्ता नाही हातीं ।।

तुकोबा काय म्हणत आहेत हे माझ्या लक्षात येण्याच्या आत ती मंडळी जय हरि विठ्ठल करीत निघून गेली सुद्धा!

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?