आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – सुभोध केम्भवी
—
शिकण्याच्या, शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींची गरज आहे काय?
ह्या प्रश्नाचे एक उत्तर असे असू शकेल : ‘वेगवेगळ्या पद्धतींची गरज नाही. एकच पद्धत पुरेशी आहे, पण भरपूर सराव करून घ्यावा. मग सगळी मुले नीट शिकतात. कितीतरी कोचिंग क्लासेस हेच तर करून घेतात.’
पण ह्या प्रश्नाचे अजून एक उत्तर आहे. ते उत्तर अनेक शिक्षकांच्या अनुभवांच्या मदतीने आपल्याला समजू शकेल.
समजा इयत्ता पाचवीचा वर्ग आहे आणि वर्गात वीस मुले आहेत. अशावेळी किमान दोन-तीन पद्धती वापरल्याशिवाय सगळी (किंवा निदान वीसपैकी अठरा) मुले शिकत नाहीत हा अनेक शिक्षकांचा अनुभव आहे.
भरपूर सराव करून घेऊनही शिकत नाहीत. काही मुले तात्पुरती शिकतात पण सराव बंद झाला की शिकलेलं (!) सगळं आठवड्याभरात विसरतात.
मनाविरुद्ध भरपूर सराव करवून घेतला तर? अशावेळी अनेक मुले शिकत तर नाहीतच पण काहीजण शाळेत येणंच बंद करतात.
गणित विषयाचे उदाहरण घेऊया.
गणित शिकवायची रुढ पद्धत काय आहे? शिक्षकांनी एक गणित फळ्यावर सोडवायचे, सोडवताना स्पष्टीकरण द्यायचे मग मुलांनी तशीच काही उदाहरणे सोडवायची. ह्या पद्धतीने किती मुले शिकतात? जी शिकत नाहीत त्यांचे काय?
त्या विद्यार्थ्यांसाठी दुसरी पद्धत हवी. अनुभव असा आहे की तीन-चार पद्धती शिक्षकांना माहित असतील तर किमान नव्वद टक्के मुले नीट शिकली हे उद्दिष्ट्य गाठणे सोपे होते.
वरील उत्तर हे शिक्षकाच्या अनुभवातून आलेलं उत्तर आहे. शिकवण्याच्या पद्धतींबद्दलचं उत्तर आहे हे.
शिकवण्याची पद्धत कशी ठरते? एखादा विषय शिकण्याची मुलाची स्वतःची अशी जी काही पद्धत असते ती नीट वापरली जावी, विकसित व्हावी म्हणून शाळेत शिकवण्याची पद्धत वापरावी लागते. शिकवण्याच्या पद्धती ह्या शिकण्याच्या पद्धतींवरून ठरायला पाहिजेत. शिकण्याच्या पद्धती समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे.
विद्यार्थ्याच्या अनुभव समजून घेतला तर शिकण्याच्या पद्धतींबद्दल काय लक्षात येतं? हे समजून घ्यायला वरच्या उदाहरणातील इयत्ता पाचवीच्या वर्गातील वीस विद्यार्थी लक्षात न घेता एकाच मुलीचा, मानसीचा अनुभव बघुया.
ही मानसी कशी आहे? ती शाळेत बहुतेक परीक्षेत पास होते, काहीवेळा नापास होते. हुशार वगैरे मानली जात नाही.
शाळेत येण्यापूर्वीच मानसी एक भाषा बोलायला नीट शिकली होती. आता ती मित्रमैत्रीणींबरोबर कितीतरी खेळ खेळायला शिकली आहे. आपण फुटबॉल इतरांपेक्षा चांगला खेळू शकतो हे मानसीच्या लक्षात येतं आहे.
तिला कुठली भाजी आवडते ते तिला माहित आहे आणि न आवडणारी भाजीसुद्धा बरेचदा कशीतरी खावी लागते हे ती शिकली आहे. आमटीची चव घेऊन त्यात काय जमलय आणि काय हवं आहे हे ती चटकन सांगते.
पाळलेल्या आणि न पाळलेल्या कुत्र्यांशी कसं वागायचं हे तिला हळूहळू समजतय. पावसाळ्यात आपण व आपलं दप्तर भिजू नये म्हणून कायकाय करता येतं हे तिला ठाऊक आहे आणि एखादा मोबाईल फोन वापरायला मिळाला की त्यातले खेळ कसे शोधायचे आणि कसे खेळायचे हे तर छानच जमतय.
ह्यातलं काहीच ती शाळेच्या वर्गात बसून, पाठ्यपुस्तकातून शिकलेली नाही. हे खास आहेच पण ह्याशिवाय एक महत्त्वाचा मुद्दा आहे इथे.
