राहुल गांधींची असंवेदनशीलता दाखवून देणे म्हणजे त्यांची टिंगल टवाळी नव्हे!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
राहुल गांधींनी कॅप्टन अमरिंदसिंग यांची त्यांच्या आईचे निधन झाल्यानिमित्ताने दुखवट्याची भेट घेतली. भेटीचा फोटो मी फेसबुकवर शेअर केला. सदर भेटीमध्ये दोन फोटो आले आणि दोन्ही फोटोंमध्ये राहुल गांधी यांनी आपल्या मुखावरचे हसू अजिबात लपवले नव्हते. अनेकांना माझं हे फोटो टाकण्याचं कृत्य आवडलं नाही.
या फोटोचा सोर्स कॅप्टन अमरिंदर सिंगांच्या ट्विटरवरच होता, तेव्हा हा फोटोशॉप नव्हता. सदर ट्विटचा स्क्रिनशॉट पुढे देतो आहे :
आता या फोटोपोस्टमागची माझी भूमिका स्पष्ट करतो. या फोटोपोस्टमागे राहुल गांधींची व्यक्तिगत हेटाळणी कोणाला वाटत असेल तर त्याला माझी काही हरकत नाही. पण त्याहीआधी एक नेता म्हणून राहुल गांधींना काही एटीकेट्स सांगण्याचा माझ्यासारख्या सामान्य माणसाला अधिकार आहे असं मी मानतो. राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांचा पक्ष राष्ट्रीय नव्हे तर खऱ्या अर्थाने राष्ट्रव्यापी आहे. आणि अश्या पक्षाचं नेतृत्व करताना काही पथ्य त्यांना जरूर पाळावी लागतील असं माझं मतदार म्हणून मत आहे.
इमेज बिल्डिंग नावाचा एक प्रकार असतो. जो प्रत्येक राजकारण्याला करावा लागतो. राजकारण ही साध्या सरळ शब्दात जनसेवेची दुकानदारी असते. इथे तुम्ही स्वतःला लोकांसमोर कसं मांडता ह्यावर असंख्य गोष्टी अवलंबून आहेत. राहुल गांधींच्या आजींना ह्या गोष्टी अफाट जमायच्या.
हेन्री किसिंजरना एक गर्भित धमकी म्हणून तत्कालीन लष्करप्रमुख सॅम माणेकशॉना इंदिराजींनी चक्क युनिफॉर्ममध्ये न्याहारीला बोलावलं होतं.
१९७७ च्या निवडणुकीत इंदिराजींचा मोठा पराभव झाला. इंदिराजींच्या पक्षातल्या अनेकांनी त्यांनाच आव्हान दिलं. त्या संपूर्ण कालखंडात इंदिराजी अविचल राहिल्या. आपल्याच पक्षातून बाहेर पडून इंदिराजींनी नवीन पक्ष स्थापन केला. जनता सरकारचा संपूर्ण काळ त्यांनी लोकांमध्ये घालवला. अनेक महिला, मजूर, कष्टकरी वर्ग, आदिवासी जनता यांच्यात त्या फिरल्या. दुर्गम भागात जाऊन त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतले आणि लोकांमध्ये स्वतःला रुजवलं.
आज इंदिरा गांधी म्हटल्या की समोर येतात त्या हरितक्रांती, बँकांचे राष्ट्रीयीकरण, बांगलादेश युद्ध, पोखरण अणुचाचणी, सिक्कीम विलीनीकरण, आशियायी खेळ आणि ऑपरेशन ब्लुस्टार सारखी धोरणे. आणिबाणीबद्दल लोकांचे शिव्याशाप काँग्रेसला कितीही लागोत परंतू इंदिराजींबद्दल कोणीच अनादर व्यक्त करत नाही.
यामध्ये लोकांमध्ये जाऊन इमेज बिल्डिंग ही महत्वाची असेल तर ती इंदिराजींनी जबरदस्त केली.
दुसरे उदाहरण कोणाच काँग्रेसवाल्याला आवडणार नाही. पण शेवटी पंतप्रधान म्हणून नाईलाजाने द्यावे लागेल नरेंद्र मोदींचे.
जयललिता यांच्या अंत्यदर्शनावेळी नरेंद्र मोदी गेले होते त्याची एक साधारण सात मिनिटाची क्लिप फिरत होती. नरेंद्र मोदी त्या स्थळी आले आणि लोकांचा उन्माद स्पष्ट ऐकू यायला लागला. मोदी शांतपणे आले. लोकांकडे एक नजर टाकल्यासारखी केली. जयललिता यांचं मनापासून अंतिम दर्शन घेतलं, त्यांच्या पार्थिवाभोवती शांतपणे एक प्रदक्षिणा घातली, शशिकलांची एक भेट घेतली, जयललिता यांच्या जवळच्या व्यक्तींच्या डोक्यावरून हात फिरवला. आणि मोदी लोकांना सामोरे गेले. लोकांमध्ये हिस्टेरिया अजून वाढला, महाप्रचंड गोंगाट सुरु झाला, संपूर्ण वेळ मोदी लोकांसमोर गंभीरपणे हात जोडून उभे होते. आपण एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अंत्यदर्शनाला आलेले आहोत आणि समोरचा जनसमुदाय आपल्यामुळे भारावून गेलाय, ही कदाचित आपली लोकप्रियता असेल किंवा देशाचा पंतप्रधान आपल्या लाडक्या नेत्याच्या अंतिम दर्शनाला आलाय म्हणून लोक उत्तेजित झालेले असतील.
मोदींनी हा क्षण मनातल्या मनात एन्जॉय केला नसेल? पण चेहऱ्यावर जोडलेले हात ठेवून मोदी तीस सेकंड उभे होते आणि निघून गेले. क्षणभर समजूया मोदींनी अभिनय केला. पण तो जबरदस्त केला, हे तर मानावंच लागेल.
आणि याही प्रसंगी इतरांशी हसून बोलताना राहुल यांचे क्षण पकडले गेले. शेवटी तर राहुल हसून लोकांना हात हलवून टाटा करताना निघून गेले.
राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना होणार. जोपर्यंत विरोधकांकडून सक्षम पर्याय मिळत नाही आणि काँग्रेस मुख्य पर्याय असताना, राहुल गांधी प्रमुख नेते असताना ह्या तुलनेला अंत नाही.
मी टाकलेला फोटो अनेकांना आवडला नाहीत. एका मित्राने मला वैयक्तिक विनंती केली. एका मैत्रिणीने मला ह्याबद्दल गोड शब्दात सुनावलं आणि दुसऱ्या एका आदरणीय व्यक्तीने काही प्रश्न केले. राहुल गांधींवर वैयक्तिक टीका टवाळी नको, असाच सगळ्यांचा सूर होता.
परंतु राहुल गांधी इथे खूपच कमी पडले आहेत, कमी पडत आहेत हे दाखवून देणे ही गांधींची टिंगल टवाळी नव्हे. हा फरक आपण सर्वांनीच लक्षात घ्यायला हवा. म्हणून हा लेखनप्रपंच!
कॅप्टन अमरिंदरसिंग यांना सहानुभूती. माझ्या या आवडत्या नेत्याला हा काळ धीराचा जावो.
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page