Site icon InMarathi

“शेयरिंग” आजही “मिसिंग”च आहे!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

आपण शेयर मार्केट मधले शेयर्स किंवा खाण्याचं शेयरिंग याबद्दल बरच ऐकलंही असेल आणि आणि स्वतः केलंही असेल, पण मला एका वेगळ्याच शेयरिंगबद्दल बोलायचं आहे.सहसा इतकं महत्व याला दिलं जात नाही.

आपण रोज वेगवेगळे चांगले /वाईट , सुखद/दुःखद , अनुभव घेत असतो, शिकत असतो, नवीन काही ऐकत असतो, बघत असतो आणि या सगळयाने आपल्या डोक्यात बरेच विचारही येत असतात आणि याच विचारातून वेगवेगळया भावानांचा जन्म होत असतो. याच भावना एखाद्याचा स्वभाव बनवत असतात आणि जी भावना जास्त प्रभावी तसा त्या व्यक्तीचा स्वभाव अनुभवास येत जातो. आनंद, राग, दुःख, प्रेम, त्वेष, मत्सर,लोभी वृत्ती,चिडचिडेपणा इ. भावना होतं.

steadyhealth.com

पूर्वीच्या काळी कमी शिक्षणापायी स्त्रीयांना, कनिष्ठांना त्यांची मतं, मनातल्या गोष्टी, त्यांचे एखाद्या गोष्टीवरील अनुभव कुणाशी “शेयर”करण्याची मुभा नव्हती आणि आज शहरीकरण, विभक्त कुटुंब पद्धती, घरी सगळे (नवरा ,बायको आणि अपवादाने सासू सासरे सोबत राहत असतील तर तेही) उच्चशिक्षित असल्यामुळे शक्यतो नोकरी करणारे, तेही MNC कंपनी मधे दिवसातले 10-12 तास राबवुन घेणारे, अगदी एकत्र जेवणाचं म्हटलं तरी तसा” बेत” बनवावा लागतो. का? तर काळाची गरज, वाढते खर्च, महागाई, स्वतःचं घर बनवण्याचं स्वप्न, मुलांना चांगलं शिक्षण देता यावं यासाठी…!

थोडक्यात काय तर आपलं कुटुंब, सुखी ,समाधानी (आता इथे बऱ्याचदा फक्त भौतिक समाधानाचाच विचार केला जातो) आनंदी आरोग्यदायी रहावं यासाठीच जिवाचा इतका आटापिटा करावा लागतो. आता इथे “शेयरिंग” माहीत आहे, आपले विचार ,मतं ,अनुभव व्यक्त करण्याचं स्वातंत्र्यही आहे पण, पण इथे कुणाकडे “वेळच” नाही आणि त्यामुळे “शेयरिंग” आजही “मिसिंग”च आहे.

त्यामुळेच मानसिक आजारा़ंचे प्रमाणही लहान गावांच्या तुलनेमधे शहरांमधे जास्त आहे आणि परिणामी हेच मानसिक आजार शारीरक आजारांमधे कधी परावर्तित होतात हे कळतही नाही आणि यावर कितीही महागडे उपचार केले तरी आजार पुर्णपणे बरे होताना दिसत नाहीत, कारण कोणताही आजार आजारचं मूळ मानसिकतेत असतं आणि तिकडे इलाज करणं म्हणजे आजही “वेड्याची” लक्षणं मानली जातात.
तर असा हा “शेयरिंगचा” महिमा मी तुमच्याशी “शेयर” करणार आहे. शेयरिंग म्हणजे नेमकं काय? कुठे, कुणाशी, किती, केव्हा कसं करावं हे सगळं तर सांगेनच, पण त्यासोबत आपल्या भावनाचं योग्यरित्या विरेचन कसं करावं की जेणेकरून नकारात्मक भावनांचा प्रभाव आपल्या रोजच्या आयुष्यावर आणि परिणामी आपल्या नातेसबंधावर पडू नये हेही सांगेन.

beliefnet.com

वरती सांगीतल्याप्रमाणे आपल्या अनुभवातून भावना बनतात आणि त्याचे फलद्रुप व्यक्तिमत्वात होत असते तेव्हा “शेयरिंग” म्हणजे आपल्या “भावनांचे शेयरिंग”.

