आर्टिफिशीयल इंटेलिजन्सला “घाबरून” फेसबुकने त्यांचा प्रयोग बंद केला नाही! खरं कारण “हे” आहे!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
“Artificial Intelligence ने स्वतःची भाषा तयार केल्या नंतर फेसबुकने बंद केला प्रोजेक्ट”, “Artificial Intelligence च्या बॉट्सने तयार केली स्वतःची भाषा”, “Facebook closed the research project after AI created a new language” अश्या प्रकारच्या हेडलाईन्स तुम्ही गेल्या आठवड्याभरात पेपर मध्ये वाचल्या असतील. यावरून AI कसं वाईट आहे आणि अगदी फेसबुक देखील कसं AI च्या तंत्रज्ञानाला घाबरून गेलंय असं जवळ जवळ प्रत्येक पेपरने केलेल्या वर्णनाने तुम्हालाही बहुदा प्रश्न पडला असेल कि AI म्हणजे नेमकं काय आणि त्याने फेसबुक सारख्या कंपनीने घाबरून जाण्यासारखं काय झालंय. हे स्वाभाविकच आहे. जवळ जवळ प्रत्येक न्यूज पेपर किंवा वेबसाईटने या घटनेवर फारच अतिरंजित आणि अवैज्ञानिक बातमी दिलेली असल्याने बऱ्याच लोकांची उत्सुकता चाळवल्या गेलीए त्याचबरोबर AI आणि ऑटोमेशनच्या विरोधात असणाऱ्या लोकांच्या हातात AI ला विरोध करण्यासाठी एक भरभक्कम पुरावा आलेला आहे. हफिंगटन पोस्ट ने या मुद्द्यावर दिलेल्या बातमीचे हजारो शेयर आहेत.
एकूणच ही बातमी वाचणाऱ्याला असं वाटणं सहज शक्य आहे कि मशीनने माणसावर राज्य करण्याचा काळ जवळ आलेला आहे. हे विज्ञानकथेत कितीही छान वाटत असलं तरी यात खरंच किती तथ्य आहे?
AI म्हणजे नेमकं काय?
AI किंवा Artificial Intelligence (याला कोणी मराठी नाव शोधलं असलं तरी सोयीसाठी यापुढे मी याला AI म्हणणार आहे) बद्दल बऱ्याच लोकांनी वाचलं किंवा ऐकलं असलं तरी त्याचा नेमका अर्थ काय आहे याच्या बद्दल बहुतेक लोकांच्या मनात गोंधळ असतो. AI ही तशी बघितली तर काही अगदीच नवीन संकल्पना नाहीये. विज्ञानकथांमध्ये AI बद्दल ४०-५०च्या दशकापासून लिहिल्या जातंय. असिमोव हा विज्ञानकथा लेखक खरं तर त्याचा जनक. त्याने AI वर एवढं विपुल आणि बऱ्याच प्रमाणात अचूक लेखन केलंय कि आजही AI ची प्रत्येक अल्गोरिदम असिमोवने दिलेल्या AI च्या तीन प्राथमिक नियमांना बांधलेली असते.
AI ला समजून घेण्यासाठी आपल्याला पहिले थोडसं संगणकाच्या कार्यपद्धती बद्दल बोलायला पाहिजे.
संगणकातला कुठलाही प्रोग्राम हा एक ठरलेली नियमसूची फॉलो करत असतो. उदाहरणार्थ तुमच्या घरात स्मार्ट फ्रीज असेल जो दुध संपल्यावर तुमच्या फोन वर मेसेज पाठवून तुम्हाला दुध आणायची आठवण करून देत असेल – तर ती त्या फ्रीजची कृत्रिम बुद्धिमत्ता वाटत असली तरी ती तशी नसते. फ्रीज मध्ये साधा सेन्सर असतो आणि फ्रीजच्या संगणकात प्रोग्राम असतो ज्याला नियम सूची दिलेली असते जशी कि –
१. दर १० सेकंड्स ने सेन्सरकडून डेटा घेणे.
२. जर डेटा नकारात्मक असेल तर मेसेज पाठवणे. सकारात्मक असेल तर सोडून देणे वगैरे.
पण यात संगणकाची बुद्धिमत्ता काहीच नाहीये. संगणक फक्त त्याला सांगितलेलं काम करतोय.
