Site icon InMarathi

चिनी समाजवादमागचा भांडवलवाद : चीन चं करायचं तरी काय? (१)

china-marathipizza00

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

चीन या देशाबद्दल लेखमाला प्रकाशित करत आहे. याआधी काही गोष्टी मी स्पष्ट करतो. भारताच्या स्ट्रॅटेजिक पॉलिसीला या लेखाचा उपयोग किंवा भारताच्या सामरिक धोरणावर आधारित चर्चा वगैरे या लेखांमध्ये नाही. माझं वाचन फारसं नाही. उपरोक्त लेख मी वेळोवेळी वेगवेगळ्या रिपोर्ट्समध्ये जी जी माहिती आली होती ती संकलित करून लिहायचा प्रयत्न केला आहे. चीनचा सामाजिक आर्थिक जडणघडणीचा थोडाफार भाग मी यात मांडायचा प्रयत्न केलेला आहे. त्यातून कसलाही सिद्धांत मांडायचा माझा अजिबात प्रयत्न नाही आणि तसा माझ्यावर कोणी आरोपही कृपा करून करू नये.

लेख वाचून त्यात अमूक एक तज्ज्ञ जर टॅग करायचा असेल तर खुशाल करावा. परंतु माझ्याशी वाद घालायला त्या टॅगलेल्या तज्ज्ञाने येऊ नये. तरीही कोणालाही मतभेद व्यक्त करायचे असल्यास केवळ आणि केवळ लेखांमधल्या मुद्द्यांवर करावेत. मला सैद्धांतिक चर्चा येत नाही. लेखातली भाषा ही गोष्टी स्वरूपात आहे. समोर सातवीची मुले बसल्यासारखी भाषा वाटेल. यात वाचकांची लेव्हल काढायचा माझा प्रयास नाही. मला माझं म्हणणं कोऱ्या फळ्यांवर मांडायची सवय असल्याने मुळापासून विषय समजावून सांगायला आवडतो. त्यामुळे उगीच जडजड शब्द वापरून (जे मला जमत नाही) मला कित्ती कित्ती माहिती किंवा तत्वज्ञान येतं असं माझ्याकडून झालं तर माझाच मला राग येतो.

कसलाही तोडगा काढायचा नाही मला. काही गोष्टी समजल्या की जे भान येतं त्यामुळे परिस्थिती निवळते असं माझं ठाम मत आहे.

तर आपल्याला जाणून घ्यायचंय आपल्या महाकाय शेजाऱ्याबद्दल.

businessinsider.com

चीन या देशाबद्दल आपल्या देशात अनेक प्रवाद आहेत. पहिला वर्ग सगळ्यात मोठा. आपल्या देशातली बहुतांश जनता चीनी ड्रॅगन बद्दल एक आधी बाळगून असते. १९६२ च्या युद्धात चीनने आपला पराभव केला होता अश्या विचाराचा सल लोकांच्या मनात अजून आहे. तो किती योग्य आणि अयोग्य याबद्दल चर्चा नंतर कधीतरी. शोएब अख्तरने सचिन तेंडूलकरची भन्नाट वेगात मधली दांडी उडवल्यावर आपला डोक्यात अशीच भीती बसली होती. तिचं निवारण साडे तीन वर्षांनी भारतरत्नानेच धुलाई करत केलं होतं. तसा मोका आता चीनबद्दल शक्यतो मिळणार नाही अशी अपेक्षा होती. कारण समोरासमोर भांडायला किमान एक कोणीतरी जॉर्ज बुश किंवा रोनाल्ड रेगन अथवा गेला बाजार रशियन ब्रेझनेव लागतो. आज त्या तोडीचा मूर्ख शिरोमणी कोणी नाही. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग तर नाहीच नाहीत. त्यामुळे दोन देश समोरासमोर सरळ युद्ध करतील ही शक्यता जवळपास मावळली होती. पण आज डोकलाम पाठोपाठ उत्तरांचलमध्येही घुसखोरी करून चीनने प्रश्न चिघळवलाय. युद्द्याने प्रश्न वाढतात. सुटतात की नाही यावर वाद होतील. हा वर्ग धास्तावलाय. तरीही नेमकं काय घडतंय चीनमध्ये? हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.

चीनबद्दल विचार करणारा दुसरा भाबडा वर्ग म्हणजे भारत चीन सहकार्य याबद्दल भरभरून बोलणारा. यांची एक विचारधारा ठरून गेलेली आहे. १९७० च्या दशकात अनेक कम्युनिस्ट कॉम्रेड्स कम्युनिस्टांच्या कम्युनिस्टपणाला कंटाळून सेक्युलर किंवा कॉग्रेसधार्जिणे झाले. यांना आजही कम्युनिस्ट विचारसरणीचं छुपं आकर्षण आहे. नेहरूप्रणीत समाजवाद, इंदिराप्रणीत आर्थिक पायाभरणी याबद्दल हे भरभरून बोलताना थकायचं नाव घेत नाहीत. महाराष्ट्रातले अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकार या श्रेणीत येतात. चीनमधल्या आर्थिक उत्क्रांतीवर यांना भारी माया. भारत चीन ही जगाच्या आर्थिक वाढीची इंजिन्स कशी बनतील यावर यांची रसवंती बहरत असते. त्यामुळे चीन शत्रू नव्हे तर सहकारी अशी यांची धारणा.

