आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
===
आपण इकडे भारतात एनएसजी व इतर बाबींमध्ये गुंतलेले असताना आपले पश्चिमेकडील दोन शेजारी यांच्यात सिमेवर एक गेट बसविण्यावरुन गोळ्यांचे अदानप्रदान होऊन दोन्हीही बाजूकडील काही सैनिक मारले गेले आहेत.
अफगाणिस्तान व पाकिस्तान या देशांतील सिमारेषेला ड्युरंड लाईन म्हणून ओळखले जाते. अफगाणिस्तानातील आतापर्यंत आलेल्या कुठल्याही सत्ताधार्याने या सिमारेषेस मान्यता दिलेली नाही.
भारताची फाळणी झाल्यानंतर तत्कालीन ब्रिटिश भारतातून पाकिस्तानी भुभाग वेगळा झाल्यानंतर अफगाणिस्तानने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला प्रवेश देऊ नये अशी भुमिका घेतली होती.
खैबर पख्तुन ख्वा हा सध्याच्या पाकिस्तानातील कबाईली भाग हा आपला असून ब्रिटिशांनी तो जबरदस्तीने तेव्हा घेतला होता असा त्यांचा दावा आहे. या ड्युरंड लाईनवर आठ गेट आहेत. तसेच ही एक खुली सिमा आहे – दोन्हीही बाजुकडील कबाईली लोक परस्परांशी जोडलेले असल्यामुळे हजारो वर्षापासून ऐकमेकांकडे जात आहेत.
त्यांच्या दळणवळणात अडथळा आणण्याचे प्रयत्न आतापर्यंत तरी झालेले नव्हते. पण पेशावर येथील सैनिक स्कुल, बाचा खान युनिवर्सिटी येथे दहशतवादी हल्ले करणारे दहशतवादी ह्याच रस्त्याने पाकिस्तानात आले असे तपासात सिद्ध झाल्यानंतर पाकिस्तानने येथील वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी तोरखम येथे एक गेट उभारण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार पाकिस्तानने निर्मिती सुरू करताच अफगाणिस्तानने यास विरोध केला. तरीदेखील काम सुरू पाहून त्यांनी तिथे गोळीबार केला. यानंतर इकडूनही उत्तर दिले गेले. ह्या बाचाबाचीत पाकिस्तानचा मेजर जवाद चंगेझी मृत्युमुखी पडला.
सध्या या दोन देशांतील संबंधात कमालीचा तणाव आहे.
अफगाणिस्तान हा पूर्णपणे लँन्डलॉंक देश आहे – म्हणजे त्याच्या चारही बाजुला जमीन आहे. त्याची सिमा कुठल्याही समुद्रास लागत नाही, त्यामुळे सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारासाठी तो पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून आहे. पाकिस्तानच्या कराची बंदरातून आलेला माल पुढे पेशावर, तेथून पुढे तोरखम येथून अफगाणिस्तानातील जलालाबाद व पुढे काबुलला पोहचतो.
भारताने झारंज -देलराम – जो की इराणच्या चाबहारमार्फत आलेला माल अफगाणिस्तानात पोहचवणारा पर्यायी रस्ता बांधलाय खरा – परंतु अफगाणिस्तानचा जास्त व्यापार पाकिस्तान मार्फतच होतो.
अफगाणिस्तानात पाकिस्तान तालिबान यांना मदत करतो. बहुसंख्य तालीबानी नेत्यांची घरे व परिवार पाकिस्तानातील चमन याठिकाणी आहेत. मुल्ला मंसूर, मुल्ला ओमर व अनेक महत्त्वाचे तालिबानी नेते एकतर पाकिस्तानात मारले किंवा पकडले गेलेले आहेत. भारत अफगाणिस्तानात नार्दन अलायंन्स यांना मदत करतो. जो की तालीबान विरोधी गट आहे. ऐंशीच्या दशकात भारत, इराण, रशिया नार्दन अलायन्संला व अमेरिका, नाटो व पाकिस्तान तालीबान यांना मदत करत असत.
अफगाणिस्तान स्थिर झाला तर आपल्यावर ड्युरंड लाईनचा विवाद सोडविण्यासाठी दबाव टाकेल, पख्तुनीस्तानशी मागणी पुन्हा डोके वर काढेल म्हणून पाकिस्तानने हा देश नेहमीच अस्थिर राहील याची काळजी घेतलेली आहे.
बीबीसीला दिलेल्या मुलाखातीत अफगाणिस्तानचे पूर्व राष्ट्रपती हमीद करझाई यांनी, जनरल मुशर्रफ यांनी आपल्याला खाजगीत ड्युरंड लाईनीस मान्यता देण्याची विनंती केली असल्याचे सांगितले आहे. त्यापुढे जाऊन अफगाणिस्तानात अस्थिरता माजवून या रेषेला मान्यता मिळविण्याचा पाकिस्तानचा कावा असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
भारत, इराण, रशिया, अमेरिका, चीन व पाकिस्तान या सर्व देशाच्या गुप्तहेर संस्था या देशात पूर्णपणे कार्यरत असून प्रत्येकाने तिथे आपापले पाठिराखे तयार केले आहेत. ह्यात कुणाची सरशी होते – किंवा हा देश अनंतकाळासाठी असाच अस्थिर राहतो की काय – अशी भिती आहे. ह्याचा परिणाम मात्र सर्वसामान्य अफगाण लोकांना भोगावे लागत आहेत.
एकट्या पाकिस्तानात तीस लाख अफगाण निर्वासित आहेत. त्यांनाही हाकलून देण्याची मागणी तिथे वाढत आहे. यातून अस्थिरतेत अजूनच वाढ होण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तानचा गुंता दिवसेंदिवस वाढत जातोय हा तिढा इतक्यात सुटण्याची तिळमात्रही संभावना दिसत नाही.
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.