आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
अहमद पटेलांचा विजय झाल्यापासून देशभरातल्या पुरोगाम्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. कारण राजकीयदृष्ट्या डोळ्यात मावेनासे झालेले भाजप अध्यक्ष अमित शाह ज्या पद्धतीने त्यांच्या मागे लागून होते त्यावरून अहमद पटेलांना रात्रीची झोप महाग झाली होती हे स्पष्ट कळत होतं.
अमित शाह यांच्यासाठी ही लढाई जीवन-मरणाची झाली होती. त्यात अनेकांना शाह यांची चूक झाल्यासारखे वाटेल तर काहींना शहांनी हिशोब चुकते केल्याचं वाटेल. सगळ्या घडामोडींवरून गेल्या काही आठवड्यात दोन अश्या घटना घडल्या की ज्यावरून भाजप विरोधकांचा थयथयाट बघण्यासारखा ठरला.
सगळ्यात आधी देशांतर्गत राजकारण.
अमित शहांनी ज्या पद्धतीने अहमद पटेलांना पळता भुई थोडी केली त्यावरून अनेकांना भाजपने अनैतिक मार्गाने व्यवस्था राबवल्याचा वगैरे साक्षात्कार झाला. रणदीप सुरजेवाला तर “गांधीजीके देश मे”च्या चिपळ्या घेऊन बसले होते. प्रत्यक्षात अमित शाह यांना कोणते हिशोब चुकते करून घ्यायचे होते?
ती इशरत जहाँ आठवते काय?
एक लक्षात घ्यायला हवं की इशरत जहाँ ही मुलगी दहशतवादी होती याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. पण त्याहीबरोबर हेही बघायला हवं की इशरत जहाँ ज्या लोकांबरोबर मारली गेली त्यांच्या दहशतवादी असण्याचे मात्र पुरावे सापडलेले आहेत. त्याचबरोबर इशरत जहाँ त्यांच्यात कशी आली? जिवंतपणे सामील झाली की तिला मारून आणली गेली याबद्दल पोलिसांनी जो अहवाल तयार केला त्यापलीकडे एकही विश्वसनीय सिद्धांत तयार झालेला नाही. म्हणजे पोलिसांनी मांडलेला अहवाल मंजूर नाही आणि त्याविरुद्ध सिद्ध करण्याजोगं काही म्हणणंच नाही, असं चालत नसतं हे इशरत प्रेमींना (त्यात नव घरवापसीवाले नितीश कुमारही आले) वेगळं सांगायला हवं काय? थोडक्यात –
ती दहशतवादी नव्हती, हे म्हणणं रेटायचं – त्याचवेळी शोधाशोध करून तिच्या निरागस असण्याचा कोणताही पुरावा मात्र द्यायचा नाही – ह्यालाच पुरोगामी राजकारण म्हणतात.
इशरत जहाँ प्रकरणी आयबीच्या अधिकाऱ्यांना कसं छळलं गेलं, अगदी सिगारेटचे चटके दिले गेले याचा रीतसर वृत्तांत प्रसिद्ध झाला आहे. “इशरत जहाँ प्रकरणी जे पाहिलं प्रतिज्ञापत्र आलं त्यावर मी काही बोलणार नाही कारण ते मी बघितलं नव्हतं,” अशी थाप पी. चिदंबरम यांनी मांडली. प्रत्यक्षात पाहिल्याही प्रतिज्ञापत्रावर त्यांची सही असल्याचं उघड झालं आणि बदलेल्या प्रतिज्ञापत्रावरही त्यांनीच सही केली हे उघड झालं.
जबरदस्तीने इशरत जहाँ निरागस ठरवली गेली आणि तिच्या खुनाचा ठपका तत्कालीन गुजरात गृहमंत्र्यांवर म्हणजेच अमित शहांवर लावला गेला. पुढे सोहराबुद्दीन नावाच्या एका गँगस्टरला मारल्याबद्दल गृहमंत्र्याला तडीपारीची शिक्षा दिली जाण्याचा प्रसंग गांधीजींच्या देशात घडला.
तडीपारीची शिक्षा देणारे न्यायाधीश कोण बरे? हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांची कन्या. म्हणजे भारतीय संविधानाच्या कलम ५० (न्यायपालिका आणि कार्यकारीमंडळ यांच्यात फारकत) चा मस्तपैकी कोथळा बाहेर काढला गेला तोही गांधीजींच्याच देशात. कायमस्वरूपी अमित शहांच्या राजकीय कारकिर्दीवर काळा डाग आला. तडीपारीचा शिक्का बसला. हे सगळं घडलं निव्वळ नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या द्वेषापायी.