यांच्यातलाच अजून एक उपवर्ग म्हणजे कोलांट्या उड्या मारत चीन कसा योग्य आहे याबद्दल बोलणारा. भारत आणि चीनच्या युद्धात या विचारसरणीच्या लोकांनी चीनची बाजू तर घेतली होतीच आणि शिवाय तिला जागतिक पातळीवर मांडायचा प्रयत्न केला होता.

indianexpress.com

चीनबद्दल विचार करणारा तिसरा वर्ग बराचसा वास्तववादी आहे. स्पर्धा असो की सहकार्य, भारत आणि चीन यांची बरोबरी होऊच शकत नाही असा यांचा रास्त होरा असतो. चीनची परकीय गंगाजळी साडेतीन महपद्म (ट्रीलियन) डॉलर्स तर आपली अर्थव्यवस्थाच जेमतेम सव्वा दोन महपद्म डॉलर्सची. आपल्या अर्थव्यवस्थेच्या जवळपास साडेचार पट अर्थव्यवस्था चीनची आहे. पण भारताशी तुलना होताना लोकशाहीत प्रगतीचा वेग हा कमीच असतो ही बुनियादी गोष्ट हा वर्ग सोयीस्कर विसरतो.

एकूणच चीन आणि चीनी राज्यकर्ते यांच्याबद्दल भारतात एक हत्ती आणि सात आंधळे ही गोष्ट फिट बसते. त्यामुळेच डोळ्यावरची सगळी कातडी बाजूला सारून या शेजाऱ्याचा मागोवा घ्यावा लागेल.

डावी विचारसरणी १९९१ साली जगातल्या अनेक देशांनी त्यागली. त्याच बरोबर अमेरिकेच्या पुढाकाराने सुरु झालेल्या जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सारख्यासंघटनांनी अनेक देशांना उभं राहण्यासाठी हातभार लावला. विज्ञान तंत्रज्ञानाने घेतलेली झेप तर थक्क करणारी आहे. यासाठी अनेकांनी मनापासून केलेले श्रम आपल्या कमी आले आहेत यात वादच नाही. आपलं जीवनमान उंचवायला भांडवलवाद कमी आला यात तर वादच नाही.

डावा विचार संपला हे सांगण्यासाठी चेकाळून चीनचा दाखला दिला जातो. गरज आहे ती चीनने काय केला ते समजून घ्यायची.

संपत्ती आकाशातून पडत नसते. तिच्यासाठी हाताला काम लागतं. यासाठी लागतात ते उद्योगधंदे आणि त्यासाठी लागते ती गुंतवणूक. १४० कोटी लोकांचा देश चालवणाऱ्या वअनेकांना पोसणाऱ्या सरकारने उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करत बसलेला फार चांगलं लक्षण नाही. गुंतवणूक, रोजगार व त्याद्वारे उत्पादकता वाढविण्याची जबाबदारीउद्योगापतींचीच असते. पण त्यासाठी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध असेल याची शाश्वती नाही. म्हणून बाहेरून गुंतवणूक होणार असेल तर ती अव्हेरणे हे व्यावहारिक शहाणपण नाही. चीनने हे दाखवले. आणि पाठोपाठ भारताने. त्यामुळे संपत्तीचे समान वाटप करण्याची संधी मिळेल. कदाचित काही लोकांना अधिक पैसाही मिळेल. परंतु सर्वच गरीब राहण्यापेक्षा ही व्यवस्था परवडली. प्रजा भिकारी आणि राजा गरीब याहीपेक्षा प्रजा गरीब आणि राजा श्रीमंत ही अवस्था परवडली. कारण त्याठिकाणी राजा तिजोरी तरी मोकळी करू शकतो. पण रिकामी करायला तिजोरी भरायला नको? समाजवाद जोपासायला आधी भांडवलशाही लागते हेच अनेकजण विसरतात. पण डेंग शिओ पिंग यांनी एक फार सुंदर वाक्य उच्चारलं होतं,

मला मांजर लाल आहे की काळं यांच्याशी देणं घेणं नाही. ते उंदीर मारतंय की नाही हे महत्वाचं.

पण म्हणून भांडवलशाही आणायची म्हणून विचारसरणी आणि शोषितांचा विचार आजच्या जगातून खरोखरीच संपला काय? चीनची लाल भांडवलशाही पूर्ण सकारात्मक राहिली काय? चीनने वित्तीय प्रगती केली खरी, परंतु वित्तीय प्रगती हीच आर्थिक प्रगती असते काय? आर्थिक प्रगतीचे मापदंड कोणते? जगातली दुसऱ्या क्रमांकाची (आणि काही विशिष्ट मोजमापाप्रमाणे पहिली) अर्थव्यवस्था बनलेला चीन आज नकारात्मकरित्या चर्चेत का आहे? दोन वर्षांपूर्वी पत्त्याच्या बंगल्यासारखा चीनचा शेअरबाजार कोसळला होता. आज त्याचेच चटके जगाला बसतायत काय?

एकीकडे एकदा एखाद लक्ष ठरवलं की काहीही करून ते गाठायचं हा चीनचा राष्ट्रीय स्वभाव आहे. मग ते लक्ष ऑलिम्पिक सुवर्णपदकांमध्ये क्रमांक एक मिळवणे असो अथवा निर्यात वाढ करून जगाचं निर्मिती क्षेत्र बनणे.

दुसरीकडे नक्की काय आणि कुठे चुकलं??

पुढच्या लेखात उकल करायचा प्रयत्न करू.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version