' “त्या” ४० क्रांतिकारकांच्या आगळ्यावेगळ्या होळीची कथा, जी आजही प्रेरणा देत रहाते… – InMarathi

“त्या” ४० क्रांतिकारकांच्या आगळ्यावेगळ्या होळीची कथा, जी आजही प्रेरणा देत रहाते…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

उत्तर प्रदेशातील कानपूर हे शहर ज्या प्रमाणे त्याच्या विविध वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहे, तसंच ते प्रसिद्ध आहे येथे खेळल्या जाणाऱ्या होळीमुळे!

मुख्य गोष्ट म्हणजे या होळीमागे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक कथा आहे.

 

ganga-mela-marathipizza01
youtube.com

असं म्हणतात की जेव्हा संपूर्ण भारतात इंग्रजांविरोधात संग्राम चालू होता आणि इंग्रजांनी भारतीयांना आपला गुलाम करून ठेवले होते, तेव्हा कानपूर मधील काही क्रांतिकारकांनी इंग्रजांना न जुमानता कानपूरच्या हटीया बाजार मध्ये होळीचे आयोजन केले आणि होळी खेळता खेळता भारतीय तिरंगा देखील फडकवला.

या कृतीने चिडलेल्या इंग्रजांनी ४० क्रांतीकारकांना पकडून तुरुंगात टाकले. त्यांना सोडवण्यासाठी तेव्हा संपूर्ण कानपूर एकत्र आले. कानपूरकरांचा तो रोष पाहून इंग्रज पुरते हादरले होते.

तेव्हापासून अनुराधा नक्षत्राच्या दिवशी येथे होळी खेळली जाते, जी हटीया गंगा मेला म्हणून प्रसिद्ध आहे. चला जाणून घेऊया ती पूर्ण कहाणी!

१९४२ साल सुरु होते. संपूर्ण भारताप्रमाणे कानपूर मध्ये देखील क्रांतिकारी घडत होते. इंग्रजांच्या जाचाला ते जमेल तसे आव्हान देत होते.

इंग्रजांना अजून डिवचावे म्हणून हटीया बाजाराच्या मोहल्ल्याच्या राजन बाबू पार्क मध्ये तरुण क्रांतिकारकांनी होळीचे आयोजन केले आणि त्या होळीमध्ये तिरंगा फडकावून इंग्रजांच्या जखमेवर मीठ चोळले.

झालं…जे अपेक्षित होतं तेच झालं. इंग्रजांना या होळीची आणि त्यात फडकावलेल्या तिरंग्याची बातमी मिळाली.

एक डझन पेक्षा जास्त इंग्रज शिपाई घोड्यावर स्वार होऊन हटीया बाजारात पोहोचले, त्यांनी तिरंगा खाली घेण्याचा आदेश दिला. पण आपले क्रांतिकारी देखील तयार होते. ते थेट इंग्रजांना जाऊन भिडले.

 

ganga-mela-marathipizza02
techicy.com

इंग्रजांनी गुलाबचंद्र सेठ, बुद्धूलाल मेहरोत्रा, नवीन शर्मा, विश्वनाथ टंडन, हमीद खान, गिरीधर शर्मा सहित इतर ३५ क्रांतीकारकांना तुरुंगात डांबले.

इंग्रजांच्या या कारवाईचा निषेध म्हणून सर्व कानपूरवासी एकत्र आले आणि त्यांनी कडकडीत बंद पाळला. मजूर, साहित्यिक, गरीब, श्रीमंत प्रत्येक भारतीय व्यक्तीने स्वत: आंदोलन सुरु केले. हे आंदोलनचे लोण हळूहळू कानपूरच्या इतर भागातही पसरले. सगळ कानपूर ठप्प झालं.

क्रांतिकारकांची हि अटक आता इंग्रजांच्याच अंगाशी आली होती. काहींनी तर हटीया बाजारातच धरणे आंदोलन सुरु केलं. इंग्रजाचा कारभार बंद पडला. पंडित नेहरू आणि महात्मा गांधी यांनी देखील या तीव्र आंदोलनाला समर्थन दिले.

सतत चार दिवस कानपूर जणू मृत झालं होतं. चौथ्या दिवशी एक मोठा इंग्रजी अधिकारी कानपूर मध्ये हजर झाला. त्याने सर्वांसमवेत चर्चा केली आणि त्याला त्यावर एकच उपाय सापडला – तो म्हणजे त्या क्रांतीकारकांना सोडून देणे! तरच हे आंदोलन शमणार होते…!

पाचव्या दिवशी, त्या अधिकाऱ्याने सर्व ४० क्रांतीकारकांना सोडून दिले…!

होळी खेळताना अटक झालेल्या त्या क्रांतिकारकांच्या चेहऱ्यावर अजूनही रंग होता. कानपूर वासियांनी त्यांची मोठी जंगी मिरवणूक काढली. हि मिरवणूक हटीया बाजारात येऊन समाप्त झाली आणि आनंद साजरा करावा म्हणून पुन्हा एकदा होळी खेळण्यात अली.

 

ganga-mela-marathipizza03
techicy.com

तेव्हापासून सुरु झालेली परंपरा आजतागायत सुरु आहे.

दर वर्षी अनुराधा नक्षत्राच्या दिवशी संपूर्ण कानपूर मधील लोक एकत्र येतात. या दिवशी मोठी मिरवणूक काढली जाते आणि त्यानंतर संध्याकाळी सरसैया घाटावर गंगा मेलाचे आयोजन केले जाते. या गंगा मेला मध्ये सर्व जण मोठ्या उत्साहात होळी साजरी करतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?