पण आता आपण दुसरं उदाहरण घेऊ. तुम्ही तुमच्या फोन वर एक app उघडली आणि त्या app ने तुमचा फोटो काढून तुमचं वय अचूक ओळखलं. आता हे कुठल्याही प्रोग्राम मध्ये नियमबध्द करणं (pre-code) कठीण आहे. कारण प्रोग्राम ला माहित नाहीये त्याच्यासमोर कुठला चेहरा येणार आहे. त्यामुळे प्रोग्राम आधी हजारो लाखो चेहऱ्यांचा अभ्यास करून, त्या चेहऱ्यांची ठेवण (आठ्या, सुरकुत्या वगैरे) आणि वयाची सांगड घालून, चेहऱ्यांवरून वय ओळखणे शिकतो. आणि मग एक नवीन चेहरा समोर आला कि आधी शिकलेल्या चेहऱ्यांच्या आधारे तो नवीन चेहऱ्याच्या वयाचा अंदाज बांधतो. हे त्या प्रोग्रामला कोणी सांगितले नाहीये. हे तो प्रोग्राम लोकांचे चेहरे बघून-बघून, चुका करत “शिकलाय”. आणि नेमकी हीच कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AI आहे ज्याच्या बद्दल एवढी चर्चा सध्या सुरु आहे.
कुठलाही प्रोग्राम किंवा अल्गोरिदम हे कसं करते? AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता दोन प्रकारची असते.
१. Regression आणि २. Classification.
Regression अल्गोरिदम prediction किंवा recommendation साठी वापरल्या जातात. म्हणजे तुम्ही गुगल वर कारच्या किमती शोधल्या कि पुढचे दोन आठवडे तुम्हाला इंटरनेटवर फेसबुक, ट्विटर, ब्लॉग्स वगैरे सगळीकडे फक्त कारच्या जाहिराती दिसू लागतात, त्याचं कारण आहे गुगलने वापरलेला Regression अल्गोरिदम.
दुसरा प्रकार म्हणजे Classification. याचे दोन भाग असतात. पहिला भाग म्हणजे शिकणे किंवा ज्याला Learning Phase म्हणतात. दुसरा भाग म्हणजे ओळखणे किंवा ज्याला Detection phase म्हणतात. यातल्या शिकण्याच्या भागात अल्गोरिदमला एक एक डेटा इनपुट पुरवल्या जातो आणि ते इनपुट काय आहे हे सांगितल्या जाते. मग तोच इनपुट परत पुरवल्या जातो आणि ते ओळखायला सांगितल्या जाते. जर प्रोग्राम ने चूक केली तर हीच शिकवणी सुरुवातीपासून परत सुरु होते. जो पर्यंत हा एरर रेट ०.५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी नाही होत तोपर्यंत ही शिकवणी परत परत सुरु असते. एकदा हे संपलं कि नं शिकवलेले इनपुट देऊन ते ओळखायला सांगितले जातात. या सगळ्यात हे प्रोग्राम्स अश्या प्रकारे बनवलेले असतात कि त्यांनी शिकण्याची सगळ्यात कार्यक्षम पध्दत शोधून काढावी आणि वापरावी. त्यामुळे हे शिकणे तुमच्या माझ्या शिकण्यापेक्षा फार वेगळे असते.
आपण वर ज्या फेसबुकच्या प्रोजेक्ट बद्दल बोललो तो याच प्रकारात मोडतो.
काय आहे फेसबुकचा प्रोजेक्ट?
फेसबुकच्या रिसर्च विभागात बऱ्याच नवीन तंत्रज्ञानावर काम सुरु असतं. AI त्यातलंच एक. फेसबुक गेल्या काही महिन्यांपासून चॅटबॉट्स वर प्रचंड काम करते आहे. चॅटबॉट्स म्हणजे आपल्याशी संवाद साधणारे प्रोग्राम्स. यावर रीसर्च करत असताना फेसबुकच्या इंजिनियर्सने AI वापरायचं ठरवलं. चॅटबॉट्सने मानवाशी संवांद साधण्यासाठी त्यांना भाषेची माहिती असणे आवश्यक असते. बहुतांश वेळेला ही माहिती प्रीप्रोग्राम केलेली असते. म्हणजे एखाद्या प्रश्नात कार आणि किंमत हे शब्द आले तर उत्तर म्हणून कारच्या किमती पाठवायच्या वगैरे. यामुळे होतं काय कि एका चॅटबॉटचं कार्यक्षेत्र फारच सीमित होऊन जातं. म्हणजे कार बद्दल माहिती देणारा चॅटबॉट मोबाईल बद्दल माहिती देऊ शकणार नाही. जर चॅटबॉट्सना खरंच अधिक उपयुक्त बनवायचं असेल (म्हणजे general purpose chat bots) तर त्यासाठी त्यांना प्रीप्रोग्राम नं करता AI चा वापर करणे अधिक संयुक्तिक ठरेल. त्याच अनुषंगाने फेसबुक मध्ये चॅटबॉट्सना AI द्वारे भाषा शिकवण्याचे प्रयत्न सुरु होते (याला natural language processing म्हणतात).
