Site icon InMarathi

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम: ‘सर्वसामान्य ते असामान्य’ प्रवासाचा यात्री!

abdul kalam with children inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – केदार गोगरकर 

===

भारताचे ११ वे राष्ट्रपती हे कोणीतरी तर बनणारच होते, म्हणून ‘झालेले’ किंवा ‘कोणीतरी नामधारी म्हणून बनवलेलेे’ असे परंपरागत नव्हे; तर आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत लोकांसाठी जगुन लोकांचेच बनुन राहिलेले असे एक व्यक्तिमव होते कारण ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम होते.

 

 

एका बाजूला शांततेसाठी तरीही शत्रूच्या मनात धडकी भरवणारी पोखरण अणुचाचणी होती, तर दुसरीकड़े “when there is order in the nation then, there is peace in the world”, म्हणत यूरोपियन देशांच्या संसदेत केलेल्या सर्वकालीन सर्वश्रेष्ठ भाषणांपैकी एक असे जागतिक शांततेचे आवाहन करणारे भाषण होते.

E.U.ची संपूर्ण संसद जेव्हा आनंदाने भारावलेल्या अवस्थेत, बराच वेळ टाळ्या पिटत असतांनाच उभी राहून मानवंदना देते होती तेव्हा, “भारताकडून शांततेचा जगाला दिला जाणारा संदेश आणि न्युक्लीअर टेस्ट या दोन्ही परस्पर विरोधाभास असणाऱ्या गोष्टी आहेत”,असे ओरडणाऱ्या पाकिस्तानला आपोआप उत्तर मिळाले.

 

 

या प्रसंगातून एका शांततावाद्याची विविध देशांच्या प्रतिनिधी मनावर, जादू करणाऱ्या वक्तृत्वाची झलकही दिसली आणि strength respects strength only, ह्या वाक्याचा अर्थही कळाला.

पेपर वाटण्यापासून खडतर आयुष्याची सुरवात करणाऱ्या एका व्यक्तीवर जेव्हा जगातील लहानमोठ्या सर्व पेपर्समधे स्तुती करणारे रकानेच्या रकाने लिहून येतात तेव्हा ‘अतिसामान्य ते असामान्य’ या प्रवासाचे ते एक उदाहरण ठरते.

अनेक मार्गदर्शक पुस्तकांतून आशावादी लिखाण करुन जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी आणि युवकांना सत्य, विकास, नीतिमत्ता आणि राष्ट्रनिर्माणाचा मार्ग दाखवणाऱ्या या महापुरुषाचा जन्मदिन १५ ऑक्टोबर हा विश्व विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो तो यासाठीच.

 

 

एकदा डॉ.साहेब मिसाईल चाचणीत इतके रममाण झाले, की स्वतःच्या भाचीचेही लग्न विसरून गेले.

कधी शाळेत जेवणाच्या पंगतीत आनंदाने लहान मुलांना वाढणे, तर कधी आपली खुर्ची इतरांपेक्षा वेगळी आहे, हे आढ़ळल्याने ‘मलाही साधीच खुर्ची द्या’ म्हणत बडेजाव टाळणे.

 

 

अगदी २०१२ ला देशाच्या सर्वोच्च पदाच्या निवडणुकीत ‘राष्ट्रपती पदाबाबत राजकारण होणे योग्य नसून सर्वसंमती असेल, तरच मी उभा राहील’ म्हणत राष्ट्रपतीपदावर सुद्धा पाणी सोडणे.

वयाच्या ८३ व्या वर्षीही युथ आयकॉन असणे किंवा राष्ट्रप्रमुख असतांनाही आपल्यात एक कॉमन मॅन जपणे, असे कितीतरी पैलू आपल्याला डॉ. कलामांनी आधुनिक काळातही एका साधुप्रमाणे निर्मोही आयुष्य व्यतीत केल्याचे दाखले देतात.

 

 

जगातील सर्वश्रेष्ठ संशोधकांपेेकी एक असूनही शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपली ओळख केवळ एक शिक्षकाची रहावी, कारण ‘शिक्षकांची राष्ट्रनिर्माणातील भूमिका अतुलनीय असते’, असे म्हणत ज्ञानदानाच्या पवित्रकार्याचा केलेला योग्य असा गौरव करणे.

नातलग दिल्लीला आल्यावर स्वतःच्या खिशातून केलेला त्यांच्यावरचा खर्च असो किंवा कायम गरजू संस्थाना केलेले आपल्या मासिक मानधनाचे वाटप असो, ही उदाहरणे अगदी सहज सांगतात, की या आदर्श व्यक्तिमत्वाची, ट्रक भरून असणारी एकमेव संपत्ती म्हणजे पुस्तके का होती?

 

 

एकीकडे “स्वप्न म्हणजे ते नाही जे तुम्हाला झोपेत पडते, स्वप्न म्हणजे ते जे तुम्हाला झोपूच देत नाही” म्हणणारे राष्ट्रसमर्पित व्यक्तिमव तर दुसरीकडे, ‘low aim is a crime, स्वप्ने मोठीच बघा आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा’ म्हणणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्व.

‘नि:संशय देशाने सर्वाधिक प्रेम केलेला राष्ट्रपती’ अशी ओळख असणाऱ्या या मिसाईल मॅनच्या आठवणी जनतेच्या मनात कायमच राहतील यावर कोणाचेही दुमत असू शकत नाही.

 

 

‘मी मरेन त्या दिवसाला सुट्टी जाहीर करु नका, तर एक दिवस जास्त काम करा’ म्हणत always nation first हा त्यांच्याच संदेश अंगीकारुन आधुनिक स्वप्नातील भारताचे निर्माण करु शकतो.

भारताच्या या थोर सुपुत्रास  वाहिलेली श्रद्धांजली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version