आणि ह्या सर्व आरोपांतून अमित शहा निर्दोष सुटले.
आज फासा पलटलेला आहे. आज सीबीआय, आयकर विभाग सारख्या व्यवस्था मोदी आणि अमित शहांच्या सांगण्यावरून विरोधकांच्या मागे लागल्या आहेत. दहा वर्षे या संस्थांना सरकारकडून वापरलं गेलं, आता “ज्याचे हाती सरकारची दोरी तो सीबीआयने विरोधकांते उद्धारी” हा काळ आहे. जुने हिशोब चुकते होणारच. “परंतु आपणही असं केलं, तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय राहिला?” असा प्रश्न पाडून घ्यायला हा देश गांधीजींचा थोडीच राहिलाय. आणि भाजप तरी कुठे वाजपेयी अडवाणींचा राहिलाय?
देशपातळीवरच्या घाणेरड्या राजकारणातून थोडं आंतरराष्ट्रीय राजकारणात डोकावू.
डोकलाम भागात चीनने घुसखोरी केली. जगाची डोकेदुखी झालेला आहे हा देश. चीनचे सौहार्दपूर्ण संबंध नक्की कोणत्या देशाशी आहेत हे भिंग लावूनही दिसणार नाही. त्यातच भूतान आणि सिक्कीम मधल्या अत्यंत चिंचोळ्या जागेवर चीनने आपला दावा मजबूत करायला घेतलाय. त्यात त्यांना थोडी भूतानची जागा हवी आहे. भारताचा याला कडाडून विरोध आहे आणि त्या जागेवरच्या चिनी अतिक्रमणाला हटकायला भारतीय सैन्य तिकडे जाऊन पोहोचलं म्हटल्यावर अनेकांच्या पोटात आलाय.
भारत आणि चीनमध्ये सीमा रेषेवरून वाद आहेत. इतकी वर्षे हा वाद का नाही सुटला, याला भारतीय पवित्रा जबाबदार नाहीच. भारताने नेमस्त धोरण स्वीकारून दोन पावलं मागे यायचं म्हटलं तर चीन बोट पकडतो सांगून हात पकडणारा देश आहे. आणि चीनचे प्रत्येक देशाबरोबर वाद आहेत. चीनच्या विस्तारवादाची त्याच्या प्रत्येक शेजाऱ्याला भीती वाटते.
भारतातल्या पुरोगाम्यांना मात्र याला जबादार सध्याचं सरकार आणि त्याआधी विरोधात असलेले पक्ष वाटतायत. आपल्या विचारसरणीपायी देशाच्या मुळावर उठलेल्या राष्ट्रासमोर लोटांगण घालणारे विरोधी विचारवंत या देशात आहेत.
या लोकांना डोकलाम भाग चीन आणि भूतानमधली अंतर्गत समस्या वाटत्ये. भूतानने चीनला जागा दिली असती तर बदल्यात चीन भूतानला त्याच्या चौपट जागा देण्यास तयार होता, त्यांच्यातल्या व्यवहारामध्ये आपल्याला नाक खुपसायची गरजच नव्हती, असं लॉजिक मांडणं चालू आहे.
अरे राष्ट्रहीत वगैरे काही मानता की नाही? त्या जागेत चीनला हवं ते करायला मोकळीक मिळाली तर आपला ईशान्य भारताकडे जाण्याचा मार्ग बंद होऊ शकतो, किमान शत्रूच्या टप्प्यात सहज येऊ शकतो. हे लक्षातच घ्यायचं नाहीये काय? आणि चीन भूतानमधील अंतर्गत मामला हे काय लावलंय?
उद्या भारताने अंतर्गत मामला म्हणून आपल्याच डोक्यावर अणुबॉंब फोडायला घेतला तर बाकीच्या देशांना काहीच फरक पडणार नाहीये काय?
हे फरक पडणं म्हणजेच राष्ट्रहिताला बाधा पोहोचणं असतं. पण विचारसरणीच्या प्रेमापुढे राष्ट्र वगैरे गोष्टी तुच्छ मानायचा जो अहंकार आहे तो वाईट आहे.
भारतातला उरला सुरला विरोधी पक्ष संपवतील हे भाजपचे हस्तक.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.