आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
राजेशाही… हा शब्द आपल्या जवळचाच, कारण आपल्या देशातही पूर्वी राजेशाहीच होती आणि त्यानंतर इंग्रजांची हुकूमशाही, पण आपण या हुकूमशाहीतून मुक्त झालो….स्वतंत्र झालो आता.
पण या जगात अजूनही काही राष्ट्रे अशी आहेत जिथे आजही राजांची राजेशाही चालते. या राष्ट्रांत अजूनही शासक हा राजा आहे. भलेही या राष्ट्रांचे व्यवहार हे कायदेशीर आणि संविधानिक पद्धतीनेच चालत असलेत तरीदेखील यांच्यावर राजाचाच अधिकार आहे.
आज आम्ही तुम्हाला माहित नसलेल्या अशाच काही राष्ट्रांची माहिती घेऊन आलो आहोत…
१. बहारीन (Bahrain)
बहारीन हे पेर्शिअन गल्फ मधील छोटसं द्वीपराष्ट्र आहे. या देशावर शेख हमद-इब्न-इसा-अल खलिफा याच राज्य आहे. ते २००२ मध्ये या देशाचे राजा झाले. ते १९९९ पासून राज्य करत आले आहेत. त्यांचे काका खलिफा-बिन-सलमान-अल खलिफा हे १९७० सालापासून बहारीन देशाचे पंतप्रधान आहेत, ते सध्या जगातील सर्वात जास्त काळापर्यंत असलेले पंतप्रधान आहेत.
येथे विधानमंडळाचे दोन सभागृह आहेत, त्यापैकी एका सभागृहातील सदस्य हे लोकांद्वारे निवडून दिले जातात तर दुसऱ्या सभागृहातील सदस्य राजा नियुक्त करतो. शासनाने अंमलात आणलेल्या कुठल्याही कायद्याला फेटाळून लावण्याचा अधिकार हा राजाला असतो.
२. भूतान (Bhutan)
भूतान हा देश आपल्या अगदी जवळचा. पण इथे देखील राजेशाहीच चालते. भूतानचा सध्याचा राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी २००६ मध्ये शासन करण्यास सुरुवात केली.
ते वांगचुक कुटुंबाचाचे आहेत, ज्यांनी २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून भुतानवर राज्य केले आहे. वांगचुक यांनी नाटकीय लोकशाही सुधारांची देखरेख केली आहे, जी त्यांच्या वडिलांनी सुरु केली होती.
गेल्या काही वर्षांमध्ये भूतान एक संपूर्ण राजेशाहीपासून एक संविधानिक राजेशाही राष्ट्र म्हणून परावर्तीत झाले आहे, जिथे लोकांनी निवडलेलं विधानमंडळ आहे. वांगचुक हे एक लोकप्रिय राजे आहेत.
२०११ साली झालेला त्यांचा लग्न सोहळा हा मीडियात खूप चर्चिला गेला. गरीब शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता ते नेहमीच दुर्गम गावांना भेट देत असतात.
या जनसंपर्क कार्यांसोबतच, भूतानमधील नवीन संविधानाने त्यांना संसदेने मंजूर केलेले कायदे नाकारण्याचा तसेच देशाच्या न्यायव्यवस्थेसाठी सदस्यांचे वैयक्तिकरित्या नियुक्ती करण्याचे अधिकार दिलेले आहेत.
३. ब्रुनेई (Brunei)
बोर्नियो बेटाच्या उत्तरी किनाऱ्यावर वसलेला “ब्रुनेई” हा एक छोटासा देश आहे. इथे आजही राजेशाही चालते. या देशावर राज्य करणाऱ्या राजाला सुलतान म्हणतात. हसन-अल-बोलकिया हे या देशाचे सुलतान आहेत.
ते एका राजेशाही घराण्यातून आहेत. जरी या देशात त्यांचं स्वतःच संविधान आणि काही लोकांनी निवडून दिलेलं विधान मंडळ असेल तरीदेखील बोलकिया हेच राज्याचे प्रमुख आणि देशाचे पंतप्रधान आहेत.
त्यांच्याकडे देशातील राजकीय सत्ता असल्याने ते देशासाठी कुठलाही निर्णय घेऊ शकतात. हसन-अल-बोलकिया हे त्यांच्या राजेशाही थाटासाठी देखील खूप प्रसिद्ध आहेत.
४. लिकटेंस्टीन (Liechtenstein)
मोनाकोचे प्रिन्स अल्बर्ट यांच्याबरोबरच लिकटेंस्टीनचे प्रिन्स हान्स-अॅडम दुसरे हे वास्तविक राजकीय सत्ता मिळविणारे युरोपमधील शेवटच्या उर्वरित सम्राटांपैकी एक आहे. त्यांच्याकडे नियमांना नाकारण्याचा तसेच न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार आहे.
हान्स-अॅडम दुसरे यांचा मुलगा प्रिन्स अलॉईस हे शासनाची रोजची कामे हाताळतात. भलेही यांना लोकांनी निवडून दिलेले नाही तरीदेखील या पिता-पुत्रांची जोडी लिकटेंस्टीनच्या जनतेमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.
५. मोनॅको (Monaco)
क्षेत्रफळानुसार पृथ्वीवरील मोनॅको हे दुसरे सर्वात लहान स्वतंत्र राष्ट्र आहे. त्याचा शासक प्रिन्स अल्बर्ट दुसरा हा राज्याचा प्रमुख आहे आणि त्याच्याकडे महत्त्वपूर्ण अशी राजकीय ताकद आहे.
