Site icon InMarathi

काँग्रेस व भाजप भक्तांचा सोयीस्कर तर्क: “लोक सुधरले तरच देश सुधरणार!”

corruption-marathipizza02

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

काँग्रेस सत्तेत असताना –

काँग्रेसी : लोक सुधरले तरच देश सुधरणार !
भाजपेयी : सरकार बदला, देश बदलेल !

भाजप सत्तेत असताना –

भाजपेयी : लोक सुधरले तरच देश सुधरणार !
काँग्रेसी : सरकार बदला, देश बदलेल !

मिनव्हाईल : देश आहे तसाच आहे, लोक ही आहेत तसेच राहिलेत.

“लोक सुधरले तरच देश सुधरणार !” / “सरकार बदला, देश बदलेल !” हे म्हणणारे सर्वच्या सर्व पक्ष भक्तच असतात असं नाही. मुद्दा हे दोन्ही तर्क चुकीचे आहेत हा आहे. कसं ते समजून घेऊ.

कोणत्याही देशात ३ प्रकारचे लोक असतात :

“आतले” – सिस्टीम मधील लोक. पं प्र पासून मनपा सफाई कर्मचाऱ्यापर्यंतचे सर्व.

“बाहेरचे” –  सामान्य जनता. ह्यांचा सिस्टिमशी संबंध फक्त कामापूरता असतो. लोकशाहीतील सहभाग मतदानापुरता असतो.

“कुंपणावरचे” – सिस्टीमध्ये नसलेले पण तरीही अगदीच “बाहेरचे” नसलेले लोक. ह्यांनाच सिव्हिल सोसायटी म्हणतात. हे लोक एकूण लोकसंख्येच्या १-२ % असतात. ह्यांचा कमी-अधिक प्रभाव आतले आणि बाहेरचे, दोघांवरही असतो. सार्वजनिक जीवनात ओळख असते, पॉलिसी मेकिंगवर प्रभाव असतो, जनमतावर प्रभाव असतो, लोक ह्यांचं “ऐकतात”.

===

“लोक सुधरले तरच देश सुधरणार !” ह्या वाक्यानंतर सहाजिक प्रश्न निर्माण होतो की “लोकांना सुधरायचं तरी कुणी?” लोक आपोआप बदलणार नाहीत ना! हे बदल घडवून आणावे लागतात.

रहदारी सुरळीत असावी असं सर्वांनाच वाटतं. पण त्यासाठी योजना आखावी लागते. “सर्वांनी डावीकडून चालावे” हा नियम तयार करून तो फोर्सफुली अमलात आणावा लागतो. नियम नं पाळणारे असणारच – त्यांना शासन करावं लागतं. शासन करण्याची जबाबदारी असणाऱ्यांनी निष्पक्ष आणि स्वच्छ असावं ह्याची काळजी घ्यावी लागते. पण एवढ्याने भागात नाही.

रहदारी वाढते, वाहनं वाढतात. मग चौकाचौकात सिग्नल, ट्राफिक पोलीस आले. तेही पुरत नाही म्हटल्यावर पूल, रिंग रोड, वन वे – नो एंट्री ह्या मार्गांचा वापर होतो. ही प्रक्रिया कायमस्वरूपी आहे. थांबून चालत नाही.

हे सर्व “सतत” करत राहिलं तरच लोकांना शिस्तशीर वर्तन करण्यास पोषक वातावरण रहातं. स्टेशन हून बाहेर जाण्यासाठी जे फूट ओव्हर ब्रिज असतात, त्यावर तोबा गर्दी बेशिस्तपणे चालत असते. “हळूहळू चालणाऱ्यांनी डावीकडून चालावं म्हणजे घाई असणारे उजवीकडून पुढे जाऊ शकतील” हे सामाजिक भान आपोआप आलं तर उत्तमच. पण जगात कुठेच असं होत नसतं. सर्वत्र शिस्त एन्फोर्सच करावी लागते. शिकवावंच लागतं.

लोक असे सुधरतात. असेच घडतात.

