आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
कुठेही जायचे असल्यास आजही रेल्वे हा उत्तम पर्याय मानला जातो. कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये तुम्ही तुमच्या इच्छुक ठिकाणी पोहचू शकता. पण या रेल्वेचे तिकीट मिळवणे, तेवढीच डोकेदुखी असते. तिकीट कन्फर्म न झाल्याने आणि तिकीट आरक्षण होत नसल्याने कितीतरी वेळा प्रवाश्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, म्हणून आता आयआरसीटीसीने या आरक्षणाच्या त्रासामधून मुक्त होण्यासाठी क्रांतिकारी असे पाऊल उचलले आहे.
आता जर तुमच्याकडे रोख रक्कम नसेल, तरीसुद्धा तुम्ही तिकीट बुक करू शकता, कसे ते जाणून घेऊया.
भारतीय रेल्वेने आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर तात्काळ तिकिटे बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याच वेबसाईटवर तुम्ही तिकीट खरेदी करू शकता आणि नंतर पैसे देऊ शकता. या योजने अंतर्गत आयआरसीटीसीच्या वेबसाईटद्वारे इ-तिकीट आरक्षित केल्यानंतर १५ दिवसांच्या आत पैसे भरण्याची मुभा दिली आहे. सध्या ही सुविधा तात्काळ तिकीटासाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे.
‘ई-पेलेटर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सुविधेचा वापर करत असताना, ग्राहकांना एकूण तिकिटाच्या व्यवहार शुल्कावर ३.५० टक्के एवढा सेवा कर आकारला जाणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटच्या पेमेंट पेजवर वापरकर्ते ‘ई-पेलेटर’ हा पर्याय पाहू शकतात.
ग्राहकाला एक पेमेंट लिंक एसएमएस किंवा ई-मेलवर पाठवण्यात येईल. या लिंकच्या आधारे तुम्ही १४ दिवसांमध्ये पैसे भरू शकता.
या सुविधेबद्दल आयआरसीटीसीने सांगितले आहे की,
कृपया हे लक्षात तेव्हा की, जर तुम्ही १४ दिवसांमध्ये पैसे भरण्यास अयशस्वी ठरलात तर तुमच्यावर दंडनीय कारवाई करण्यात येईल. या दंडाचे व्याज म्हणून तुम्हाला दर वर्षाला ३६ रुपये एवढा दंड आकाराला जाईल किंवा तुमचे तिकीट रद्द करण्यात येईल किंवा तुमचे खाते निष्क्रिय करण्यात येईल.
तात्काळ तिकीट आरक्षण आणि पैसे परत करण्याचे नियम..
२०१५ सालापासून तात्काळ तिकीट बुकिंग करण्याची एसी क्लासची वेळ सकाळी १० वाजता आणि नॉन-एसी क्लासची वेळ सकाळी ११ वाजता (प्रवास सुरु करण्याच्या एक दिवस अगोदर, प्रवास सुरु करण्याच्या वेळी नाही) निर्धारित करण्यात आली आहे.
१. प्रत्येक PNR ने जास्तीत जास्त चार प्रवाशांचे तात्काळ तिकीट बुक करता येते.
२. तात्काळ तिकिटाचे प्रत्येक प्रवाशाचे शुल्क हे साधारण तिकीटापेक्षा जास्त आकारले जाते.
३. प्रिमियम तात्काळ सुविधा: ऑक्टोबर २०१४ पासून काही निवडक गाड्यांसाठी, प्रिमियम तात्काळ सुविधा सुरु करण्यात आली आहे आणि ही तिकिटे डायनॅमिक किंमतीला विकली जातात. या तिकीटाची अतिरिक्त शुल्क आकारण्याची टक्केवारी त्याच्या सर्वात जास्त प्रवासी भाड्यावर अवलंबून असते.
४. तात्काळ तिकिटाच्या बुकिंगवर कोणतीही सवलत देण्याची परवानगी दिली जात नाही.
५. या तिकिटामध्ये कोणतेही फेरबदल करता येत नाहीत.
६. तात्काळ तिकिटाची अतिरिक्त शुल्काची टक्केवारी ठरलेली आहे. द्वितीय श्रेणीच्या तिकीटासाठी मुलभूत १० टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाते आणि इतर वर्गासाठी कमीत कमी ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाते.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page