पृथ्वीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास आशेची किरण असलेला ‘एक भारतीय’!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
उत्तरप्रदेशमधील बागपतमध्ये जमीनदार घराण्यात जन्मलेल्या राजेन्द्रसिंह यांना आयुर्वेदिक मेडिसिन व सर्जरीचे शिक्षण पूर्ण केल्यावर, लगेचच सरकारी नोकरीही लागली. मात्र ‘समाजाला विकास पथावर न्यावयाचे असल्यास शिक्षण प्रसार करणे गरजेचे आहे’ असे मानणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्याचे मन त्यात काही रमत नव्हते. वयाच्या 14 व्या वर्षीच त्यांनी दारुबंदी आंदोलनात सहभाग घेतला होता आणि 1975 ला साथीदारांसह ‘तरुण भारत संघ’ ह्या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. समाजाच्या बिघडत्या स्थितीमुळे अस्वस्थ होऊन आपल्या नोकरीचा राजीनामा दिला, घरातील सर्व सामान विकले आणि थेट राजस्थानातील अलवार जिल्ह्यातील एक गाव गाठले. तेथे डॉ. सिंहांनी गावकऱ्यांवर आयुर्वेदिक औषधोपचार तर सोबतीने शिक्षणप्रसार करण्यास सुरवात केली.
कधीकाळी धान्याची मोठी बाजारपेठ म्हणुन ओळख असलेला अलवार जिल्हा हा खाणकाम व जंगलतोडीमुळे कोरड़ा व उजाड़ बनला होता. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने परंपरागत पद्धतीने पाण्याची साठवणुक करण्याऐवजी लोकांनी बोअरवेल खोदुन पाणी उपसले होते. हजार-हजार फुटापर्यंत बोअर मारुन लोकांनी पृथ्विची चाळणी करुन टाकली होती. त्यावेळी शिक्षणापेक्षा पाण्याचा प्रश्न जास्त बिकट असल्याचे जाणवल्याने, जल हेच त्यांचे जीवन बनले.
सुरवातीला पावसाचे पाणी जमीनीत मुरवण्याकडे लक्ष दिल्याने एकाच मॉन्सूनमध्ये विहिरी भरण्यास सुरवात झाली. ’डार्क झोनमध्ये’ समाविष्ट असलेला हा भाग पाण्याची पातळी वाढून अल्पावधितच ’व्हाईट झोंनमध्ये’ म्हणजे भरपूर पाणी असलेल्या भागात परावर्तित झाला. परंपरागत पद्धती उदा; मातीचे लहान-लहान बंधारे, पाणी जमिनीत नैसर्गिकरीत्या झिरपण्याच्या पद्धती; ज्या ग्रामीण भागातील लोकांनी सोडून दिल्या होत्या, त्या परत सुरु करायला लावल्या.
राजस्थानमधील पाच नद्यांना म्हणजेच रुपारेल, भागनी, जहाजवाली, अरवारी, सारसा ह्यांना पुनर्जिवित करून लाखो लोकांचे आयुष्य बदलले. प्रयत्नाच्या पराकाष्ठेमुळे जवळपास 1 हजार गावात पाणी परत आणले गेले. आतापर्यंत 8600 पेक्षा जास्त ‘जोहड़’, चेक डॅम व अनेक विविध प्रकारचे उपक्रम हे वाळवंटी भागात राबवले आहेत.
भारताचे जलपुरुष असा लौकिक असलेले राजेन्द्रसिंह म्हणतात,
स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात दुष्काळ पडण्याचे क्षेत्र दहा पटीने तर पुरग्रस्त भाग आठ पटीने वाढले आहेत. आम्ही कमी पावसाचे क्षेत्र असणाऱ्या अरवारी नदीच्या आजुबाजुच्या प्रदेशातुन उस, कापुस, तांदूळ पूर्णपणे हद्दपार केले असुन तिथे तीळ, बाजरी, ज्वारी, तुर हयांची शेती सुरु केली; जी कमी पाण्यात घेतली जाणारी असून पौष्टिकगुण जास्त असणारी पिके आहेत. ज्यामुळे आपले घरदार सोडुन गेलेले अनेक शेतकरी परत येउन नवीन पद्धतीने जमीन कसायला लागले आहेत.
तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व बिहारमध्ये आपले काम वाढवले आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असताना जलयुक्त शिवार अभियानाचे कौतुक करत असताना, हे जलसंवर्धनाचे मॉडेल भारतभर राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले होते. गंगा स्वच्छ होण्यातील सर्वात मोठा अडथळा हा तिच्या विविध उपनद्यांवर बांधलेल्या मोठाल्या धरणांचा आहे असे ते मानतात. जलयुक्त शिवार, छोटी तळी, विहिरी, मातीचे बंधारे ह्यांसारख्या पारंपरागत पद्धती; महाकाय धरणांपेक्षा जास्त सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे त्यांचे मत आहे.
भगीरथी नदीवर प्रस्तावित असणारा लोहारीनाग सारखा जलविद्युत प्रकल्प बंद पाडणे, देशभरातील अनेक नद्यांना प्रदुषणाच्या विळख्यातुन मुक्त करण्यासाठी किनारी भागात लोकांमध्ये जलसाक्षरता पसरवणे,पर्जन्यपुरक शेती करण्यास शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे असे अनेक कार्यक्रम ते देशभर करत आहेत.
जलसंधारण व जलव्यस्थापन क्षेत्रातील अतुलनीय कार्यामुळे त्यांना आशिया खंडाचे नोबेल पारितोषिक समजल्या जाणाऱ्या रेमन मॅगासेसे पुरस्काराने 2001 साली गौरवण्यात आले. 2015 साली तर स्टॉकहोमला पाण्याचे नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तर ‘द गार्डियनने’, डॉ राजेन्द्रसिंह यांचे नाव ‘पृथ्वीचे अस्तित्व टिकवुन ठेवण्यास, आशेची किरण असलेल्या जगातील 50 लोकांत घेतले आहे.
ह्या आधुनिक भगीरथास, माझा साष्टांग नमस्कार.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page