आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
राजकारण्यांकडून होणारे घोटाळे आपल्या सर्वांसाठी काही नवीन नाहीत. आपण दररोजचं लहान-मोठ्या घोटाळ्यांच्या वार्ता ऐकत असतो. काहींचे आरोप सिद्ध होतात तर काहींचे होत नाहीत .मोठमोठ्या लोकांची नावे तर समोर येतात, पण पुराव्यांअभावी त्यांच्यावर काहीही कारवाई करता येत नाही. कोळसा-गेट, २ जी, बोफोर्स, व्यापम इत्यादी घोटाळे यथार्थपणे मोठे नक्कीच आहेत .पण काही असेही घोटाळे आहेत, जे खूप लक्षवेधी आहेत. १९७१ मध्ये झालेला नगरवाला घोटाळ्यामध्ये एका व्यक्तीने इंदिरा गांधींच्या आवाजाची नक्कल करून एसबीआय (स्टेट बँक ऑफ इंडिया) मधून ६० लाख रुपये हडप केले होते.
२१ मे १९७१ मध्ये जेव्हा बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारत-पाकिस्तान युद्ध झाले होते, तेव्हा रुस्तम सोहराब नगरवाला याने स्टेट बँक ऑफ इंडियामधील वेदप्रकाश मल्होत्रा याला फोन केला आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आवाजाचे अनुकरण करून नगरवाला याने पंतप्रधानाना तातडीने ६० लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले.
इतकी मोठी रक्कम काढून घेण्यासाठी नगरवाला याने नेमके बँकेला काय सांगितले असेल, याबद्दल अनेक माध्यमांचा वेगवेगळा अंदाज आहे. काहीजण म्हणतात की, पंतप्रधानांना “बांगलादेशच्या गुप्त मोहिमेसाठी” पैशांची आवश्यकता होती असे त्याने सांगितले, तर काहींचा असा दावा आहे की, “बांगलादेशच्या लोकांनी पैशांची विनंती केली होती” असे कारण त्याने पुढे केले.
नगरवाला यांना प्रश्न केल्यावर, त्यांनी इंदिराजींच्या आवाजात सांगितले की, “ही महान राष्ट्राची महत्त्वपूर्ण बाब आहे”. नगरवाला याने बँकेच्या व्यवस्थापकाला अजून सांगितले की, या पैशांची पोचपावती गोळा करण्यासाठी तुम्ही पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधू शकता. त्यावर बँकेच्या व्यवस्थापकाला खात्री पटली की पंतप्रधानच आपल्याशी बोलत आहेत. मल्होत्रा पैसे देण्यासाठी तयार झाले. त्यांनी सर्व पैसे नगरवाला यांच्याकडे पोहचवले. नगरवाला याने पंतप्रधानांच्या वतीने पैशांचे कुरियर स्वीकारल्याचा अभिनय केला.
त्यानंतर मल्होत्रा जेव्हा पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये पैसे घेतलेल्याची पावती मागण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना समजले की ,पंतप्रधानांनी अशी कोणतीही रक्कम काढण्यासाठी फोन केलेला नव्हता. मल्होत्रा यांनी तातडीने पोलिसांना झालेली संपूर्ण घटना सांगितली. पोलिसांनी थोडा सुद्धा उशीर न करता, यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. एका दिवसापेक्षा कमी कालावधीमध्ये पोलिसांनी नगरवाला याला विमानतळावरून अटक केली. त्यावेळी नगरवाला देश सोडून जाण्याच्या तयारीमध्ये होता. त्याच्याकडून बहुतेक पैसा वसूल केला गेला आणि त्याला ४ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
नगरवालाने २६ मे १९७१ मध्ये १० मिनटांच्या झालेल्या सेशनमध्ये स्वतःवर असलेला आरोप कबूल केला. १९७८ मध्ये पी. जगन मोहन रेड्डी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाच्या अहवालानुसार, या आयोगाने नगरवालाने दिलेली कबुली नाकारली होती, कारण कोणत्याही पुराव्याने त्याच्यावरील आरोप हे सिद्ध होत नव्हते. जेलमध्ये लिहिलेल्या एका पत्रामध्ये नगरवालाने दावा केला होता की, मी केलेल्या गुन्ह्यामागील सत्य सांगू इच्छित आहे आणि त्यामुळे “राष्ट्राचे डोळे उघडले जातील”. पण काही सांगण्याच्या अगोदरच नगरवाला यांचा हृदयविकाराच्या झटक्याने तुरुंगातच मृत्यू झाला.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page