' “वंदेमातरम” जरूर म्हणेन – पण…! : एका मुस्लिम बांधवाचं परखड मत – InMarathi

“वंदेमातरम” जरूर म्हणेन – पण…! : एका मुस्लिम बांधवाचं परखड मत

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

अबू आझमींनी केलेल्या वक्तव्यामुळे वंदेमातरम, मुस्लिम समाज ह्यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

ह्या एकंदरीत प्रकरणावर फेसबुकवर श्री मोहसीन शेख ह्यांनी मनमोकळेपणाने मत मांडलं आहे. ती पोस्ट सर्व वाचकांकरिता पुढे देत आहोत.

ह्या पोस्टवर आपलं मत व्यक्त करायचं असेल तर आमच्या फेसबुक पेज – facebook.com/MarathiPizza – वर मेसेज करा. निवडक अभ्यासपूर्ण मताना प्रसिद्धी देण्यात येईल.

===

“वंदे मातरमच्या निमित्ताने”

एका मुस्लिम घरी मी जन्मलो म्हणून मी एक मुस्लिम आहे. यात माझं कर्तृत्व शून्य आहे. पण माझ्या घरी आधीही लिबरल वातावरण होत…आणि आजही आहे. माझ्या मुस्लिम असण्याची जाणीव ना माझ्या आज्याने कधी करून दिली ना कधी वडिलांनी….पण जस कळायला लागलं तस माझं मुस्लिमत्व मला जाणवून द्यायचा तो अधोरेखित करायचा प्रयत्न इथल्या मुस्लिमसकट सर्वच समाजाने केला आहे.

वेळोवेळी इतरांपेक्षा जास्त राष्ट्रभक्ती सिद्ध करायची एक अलिखित सक्ती इथल्या वातावरणात गच्च भरून आहे. सुरवातीच्या काळात मी देखील या सक्तीला बळी पडलो होतो. नंतर मात्र या प्रकारांना मी भीक घालनासा झालो. पेक्षा याला फाट्यावर मारायला शिकलो. मुस्लिम असण्यापेक्षा आपण आधी भारतीय आहोत ही भावना माझ्या पप्पाने, आईने, आज्याने माझ्या मनावर बिंबवली होती.

muslim-marathipizza-01
caravandaily.com

जसा मोठा होऊ लागलो तसा सामाजिक, राजकीय प्रश्नांकडे मी आकर्षित होऊ लागलो. यात कधीच फक्त “मुस्लिम समाजाचे” प्रश्न असा विचार कधी केला नाही. जे काही केलं ते सरसकट फक्त “समाजचे प्रश्न” या प्रमेयाखालीच केलं. तरी मुस्लिम समाजात वाढलो असल्याने आणि या समाजाला जवळून अनुभवलेले असल्याने मुस्लिम समाजाप्रती आपसूकच एक सॉफ्ट कॉर्नर माझ्या मानता होता हे मी मान्य करतो. जसा तो प्रत्येकाच्या मनात आपापल्या जाती धर्माविषयी असतो…!!

एक मुस्लिम म्हणून विचार करत असताना मला कट्टर हिंदुत्वाच्या तलवारी कधी बोचल्या नाहीत, कारण माझी जडणघडण ही बहुसंख्य हिंदू मित्रातच झालेली आहे आणि बहुसंख्य हिंदू हे ” सहिष्णुच” असतात यावर देखील माझा विश्वास आहे..! विश्वास यासाठी की उणापुऱ्या 29 वर्षाच्या आयुष्यात मी मुस्लिम आहे म्हणून मला टाळणारे मित्र मी कधीच पाहिले नाहीत. जे कोणी आहेत…त्यांनी वेळोवेळी जीव ओवाळून टाकाव अशी मदत मला नेहमीच केली आहे. माझी एक्सट्राची देशभक्ती मला या मित्रात कधीच सिद्ध करावी लागली नाही. उलट कोणत्याही कार्यक्रमात, लग्नात, हॉस्पिटल मधल्या प्रॉब्लेम्स मध्ये, कोर्ट कचेरी, यात गरज पडली तेंव्हा ही मुलं “हक्काने”पहिल्यांदा मोहसीन शेख हेच नाव घ्यायची…आणि आजही घेतात.