रस्त्यावर खड्डे पडतात कारण कंत्राटदार – अधिकारी – मंत्री ह्यांचं साटंलोटं असतं. आता ह्या साट्यालोट्यासाठी – त्याच खड्यात स्कुटर गेल्यामुळे दाणकन आपटलेल्या माणसालाच जबाबदार धरलं तर कसं चालेल? जबाबदारी भ्रष्ट युतीचीच. पण ती युती तोडायची कुणी?

इथे “कुंपणावरचे” म्हणजेच सिव्हिल सोसायटीचा रोल आहे. तक्रार करणे, फॉलो अप घेणे, RTI करणे…भांडत रहाणे…हे करणं सिव्हिल सोसायटीकडून अपेक्षित आहे. सामान्य जनता – “बाहेरचे” – हे करूच शकत नाहीत.

१० – ७ नोकरीच्या फेऱ्यात अडकलेल्यापासून स्वतःच्या बिझनेसमध्ये अडकलेल्यापर्यंत, दोन वेळच्या भाकरीची भ्रांत असणाऱ्या पासून बँड स्टॅन्डवर घर बांधण्याची इच्छा असणाऱ्या स्वप्नाळूपर्यंत – कुणाकडूनही “आपणहोऊन सभ्य वर्तन” ची अपेक्षा करणं हा अव्यावहारिक भोळसट्पणा आहे. दिवसरात्र समाजाची काळजी करावी अशी अपेक्षा अख्ख्या समाजाकडून करायची असेल तर पोलीस, जज, स्वच्छता कर्मचारी कशाला बसवलेत त्या त्या पदांवर? ही संपूर्ण व्यवस्था निर्माण करण्यामागे कारणच हे आहे की सामान्य लोक एका सर्वसाधारण पातळी पर्यंत “आपोआप” सभ्य वर्तन करतात. त्या पुढे त्यांना योग्य दिशेने वाळवावं लागतं. कधी हळुवार वळण पुरतं, कधी कठोर टर्न घ्यावा लागतो.

प्रत्येक गोष्ट अनुशासनावर सोडून आणीबाणी / हुकूमशाही आणणं जितकं टोकाचं आहे, तितकंच सर्वकाही “लोकांनी आपोआप घडवून आणावं” असं समजणं ही टोकाचं आहे.

ही वस्तुस्थिती कुणी समजून घ्यायची आहे?

ज्यांना “५ वर्षात तीन मतं देणे एवढीच आपली जबाबदारी आहे” असं वाटत नाही, ह्याहून अधिक काहीतरी करायला हवं असं वाटतं – त्या लोकांनी हे समजून घ्यायचं आहे.

एका वाक्यात सांगायचं झालं तर –

“बाहेरचे” व्यवस्थित वागावेत ह्याची काळजी घेण्याची जबाबदारी “आतले” असणाऱ्यांची.

“आतले” व्यवस्थित वागवेत ह्याची काळजी घेण्याचं काम “कुंपणावर” असणाऱ्यांचं.

हे काम कसं करावं? “आतले” आमचं का ऐकतील? किती तक्रारी करायच्या? RTI वर धड उत्तरं देत नाहीत, परिस्थिती बदलायची कशी?

असे अनेक प्रश्न आहेत. त्यावर उत्तरं सापडणं कठीण आहे. वेळखाऊ आहे.

पण उत्तर सापडत नाही म्हणून प्रश्नच बदलता येत नसतो.

“आपल्या वॉर्डात स्वच्छता का पाळली जात नाही?” हा प्रश्न नगरसेवकाला विचारण्याची छाती नाही म्हणून “लोकच बेक्कार आहेत हो” असं म्हणणं, ही इंटेलेक्च्युअल ऑरगॅझम मिळवण्याची क्लृप्ती आहे. असं म्हणत राहिल्याने आपण फार शहाणे आहोत, इतरांपेक्षा उच्च आहोत, ह्याचं समाधान मिळतं फक्त. पण इतर लोकही हेच म्हणतात आणि ऑरगॅझमीक फिलिंग मिळवत रहातात.

अर्थात, हे सर्व, “मला मतदान करण्यापेक्षा अधिक काहीतरी करायचं आहे” असं वाटणाऱ्या, १-२% लोकांसाठी. सामान्य जनतेकडून हे समजून घेऊन तसं वर्तन करण्याची अपेक्षा नाही.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Exit mobile version