1) “शेयरिंग”चा सर्वात महत्वाचा मुद्दा “शेयरिंग” नेहमी “विश्वासु व्यक्तिशीच” करावं. मग ते तुमचे मित्रमंडळ असेल, आई/वडिल , बहीण/भाऊ असतील किंवा मग वहिनी/मावशी/आत्या किंवा अगदी आजी/आजोबा ही असतील आणि ज्यांचं लग्न झालय त्यांना तर वेगळा “शेयरिंग पार्टनर” शोधायची गरजच नाही.

2) शक्यतो आनंदाचं “शेयरिंग” सगळयांकडून अगदी उत्स्फूर्तपणे होत असतं, पण दुःख/नैराश्य, मानसिक ताण, तणाव, यातना, घुसमट, मानसिकरित्या सलणाऱ्या गोष्टी यांचं “शेयरिंग” होताना दिसत नाही आणि याच भावनाचं विरेचन योग्य रितीने होणं जास्त गरजेचं आहे. त्यासाठी विश्वासु व्यक्तीला आपली मानसिकता, विचार सगळं सांगा “शेयर करा”. प्रसंगी रडा (पुरुषांनी यात कमीपणा वाटून घेवू नये, कारण भावना स्त्री पुरुष दोघांनाही असतात दुःख दोघांनाही होत असतं). मोकळं वाटेल आणि डोकं नव्याने विचार करून कामाला लागेल. अश्यावेळी ऐकणाऱ्याने रडणारया व्यक्तिच्या खांद्यावर/पाठीवर हात ठेवावा पण जबरदस्ती त्याचे रडणे बंद करु नये.

3) रागाचा सामना आपल्याला सगळयात जास्त करावा लागत असेल असं मला वाटतं. जेव्हा आपल्या मनाविरुद्ध काही घडतय असं वाटलं की आपल्याला राग येत असतो, पण दरवेळी तिथल्या तिथे व्यक्त करणं शक्य नसतं (जसं की boss) मग अश्यावेळी घरच्यांवर याचा राग विनाकारण निघतो. त्यापेक्षा “विश्वासु ” व्यक्तिशी शेयर करा किंवा जर खुपच राग आला असेल तर ” उशिला/मऊ गादीला राग कमी होईपर्यंत हाताने ठोसे द्या.” स्त्रीया यासोबतच कणिक तिम्बू शकतात (हवं तितकं हाणा चालेल). हा पण काही चिरणे/कापणे असं काही करू नका.

4) प्रेमाचंही तसच आहे ते योग्य वेळी व्यक्त नाही केलं की मग म्हणत बसायचं आयुष्यभर “सध्या ती काय करते/करतो?”

5) शेवटचा महत्वाचा मुद्दा जे कोणी एकटे राहतात किंवा घरापासून लांब राहतात किंवा कोणी विश्वासू व्यक्ति नाही अश्याना एक उपाय करता येईल. ज्या गोष्टीचा त्रास होतोय, प्रचंड राग आलाय, मानसिक ताण आलाय अश्या गोष्टी एका पानावर जितकं जमेल तितक्या मोठ्या अक्षराने लिहावं त्यावर तेवढीच मोठी फूली/cross मारावी. अगदी राग थोड़ा कमी होईपर्यंत मग या पानाचे जितके जमतील तितके छोटे छोटे तुकडे करावेत आणि जमत असल्यास जाळून टाकावं किंवा कचराकुंडित फेकून द्यावं.

दरवेळी हे उपायच केले पाहिजेत असं नाही थोडं सहन करण्याची क्षमता ठेवावी/वाढवावी.जेव्हा अतिरेक होईल तेव्हाच या उपायांचा वापर करावा. “केव्हा तर जेव्हा मौखिक शेयरिंग शक्य नसेल तर……!”

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version