हा त्यांचा विश्वास माझ्यासाठी म्हणूनच नेहमी महत्वाचा आणि किमती राहिलेला आहे.

आता गेल्या 3-4 वर्षांपासून काही निरीक्षण मी मुस्लिम समाजाचा हिस्सा म्हणून नोंदवली आहेत. यात सर्वात आधी वर सांगितल्याप्रमाणे देशभक्तीचा मुद्दा आहे. “भाई तू मुस्लिम आहेस तर तुला तुझी देशभक्ती इतरांपेक्षा शाटभर का होईना जास्त सिद्ध करावी लागेल…असा पथेटिक नियम इथला कट्टर समाज बनवू पाहतो आहे. ज्याला बहुसंख्य मुस्लिम समाज बळी पडतो आहे…पण असं बळी पडतानाच एक प्रकारचा राग ही इथल्या मुस्लिम समाजात भरला जातोय..!! आणि नेमकं हेच इथल्या दोन्ही बाजूच्या कट्टर नेत्यांना पाहिजे आहे. ज्याला पद्धतशीरपणे इथला मुसलमान बळी पडत आहे…आणि याच सर्वात मोठं कारण लपलेलं आहे त्याच्या शिक्षणाकडील अक्षम्य दुर्लक्षामुळे..! आणि हेच दुसरं निरीक्षण आहे की जे या समाजच्या अधोगतीच प्रमुख कारण बनलं आहे….!

1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुस्लिम समाजापेक्षा वाईट स्थिती असलेल्या दलित समाजाने नेत्रदीपक प्रगती फक्त शिक्षणाच्या जोरावर केली आहे..! स्वतःच्या हक्काची जाणीव आणि त्यासाठी नेमकं काय करावं लागेल हे या समाजाने शिकून घेतलं आहे आणि त्यासाठी कालानुरूप बदल करत हा समाज सदैव शिक्षण आणि एकजुटीच्या जोरावर प्रगती करतोच आहे.

आणि हेच “कालानुरूप” बदलणं मुस्लिम समाज विसरला आहे.

आजही “इजतेमा”च्या नावाखाली लाखोंच्या संख्येने एकत्र येणारा मुस्लिम समाज समाजाच्या छोट्या छोट्या प्रश्नासाठी एकत्र येत नाही हे वास्तव आहे आणि हे अतिशय क्लेशदाई आहे. जुन्या चालीरीती, आणि आंधळा अभिमान यांचं गरजेपेक्षा जास्त अनुकरण आणि जमान्यानुसार न बदलायची ताठर मानसिकता “काळानुरूप” प्रगती करण्यात अडसर ठरत आहेत. पर्यायाने समाज अजूनही “जैसे थे” याच अवस्थेत आहे.

muslim-marathipizza-02
abc.net.a

त्यात सुधारणावादी आणि पुरोगामी विचारांच्या नेतृत्वाची कमी हा देखील एक महत्वाचा घटक ठरतो आहे. 1500 वर्षाच्या इतिहासात छत्रपती शिवराय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज सारखे एकही नेतृत्व या समाजात पुढे आले नाही…ही खेदाची गोष्ट आहे. मुळात मुस्लिम समाज हा अनुकरणप्रिय आहे. त्याला इतक्या वर्षात एकही सर्वमान्य नेतृत्व मिळू नये आश्चर्यकारक वाटते. त्याही पेक्षा असं नेतृत्व बनुच नये अशी काळजी घेणारा एक कट्टर धार्मिक आणि बिनडोक वर्ग या समाजच्या डोक्यावर बसून घेत आहे. यामध्ये प्रामुख्याने मुल्ला मौलवी आणि समाजचे कैवारी म्हणून घेणाऱ्या भामट्या नेतृत्वाचा भरणा आहे. ही जमात समाजाला कधीच मुख्य प्रवाहात येऊ नये यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. अर्थात तुमचं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे यावर बरचस अवलंबून आहे हा भाग वेगळा..!!

तलाक, बुरखा, शरियत, सारख्या विषयावर बोलणारी ही मंडळी समाजाच्या सामाजिक आणि निकडीच्या मुद्द्यावर एकदम शांत असते, पण धार्मिक अस्मितेच्या मुद्द्यावर मात्र हे लोक्स अक्षरशः अंगावर आल्यागत ओरडत असतात.

