आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कब्रस्तान म्हटले की, आपोआपच आपल्या अंगावर शहारे येतात. आपण कितीही धीट असलो तरी रात्रीच्यावेळी किंवा अवेळी कब्रस्तानच्या जवळून जाताना थोडी भीती तर नक्कीच वाटते. पण हे झालं मनुष्य मृतदेहांच्या कब्रस्तानाबद्दल.
पण काय हो, तुम्ही कधी गाड्यांच्या कब्रस्तानविषयी ऐकले आहे का?
चला जाणून घेऊया या आगळ्यावेगळ्या कब्रस्ताना बद्दल जेथे कित्येक गाड्या चिरनिद्रेत आहेत!
दक्षिण बेल्जियम मधील लग्जमबर्ग प्रांतामध्ये एक शहर आहे ‘चॅटिलोन’. हे शहर कार्सच्या कब्रस्तानासाठी प्रसिद्ध आहे.
कारण येथील जंगलामध्ये ७० वर्ष जुन्या जवळपास ५०० पेक्षा अधिक कार आहेत. ७० वर्षांपासून एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या या कार्सची स्थिती अतिशय खराब असून आता त्यांच्यावर झाडे, झुडपे आणि वेली उगवल्या आहेत.
सर्वात आश्चर्याची बाब ही आहे की या कार्स इथे कुठून आल्या आणि कशा आल्या याबद्दल आजही कोणाला काहीही माहिती नाही. आसपासच्या स्थानिक भागामध्ये या जागेविषयी अनेक भीतीदायक आणि रंजक कथा प्रचलित आहेत.
त्यापैकी सर्वात जास्त प्रचलित आहे अमेरीकन सैनिकांची कथा!
असे म्हटले जाते की, दुसरे महायुद्ध संपल्यानंतर अमेरीकन सैनिक घरी परत जाण्याची तयारी करू लागले. परतीच्या प्रवासात या भागात आल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या कार्स/गाड्या या जंगलातून पुढे जाऊ शकत नाहीत. म्हणून त्यांनी त्या कार्स चॅटिलोनच्या जंगलामध्ये सोडून दिल्या.
येथे कार्स सोडून जाणे हे सुरक्षित होते, कारण या भागात जास्त रहदारी नव्हती आणि हा भाग संपूर्णतः डोंगराळ आहे.
अमेरीकेच्या सैनिकांचा विचार होता की, अमेरीकेला पोहोचल्यानंतर आपापल्या कार्स अमेरीकेत मागवून घ्यायच्या. पण काही कारणामुळे असे करणे त्यांना शक्य झाले नाही आणि त्या कार्स शेवटपर्यंत येथेच पडून राहिल्या.
पण ही गोष्ट बऱ्याच जणांना थोतांड वाटते. त्यांच्या मते या कार्स येथील जुन्या स्थानिक निवासी लोकांच्याच आहेत. त्यांच्या मते ही जणू प्रथा आहे की, जेव्हा कधी कोणाची कार या भागात खराब होते, तेव्हा तो माणूस आपली कार याच जंगलामध्ये उभी करून निघून जातो.
पण या म्हणण्यामध्ये देखील काही तथ्य वाटत नाही, कारण येथे उभ्या असलेल्या सर्व कार जवळपास एकाच मॉडेलच्या आहेत.
आता हे कब्रस्तान फक्त छायाचित्रामध्येच उरलेले आहे, कारण पाच वर्षांपूर्वी बेल्जियम सरकारने या खराब कार्समुळे पर्यावरणावर होणारा प्रतिकूल परिणाम पाहता सर्व कार्स हटवून ही जागा साफ केली आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.