मोबाइलवरचे गेम्स खेळायला शिकण्यासाठी आणि फुटबॉल खेळायला शिकण्यासाठी दोन वेगळ्या पद्धती, कुवती लागतात. पाळलेल्या कुत्र्यांशी कसं वागायचं हे शिकायला आणि आमटीत काय हवं-नको हे शिकायला दोन वेगळ्या पद्धती, कुवती लागतात.
मानसीचा मेंदू पहा कसा योग्यवेळी योग्य पद्धत, कुवत वापरत हे सगळं बरोबर शिकतोय.
ही ‘शिकण्याच्या पद्धतींमधील विविधता ’ मानसीला फारशी नीट जाणवलेलीही नाही आहे. तिला हे सगळं खेळता खेळता, जगता जगता जमून गेलंय.
अशी ही मानसीसारखी मुलगी इयत्ता नववीत गेल्यावर बहुदा काय होतं? तिला बहुपदींचा गुणाकार-भागाकार तसेच भूमितीतील सिद्धता अजिबात समजत नाही. ती सिद्धता पाठ करते. तिला भौतिकशास्त्र कठीण वाटतं, विज्ञान-गणितात नापास होऊ अशी भीती वाटू लागते. असं कसं होतं?
योग्यवेळी योग्य पद्धत वापरत बरोबर शिकणारा मेंदू आहे ना मानसीकडे? मग हाच मेंदू आता भूमितीतील सिद्धतेबाबत काम करेनासा कसा होतो?
की बहुपदींचा गुणाकार-भागाकार हे विषयघटक अशा मानसीसारख्या सर्वसामान्य मुलांबाबत ‘मेंदूच्या पलिकडले’ असतात? काहीतरी भानगड दिसतेय इथे आणि ती जरा नीट समजून घ्यायचा प्रयत्न करू.
माझ्या अनुभवानुसार वरील भानगडीबद्दलची माझी मते, विचार खाली दिले आहेत. वाचकांनी, पालकांनी पुढील भाग वाचताना आपले अनुभव आठवावेत व आपण सहमत आहोत का ते ठरवत वाचावे.
मानसीने शाळेत इतकी वर्षे कायकाय केलं हे बघितलं तर शाळेत वापरली जाणारी, वेगवेगळे विषय शिकण्याची, सामाईक अशी एक पद्धत लक्षात येईल. त्या पद्धतीचे दोन मुख्य पैलू असे आहेत –
• वर्गात शांत बसून नीट ऐक. पाठ्यपुस्तकही वाच. समजत नाही? गाईड वाच किंवा कोचिंग क्लासला जा.
• पाठ्यपुस्तक वाचताना सर्व समजलं पाहिजेच असं नाही. परिक्षेतील उत्तरे मात्र पाठ्यपुस्तकातील भाषेतच हवीत. परिक्षेपुरता तरी धड्यातला मजकूर लक्षात ठेव.
विषय अनेक पण शिकायची पद्धत साधारणपणे एकच असा शाळेतला प्रकार आणि वेगवेगळ्या पद्धती वापरत हवं ते शिकणारा शाळेबाहेरचा मेंदू ह्यांचे जमत नसावे असे मला वाटते.
हवं ते शिकू दे आणि ते शिकण्याची पद्धतही ‘माझी मलाच’ ठरवू दे अशी मेंदुची ठाम मागणीच आहे बहुतेक.
ही मागणी पूर्ण झाली नाही तर मेंदू नीट शिकत नसणार.
हा अंदाज कसा वाटतोय? तुमचा अनुभव काय सांगतोय?
विद्यार्थी असतानाचा तुमचा अनुभव आठवा. पालक/शिक्षक/मुलांचा हितचिंतक या नात्याने तुमचा आलिकडचा अनुभव काय आहे ते तपासा. तुमचे अनुभव जर ह्या अंदाजाला आधार देणारे असतील तर आपण हा अंदाज तपासून बघू.
वैज्ञानिक पद्धत वापरून असे अंदाज तपासता येतात. त्यासाठी ‘शिकण्याचे प्रयोग’ विचारपूर्वक करायला पाहिजेत. शाळेतील पारंपरिक पद्धतींशी हे प्रयोग बहुदा जुळणार नाहीत. त्याची चिंता करू नये.
मात्र, मुलांच्या शारिरिक, मानसिक आरोग्याबाबत किंवा सुरक्षिततेबाबत तडजोड न करता हे प्रयोग करावेत. प्रयोगशील शिक्षणाचा अनुभव असलेल्या लोकांशी चर्चा करून प्रयोगाचा तपशील ठरवावा.
काही पालकांना वरचा अंदाज मान्य नसेल तर ? त्यांची बाजूही समजून घेऊ. पुढच्या लेखात!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.