आजही फळगाड्या लावणाऱ्या, ग्यारेज टाकणाऱ्या व्यवसायात 80%मुस्लिम समाज का अडकून पडला आहे यावर यांच्याकडे उत्तर नसतंं. पण “वंदे मातरम” म्हणायला विरोध आहे असं म्हणत दिवस रात्र ही लोक वेगवेगळ्या न्यूज चॅनेल वर बोंबलत असतात. कारण समाजावर मोनोपॉली ही फक्त “धार्मिक प्रश्नाच्या” आधारानेच राखता येईल…हे या गटाला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच अबू आझमी, ओवेसी सारखी लोक या समाजवर अगदी आरामात राज्य करू शकतात. समाजाच्या शिक्षणावर, रोजगारावर, वर्षानुवर्षे कैदेत सडवल्या जाणाऱ्या तरुणांवर, महिलांच्या प्रश्नांवर, रोजच्या आयुष्यातील साध्या साध्या हक्कावर ही मंडळी तोंड मिटून गप्प असतात, पण धार्मिक चिथावणी देण्यासारखा मुद्दा दिसला की अस्मितेच्या हळ्या देत रिंगणात उतरतात आणि दुर्दैवाने बहुसंख्य मुस्लिम समाज बळी पडतो आणि वर्षानुवर्षे ही सायकल चालतच राहते…आणि राहणार आहे..!

शेवटी,

मुद्दा आहे वंदे मातरम म्हणायचा…

तर मला पर्सनली ते म्हणण्यात काहीच वावग वाटत नाही. पण त्याला ज्या अनुषंगाने म्हणायला लावले जात आहे त्याला मात्र माझा सक्त विरोध आहे. “वंदे मातरम” म्हणूनच जर माझी देशभक्ती सिद्ध होणार असेल तर…

वंदे मातरम म्हणूनच इथल्या मुस्लिम समाजाचे प्रश्न ही प्रेफ्रेंस न सोडवले जातील याची हमी अशी सक्ती करणाऱ्यांनी द्यावी…!! कारण एक वाक्य म्हणूनच जर देशभक्ती सिद्ध करायची असेल तर ती आम्ही हजारवेळा करू….पण त्याचवेळी…मुस्लिम समाजाचे शिक्षणाचे, रोजगाराचे, प्रगतीचे प्रश्न ही तितक्याच तत्परतेने सोडवण्यात यावेत. त्यांना सुरक्षतेची हमी द्यावी…!! कारण फक्त एका वाक्याने त्यांनी आपली देशभक्ती सिद्ध केली आहे..!

अर्थात अशी अपेक्षा करणे योग्य नाही हे मी समजतो…तसाच हा सौदा ही या दोन्हीकडच्या विकृत लोकांना परवडणारा नाही हे ही मी जाणतो…!!

muslim-marathipizza-03
media2.intoday.in

मुळात मुस्लिम समाजाने आता कात टाकली पाहिजे. समाजाच्या मूळ आणि गरजेच्या प्रश्नानेवजी धार्मिक, जातीय प्रश्न विचारणाऱ्या पुढाऱ्यांना जाब विचारला पाहिजे..!! त्याशिवाय मुस्लिम समाजची प्रगती शक्य नाही.

बाकी अबू आझमी, ओवेसी सारख्या लोकांना मी मुस्लिम समाजाचा नेता मानत नाही. ते फक्त मुस्लिम समाजच्या टाळ्यावर बसून लोणी खाणारे भामटे आहेत. त्यांच्या वंदे मातरम न म्हणणाच्या दृष्टिकोनात त्यांना स्वतःचा TRP दिसतो आहे…कारण आंधळेपणाने आपल्या मागे मुस्लिम समाज उभा राहणार याची त्यांना गॅरंटी आहे..!! आणि ही गॅरंटीच त्यांची सत्तास्थान अबाधित राखणार आहेत…!

शेवटी मला अल्लाम्मा इकबालच्या “सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ता हमारा” या ओळी आठवतात. स्वदेशाला सर्व जगाहून चांगलं म्हणणार श्रेष्ठ कवी अल्लाम्मा इकबालने शेवटी पाकिस्तानचा पुरस्कार का गेला…? हा प्रश्न मला सतावत असतो..!

 

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi facebook.com/MarathiPizza । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?