ज्याप्रकारे कुठलीही AI अल्गोरिदम वागते तसच या अल्गोरिदमनेही शिकताना सगळ्यात कार्यक्षम पध्दत वापरायला सुरुवात केली आणि त्यातून त्या प्रोग्राम ने इंग्रजी भाषेचे व्याकरण अधिक कार्यक्षम आणि वेगवान पद्धतीने वापरायला सुरुवात केली. इंग्रजी भाषेचेच शब्द वापरून पण व्याकरणाचा वेगळा अर्थ लावत चॅटबॉट्सने आपापसात संवाद करायला सुरुवात केली. म्हणजे आपण व्याकरणाकडे ज्या अर्थाने बघतो (संधी, समास, नाम सर्वनाम वगैरे) तसं न बघता चॅटबॉट्स ने त्याच्याकडे गणितीय दृष्टीने बघायला सुरुवात केली.
मग अल्गोरिदमच्या लक्षात आलं कि एकच शब्द परत परत वापरून आपण तो शब्द किती वेळा आणि कुठल्या जागी वापरतो आहे यावरून वेगवेगळी वाक्य तयार करू शकतो. (इथे मी अल्गोरिदम च्या लक्षात आलं वगैरे म्हणतोय पण मुळात ते एक गणितीय समीकरण असतं). संगणकाच्या दृष्टीने तोच अर्थ शब्दांची विविधता कमी करून वापरण्यात कार्यक्षमतेची वाढ झालेली असते. कारण आता संगणकाला कमी शब्द शिकावे लागतील.
फेसबुकच्या इंजिनियर्स साठी हे नक्कीच नवीन आणि वेगळं असलं तरी unexpected नव्हतं. आणि भयानक किंवा भीतीदायक तर त्याहून नव्हतं. चॅटबॉट्स त्यांना सांगितल्याप्रमाणेच फक्त संवादाचे नवीन आयाम तयार करत होते. यानंतर फेसबुक कडे दोन पर्याय होते.
चॅटबॉट्सना ही संवादाची नवीन पध्दत वापरू द्यावी किंवा मानवनिर्मित व्याकरणाचे नियम शिकायला लावावे. या चॅटबॉट्सचा मुख्य उद्देश्य मनुष्याशी संवाद करणे हा होता. संवादाची ही नवीन पध्दत वापरण्यात अडथळा हा होता कि हे नियम सामान्य माणसाला माहितच नाहीएत. म्हणजे चॅटबॉट्स चा उपयोग शून्य. त्यामुळे फेसबुक ने सामान्य नियम वापरण्याचा निर्णय घेतला.
पण यावर लगेच मिडियाने चुकीची माहिती पसरवायला सुरुवात केली. मुळात भाषा हि फक्त व्याकरणाच्या नियमांनी नाही बनत. त्याला शब्द, संस्कृती, व्याकरण, अर्थ, लिपी असे बहुआयाम असतात. चॅटबॉट्स ने त्यांना शिकवल्यागत सगळ्यात कार्यक्षम पध्दत शोधून काढली. ती पध्दत चॅटबॉट्सचा उपयोग ज्याकामासाठी करायचा त्याकामासाठी उपयोगाची नव्हती. त्यामुळे ती पध्दत सोडून देण्याचे ठरवण्यात आले. यात भीतीचा किंवा AI ला घाबरण्याचा भाग कुठेही नव्हता. पण नीट शहानिशा न करता बातमी पसरवणाऱ्या मिडियाला याची काळजी असायचं कारणच काय…!
रंजक बातमी देण्याच्या नादात विज्ञानातल्या एका मोठ्या आणि रोमांचक घटनेचं भितीदायक बातमीत रुपांतर करण्यात आलं एवढं मात्र खरं.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page