अल्बर्ट हा ग्रिमाल्डी हाऊसचा एक सदस्य आहे, ज्यांनी शतकानुशतके मोनॅकोवर शासन केलं आणि करत आहे. इथे प्रत्येक नवीन कायद्यासाठी राजा जबाबदार असतो, ज्यानंतर ते कायदे येथील नॅशनल कौन्सिल मंजूर करते. अल्बर्टकडे मोनॅकोच्या न्यायिक शाखेचा ताबा आहे.
६.ओमान (Oman)
अरबी द्वीपसमूहातील राजेशाही असणार हे आणखी एक राष्ट्र. ओमानवर १९७० पासून कबाओस बिन-सईद-अल सईद राज्य करत आला आहे. नुकतेच, सुलतान कबाओसने राजकीय सुधारणा घडवून आणली आणि पहिल्यांदाच संसदीय निवडणुकीची परवानगी दिली.
परिपूर्ण राजेशाही असूनही, ओमान सुलतानच्या अधिपत्याखाली समृद्धीचा अनुभव घेत आहे. या देशाला अन्य अरेबियन प्रायद्वीप राष्ट्रांपेक्षा अधिक खुले व उदारमतवादी विचारांचे मानले जाते. येथे आरोग्यसेवा आणि शिक्षण हे सरकारी खर्चाचा एक प्रमुख अंग आहेत.
७. सौदी अरेबिया (Saudi Arabia)
सौदी अरेबिया हा देश जगातील सर्वात सुप्रसिद्ध परिपूर्ण राजसत्तांपैकी एक आहे. राजा अब्दुल्ला (अब्दुल्ला बिन अब्दुल अझिझ अल सऊद) हे २००५ मध्ये त्यांचे सावत्र भाऊ राजा फहाद यांच्या मृत्यूनंतर सत्तेवर आले.
१९२० च्या दशकाच्या सुरुवातीपासूनचं सर्व राज्यकर्ते ते सौदी घराण्यातूनच आले असले, तरी या घराण्याने त्यापूर्वी कित्येक वर्षांपासून अरबी द्वीपसमूहांच्या बऱ्याच भागांवर राज्य करत आले आहेत.
सऊदी शाही वारसा हा ज्येष्ठतेवर आधारित आहे, परंतु सऊदी अधिकाऱ्यांची एक समिती एखाद्या सक्षम नेत्याला निवडून त्याला हा वारसा सुपूर्द करू शकतात.
८. स्वाझीलँड (Swaziland)
स्वाझीलँड, दक्षिण आफ्रिका आणि मोझांबिक यांच्यातील एक लहान राष्ट्र आहे. मस्वाती तिसरा हे येथील राजा आहेत, त्याच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी इथला राजकारभार सांभाळला, तेव्हा ते केवळ १८ होते.
मस्वाती हे त्यांच्या लॅव्हिश लाईफस्टाईल आणि त्यांच्या अनेक पत्नींसाठी प्रसिद्ध आहेत, त्यांना १५ बायका आहेत. आपल्या देशात लोकशाहीचा स्तर वाढविण्यासाठी त्यांनी काही पावले उचलली असली, तरी स्वाझीज आणि मानवाधिकार संरक्षण गटातील अॅम्नेस्टी इंटरनॅशनलसारख्या गटांनी यात सुधारणांच्या संधीचा अभाव असल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली आहे. मस्वाती हे स्वतः देशातील खासदारांना नियुक्त करतात.
९. व्हॅटिकन सिटी (Vatican City)
जगातील सर्वात लहान स्वतंत्र राज्य व्हॅटिकन सिटी हे तांत्रिकदृष्ट्या एक परिपूर्ण राजेशाही असलेलं राष्ट्र आहे. ही एक आश्चर्याची बाब आहे की, इथे ‘पर्यायी राजेशाही’ आहे.
इथल्या कार्डिनल्स महाविद्यालयाने पोप यांना आपला राजा म्हणून निवडलं असून सध्या पोप फ्रान्सिस हे जगातील सर्व रोमन कॅथलिक चर्चवर राज्य करतात, तसेच ते व्हॅटिकन सिटीचेही राज्यकर्ते आहेत.
जरी त्यांना कार्डिनल्स महाविद्यालयाने देशाचा कारभार पाहण्यासाठी नियुक्त केले असले तरी त्यांना त्यांच्या ऑफिस मधून कुणालाही बडतर्फ करण्याचा अधिकार आहे, तसेच व्हॅटिकन सिटीचा कुठलाही कायदा बदलण्याचाही त्यांना अधिकार आहे.
१०. संयुक्त अरब एमिरेट्स (United Arab Emirates)
संयुक्त अरब एमिरेट्स हा सात वेगवेगळ्या राज्यांचा महासंघ आहे, या प्रत्येक राज्यांत त्यांचा शासक आहे. दुबई आणि अबु धाबी ही राज्ये
एमिरेट्सपैकी सर्वात सुप्रसिद्ध आहेत.
हे सर्व सात राज्यकर्ते फेडरल सुप्रीम कौन्सिलचे सदस्य असतात, या कौन्सिलद्वारे प्रभावीपणे, देशाच्या सर्व ऑपरेशनची देखरेख केली जाते. या गटाद्वारे मंत्री, सल्लागार आणि ४० सदस्यीय राष्ट्रीय परिषदेतील २० सदस्य नियुक्त केले जातात.
इतर २० प्रतिनिधी हे निवडणुकीद्वारे निवडून येतात, परंतु ही निवडणुक लोकक्रियेनुसार नाही, तर मतदार सदस्यांच्या गटाद्वारे होत असते. दुबई आणि अबु धाबी आणि इतर एमिरेट्स हे जलदगतीने होणाऱ्या आधुनिकीकरणासाठी प्रसिध्द आहेत.
तर ही होती अशी काही राष्ट्रे जिथे आजही राजेशाही चालते…
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.