मोदी लाटेच्या अजूनही न ओसरलेल्या प्रभावात टिकून राहण्यासाठी प्रादेशिक पक्ष धडपडत आहेत का?
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
भारतातील दक्षिण भारत भाग सोडला तर बहुतांशी भागात भाजप ला यश मिळते आहे. अनेक लोक भाजप मध्ये जाण्यास आणि त्यांच्या परिवारात हाताला काय लागेल का या अभिलाशेने मैदानात उतरलेले दिसतात. नुकत्याच झालेल्या बिहार च्या राजकीय घडामोडीने तिसऱ्या फ्रंट चे बारा वाजले आहेत व सेक्युलर लोकांचा अचानक प्रेमभंग झाल्याने मळभ आलंय. सर्व करताना नितीश कुमार हे केंद्रस्थानी होते व जणू लालू कुठे अडकत आहेत याची ते वाटच पाहत होते असे सध्या तरी वाटते आहे.
भाजपची ही माया पूर्वीच्या काळात नव्हती, पण ती आता मोदी पर्वात असल्याने भलतीच फोफावलेली वाटते. 2014 साली झालेल्या निवडणुकीत भाजप सोबत असताना देखील नितीश कुमार यांनी मोदींना जोरदार विरोध केला होता. आपल्या पेक्षा ज्युनियर माणूस मुख्यमंत्री असताना प्रधानमंत्री होतो हे त्यांना पटणारे व पचणारे नव्हते. नितीश कुमार व त्यांचा पक्ष हे भाजपच्या सहयोगी पक्षात सहभागी होतील अशी खात्री असतानाच त्यांनी मोठा दंड थोपटून मोदी यांना विरोध केलेला दिसला.
नुकत्याच झालेल्या बिहार राज्याच्या निवडणुकीत नितीश यांनी मोदी लाटेतही मोदी विरोध कायम ठेवून आर जे डी शी युती करून निवडणूक लढवली. भाजपला रोखणे हाच त्या निवडणुकीचा उद्देश होता. निवडणूक निकालानंतर देखील हे स्पष्ट झाले की जर त्यांची मोठी आघाडी नसती तर सर्व इतर पक्ष यांचे तीन तेरा वाजले असते.
सोशल नेटवर्क सकट अनेक गोष्टीवर मोदी लाट आहे. मीडिया ही गप्प वाटते. विरोधी पक्ष क्षीण झाले आहेत. त्यात बिहार नंतर झालेल्या निवडणूकीमध्ये भाजप ने उत्तर प्रदेश व उत्तराखंड मध्ये दणदणीत यश मिळवल्याने कल सर्वत्र भाजप चा दिसतोय. अशा अवस्थेत नितीश कुमार यांनी घेतलेला निर्णय सध्या तरी योग्य वाटायला हवा. भाजपनी ताकद वापरून लालू व परिवाराला कायद्याच्या कचाट्यात अडकवले, त्याच्या फटक्यापासून वाचायला तर नितीश भाजप सोबत गेले नसावेत ना? सामान्य माणसाला याची उत्तरं मिळायला वेळ नक्की जाईल.
महाराष्ट्रात नितीश कुमारांच्या बातमी नंतर मोठी टवाळी सुरू झाली ,अर्थात ही टवाळी शिवसेनेच्या विरोधातली होती. 18 तासाच्या आत नितीश कुमार हे राजीनामा देऊन परत मुख्यमंत्री झाले असताना, सेना नेहमी इशारा देते आहे असे लोकांना सुचवायचे होते. भाजप वगैरे सारख्या पक्षाच्या निशाण्यावर काँग्रेस पेक्षा प्रत्येक राज्यातील विरोधी पक्ष जास्त असावेत असे वाटते. शिवसेना विरोध हा महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख अजेंडा आहे असेच वाटते. नितीश कुमारांच्या पत्रकार परिषदे नंतर महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी घेतलेली पत्रकार परिषद व त्यात आम्ही सेनेसोबत शासनकाळ पूर्ण करू हे ही तितकेच महत्वाचे वचन विधान वाटते.
सध्या महाराष्ट्रातली काय तर सबंध देशातील भाजप ही हिंदुत्ववादी भाजप उरलेली वाटत नाही. काँग्रेस पेक्षाही भारी लोक असतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या सतराशे बी टीम सुद्धा त्यांच्या पक्ष धोरणाबाबत गप्प आहेत. ते ही त्यांच्या शासनाविरोधात बोलत आहेत. आपल्याच विचारांच्या अधिकारी व मंत्र्यांचे पुतळे जाळत आहेत व तरीही बिनदिक्कत त्यात निर्विवाद यश मिळत आहे.
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व त्याचे यश पाहता त्या यशात आपली नौका व स्वतंत्र भूमिका टिकवून तारण्याचे मोठे काम शिवसेनेने केलंय असं म्हंटलं तर वावगं ठरू नये, कारण देशात सर्व रिजनल पक्ष मोदी व भाजप समोर हतबल झालेले असताना रिजनल पक्ष म्हणून शिवसेना जिवंत राहणे व तारणे हे महत्वाचे ठरते. सर्व राज्यात मोदी लाट असताना तो उधळलेला मेरू सेनेनी रोखला होता. त्याचा प्रत्यय बीएमसी निवडणुकीत सुद्धा आलाच. सबंध राज्यात सेनेला तुलनेने कमी यश मिळालेले असले तरी बी एमसी मधली सेना ही अभेद्य दिसते. नितीश यांच्यासारखे पाऊल उचलून त्यांचा कधीच काही फायदा होणार नाही हे देखील सेना नेतृत्वाला समजलेले असावे.
नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपने आघाडी घेतल्याने सातत्याने सेनेवर टीका होत राहिली व विविध इशाऱ्यावर इशारे देऊन सुद्धा सेना बाहेर पडत नसल्याने मोठा वर्ग सेनेवर सातत्याने तुटून पडताना दिसतो आहे,पण यातही अभ्यासावे असेच कौशल्य सेना नेतृत्वाचे दिसते आहे. विरोधाला विरोध व समर्थन ठिकाणी संयमी समर्थन या सेनेच्या भूमिकेमुळे विरोधकच गायब झाल्याचे चित्र आहे.
कदाचीत परत महाराष्ट्रात निवडणूक झाली तर शिवसेना परत क्रमांक दोनचा पक्ष ठरू शकेल व तसे होणे हेच सेनेच्या व महाराष्ट्राच्या हिताचे ठरणार आहे.
भारतीय राजकारणात प्रादेशिक पक्षांची कायम गरज असणार आहे. संस्कृती टिकवण्यासाठी व आपले विचार हे आपल्याच भाषेतून जोपासून ते जगासमोर आणायला प्रादेशिक पक्ष हवेतच. एक देश, एक भाषा, एक टॅक्स या पुढे एक चलन एक कायदा वगैरे दिव्य विचार पाजळून देशाला वेगळे भासवायचा प्रयत्न हा घातक ठरू शकतो. नितीश यांचा संदर्भ देऊन इतकेच सांगावे वाटते को नितीश यांनी जे केले ते योग्य केले व सेना ही सत्तेत राहून विरोध करून जे करते आहे ते योग्यच करते आहे असे म्हणणे क्रमप्राप्त ठरते. देशभरातल्या सध्याच्या नव्या शासकीय धोरणांनी जनतेचं नुकसान होईल की फायदा यावर 4 वर्षांनी कळेल. तूर्तास तरी स्वताचा लालू न होउ देणे हेच अनेकांच्या फायद्याचं दिसतंय.
लेखक राज्य शास्त्राचे अभ्यासक आहेत.
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi